माघ शुद्ध ७
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
सूर्यदेवाचें महात्म्य !
माघ शु. ७ हा दिवस सर्व भारतांत रथसप्तमी म्हणून मानला गेला असून या दिवशीं सर्वत्र भक्तिभावानें सूर्यपूजन होत असतें. पृथ्वीवरील चराचर वस्तूंचें जीवन सूर्यप्रकाशावर अवलंबून असल्याकारणाने प्राचीन लोक सूर्यास देव मानूं लागले. ही सूर्याची उपासना फार प्राचीन काळापासून सुरु आहे. ऋग्वेदामध्यें सूर्य या देवतेच्या अनेक प्रार्थना आहेत - "आकाश म्हणजे अदिति, त्याचा पुत्र सूर्य म्हणजे आदित्य, तो आम्हांस पापमुक्त करो." अशा आशयाच्या प्रार्थना सूत्रांतून आढळतात. सूर्योदय व अस्त या वेळीं सूर्यअर्ध्य देण्याची प्रथा आपल्यांत आहेच. उपनयनाच्या वेळीं बटु हा सूर्याचाच विद्यार्थी मानला गेलेला आहे. इच्छित अन्न देणारी थाळी युधिष्ठिरास सूर्यापासून मिळाली होती. मयूरकवीचा कुष्ठ रोग सूर्योपासनेनें बरा झाला .... यावरुन आर्यावर्तात सूर्यापासनेची चाल पहिल्यापासून होतीसें वाटतें. त्याची पूजा करणार्या पंथास ‘सौर’ पंथ असें नांव मिळालें. रामायण, महाभारतकालीं सूर्याची आयतनें स्वतंत्र मांडून पूजा करीत असत. पुराणकाळीं मूर्तिपूजा सुरु झाल्यावर सूर्याच्याहि मूर्ति शास्त्रशुद्ध पद्धतीनें तयार होऊं लागल्या. ह्यूएनत्संग व आल्बरोनी यांनीं मुलतान येथील प्रसिद्ध सूर्यमंदिर पाहिलें होतें. सतराव्या शतकांत धर्मवेड्या औरंगजेबानें त्याचा विध्वंस केला. ऋग्वेदांतील ‘ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि । धियो यो न: प्रचोदयात्"; " अखिल चराचराला प्रेरणा करणारा जो भगवान् सूर्य त्याचें सर्वांना प्रिय असें जें एक सर्वश्रेष्ठ उज्जवल तेज आहे त्याचें आम्ही ध्यान करतों. तो आमच्या बुद्धीला आणि ध्यानभक्तीला उत्तम रीतीनें प्रेरणा करतो -" हा श्लोक आणि त्याचा अर्थ अत्यंत श्रेष्ठ मानतात, "ज्योतिषां रविरंशुमान" (सर्व ज्योतींत भास्वान् रवि तो मी) या गीतेंतील श्रीकृष्णाच्या सांगण्यावर भारतीयांची श्रद्धा आहे. हिंदुस्थानांत स्थानपरत्वें या तिथीला निरनिराळीं नांवें प्राप्त झालीं आहेत. हा मन्वंतराचा पहिला दिवस असून या दिवशीं भगवान सूर्यनारायण सात घोडे जुंपलेल्या नवीन रथांतून मार्ग आक्रमण करीत असतो.
N/A
References : N/A
Last Updated : October 04, 2018
TOP