माघ वद्य ५
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
सोनोपंत डबीर यांचा मृत्यु !
शके १५८६ च्या माघ व. ५ रोजीं शिवाजीच्या पदरीं असणारे प्रसिद्ध राजनीतिज्ञ सोनाजी विश्वनाथ डबीर यांचें निधन झालें ! सोनोपंत डबीर हे प्रथमपासूनच शिवाजी व जिजाबाई यांचेजवळ होते. हे राजनीतींत फार हुषार होते. शिवराय स्वराज्याच्या मार्गावर होते. सर्वत्र इस्लामी जुलूम सुरु होता. त्यांतून देशाला मुक्त करावें म्हणून शिवाजीचे उद्योग सुरु झाले. रामचंद्रपंत अमात्य म्हणतात : "शककर्ते छत्रपति साहेब यवनाश्रय असतां त्यापासून पुणें आदिकरुन स्वल्प सत्ता स्वतंत्र मागून घेऊन पंधरा वर्षांचें वय असतां त्या दिवसापासून तितकेच स्वल्प मात्र सत्तेवर उद्योग केला. " शिवरायांच्याभोवतीं जिवास जीव देणारे अनेक संवगडी जमले. देशमुखांना आपणांकडे वळवून घेण्यास ज्या कार्यकुशल मुत्सद्यांचा शिवाजीस फार उपयोग झाला त्यास त्यांनीं डबीर हा किताब दिला. डबीर म्हणजे युक्ति जाणणारा. तेच सोनोपंत डबीर होत. मुरार, शहाजहान, औरंगजेब, शाहिस्तेखान, जयसिंग यांकडे वकील म्हणून शिवाजीनें यांनाच पाठविलें. होतें. औरंगजेब दक्षिणेवर स्वारी करण्याची तयारी करीत होता तेव्हां शिवाजीनें अहमदनगरच्या मुल्ताफखान याकडे सोनोपंतांसच पाठविलें होतें. "आदिलशाहीचा कोंकणांतील भाग माझ्याकडे चालविण्याचें आपण वचन देत असाल तर विजापूरच्या युद्धांत मोंगलांस मदत करण्यास मी तयार आहें." याचा जबाब सोनोपंतांनीं आणला कीं, "तुमचे वकिलांनीं आमची खातरी केली. तुमचे मनोगताप्रमाणें बंदर दाभोळ व त्याजखालील मुलूख व किल्ले विजापूरकरांकडील तुमचे हातीं होते, ते तुम्हांस दिल्हे असत. " सोनोपंत डबीर दिल्लीसहि गेले होते. तत्कालीन कवि परमानंद यांना ‘अग्रजन्मा’ म्हणजे ब्राह्मण समजतो. शके १५८६ च्या पौष व. ३० (दि. ६-१-१६६५) रोजीं महाबळेश्वरीं सूर्यग्रहणानिमित्त जिजाबाईंची व सोनोपंतांची तुला झाली असा उल्लेख सांपडतो. पुढें राज्याभिषेकप्रसंगीं त्रिंबकपंतांचे पुत्र रामचंद्रपंत हे सुमंत होते. अशा प्रकारें डबीरांचे घराणें एकनिष्ठपणें शिवाजीजवळ होतें.
- २५ जानेवारी १६६५
N/A
References : N/A
Last Updated : October 05, 2018
TOP