माघ शुद्ध ९
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
राणा संग्रामसिंहाचें निधन !
शके १४५० च्या माघ शु. ९ ला मेवाडचा प्रसिद्ध ऊर्फ राणा संग याचें निधन झालें. हा महाराणा रायमलचा तिसरा पुत्र. गादीवर आल्यापासून याला सतत स्वातंत्र्यासाठीं मोंगलांशीं लढावें लागलें. दिल्लीच्या इब्राहिम लोदीचा यानें घौलपुराजवळ चांगलाच पराभव केला. बाबरास राज्यवर्धनाची इच्छा फार होती. त्यानें या संग्रामसिंहाशीं अनेक लढाया केल्या व प्रत्येक ठिकाणीं बाबर पराजित झाला. शेवटी बाबरानें दारु पिण्याचें सोडून देऊन कुराणाची शपथ घेतली आणि मरेपर्यंत लधावयाचा निश्चय करुन मोठ्या ईर्ष्येनें लढण्यास सुरुवात केली. तोफखान्याच्या जोरावर मुसलमानांनीं रजपुतांना चारहि बाजूंनीं वेढले. संग्रामसिंहाला मर्मस्थानीं बाण लागला आणि तो बेशुद्ध पडला. बाबराचा जय होऊन भारतांत इस्लामी राज्य स्थिर झालें. राणा संग याला मूर्छितावस्थेंतच नेत असतांना बसवा या गांवापांशीं तो सावध झाला. आपणास युद्धभूमींतून परत आणलें याबद्दल त्याला मनस्वी खेद वाटला. आणि तो पुन: युद्धास सिद्ध झाला. पण युद्धविरोधी रजपुतांना ही गोष्ट सहन झाली नाहीं. त्यांनीं राणा संग्रामसिंहाला विषप्रयोग केला. तेव्हां माघ शु. ९ रोजीं हा शूर राजा काल्पी येथें मरण पावला. मरतांना याला फार दु:ख झालें. तो म्हणाला, "बाबराचा पराभव केल्याखेरीजे चित्तोडास पाऊल ठेवावयाचें नाहीं असा माझा निश्चय आहे. चित्तोडचें सिंहासन माझ्यासारख्या रणांगणांतून परत फिरणार्यांसाठीं नसून शत्रुसंहार करुन चित्तोडचा गौरव वाढविणार्या वीरांसाठीं आहे." राणा संग शूर, बुद्धिमान आणि कृतज्ञ होता. गुजराथ, माळवा व दिल्ली येथील सुलतानांचा पराभव करुन यानें महाराणा कुंभ याचें कार्य पुढें नेले. राजनीति आणि धर्म यांचा ज्ञाता म्हणून याचा लौकिक आहे. राणा एका डोळ्यानें अंध, हातानें थोटा, पायानें लंगडा पण मजबूत व धिप्पाड होता.
- ३० जानेवारी १५२८
N/A
References : N/A
Last Updated : October 04, 2018
TOP