फाल्गुन वद्य ३०
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
संभाजी राजांचा वध !
शके १६१० च्या फाल्गुन व. ३० रोजीं छत्रपति संभाजी राजे यांचा वध वडू (बुद्रुक) येथें औरंगजेब यानें अत्यंत अमानुषपणें केला ! सुमारें सव्वा महिन्यापूर्वी म्हणजे माघ व. ७ रोजीं मुकर्बखानानें औरंगजेब बादशहाच्या सांगण्यावरुन संभाजी व कलुशा या दोघांना संगमेश्वर येथें कैद केलें होतें. ही बातमी बादशहास कळल्यावर त्यानें विजयोत्सव सुरु केला. फार दिवसांची त्यांची मनीषा पूर्ण होणार होती. लागलीच त्यानें आनंदाप्रीत्यर्थ गुलबर्गा येथील साधूस दहा हजार रुपयांची भेट पाठविली. बादशहा या वेळीं बहादुरगडास होता. संभाजी व कवि कलश येत आहेत असें कळतांच त्यानें हुकूम पाठविला, "संभाजीची धिंड काढीत घेउन या." आणि हुकुमाप्रमाणें मराठ्यांच्या या राजाला चित्रविचित्र पोशाख चढविण्यांत आला, डोक्यावर विदुषकी टोपी घालून तीस घुंगरू लावले, आणि संभाजीला उंटावरुन मिरवीत वाद्यें वाजवीत हमीदुद्दीखानानें बादशहासमोर आणलें. संभाजीचा निकाल कसा लावावा याची सल्लामसलत झाली. "मुसलमानी धर्म स्वीकारुन बादशहाची सेवा कराल तर जीवदान मिळेल" या औरंगजेबाच्या विचारण्याला संभाजींत उसळत राहणार्या हिंदु धर्माच्या अभिमानानें उत्तर दिलें. "मृत्यु किंवा हाल अपेष्टा यांना भिऊन हा शिवाजीचा पुत्र जिवाची पर्वा करणार नाहीं .... बादशहा मला आपली कन्या देऊन जांवई करुन घेत असेल तर मी विचार करीन." याचा परिणाम अपेक्षेप्रमाणें झाला. त्याच रात्रीं संभाजीचे डोळे काढण्यांत आले. कलुशाची जीभ कांपण्यांत आली ! आणि दोघांनाहि ठार करण्याचा हुकूम बादशहानें फर्माविला ! शेवटीं फाल्गुन व. ३० रोजीं संभाजीने व कलुशाचे एक एक अवयव तलवारीने तोडून आणि त्यांचें मांस कुत्र्यास देऊन दोघांचा शिरच्छेद करण्यांत आला ! उभयातांची शिरें पेंढा भरुन कैक दिवस निरनिराळ्या गांवांतून वाद्यें वाजवून मिरवण्यांत आलीं; पुढें तीं फेकून दिल्यानंतर मराठ्यांनीं तुळापूर येथें आणून भीमा-इंद्रायणीच्या संगमावर अग्निसात् केली !
- ११ मार्च १६८९
समाप्त.
N/A
References : N/A
Last Updated : October 05, 2018
TOP