माघ वद्य ६
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
कवि दासोपंत यांची समाधि !
शके १५३७ च्या माघ व. ६ ला आंबेजोगाई येथें नृसिंहतीर्थाजवळ प्रसिद्ध साधु कवि दासोपंत यांनीं समाधि घेतली. बिदरच्या बहामनीशाहींत नारायणपेठ गांवीं शके १४७३ मध्यें दिगंबरपंत देशपांडे यांचे पोटी दासोपंतांचा जन्म झाला. बाळपणापासून ते दत्ताचे भक्त होते. त्यांनीं कोणाचीहि ताबेदारी न करितां जन्मभर आंबेजोगाई येथेंच राहून प्रचंड प्रमाणावर लेखनव्यवसाय केला. त्यांनी शंभर ग्रंथ लिहिले आहेत. बृहद्ग्रंथप्रविरता म्हणून मराठी वाड्मयांत ते अद्वितीय आहेत. त्यांची सर्व कविता तीनचार लाखांवर असेल ! ‘गीतार्णव’ हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ. "दासोपंती केला गीतार्णव मानवा सवा लाख" असा यांचा उल्लेख मोरोपंतांनीं केला आहे. एवढा मोठा ग्रंथ मराठी भाषेंत नाहीं. पहिल्या अध्यायाच्या ओव्या ३१३३ असून दुसर्या अध्यायाच्या ओव्या ५६५५ आहेत. ग्रंथ विस्तारानें अफाट असला तरी सुबोध आणि चटकदार आहे. ग्रंथकार अत्यंत विद्वान् व वेदांतवेत्ते असावेत अशी साक्ष या ग्रंथावरुन दिसली तरी त्यांत अवजडपणा, क्लिष्टता आलेली नाहीं. सव्वा लाख ओव्यांचा ग्रंथ लिहिण्यास जी निष्ठा, जोमदारपणा, भाषाप्रभुत्व, आत्मनिष्ठा, इ० श्रेष्ठ गुण लागतात ते दासोपंतांत नि:संशय होते. दासोपंतांच्य ‘ग्रंथराज’ या ग्रंथाची मोठी छाप रामदासांच्या दासबोधावर पडलेली दिसून येते. याशिवाय, पंचीकरण, गीताभाष्य, अनुगीता, दत्तात्रेयमाहात्म्य, पदार्णव, वाक्यवृत्ति,अवधूतराज, इत्यादि अनेक ग्रंथ दासोपंतांनीं लिहिले आहेत. याशिवाय दासोपंतांचीं बरींचशीं पदेंहि रसिकमान्य आहेत. आपल्या एका पदांत दासोपंत शब्याच्या शक्तीचें वर्णन करतात -
"शब्द जेणें पर्वत द्रवती, शशिसूर्य गति विसरती रे, ।
शब्दें थरथरिली मेदिनी जाले तन्मय लोक तीन्ही ।
शब्दें पावकु तोहि निवाला अकालीं धनु वर्षिला ।
सप्तसागर मिळे क्षिती शब्दु आइकोनि येकत्व होती ! "
- २९ जानेवारी १६१६
N/A
References : N/A
Last Updated : October 05, 2018
TOP