(१) उद्गीरच्या लढाईंत निजामाचा पराभव !
शके १६८१ च्या माघ व. २ ला उद्गीर येथें मराठ्यांनीं निजामाचा प्रचंड पराभव केला. महाराष्ट्राच्या इतिहासांत निजामाचें प्रकरण कायमचें भानगडीचें म्हणून टिकलें आहे. पूर्व महाराष्ट्राचा भाग निजामाच्या ताब्यांत असून निजाम दिल्लीच्या बादशहाचा दक्षिणेंतील प्रतिनिधि म्हणून काम पहात असे. दक्षिणेंतील कर्नाटकावर कोणीं हक्क गाजवावा यासंबंधीं निजाम-मराठे यांमध्यें सतराव्या शतकांत वाद सुरु होतेच. शके १६८२ मध्यें पानिपतचें युद्ध झालें. तत्पूर्वी उत्तर भारतांत अनेक घडामोडी झाल्या, त्याचप्रमाणें दक्षिणेंत कर्नाटकावर स्वामित्व बसविण्यास मराठ्यांची खटपट यशास पावत होती. शके १६८१ च्या सुमारास निजाम अल्ली कारभारावर होता. दोन वर्षापूर्वी शिंदखेड येथें ठरल्याप्रमाणें पंचवीस लक्षांचा मुलूख मराठ्यांना यावयाचा, पण तो अजून हवालीं झाला नव्हता. मोठ्या प्रयत्नांनीं अहमदनगरचा किल्ला मराठ्यांना मिळाला. निजामअल्ली लागलीच लढण्यास सिद्ध झाला. फौजा तयार केल्या. मराठ्यांच्या तर्फे सदाशिवराव, रघुनाथराव, विश्वासराव असे त्रिवर्ग आपल्या सैन्यासह हजर होतेच. उदगीर येथें दोनहि सैन्यांची गांठ पडली. "युद्धप्रसंग बराच झाला. मोंगलाकडील दोनतीन मातबर सरदार पडले, सरकारच्या फौजा चौगीर्द चालतात, दाणा वैरण त्यास मिळूं देत नाहींत. त्याजकडे दाणावैरणींचा आकांत आहे .... तोफांच्या मारानें मागें रेटीत रेटीत औंसा किल्ला येथें नबाब पोंचल्यावर भाऊसाहेब व विश्वासराव यांनीं दोन प्रहरच्या समयांत मोंगलांवर हल्ला केला. तोफा बंदुकांचा मार अतिशय केला. उजवीकडून भाऊसाहेब व रावसाहेब व डावेकडून दादासाहेब खासे मारामार करीत खाशांचे हौद्यापर्यंत पोंचले, एक प्रहरपर्यंत उत्तम युद्ध झालें. मोंगल कचरला, हिंमत सोडली. बहुत लोक पडले, व जखमी झाले; मोंगलानें जवळ येऊन मुक्काम केला ... बहुत संतोष झाला." निजाम व मराठे यांचा तह होऊन साठ लक्षांचा मुलूख व किल्ले मराठ्यांना मिळाले.
- ३ फेब्रुवारी १७६०
-----------------------
(२) सयाजीराव गायकवाड यांचें निधन !
शके १८६० च्या माघ व. २ रोजीं जगप्रसिद्ध असलेले राज्यव्यवस्थापक, ज्ञानोपासक व समाजसुधारक, बडोदा राज्याचे अधिपति महाराज सयाजीराव खंडेराव गायकवाड यांचें निधन झालें. कवळण्याच्या काशिराव गायकवाडांचे हे चिरंजीव. यांना कै. खंडेराव गायकवाडाच्या पत्नी जमनाबाई यानीं दत्तक घेतलें. वयाच्या बाराव्या वर्षी खेडेगांव सोडून आलेला अज्ञान मुलगा बडोद्यास आल्यावर अठराव्या वर्षी राज्यकारभार पाहूं लागला. यांचें शिक्षण मातोश्री जमनाबाई, दिवाण सर टी. माधवराव व. मि. इलियट यांच्या नेतृत्वाखालीं सुरु झालें. यांनीं आपल्या राज्याची सर्वांगीण सुधारणा केली. सर्व राज्याची स्वत: पाहणी केली आणि राज्यकारभार करण्यासाठीं अधिकार्यांचें सल्लामसलत मंडळ नेमले. वरिष्ठ इंग्रजी राजसत्तेशी यांना सतत झगडावें लागलें. हे मोठे स्वाभिमानी होते. व्हाइसरॉयच्या परवानगीशिवाय संस्थानिकांनीं परदेशीं जाऊं नये, सातव्या एडवर्डच्या राज्यरोहणानिमित्त दिल्लींतील मिरवणुकींत संस्थानिकांनीं सामील व्हावें, इत्यादि इंग्रज सरकारच्या आग्रहाबद्दल यांनीं वेळोवेळीं आपली नापसंती तीव्र शब्दांत व्यक्त केली. सयाजीराव प्रजेंत अत्यंत प्रिय झाले होते. शिक्षणाची सुधारणा यांनीं मोठीच केली. राज्यावर आले तेव्हां अवघ्या एकशें ऐंशी शाळा राज्यांत होत्या, परंतु नंतर यांच्या प्रयत्नामुळें २५३९ शाळा चालू झाल्या. साहित्यनिर्मितीस मदत देण्यासाठीं यांनीं मोठा उदारपणा दाखविला. यांनीं समाजसुधारणाहि सर्वांच्या प्रथम आपल्या राज्यांत केली. मिश्रविवाह, पडदापद्धतिबंदी, बालविवाह-बंदी, विधवाविवाह, अस्पृश्यतानिवारण, इत्यादि सुधारणा यांनीं अमलांत आणल्या. सन १९०४ सालीं हे राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्षहि होते. यांनीं चीन, जपान, अमेरिका व युरोप येथील प्रवास केलेला असल्यामुळें यांची दृष्टि अधिक विशाल व उदार झाली होती. "सतत ध्येयवादानें आणि संग्राहक बुद्धीनें वागून यांनी आपला उत्कर्ष साधला, आपल्या प्रजेचें कल्याण केलें, मराठ्यांच्या उज्जवल इतिहासांत भर घातली आणि जगांतील एक कर्तबगार व यशस्वी महाराजा म्हणून अलौकिक कीर्ति सयाजीरावांनीं मिळविली."
- ६ फेब्रुवारी १९३९