माघ वद्य ९
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
(१) "गड आला पण सिंह गेला ! "
शके १५९१ च्या माघ व. ९ रोजीं शिवरायांचा विश्वासू सेवक तानाजी मालुसरे हा कोंडाणा किल्ला सर करीत असतां मरण पावला. आपला भाऊ सूर्याजी व वृद्ध शेलार मामा आणि निवडक तीनशें मावळे यांसह तानाजी माघ व. ९ रोजीं काळोख्या रात्रीं सिंहगडच्या पायथ्याशीं आला. किल्ल्यावर बंदोबस्त मोठा चोख असून उदेभान नांवाचा रजपूत राठोड तेथील अधिकारी होता. सिंहगड हस्तगत करणें मोठ्या कष्टाचेंच काम होतें. तानाजीनें आपल्या सैन्याच्या दोन टोळ्या करुन स्वत: एका टोळीसह तो एका अवघड वाटेनें घोरपडीच्या साह्यानें किल्ल्यावर चढला; आणि तेथून दोर सोडून आपल्या सहकार्यांना त्यानें किल्ल्यावर घेतले. किल्ल्यावरील शत्रूला चाहूल लागून ते सावध झाले. आणि लढाईस एकदम सुरुवात झाली. युद्ध मोठ्या निकराचें झालें. थोड्याच वेळांत पन्नास मावळे आणि पांचशे रजपूत ठार झाले. आणि तानाजी व उदेभान यांची समोरांसमोर गांठ पडून दोघांचें द्वंद्व सुरु झालें. एकमेकांवर वार करीत असतां दोघेहि गतप्राण झाले. तानाजी पडला तेव्हां मावळे परत फिरणार तों सूर्याजी कल्याण दरवाजानें आपली टोळी घेऊन आला. मराठ्यांना पुन: हुरुप चढला. शेलार मामानें - ऐंशी वर्षांच्या वृद्धानें सर्व रजपुतांची कत्तल केली. गड ताब्यांत आला. संकेतानुसार किल्ल्यावर गंजी पेटवून शिवरायांना ही विजयाची बातमी कळविण्यात आली. शिवरायांना आनंद झाला. परंतु दुसर्या दिवशीं तानाजीच्या पतनाची हकीकत समजली तेव्हां त्यांना अत्यंत दु:ख होऊन ते उद्गारले, "गड आला पण सिंह गेला !" तानाजी हा उमराठे गांवचा राहणारा. शिवरायांचा हा अत्यंत विश्वासू होता. उदेभानशी लढतांना याची ढाल तुटली तेव्हां तो हाताची ढाल करुन लढला. विशेष नवलाच्या योगायोगाची गोष्ट म्हणजे ज्या माघ व. ९ रोजीं सिंहगड मराठ्यांच्या हातांत आला, त्याच माघ व. ९ रोजीं सुमारें दीडशें वर्षानंतर सिंहगड इंग्रजांच्या ताब्यांत गेला.
- ४ फ्रेब्रुवारी १६७०
-----------------------
(२) रामदासस्वामी यांची समाधी !
शके १६०३ च्या माघ व. ९ रोजीं आपल्या अंगची भगवद्भक्ति ईश्वरोपासनेचें तेज यांच्या जोरावर महाराष्ट्राला प्रपंचविज्ञान शिकवून देणारे विख्यात संत श्रीसमर्थ रामदास स्वामी यांनीं समाधि घेतली. शिवाजीमहाराजांच्या मृत्यूचें वर्तमान समजतांच ‘श्रीची इच्छा’ म्हणून रामदास खोलींत गेले. त्यानीं अन्न खाणें सोडून दिलें. फक्त दुध निर्वाह करुन बाहेरचें हिंडणें-फिरणेंहि बंद केलें. संभाजीनें केलेल्या अनन्वित कृत्यांची हकीगत स्वामींच्या कानांवर आली. त्यांनीं संभाजीला पत्र लिहले, "शिवरायांचे आठवावें रुप । शिवरायाचा आठवावा प्रताप । शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळीं ॥’ असा उपदेश केला. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत होती. माघ व. ९ ला श्रीराममूर्तीस साष्टांग नमस्कार घालून समर्थ मूर्तिसन्मुख भूमीवर बसले. शेवटची वेळ येऊन ठेपली होती. समर्थांनी उपदेश केला -
"माझी काया गेली खरे । परि मी आहें जगदाकारें ।
ऐका स्वहित उत्तरें । सांगेन तीं ।
नका करुं खटपट । पहा माझा ग्रंथ नीट ॥
तेणें सायुज्याची वाट । ठायीं पडे ॥"
शेवटीं स्वामींनी ‘हर हर’ शब्द एकवीस वेळां उच्चारुन ‘श्रीराम’ या शब्दाने बरोबर अवतार समाप्त केला. रामदासांचा जन्म शके १५३० मध्यें रामजन्माच्या दिवशीं झाला. हे गांवचे कुलकर्णी सूर्याजीपंत ठोसर यांचे चिरंजीव. प्रथमपासूनच रामभजनी विरक्त होते. लग्नाच्या वेळीं हे घरांतून पळूण गेले. नाशिकजवळील टाकळी येथे बारा वर्षे यांनीं खडतर तपश्चर्या केली. आणि पुढील बारा वर्षे त्यांनी हिंदुस्थानांत भ्रमण करुन देशस्थिती स्वत:च्या डोळ्यांनी पाहिली व दु:खानें विव्हळ होऊन कृष्णातीरीं लोकजागृति व धर्मप्रसार करणार्या सांप्रदायाची उभारणी केली.
- २२ जानेवारी १६८२
--------------------------
(३) सिंहगडची अद्भुत कथा !
शके १७४० च्या माघ व. ९ रोजीं सिंहगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यांत गेला. सुमारें दीडशें वर्षापूर्वीं याच दिवशीं तानाजीनें आत्मार्पण करुन सिंहगड आपल्या ताब्यांत आणला होता. मराठेशाहीच्या अस्तानंतर राज्याचीं आश्रयस्थानें जे किल्ले ते एकामागून असे घेण्यास इंग्रजांनी सुरुवात केली. किल्ल्याच्या भक्कम भिंती आणि अभेद्य तट प्रामाणिक होते; परंतु माणसांत मात्र फंदफितुरी सर्वत्र माजून राहिली असल्यानें सर्वच राजकीय डोलारा भराभरा कोसळून पडत होता. पेशव्यांचें राज्य नष्ट झाल्याबरोबर इंग्रजांनीं प्रथम आपली दृष्टि सिंहगडाकडे वळवली. शिरवळ, शिवापूरच्या बाजूनें इंग्रज सैन्य सिंहगडाकडे निघालें; आणि पूर्वेकडून, उत्तरेकडून सिंहगडावर तोफा डागल्या गेल्या. तोफांचा भरपूर मारा दोनतीन दिवस झाला. परंतु प्रथम इंग्रजांचा फारसा प्रभाव पडला नाहीं. कॅप्टन डेव्हिस मदतीस आल्यावर वेढ्याच्या कामाला जोरानें सुरुवात झाली. तीन साडेतीन हजार सैन्याचा गराडा सिंहगड हस्तगत करण्यासाठीं प्रयत्न करीत असतां आंतील योजना करुनहि किल्ला हातीं येण्याच रंग दिसेना. किल्ल्यावरील अरब आणि गोसावी प्राणपणानें तानाजीची स्मृति कायम ठेवून लढत होते. शेवटीं माघ व. ९ रोजीं लढाई संपली आणि किल्ला इंग्रजांच्या ताब्यांत गेला ! इतिहासांतील हा योग अपूर्व खराच. ज्या दिवशीं तानाजी मालुसरे यांनी शौर्याची शर्थ केली, आणि शेवटीं आत्मार्पण केलें, वृद्ध शेलार मामांनीं तरूणाला लाजवील असा पराक्रम करुन सिंहगड जिंकून घेतला, त्याच दिवशीं दीडशें वर्षानंतर हा सिंहगड इंग्रजांच्या हातांत गेला. ‘रायगड किल्ल्याचीं दोन स्थित्यंतरें’ नांवाचा एक उत्कृष्ट लेख कै. शिवरामपंत परांजपे यांनीं लिहिला आहे. सिंहगड किल्ला इंग्रजांकडे कसा गेला याचेंहि वर्णन त्यांनीं केलें आहे. ‘सिंहगड किल्ला इंग्रजांकडे कसा गेला याचेंहि वर्णन त्यांनीं केलें आहे. ‘सिंहगड किल्ला इंग्रजांकडे कसा गेला याचेंहि वर्णन त्यांनीं केलें आहे. ‘सिंहगड किल्ल्याईं दोन स्थित्यंतरें’ हि ध्यानांत ठेवण्यासारखीच आहेत.
- १ मार्च १८१८
N/A
References : N/A
Last Updated : October 05, 2018
TOP