रुद्र-शिव-महादेव !
माघ व. १४ हा दिवस सर्व भारतांत शिवाप्रीत्यर्थ महाशिवरात्र म्हणून साजरा केला जातो. विष्णु व शिव ही हिंदूंचीं दैवतें आहेत. शिवाची उपासना वेदकालापासून या देशांत रुढ झाली आहे. ऋग्वेदांत शिवाचा उल्लेख रुद्र या संज्ञेनें आढळतो. कदाचित् मूळची ती एक भीतिदायक अशी शक्ति असावी. चित्त थरारुन सोडणार्या मेघगर्जना, समुद्रांत घडून येणारी प्रचंड खळबळ, महान् वृक्षांचें उन्मीलन, भयंकर भूकंप, उल्कापात, इत्यादि विलक्षण घटनांच्या बुडाशीं एक संहारक शक्ति असावी अशी कल्पना करुन तीस रुद्र असें नांव प्राप्त झालें. आणि ही भयंकर शक्ति कृपावंत व्हावी म्हणून आर्यांना ती अधिकच प्रिय झाली. "जो प्रत्यक्ष पराक्रमच आहे, जो जटाभारांनीं मंडित आहे,आणि ज्याचा आश्रय अखिल वीर करीत असतात, .... त्या दैदिप्यमान, जटाधारी व त्वेषयुक्त रुप धारण करणार्या रुद्रास वंदन असो !" अशा आशयाच्या प्रार्थना ऋग्वेदांत आढळून येतात. त्यानंतरच्या काळांत शिवपूजेची प्रथा चांगल्याच प्रमाणांत विस्तार पावली. अनेक नांवें त्याला प्राप्त होऊन लिंगपूजेचीहि प्रथा रुढ झाली. भारतांत शिवाचे उपासक फारच मोठ्या प्रमाणावर असून प्रत्येक गांवांत एक तरी शंकराचें देवालय असतेंच.
(१) प्रभासपट्टणचा सोमनाथ
(२) श्रीशैल्य मल्लिकार्जुन,
(३) उज्जयिनीचा महाकाल,
(४) नर्मदेंतील ओंकारमांधाता,
(५) हिमालयांतील केदार,
(६) डाकिनी वनांतील भीमाशंकर,
(७) काशी येथील विश्वेश्वर,
(८) नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर,
(९) परळीजवळील वैजनाथ,
(१०) दारुकवनांतील औंढ्या नागनाथ,
(११) सेतुबंध रामेश्वर,
(१२) वेरुळचा घृष्णेश्वर.
ही बारा ज्योतिर्लिंगें भारतांत अत्यंत प्रसिद्ध आहेत. शैव आणि वैष्णव यांचें भांडण आज फारसे तीव्र स्वरुपांत दिसून येत नाहीं. महाराष्ट्रांतील संतांच्या कार्यामुळें हरिहरांतील भेद संपूर्णपणें नष्ट झाला आहे. लिंगायत, वीरशैव, आदि अनेक पंथ निघाले असले तरी त्यांच्या बुडाशी मुळांत एकच ऐक्याची भावना दिसून येते.
-------------------
(२) प्रतापराव गुजराचा आत्मयज्ञ !
शके १५९५ च्या माघ व. १४ रोजीं घटप्रभेच्या उत्तरेस एक मैलावरील नेसरीच्या खिंडींत बहलोलखानांशीं लढत असतां शिवाजीचा प्रसिद्ध वीर प्रतापराव गुजर मारला गेला. सन १६७३ मध्यें पन्हाळगड शिवरायांनीं घेतल्यामुळें विजापूर दरबारांत एकच धांदल उडाली. बहलोलखान फौज घेऊन पन्हाळा हस्तगत करण्यास निघाला. लागलीच शिवाजीनें आनंदराव, विठोजी शिदे, कृष्णाजी भास्कर, विओस बल्लाळ, इत्यादि कल्पक सरदार बरोबर देऊन या मोहिमेवर प्रतापराव गुजरास पाठविलें बहलोलखानाचा संपूर्ण पराभव होऊन खान जिवानिशीं निसटून गेला ही गोष्ट शिवाजीस पसंत पडली नाहीं. खानाचा पाडाव पुरता झाला नाहीं असे शिवाजीचें म्हणणे पडल्यामुळें प्रतापराव त्वेषानें पुन्हा लढण्यास निघाला. त्यानें बहलोलखानास गडहिंग्लजजवळ घटप्रभेच्या तीरावर गांठलें. खान निसटून जाऊं नये म्हणून अवघ्या सहा स्वारांनिशींच प्रतापराव अविचारानें खानावर चालून गेला ! खानाच्या मोठ्या फौजेपुढें त्यांचा टिकाव कसा लागणार ? सातहि सरदार थोड्याच वेळांत कापले गेले. स्वामींचा ठपका अंत:करणास लागूं नये म्हणून प्रतापरावानें आत्मयज्ञ केला ! त्याबद्दल शिवरायांना अत्यंत दु:ख झालें. प्रतापराव गुजराचा हा आत्मयज्ञ मराठ्यांच्या इतिहासांत अत्यंत प्रसिद्ध आहे. उंबराणी येथें याने बहलोलखानाशीं सामना दिला होता. लढाई सूर्योदयापासून अस्तमानापर्यंत झाली. दोहोंकडील लष्कर बहुत जाया जालें. नबाब (बहलोलखान) याची शिकस्त होऊन तिकोट्यास राहिले. पाण्याशिवाय खान घाबरा झाला, तेव्हां शिवाजीच्या मुलखास हात लावणार नाहीं, असें त्याने प्रतापराव गुजरास आश्वासन दिलें. परंतु पुढें खानास विजापूरचा आश्रय मिळाल्याबरोबर तो पुन्हा प्रतापरावावर चालून आला. आणि या लढाईंत नेसरी येथें प्रतापराव कामास आला. खिंडींत सहा घोडेस्वारांनिशीं हा एकटा लढत होता; अर्थातच त्याचा टिकाव लागला नाहीं. प्रतापरावास प्रथम कडतोजी असें म्हणत असत. पण यानें मोठी योग्यता मिळविली म्हणून यास प्रतापराव नांव मिळालें.
- २४ फेब्रुवारी १६७४