माघ वद्य १०
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
प. पू.गोळवलकर यांचा जन्म !
शके १८२८ च्या माघ व. १० रोजीं रामचंद्रांच्या वास्तव्यानें पुनीत झालेल्या नागपूरनजीकच्या रामटेक गांवीं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री. माधवरावजी गोळवलकर यांचा जन्म झाला. त्यांच्या विलक्षण प्रभावी व्यक्तिमत्त्वाची व कुशाग्र बुद्धिमत्तेची चुणूक त्यांच्या बाल्यावस्थेपासूनच येऊं लागली होती. काशी विश्वविद्यालयांत त्यांचें इंटरमिजिएटनंतरचें शिक्षण झालें, श्री. माधवरावजी शास्त्र, इतिहास, धर्म, संस्कृति नि राजकारण इत्यादींतील कूट-समस्यांचा नि प्रमेयांचा उलगडा करुन घेण्याच्या उद्योगांत रात्रंदिवस गर्क असत. वयाच्या एकविसाव्या वर्षी म्हणजे १९२७ मध्यें ते एम्. एस् सी झाले आणि त्यानंतर संपूर्ण चार वर्षे त्यांनीं जगाच्या भौतिक व्यवहाराचा संबंध सोडला. योगाभ्यासांत त्यांनीं खर्च केलेल्या या चार वर्षांमुळें त्यांच्या वैयक्तिक जीवनांत क्रांति घडून तर आलीच, परंतु ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते पुढें घटक झाले त्यांच्या स्वयंसेवकांपुढें नवा तेजस्वी नि नि:स्वार्थी आदर्श त्यामुळें निर्माण झाला. ..... सन १९३१ मध्यें बनारस हिंदु विद्यापीठांत ते प्राध्यापक झाल्यापासून ‘गुरुजी’ या आवडत्या नांवानें विद्यार्थी त्यांना संबोधू लागले. त्यांच्याइतका विद्यार्थीप्रिय प्राध्यापक बनारस हिंदु विद्यापीठाच्या आजपर्यंतच्या इतिहासांत सांपडणें विरळा ... काशीमधील या कालात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नि त्यांचा संबंध आला. संघाच्या विचारसरणीचें व आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवारांच्या कार्यपद्धतीचें त्यांनीं अत्यंत कसून परीक्षण केलें व ते संघाचे घटक बनले. विद्यापीठ सोडून १९३३ मध्यें नागपूरला आल्यावर डॉक्टर हेडगेवारांच्या आग्रहानुसार ते एल् एल् बी. झाले. सन १९३६ मध्यें त्यांनीं संघाच्या अधिकारी-शिक्षण-वर्गात एक स्वयंसेवक म्हणून शिक्षण घेतलें व संघप्रचारार्थ बंगाल प्रांत गांठला. त्यानंतर ते संघाचे सरकार्यवाह झाले व पुढें १९४० च्या २१ जूनला परमपूजनीय डॉ. हेडगेवारांचें निधन झाल्यावर सरसंघचालकत्वहि त्यांच्याकडेच आलें.
- ८ फेब्रुवारी १९०७
N/A
References : N/A
Last Updated : October 05, 2018
TOP