फाल्गुन शुद्ध ५
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
नामदार गोखले यांचे निधन !
शके १८३६ च्या फाल्गुन शु. ५ रोजीं भारतांतील सुप्रसिद्ध राजकारणी पुढारी, इंग्रज भाषेंतील जगप्रसिद्ध वक्ते, व सर्व्हंटस् ऑफ इंडिया सोसायटी या संस्थेचे संस्थापक नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचें निधन झालें. चिपळूण तालुक्यांतील ताम्हनमळा येथें शके १७८५ मध्यें गोखले यांचा जन्म झाला. मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजांतून बी.ए. झाल्यानंतर सन १९०२ पर्यंत हे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सभासद व फर्ग्युसन कॉलेजांत गणित, इंग्रजी, अर्थशास्त्र व इतिहास या विषयांचे प्राध्यापक होते. सन १८८७ सालीं हे पुणें सार्वजनिक सभेचे चिटणीस झाले. पुढल्याच वर्षी ‘सुधारक’ या इंग्रजी-मराठी साप्ताहिकाचे संपादक म्हणून गोखले काम पाहूं लागले. सन १८९७ मध्यें गोपाळराव गोखले हे पुण्याच्या डेक्कन सभेचे प्रतिनिधि म्हणून हिंदुस्थानच्या जमाखर्चाची तपासणी करण्यासाठीं म्हणून नेमलेल्या सेल्बी कमिशनपुढें साक्ष देण्यासाठीं इंग्लंडला गेले. तेथें यांनी चांगलाच लौकिक कमाविला. सन १९०२ पासून हे वरिष्ठ कायदे मंडळांत काम पाहत असत. येथें झालेलीं अंदाजपत्रकांतील यांचीं भाषणें माहितीपूर्ण, परिणामकारक, कळकळींची व विद्वात्ताप्रचुर अशीं असत. सन १९०४ मध्यें सरकारनें यांना सी.आय् ई. ही पदवी देऊन यांचा गौरव केला. आदरणीय शिस्तीला धरुन वागणारे नेमस्त म्हणून यांचा लौकिक असला तरी लॉर्ड कर्झन यांचें दडपशाहीचें धोरण, बंगालची फाळणी, युनिव्हर्सिटीच्या कायद्यांत सुधारणा, कलकत्ता कॉर्पोरेशनच्या हक्कावर गदा इत्यादि प्रसंगीं यांचेंहि मन प्रक्षुब्ध होऊन जाई. आणि मग हे म्हणत असत, "जनतेच्या हिताच्या दृष्टीनें नोकरशाहीशीं सहकार्य करणार्या वृत्तीला रामराम ठोकावा लागेल. " यांची अत्यंत महत्त्वाची कामगिरी म्हणजे सन १९०५ सालीं यांनी ‘सर्व्हटस् ऑफ इंडिया सोसायटी’ म्हणजे भारत-*सेवक समाजाची स्थापना केली ही होय. यांचें सार्वजनिक जीवन निष्ठामय व त्यागपूर्ण होतें. अत्यंत कठोर गोष्टी सौम्य शब्दांत पण आधारासहित मांडण्याचें यांचे कौशल्य अनुपम होतें.
- १९ फेब्रुवारी १९१५
N/A
References : N/A
Last Updated : October 05, 2018
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP