फाल्गुन शुद्ध ९
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
शिवरायांचे आग्र्यास प्रयाण !
शके १५८७ च्या फाल्गुन शु. ९ ला श्रीछत्रपति शिवाजीमहाराजांनीं रायगडावरील सर्व निवडक मंडळींचा निरोप घेऊन पुत्र संभाजी, कांही सोबती व चार हजार स्वार यांच्यासह औरंगजेबाच्या भेटीसाठीं उत्तरेस आग्र्याकडे प्रयाण केलें. जयसिंहाच्या मध्यस्थीनें शिवाजी-औरंगजेब यांच्या भेटीचा योग घडून येणार होता. औरंगजेबाच्या बेइमानीपणाचा लौकिक सर्वत्र पसरला असल्यामुळें शिवाजी सावधच होता. मातु:श्री, गुरु व साधुसंत यांच्या सहवासांत त्यांच्या अंगांत स्वधर्माचें वारें सारखें संचारत असल्यामुळें बादशहाची सेवा करणें ही गोष्ट शिवाजीस अत्यंत तिरस्करणीय वाटत असे. परंतु जयसिंहाची चिकाटी मोठीच होती. ‘बादशहाची मोठी इच्छा आहे कीं, तुम्हांस भेटावें, तुमचा गौरव करावा, तुम्हांस दक्षिणेची सुभेदारी द्यावी ...... ’ इत्यादि वचनें तो शिवाजीस देत होता. शिवाजीनेंहि आपल्या निकटच्या मंडळींत याविषयीं खूप चर्चा केली. ‘सिंहाच्या गुहेंत आपण होऊन जाणें योग्य नाहीं’ असें पुष्कळांचें मत पडलें, पण देवी आणि ज्योतिषी यांनी ‘अवश्य जावें’ असें सांगितले. आणि ‘तुमचे जिवास कोणताहि अपाय होणार नाहीं याबद्दल मी व माझा पुत्र रामसिंह जामीन आहों’ असा करार जयसिंहानें लिहून दिला. अखेर बादशहाच्या भेटीस जाण्याचें शिवरायांनीं ठरविलें. अत्यंत चातुर्यानें आणि दूरदृष्टीनें शिवाजीनें राज्याची व्यवस्था ठरवून दिली. मुख्य कारभार जिजाबाईवर सोंपविण्यांत आला. मोरोपंत प्रधान, मुजुमदार निळो सोनदेव व सेनापति प्रतापराव गुजर यांनी जिजाबाईचे आज्ञेने वागावें असें ठरलें. आपले किल्ले व मुलूख स्वत: एकवार नजरेंत घालून त्यांची जपणूक करण्यास परोपरीनें शिवाजीनं किल्लेदारांना विनविलें. आणि फाल्गुन शु. ९ रोजीं शिवरायांनीं आग्र्यास जाण्यासाठीं प्रयाण केलें. तानाजी मालुसरे, येसाजी कंक, सर्जेराव जेधे, हिरोजी फर्जंद, बाळाजी आवजी, निराजी आवजी, रघुनाथ कोरडे, त्र्यंबकराव डबीर, इत्यादि मंडळी बरोबर होती.
- ५ मार्च १६६६
N/A
References : N/A
Last Updated : October 05, 2018
TOP