फाल्गुन शुद्ध ७
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
जिंजीच्या वेढयाची समाप्ति !
शके १६२० च्या फाल्गुन शु. ७ रोजीं सात वर्षेपर्यंत रेंगाळत राहिलेला जिंजीचा वेढा संपून झुल्फिकारखानास जिंजी हस्तगत झाली ! राजाराम जिंजीस गेला आहे असें पाहून २९-८-१६९० रोजीं झुल्फिकारखानानें जिंजीस वेढा घातला. साताआठ वर्षेपर्यंत अनेक प्रकारचे संग्राम झाले. महाराष्ट्र व जिंजी या दोनहि ठिकाणीं लक्ष पुरवितांना बादशहास नकोसें झालें. आपला मुलगा कामबक्ष व झुल्फिकारखानाचा बाप आसदखान या दोघांना आणखी फौज देऊन बादशहानें जिंजीस पाठविलें. यामुळें फायदा न होतां झुल्फिकारखानास राग येऊन वेढ्याच्या कामांत ढिलाईच निर्माण झाली. इकडे रामचंद्रपंतांनीं संताजी व धनाजी यांचेबरोबर तीस हजार फौज दिली व त्यांना कर्नाटकांत पाठविलें. त्या दोघांनीं मोंगली फौजेचा पराभव केला. बादशहाच्या सैन्यांत फारच अनवस्था माजली. त्यांना दाणावैरणहि मिळण्याची मारामार पडली. कर्नाटकांत सर्वत्र बादशाही फौजेची नाचक्की होऊन मराठ्यांचा अमल सुरु झाला. तरी मोंगल मधून मधून डोके वर काढीतच. सन १६९७ च्या सुमारास झुल्फिकारखानानें पुन: उचल खाऊन वेढ्याच्या कामास जोमानें प्रारंभ केला. जिंजीस राजाराम अडकला गेला. त्याची सुटका आतां होणें जरुरीचें होतें. खंडोबल्लाळानें शिर्के यांना विश्वासांत घेतलें. त्यांची समजूत काढली कीं, "तुमचे हिंदुंच्या दौलतीकरितां आम्ही झटतच आहोंत." दाभोळचें वतन मिळतांच शिर्के राजारामादि मंडळींना मदत करण्यास तयार झाले. मोहितेहि त्यांच्या साह्यास आले व त्यांनीं राजारामास बुरख्याच्या पालखींत बसवून आपल्या आप्तांच्या बायका असें सांगून स्वत:च्या गोटांत आणलें ! त्यानंतर राजाराम वेलोरास आला. तेथून धनाजीनें त्यास महाराष्ट्रात आणले. इकडे फाल्गुन शु. ७ रोजीं जिंजी झुल्फिकारखानाच्या हातीं आली. पण एवढ्या प्रचंड लढ्याचा काय उपयोग ? राजाराम आधींच निघूण गेला होता.
- ७ फेब्रुवारी १६९८
N/A
References : N/A
Last Updated : October 05, 2018
TOP