माघ वद्य ३

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


श्रीधरस्वामींची समाधि !

शके १६५१ च्या माघ व. ३ रोजीं राम-कृष्णांच्या कथा अत्यंत रसाळ भाषेंत सांगणारे महाराष्ट्राचे आवडते भक्तकवि श्रीधर यांनी समाधि घेतली. श्रीधरस्वामी हे अत्यंत विद्वान्‍, प्रतिभासंपन्न आणि रसाळ असे ग्रंथकार होऊन गेले. यांच्या काळीं मराठी काव्य पांडित्याकडे झुकल्यामुळे सामान्य जनसमूहापासून तें दुरावू लागलें होतें. पारमार्थिक ज्ञान सामान्य जनतेस समजेल अशा सोप्या भाषेंत सांगण्यासाठीं राम-कृष्णांच्या कथा सुबोध रीतीनें कथन करावयाच्या हा मराठी वाड्मयाचा जीवितहेतु होता. परंतु या वेळीं या हेतूकडे दुर्लक्ष झालें होतें. संस्कृतमिश्र भाषेमुळें मराठी काव्य अवघड होऊन लोकांना अपरिचित होत होतें. श्रीधर कवि हे मात्र अपवादरुपानें आहेत. यांनीं आपल्या ‘हरिविजय’, ‘रामविजय’, ‘पांडवप्रताप’, ‘शिवलीलामृत’ इत्यादि ग्रंथद्वारां महाराष्ट्रांत संस्कृतिप्रसाराचें
कार्य उत्कृष्टपणें केलें आहे. "श्रीधराच्या वाणीची गोडी ज्यानें मुळींच चाखली नाहीं असा अभागी देह महाराष्ट्रांत कोठेंहि सांपडावयाचा नाहीं. आमच्या अठरापगड जातींत सर्वांचा आवडता, संसारतापानें तापलेल्या अनाथांचें मनरंजन करुन त्यांचें चित्त परमेश्वराकडे लावणारा, सर्वांच्या संकटकाळांतला एक तर्‍हेने आधार असा श्रीधरस्वामींशिवाय दुसरा ग्रंथकार नाहीं. नामदेव-तुकारामांचे अभंग फार पसरलेले खरे; पण ते फक्त पुरुषांच्याच सहवासाचे. भजनाचा छंद बायकांना, पतितांना आणि विधवांना किंवा लहान मुलांना आढळत नाहीं. या सर्वांना सारखें अन्नछत्र श्रीधरांचेंच आढळतें. भाषाशुद्ध सरणी, सुबोध व विषयाची मांडणी गोड यामुळें हे ग्रंथ वाचण्यासहि सोपे आहेत .... निर्मळ आयुष्यक्रम, सच्छील वर्तन, शुद्ध अंत:करण, दृढ आत्मविश्वास यांमुळें श्रीधरांचे ग्रंथ लोकांच्या आदरास पात्र झाले आहेत. श्रीधरांची वाणी सर्व संकटांना विसर पाडणारी, श्रमभाग हरणारी, अरसिकांनाहि गुंगवणारी, अनंतरसवाहिनी दु:ख-दारिद्र्य-परिहारिणी अशी आहे. -" श्रीधरांनीं ’श्रीपंढरीमहात्म्य’, ‘मल्हारीविजय’ इत्यादि इतर अनेक ग्रंथ लिहिले आहेत.

- २६ जानेवारी १७३०

N/A

References : N/A
Last Updated : October 05, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP