फाल्गुन वद्य ४

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


वि.ना. मंडलीक यांचा जन्म !

शके १७५४ च्या फाल्गुन व. ४ या दिवशीं अव्वल इंग्रजींतील सुप्रसिद्ध सार्वजनिक कार्यकर्ते विश्वनाथ नारायण मंडलीक यांचा जन्म झाला. यांचें जन्मस्थान मुरुड. मुंबईच्या एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्यें चार वर्षे शिक्षण घेतल्यावर कांही वर्ष यांनीं सरकारी नोकरी केली. परंतु पुढें हे वकिली करुं लागले. ‘नेटिव्ह ओपिनियन’ नांवाच्या इंग्रजी-मराठी साप्ताहिकाचे मंडलीक सात वर्षे संपादक होते. मंडलीक यांनीं आपल्या जीवितांत अनेक प्रकारची लोकोपयोगी व शिक्षणोपयोगी कामें केलीं. रॉयल एशियाटिक सोसायटीचे फेलो,मुंबई विद्यापीठाचे फेलो,मुंबई व कलकत्ता कायदे कौन्सिलचे सभासद, सरकारी वकील, इत्यादि अनेक भूमिकांवरुन यांनीं केलेली कामगिरी महनीय अशीच आहे. हिंदी आणि इंग्रज या दोनहि लोकांत रावसाहेब मंडलीक प्रिय होते. “रावसाहेबांनीं सत्याशिवाय कोणाची पर्वा केली नाहीं, मनोदेवतेशिवाय कोणाची पायधरणी केली नाहीं. लोकहिताशिवाय कांही इच्छिलें नाहीं किंवा न्यायरुप कुलदेवतेशिवाय कोणाचा प्रसाद त्यांना रुचला नाहीं. “ मंडलिक यांचा मोठा गुण म्हणजे त्यांचा सत्यशीलतेविषयीं दरारा, मोठमोठे सुद्धां मंडलीकांच्यापुढें वचकून असतात. “मोठें डोकें, रुंद कपाळ, अत्यंत तेजस्वी डोळे, तरतरीत नाक, दृढनिश्चयदर्शक भिवया, गंभीर वृत्ति, गौरवर्ण, व मुखावर असलेली निरामयसूचक लाली यांनीं रावसाहेबांचा चेहरा फार रुबाबदार दिसे. त्यावर विद्वत्तेचें तेज चढलें होतें. विचारीपणा हा जो त्यांचा विशेष गुण त्याचा ठसा चिन्हित झाला होता ... त्यांची वाणी खणखणीत होती. सत्यमार्गानें जाण्याचा त्यांचा जो निश्चय होता त्याप्रमाणें त्यांचें आचरण असल्यामुळें कोणाला केव्हाहि, भिण्याचे त्यांना कारण नसे, त्यामुळें त्यांचा चेहरा निर्भय दिसे.” बोधसार,लक्ष्मीशास्त्र, मराठी हिंदुधर्मशास्त्र, सिंधी भाषेचें लघुव्याकरण, व्यवहारमयूख, इत्यादि यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत.

- ८ मार्च १८३३

N/A

References : N/A
Last Updated : October 05, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP