माघ शुद्ध ३
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
शनिवारवाड्याचें वैभव !
शके १६५१ च्या माघ शु. ३ रोजीं पुणें येथें पहिल्या बाजीरावाच्या कारकीर्दीत प्रसिद्ध अशा शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली. बाजीराव मधून मधून पुण्यास येत असे तेव्हां त्याचा मुक्काम कसब्यांत धडफळे यांच्या वाड्यांत असे. -" शके १६५० मध्यें पुरातन नदीकिनारा, कोटकिल्ले, हिसार मोगलाई ठाणें होतें. तो कोट बाजीरावांनीं पाडून मैदान केलें आणि मुत्सद्दी वगैरे लोकांस घरें बांधावयास जागा दिली. आणि पूर्वेच्या बाजूस दोन गांव होते ते मोडून कसबा केला. हा कसबा शाहूनें पेशव्यास इनाम दिला. शके १६५१ व मावळ वेसीजवळ जागा घेऊन वाडा बांधावयास आरंभ केला. नवबुरजी कूस वाड्यास घालून आंत इमारत केली -" या वाड्यांत जयपूर येथील कारागिरांकरवीं भिंतीवर सुन्दर चित्रें बाजीरावानें काढून घेतलीं. प्रथमच्या इमारतींत दोन मजले व दोन चौक होते. पुढें नानासाहेब पेशवे यांनी त्यांत अनेक फेरफार करुन तो मोठा केला. कांही भागाचे सहा मजले करुन चार चौक केले. चौक फरसबंदी असून मध्यें कारंजी होतीं. सभोंवतीचा कोट नानासाहेबांनीं सन १७५५ त बांधला तो अद्यापि आहे. महाराष्ट्रांतील सर्व मोठ्या वाड्यांप्रमाणें शनिवारवाड्याचें तोंडहि उत्तरेकडे आहे. त्यासच दिल्ली दरवाजा असें नांव होतें. मराठे सरदारांची दृष्टि नेहमीं उत्तरेस दिल्लीवर खिळून राहिलेली असायची. शिवशाहीच्या पूर्वीपासूनच रामदास बलशाली दैवत हनुमान यासहि हीच प्रार्थना करतात कीं - ‘कोटिच्या कोटि उड्डाणें झेंपावे उत्तरेकडे’ - शनिवारवाडा इंद्रप्रस्थ येथील पुराणप्रसिद्ध वाड्याचे वरहुकूम बांधला आहे. वाड्यांतीले कारंजांपैकी कमलाकृति कारंजें हिंदुस्थानांत सर्वांत मोठें असून त्या कल्पनेचा उगमहि भारतीयच आहे. -" असा उल्लेख या वाड्यासंबंधीं सांपडतो. याच शनवारवाड्यांतून मराठ्यांचे राजकारण चालत असे. येथें अनेक ऐतिहासिक संस्मरणीय अशा घटना घडल्या.
- १० जानेवारी १७३०
N/A
References : N/A
Last Updated : October 04, 2018
TOP