(१) भीष्माचार्यांचा अंत !
माघ शु. ८ रोजीं उत्तरायणाची वाट पाहत शरशय्येवर पहुडलेले, कुरुकुलाचे पितामह, कौरव-पांडव यांचे पालनकर्ते, दुर्योधनाचे मंत्री, अलौकिक योद्धे आणि सेनापति, मुत्सद्दी, भक्त, योगी व ज्ञानी अशा भीष्माचार्यांचा अंत झाला. भारतीय युद्ध समाप्त झाल्यानंतर राज्याभिषेक झाल्यावर युधिष्ठिर श्रीकृष्णाच्या भेटीस गेला. त्या वेळीं त्रैलोक्याचा धनी श्रीकृष्ण. ‘भीष्मांचें’ ध्यान करीत होता. त्यानंतर पांडव व श्रीकृष्ण रथांत बसून शरशय्येजवळ आले. श्रीकृष्णाच्या सांगण्यावरुन भीष्मांनीं राजधर्म, क्षत्रियधर्म व नीति यांचा बोध युधिष्ठिरास केला. या बोधामृताचा उपदेश छपन्न दिवस, म्हणजे मरणकालपर्यंत अखंड सुरु होता. महाभारताच्या ‘शांति’ व ‘अनुशासन’ या दोन पर्वात तो उपदेश व्यासांनीं ग्रंथित केला आहे. त्यानंतर सूर्य उत्तर दिशेस वळल्यावर भीष्मांचा अंत नजिक आला. सर्व आप्तेष्ट, उपाध्याय, पांडव, श्रीकृष्ण इत्यादि सर्व भीष्मांच्या शेवटच्या दर्शनास आले. सर्वांचा निरोप घेतल्यावर भीष्मांनीं आपले नेत्र व श्रीकृष्णाकडे वळविलें. श्रीकृष्णानें अनुज्ञा दिली. तेव्हां श्रीकृष्णाचें ध्यान करीत हळूहळू भीष्म आपला प्राणवायु योगबलानें ब्रह्मांडीं नेऊं लागले. शेवटीं मस्तकांतून एक तेजोमय ज्योति बाहेर पडून आकाशांत निघून गेली. भीष्मांचा आत्मा श्रीकृष्णस्वरुपांत मिळून गेला ! भारतांत भीष्मासारखा सर्वगुणसंपन्न पुरुष दुसरा आढळत नाहीं. अलौकिक धैर्य, निष्पाप वर्तन, अचल कर्तव्यनिष्ठा, अनुपमेय सत्य-प्रीति इत्यादि गुण त्यांच्यांत उठावानें दिसून येतात. पित्याच्या सुखासाठीं त्यांनी आमरण ब्रह्मचर्य पाळून राज्य-पत्नीसुखाचा त्याग केला. भावांना, मुलांना, नातवांना शिक्षण दिले, उपदेश केला, युद्धाचे प्रसंगी खराखोटा पक्ष माहीत असूनहि केवळ कर्तव्य म्हणून हा अलौकिक पुरुष कौरवांच्या बाजूनें लढला. या त्यांच्या गुणांना दुसरी तोड नाहीं. आपल्या अंतकाळीं भीष्मांनीं जो उपदेश केला तो भारतीयांना आजहि मोलाचा वाटणारा आहे. सत्यनिष्ठा आणि धर्मप्रीति यायोगेंच सर्वाचें कल्याण आहे असें त्या उपदेशाचें सार होतें.
-----------------
(२) भारताच्या इतिहासांतील सोनेरी पान !
शके १८७१ च्या माघ शु. ८ रोजीं भगवंत सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्याची स्थापना होऊन भरतखंड संपूर्ण स्वतंत्र झालें. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ या लो. टिळकांच्या घोषणेची पूर्तता आज झाली. २६ जानेवारी १९३० या दिवशीं पंडित नेहरुंच्या संदेशानुसार संपूर्ण स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञा सर्व देशभर घेण्यांत आल्या. आणि हजारों लोकांच्या प्रयत्नांनीं, चिकाटीनें, त्यागानें हिंदुस्थानच्या भाग्याचा हा दिवस उजाडला. १५ ऑगस्ट १९४७ रोजीं इंग्रज या देशांतून गेले. आणि भारत देश स्वतंत्र झाला. परंतु माघ शु. ८ या दिवशीं भारतानें स्वत: तयार केलेल्या घटनेनुसार राज्य चालविण्यास प्रारंभ केला. भारताच्या राजधानींत-दिल्लींत अपूर्व सोहळा झाला. भारताचे अखेरचे गव्हर्नर जनरल श्री. राजगोपालाचार्य यांनीं सकाळी दहा वाजून अठरा मिनिटांनीं भरतखंड संपूर्ण, स्वतंत्र व प्रजासत्ताक गणराज्य झाल्याचें घोषित केलें. भारताचे पहिले राष्ट्रपति म्हणून देशरत्न बाबू राजेन्द्रप्रसाद यांनीं शपथ घेतली. याच वेळीं एकतीस तोफांची सलामी होऊन राष्ट्रपतींचा झेंडा फडकू लागला. "पांडवांच्या इंद्रप्रस्थ राजधानीच्या वैभवशाली प्राचीन कालापासून भारताच्या या राजधानीनें वैभवाचे, उन्नतीचे, उत्कर्षाचे, भरभराटीचे किती तरी दिवस पाहिले आहेत. परंतु स्वतंत्र भारताच्या संपूर्ण प्रभुत्वसंपन्न जनतंत्रात्मक गणराज्याच्या प्रस्थापनेचा सूर्योदयाचा हा दिवस दिल्लीच्याच काय पण सर्व भारताच्या इतिहासांत अपूर्व असा आहे." या प्रसंगीं उद्घाटणाच्या वेळीं महामंत्री पं. जवाहरलाल नेहरु यांनीं भारतीय जनतेला संदेश दिला, "हा दिवस भारत आणि भारतीय जनता यांच्या दृष्टीनें अत्यंत महत्त्वाचा आहे. आज मिळालेली दौलत ही मोठ्या जबाबदारीची गोष्ट असून तिला आपण सत्कृत्यांच्या द्वारां डोळ्यांत तेल घालून जपलें पाहिजे. कारण आपले प्रयत्न मंदावल्यास किंवा आपण मार्ग चुकल्यास ती आपल्या हातून निसटण्याचा संभव आहे."
- २६ जानेवारी १९५०