फाल्गुन शुद्ध ३

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


(१) सरोजिनी नायडू यांचें निधन !

शके १८७० च्या फाल्गुन शु. ३ रोजीं कॉंग्रेसच्या भूतपूर्व अध्यक्ष, ख्यातनाम कवयित्री, संयुक्त प्रांताच्या पहिल्या स्त्री गव्हर्नर सौ. सरोजिनी नायडू निधन पावल्या. सौ. सरोजिनी नायडू याचा जन्म सन १८७९ च्या १३ फेब्रुवारीस हैद्राबाद येथें झाला. वयाच्या बाराव्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्या इंग्लंडमध्यें शिकण्यास गेल्या. आणि तिकडून परत आल्यावर त्यांनीं सामाजिक आणि राजकीय विषयांवर व्याख्यानें देऊन आपल्या उपजत तेजाचा व कवित्वशक्तिचा योग्य उपयोग हिन्दी जनतेच्या हितासाठीं करण्यास प्रारंभ केला. सन १९१६ च्या लखनौच्या राष्ट्रीय सभेपासून यांनीं स्वत:स त्या कार्यासच वाहून घेतलें. आणि त्यांची देशसेवा मान्य होऊन सन १९२५ मध्यें त्यांना कानपूरच्या राष्ट्रीय सभेचें अध्यक्षस्थानहि मिळालें होतें. सरोजिनी नायडू या उपजतच कवयित्री होत्या. त्यांचा इंग्रजी काव्याची प्रशंसा इंग्रज साहित्यिक एडमंड गॉस, आर्थर, सायमन्स यांनीं केली आहे. यांच्या अमोघ भाषाप्रभुत्वानें आणि प्रतिभासामर्थ्यानें सबंध जगांत भारतास मान प्राप्त झाला आहे. निधनापूर्वी त्या वर्षभर आजारीच होत्या. डोकेंदुखी वाढली म्हणुन आदल्या रात्रीं अकरा वाजतां त्यांना झोंपेचें इंजेक्शन देण्यांत आलें. रात्रीं झोंपहि चांगली लागली. परंतु फाल्गुन शु. ३ रोजीं पहांटे तीनच्या सुमारास खोकल्याची जोराची उबळ येऊन थोड्यांच वेळांत त्यांचा मृत्युहि झाला. सर्व देशांत दु:खमय वातावरण पसरलें. पं. नेहरुंनीं श्रद्धांजलि वाहिली. "सरोजिनी देवी ह्या महान्‍ कार्यासाठीं झटणार्‍या, झगडणार्‍या महान्‍, देशसेविका होत्या. त्यांनीं झुंजारपणें व भरघोसपणें आपलें जीवन घालविले." हिंद सरकारनें पत्रक काढून सौ. नायडू यांचा गौरव केला कीं, " या देशाच्या इतिहासांतील सौ. नायडू यांनीं केलेली सर्वांगीण सेवा शब्दांत नमूद करणें अशक्य आहे. वक्तृत्व,प्रतिभा,विनोदबुद्धि यांच्या बळावर आपलें खाजगी जीवन त्यांना सहज सुखांत घालवितां आलें असतें, पण त्यागबुद्धीनें त्यांनीं स्वातंत्र्यसमरांत उडी घेतली आणि शेवटपर्यंत देशाची सेवाच केली."

- २ मार्च १९४९
--------------------

(२) शरच्चंद्र बोस यांचें निधन !

शके १८७१ च्या फाल्गुन शु. ३ या दिवशीं सुभाषचंद्र बोस यांचे थोरले बंधु, संयुक्त समाजवादी संघटनेचे अध्यक्ष शरच्चंद्र बोस यांचें निधन झालें. शरच्चंद्रांचा जन्म सन १८८९ मध्यें दिनांक ७ सप्टेंबर रोजीं कटक येथें झाला. कलकत्ता येथें शिक्षण पूर्ण करुन पुढील शिक्षण घेण्यास हे इंग्लंडमध्यें गेले. सन १९१३ मध्यें बॅरिस्टरीची पदवी घेऊन हे मायदेशीं परत आले. आणि यांनीं कलकत्ता येथील हायकोर्टात वकिली सुरु केली. कै. देशबंधु चित्तरंजन दास यांच्या देशभक्तीचा परिणाम यांच्या मनावर विशेष झाला. स्वराज्याच्या आंदोलनांत हे त्यांचे उजवे हात होते. कायदेभंगाच्या वेळीं व गेल्या महायुद्धाच्या प्रसंगीं यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. शरच्चंद्र बोस हे कांही काळ बंगाल प्रांतिक कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्षहि होते. सन १९३७ पासून सात आठ वर्षेपर्यंत बंगाल विधिमंडळांत हे विरोधी पक्षाचे नेते म्हणून काम करीत होते. आपल्या पराक्रमी आणि रणझुंजार बंधुंबरोबर (सुभाषचंद्राबरोबर) बाबू शरच्चंद्रहि भारतीय स्वातंत्र्य-संग्रामाच्या आघाडिवरच नेहमीं असत. कॉंग्रेस कार्यकारिणीचे हे कित्येक वर्षे सभासद असले तरीं पुढें कॉंग्रेसशीं यांचा मतभेद झाला; आणि यांनीं कॉंग्रेसविरोधी सर्व डाव्या गटांची संघटना करण्याच्या प्रयत्नास प्रारंभ केला. संयुक्त समाजवादी संघटनेचे ते संस्थापक व अध्यक्ष होते. या संस्थेच्या प्रचारासाठीं त्यांनीं भारतांत एक दौराहि काढला होता. आपल्या युरोपच्या दौर्‍यांत यांनीं इंग्लंड, आयर्लंड, स्वित्झर्लंड इत्यादि देशांना भेटी दिल्या होत्या. शरच्चंद्र बोस यांना शेवटीं हृदयाचा विकार झाला. गेले कांही महिने ते आजारी असले तरी त्यांची प्रकृति सुधारण्याच्या मार्गावर होती. फाल्गुन शु. ३ रोजीं दुपारी तीन वांजतां ‘नेशन’ या आपल्या वृत्तपत्रांतील लेखहि त्यांनी तयार केला. रात्रीं अकरानंतर अंथरुणावर अंग टाकताच त्यांना हृदयविकाराचा एक झटका आला आणि त्यांतच त्यांचें निधन झालें. बंगालमधील एक मुरब्बी वकील, सार्वजनिक कार्यकर्ता, जुन्या पिढीतील देशभक्त गेल्यामुळें भारतांत सर्वत्र हळहळ व्यक्त केली गेली.

- २० फेब्रुआरी १९५०

N/A

References : N/A
Last Updated : October 05, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP