माघ वद्य ३०
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
औरंगजेब बादशहाचा मृत्यु !
शके १६२८ च्या माघ व. ३० रोजीं मोंगल पातशाहींतील पराक्रमी आणि जबर महत्वाकांक्षीं बादशहा औरंगजेब याचे निधन झालें. महिउद्दीन महंमग औरंगजेब हा शहाजहान बादशहास अर्ज मंदबानू मुमताजमहाल हिचे ठिकाणीं झालेलें सहावें अपत्य होय. पूर्वायुष्यांत अनेक पराक्रम केल्यावर यानें सर्व उत्तरायुष्य दक्षिणेंत खर्च केलें. मराठ्यांशीं यानें केलेला नेटाचा झगडा इतिहासांत प्रसिद्ध आहे. शिवाजी, संभाजी, राजाराम यांचा नायनाट करण्याचे यानें आटोकाट प्रयत्न केले. संभाजी राजांचा भीषण वध करुन यानें मराठ्यांना डिवचलें आणि त्यामुळें त्याच्याच कर्तबगारीस ओहोटी लागली. शेवटीं यानें शाहूकरवी भेदाचा प्रयत्न केला. परंतु त्यांतहि यश न आल्यामुळें हा उदास झाला. अपजयामुळें याचें दुखणें पुन्हा वाढलें, आणि अत्यंत निराशमय आणि दु:खद स्थितींत वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी अहमदनगर येथें औरंगजेब मृत्यु पावला. आपलें राज्य यानें आपल्या तीनहि मुलांना वाटून दिलें. मुलांनीं अंतसमयी जवळ येण्याची परवानगी मागितली तेव्हां बादशहा म्हणाला, "शहाजहान आजारी असतांना जें निमित्त मीं योजिले होतें, तें हेंच. महत्त्वाकांक्षेच्या धुराइतकी दुसरी कोणतीहि हवा रोगकारक व सर्वस्व नाशकारक नाहीं." औरंगजेब मोठा विद्वान होता. स्वत:च्या धर्माचा अभ्यास त्यानें चांगलाच केलेला होता. त्याने ‘फतवा-इ-आलमगिरी’ नांवाचा मुसलमानी कायद्याचा एक उत्कृष्ट ग्रंथ लिहिला आहे. औरंगजेबास कुराण तोंडपाठ येत असे, आणि त्याचा अर्थहि त्यास चांगला समजत असे. हिंदु धर्माबद्दल त्याला मोठा द्वेष वाटे. त्यानें अनेक मंदिरें उध्वस्त करुन त्या ठिकाणीं मशिदी बांधल्या आहेत. कपटी आणि क्रूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या या बादशहानें आपल्या मुलास केलेला उपदेश मननीय आहे; "वाईट माणसांचे तोडीं लागूं नये. बुद्धिमान व सुशील यांची सोबत ठेवावी .... मूर्ख एकांतांत घेऊं नये. विपत्तींत धैर्य धरावें, सांप्रत चांगलीं मनुष्यें फार आहेत त्यांसी संघटन करावें."
- २० फेब्रुवारी १७०७
N/A
References : N/A
Last Updated : October 05, 2018
TOP