फाल्गुन शुद्ध ४
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
पुरंदर किल्ल्याकडे इंग्रज फौजा !
शके १७४० च्या फाल्गुन शु. ४ रोजीं इंग्रजांच्या फौजा पुरंदर किल्ला घेण्यासाठीं पायथ्यांशीं येऊन ठेपल्या. ख्रिस्ती शकाच्या एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभापासूनच मराठी राज्याएं दैव फिरलें होतें. खंबीरपणानें नेतृत्व स्वीकारील असा कोणीहि पराक्रमी मुत्सद्दी उरलेला नव्हता. ज्यांच्याकडे पाहून दिग्विजय गाजवावयाचे ते बाजीराव तर नालायकपणामुळें निरुपयोगीच बनले होते. आणि त्यांच्या कारकीर्दीत होणार्या सामाजिक विषमतेंतून एक प्रकारची कटुता सर्वत्र निर्माण झाली होती. नको हें स्वराज्य आणि पेशवाई, त्यापेक्षां इंग्रज बरा अशी भावना सर्वत्र व्यक्त केली जात असल्यानें आधुनिक शस्त्रास्त्रांनीं सुसज्ज असणार्या इंग्रज लोकांना या देशांत पाय रोवणें सुलभ झालें. हिंदुस्थानांत शौर्य, पराक्रम, यांची कमतरता होती असे नव्हें, परंतु त्यांचा उपयोग संघटित रीत्या, व स्वार्थत्यागपूर्ण; शत्रूला तोंड देण्यांत करावा अशी राष्ट्रीय भावनाच तेव्हां उत्पन्न होणें अशक्य होतें. सर्वत्र फंदफितुरी आणि अप्रामाणिकपणा भरलेला होता. पेशवाई समाप्त झाल्यावर ‘संपूर्ण राज्याचें सार जें दुर्ग’ याकडे इंग्रजांची सेना वळली व तिनें एकामागून एक असे भराभरा सर्व किल्ले हस्तगत केले. प्रसिद्ध असणारा सिंहगड किल्ला हस्तगत झाल्याबरोबर इंग्रजांचा मोर्चा इतिहासप्रसिद्ध अशा पुरंदर किल्ल्याकडे वळला. उत्तर व दक्षिण या दोनहि दिशांनीं सैन्याच्या तुकड्या येऊन दाखल झाल्या. पुरंदर आणि वजीरगड हे दोनहि किल्ले हस्तगत करावेत म्हणून इंग्रजी फौजा हल्ला करण्यास निघाल्या असतांना त्यांना प्रथम प्रतिकार सासवड येथें झाला. येथील वाड्यांत सिंधी, हिंदुस्थान, अरब अशा निरनिराळ्या जातींचे सुमारें दोनशें लोक होते. त्यांनीं सासवड येथील पेशव्यांच्या भक्कम वाड्याचा आश्रय करुन इंग्रजी सैन्यावर गोळीबार सुरु केला. इंग्रजांना पुढें जाणें अशक्य होतें. वाड्याच्या भिंतीवर इंग्रजांनींहि तोफांचा भडिमार करण्यास सुरुवात केली. त्यापुढें थोड्याशा असणार्या मराठी सैन्याचा कितीसा टिकाव लागणार !
- ११ मार्च १८८८
N/A
References : N/A
Last Updated : October 05, 2018
TOP