(१) चितोडचे सौभाग्य गेलें !
शके १४९० च्या फाल्गुन वद्य १२ रोजीं सम्राट अकबर बादशहा यानें रजपुतांचा प्रचंड पराभव करुन चितोडगड आपल्या ताब्यांत आणला. त्या वेळीं चित्तोडच्या राज्यावर उदयसिंह राणा होता. अकबर बादशहानें वयांत आल्यावर साम्राज्य-विस्तारास सुरुवात केली होती. आपल्या बापास संकटकाळीं ज्यांनीं मदत केली नाहीं त्यांना अकबरानें वठणीवर आणलें. अनेक रजपूत राजे त्याचे मांडलिक बनले. पण चितोडगडावर जोंपर्यंत केशरी आदित्यध्वज फडकत आहे तोंपर्यंत अकबराला समाधान नव्हतें. मेवाडचा राणा उदयसिंह अकबराचें स्वामित्व कबूल करीत नव्हता. तेव्हां अकबरानें शके १४८९ मध्यें तीस हजार सेना व मोठा तोफखाना यांच्यासह चितोडवर स्वारी केली. गडाचे दरवाजे फोडण्यास शेंकडों हत्ती आणले होते. अकबराच्या सैन्याचा विस्तार पांच कोसपर्यंत होता. रजपुताचें सैन्य आठ हजारापर्यंत असून जयमल्ल हा कुशल सेनापति होता. अकबर आणि जयमल्ल यांची घनघोर लढाई झाली. त्या वेळीं रजपूत स्त्रियांनींहि मोठा पराक्रम केला. चितोड किल्ल्यावरील सूर्यदरवाजावर सोळा वर्षांचा कोवळा प्रोर वीर पठ्ठा अभिमन्यूच्या शौर्यानें लढला. हातांत तरवार घेऊन त्याची आई त्यास धीर देत होती. "बाळा, चितोडच्या बचावासाठीं आपला निर्वंश झाला तरी चालेल; पण माघार मात्र नको." परंतु शत्रूचें सामर्थ्य अफाट होतें. सहा महिनेपर्यंत रजपुतांनीं तग धरला. शेवटीं दाणागोटा व मनुष्यबळ संपलें. पराजय पावण्यापेक्षां रणांगणावर प्राणार्पण करण्याचा निर्धार रजपूत वीरांनीं केला. शीलरक्षणार्थ शेंकडों स्त्रियांचा जोहार झाल्यावर केशरी पोशाख करुन सर्व वीर मोठ्या गर्जनेंत मोंगल सैन्यावर तुटून पडले. पाय तुटला असतांहि जयमल्ल लढत होता. वीर पठ्ठा व पराक्रमी जयमल्ल यांचे शौर्य पाहून अकबर विस्मित झाला. जयमल्लाला तो ‘संग्राम’ म्हणे आणि ज्या तोफेनें तो मारला गेला तिचें नांवहि पातशहानें ‘संग्राम तोफ’ असें ठेविलें. शेवटीं रजपुतांचा मोड झाला. तीस हजार लोकांची अकबरानें कत्तल केली.
- २५ फेब्रुवारी १५६८
===
(२)"तैसा शिवाजी नृप जिंकवेना !"
शके १५९४ च्या फ़ाल्गुन व १३ रोजी शिवछत्रपतींनी अनाजी पंडित व कोंडाजी खळेकर यांच्या साह्याने पन्हाळ्गड कावीज केला.
सिंह्गड घेतल्यानंतर पन्हाळ्याकडे शिवाजीने लक्ष दिले. आपल्या दोघा साथीदारांना फ़ौज जमवण्यास सांगून गुप्तपणे त्याने मसलतीस सुरुवात केली. शेदोनशे लोक अंधार्या रात्रीच पन्हाळगडाखाली जमले. खालची माणसे फ़ितवुन घेऊन कोंडाजी साठ माणसांनिशी दोरांच्या मदतीनें किल्ल्यावर चढला. कर्णे वाजवून त्यानें सर्वत्र गोंधळ उडविल्यामुळें कोणास कांही सुचेनासें झालें. किल्लेदार ठार झाल्यावर इतर लोक पळून गेले. किल्ला मराठ्यांचे हातांत अनायासेंच आला. शिवाजी महाराजांना हें वर्तमान रायगडावर समजलें तेव्हां ते आनंदित झाले. पन्हाळगड हातींचा गेला, त्यामुळें विजापूर दरबारची फारच गाळण उडाली; त्याचें चित्र तत्कालीन लौकिक पद्यांत दिसून येतें -
" सरित्पतीचें जल मोजवेना । माध्यान्हिचा भास्कर पाहवेना ।
मुष्टीत वैश्वानर बांधवेना । तैसा शिवाजी नृप जिंकवेना ॥"
या पन्हाळगडासंबंधींचें सविस्तर वर्णन जयराम पिंडे यांनीं ‘पर्णाल-पर्वत ग्रहणाख्यान’ नामक संस्कृत काव्यांत केलें आहे. अण्णाजी दत्तो हे एक शिवाजीच्या अष्टप्रधानातील अधिकारी होते. ‘तुम्ही राज्याचे आधारस्तंभ’ असा शिवाजीनें यांचा गौरव केला आहे. त्याचप्रमाणें राज्याभिषेकाच्या वेळीं हे अन्तर्गत व्यवस्थेचे अधिकारी असून छत्र धरण्याचा मान यांच्याकडे होता. त्या वेळीं यांना वस्त्रें, पोषाख, तलवार, कंठी, चौकडा, तुरा, शिरपेच, शिक्के-कट्यार, ढाल, तलवार, हत्ती, घोडा असें देऊन यांचा सत्कार करण्यांत आलेला होता. सालीना दहा हजार होनांची नेमणूक यांना असे. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी कीं, अशा या राष्ट्रसेवकाला संभाजीच्या क्रोधाला बळी पडून सन १६८१ मध्यें हत्तीच्या पायाखालीं तुडवून मरण आलें.
--------------
फाल्गुन व. १३
(३) विष्णुशास्त्री चिपळुणकर यांचें निधन !
शके १८०३ च्या फाल्गुन व. १३ रोजीं अर्वाचीन मराठी वाड्मयांतील प्रसिद्ध निबंधलेखक व टीकाकार विष्णुशास्त्री चिपळुणकर यांचें निधन झाले. अव्वल इंग्रजींतील प्रसिद्ध पंडित कृष्णशास्त्रीं चिपळूणकर यांचे हे ज्येष्ठ चिरंजीव. कॉलेजमध्यें असतांनाच यांना विद्याव्यासंगाचा नाद लागला. वडिलांनीं सुरु केलेल्या रासेलसच्या भाषांतराचें काम पूर्ण करुन विष्णुशास्त्री यांनीं आत्मविश्वास संपादन केला. हे शिक्षण संपल्यावर ‘पूना हायस्कूल’ मध्यें शिक्षकाचें काम पाहूं लागले. पुढें यांची बदली रत्नागिरी हायस्कूलमध्यें झाली. विद्यार्थ्यांच्या मनांत स्वाभिमान निर्माण करुन त्यांना देशभक्तीचे धडे देण्याची महनीय कामगिरी विष्णुशास्त्री करीत होते. सन १८७४ मध्यें त्यांनी आपली प्रसिद्ध अशी निबंधमाला सुरु केली. मराठी भाषेंत एक नवीनच युग सुरु झालें. " यांनीं ओजस्वी लिखाण करुन मराठी भाषा व महाराष्ट्रीय लोक यांच्यांत आत्मविश्वास निर्माण केला. इंग्रजांनीं राजकीय परतंत्रतेबरोबर मानसिक गुलामगिरीही पराकाष्टेची निर्माण केली होती. तिचा प्रतिकार करण्यास तितकाच कठोर हल्ला करणारा पुरुष निर्माण व्हावयास पाहिजे होता. तो चिपळुणकरांच्या रुपानें अवतरला. धर्म, चालीरिती वाड्मय वगैरेंची जितक्या उत्कटतेनें पायमल्ली चालली होती तितक्याच उत्कटतेनें प्रतिहल्ला करणारें चिपळूणकर होते. यांनी देशांतील विचाराची दिशाच बदलण्याचें काम केलें." स्वत्वापासूण भ्रष्ट झालेल्या महाराष्ट्रांत विचारजागृति करुन आत्मनाशापासून परावृत्त करण्याची श्रेष्ठ कामगिरी चिपळूणकर यांनीं केली. निबंधमालेचे आठ वर्षांत एकूण चौर्याऐशीं अंक बाहेर पडले. त्यांत मुख्यत्वेंकरुन भाषाविषय, सामाजिक, राजकीय, वाड्मयीन असेच निबंध असून त्यांच्या वाचनानें पुढें मराठी साहित्यांत एक खंबीर पिढी निर्माण झाली. चित्रशाळा, किताबखाना, केसरी-मराठा, न्यू. इं. स्कूल वगैरे संस्थांना जन्म देऊन विष्णुशास्त्री अवघ्या बत्तिसाव्या वर्षी निधन पावले.
- १७ मार्च १८८२