फाल्गुन वद्य ६

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


संतवर्य एकनाथांचें निर्याण !
शके १५२१ विकारी नाम संवत्सरीं फाल्गुन व. ६ रविवारीं अविंधमय होऊं पाहणार्‍या महाराष्ट्राला शांति, औदार्य, समता, भूतदया, इत्यादि दैवी गुणांनीं प्रसिद्ध होऊन सर्वांभूतीं भगवद्‍भावाची शिकवण देणारे श्रेष्ठ पुरुष एकनाथ याचें निधन दक्षिणच्या काशीस म्हणजे पैठणास झालें. याच फाल्गुन व. ६ ला एकनाथचरित्रांत फार महत्त्व आहे. कारण एकनाथांचे गुरु जनार्दनस्वामी यांचा जन्म, जनार्दनस्वामीस दत्तदर्शन, जनार्दनस्वामींचा नाथांवर अनुग्रह, जनार्दनस्वामींचा देहत्याग, आणि नाथांचे निर्याण या सर्व गोष्टी या एकाच तिथीला झाल्या असल्यामुळें ही तिथि भाविक लोकांत विख्यात होऊन बसली आहे. एकनाथस्वामींच्या भागवत, भावार्थ रामायण, इत्यादि ग्रंथांवर महाराष्ट्रीय जनतेचें अलोट प्रेम आहे. त्यांचीं भजनी भारुडें आजहि लोक आवडीनें गातात. ज्ञानेश्वरी लुप्त होण्याच्या मार्गाला लागली होती ती ज्ञानदेवांच्याच प्रेरणेनें संशोधून तिचा प्रसार नाथांनी महाराष्ट्र देशभर केला. समाजसुधारक म्हणूनहि एकनाथांची ख्याति आहे. भक्तीच्या प्रांतांताच नव्हे तर एरवींहि स्पृश्यास्पृश्य भेद उरतां कामा नये हें तत्त्व त्यांनीं अनेकांचा-विशेषत: स्वत:च्या पुत्राचा - रोष पत्करुन आपल्या आचरणांत उतरवून दाखविलें. आणि - "तो नाथांचा वाडा, ती पूजेंतील कृष्णमूर्ति, तो नाथद्वारींचा रांजण, अखंड अन्नदान व ज्ञानदान यांनीं पावन झालेला तो सभामंडप, नाथांच्या अद्‍भुत शांतीनें शरण येणार्‍या यवनाची ती देवडी, नाथांच्या कीर्तनश्रवणानें सन्मार्गाला लागणार्‍या ‘पिंगला विश्येची’ ती माडी, पितरांसाठीं केलेल्या श्राद्धान्नानें तृप्त केलेला तो महारांचा महारवाडा, कर्मठांच्या संतोषासाठीं नाथांनीं घेतलेली प्रायश्चित्तें, शास्त्रींपंडितांपासून तो महारांमांगांपर्यंत सर्वांच्या उद्धारार्थ अहर्निश केलेले उद्योग या नाथांच्या अलौकिक भूतराधनयज्ञामुळें दीड सहस्त्र वर्ष विद्यापीठ म्हणून गाजलेल्या पैठणास नाथांनीं स्वगुणांनीं धर्मपीठाच्या योग्यतेस चढविलें. -"

- २५ फेब्रुवारी १६००

N/A

References : N/A
Last Updated : October 05, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP