अगस्त्यगीता - नारदीय पंचरात्र
अगस्त्य, एक वैदिक ॠषि होते. ते वशिष्ठ मुनिंचे वडील बंधू होत. यांचा जन्म श्रावण शुक्ल पंचमी (ई.पू. ३०००) ला काशीमध्ये झाला.
अध्याय सोळावा
नारदीय पंचरात्र
भद्राश्व म्हणाला -
हे धर्मज्ञ ऋषे, तुम्ही जे आश्चर्य पाहिले किंवा ऐकले असेल ते जाणण्यास मी उत्सुक आहे. कृपा करुन मला सांगा. ॥१॥
अगस्त्य म्हणाले -
भगवान जनार्दन हे स्वत:च एक चमत्कार आहेत. त्यांच्यासोबत पाहिलेले चमत्कार पुष्कळ आणि निरनिराळे आहेत. ॥२॥
हे राजा ! जेव्हा नारदमुनी एकदा श्वेतद्वीपाला गेले तेव्हा तेथे त्यांनी शंख, चक्र आणि कमळ धारण केलेले अनेक तेजस्वी पुरूष पाहिले. ॥३॥
त्यांना पाहून नारद विचार करू लागले, यांचेतील विष्णू कोन ? ॥४॥
त्यांच्यात कृष्ण कोण हे त्यांना समजेना. शंख, चक्र, गदा धारणकर्त्या कृष्णाची मी कशी आराधना करू ? ॥५॥
असे गोंधळल्यावर त्याने कृष्णरूपी नारायणाचे ध्यान सुरु केले. ॥६॥
असे ध्यान एक हजार वर्षे केल्यावर भगवान त्यांच्यावर प्रसन्न झाले. ॥७॥
त्यांच्यासमोर प्रकट होऊन भगवंतांनी त्यांना वर मागण्यास सांगितले. ॥८॥
नारद म्हणाले -
मी तुझे हजार वर्षे ध्यान केले आहे. जर तू मजवर प्रसन्न असशील तर तुझी प्राप्ती मला कशी होईल ते सांग. ॥९॥
भगवान म्हणाले -
हे मुने ! पुरुषसूक्तासह यज्ञ करून जे वेदज्ञान प्राप्त करतात ते मला येऊन मिळतात. ॥१०॥
वेद आणि शास्त्रांच्या अभावात पांचरात्र पद्धतीने जे यज्ञ करतात त्यांना मी प्राप्त होतो. ॥११॥
पांचरात्र केवळ ब्राम्हण, क्षत्रिय आणि वैश्यासाठी आहे. शूद्र आणि इतरांनी देवळात जावे, माझे नाव घ्यावे पण पूजा करू नये असा नियम आहे. हे ऋषे ! मानवसमूहाकरता मी ही गोष्ट फार पूर्वी सांगीतली आहे. ॥१२-१३॥
याचे अनुकरण करून जो माझा भक्त होईल त्याची कर्मफले संपतील, पण हे त्याच्या मनात राहील. ॥१४॥
रज आणि तमाच्या प्राबल्यामुळे जे अन्य भावामध्ये मग्न असतात ते मजप्रती उदासीन असतात. हे नारदा, कृत, त्रेता आणि द्वापर ही तीन युगे आहेत. ॥१५-१६॥
सत्वप्रधान लोक मला येऊन मिळतात पण कलियुगात रजतमाचेच प्राबल्य आहे. हे नारदा, ऐक ! मी तुला अजून एक वर देतो. ॥१७॥
माझा हा दुर्मिळ पांचरात्र सिद्धांत तुला प्रकाशित होईल असा माझा आशीर्वाद आहे. याबद्दल कसलीही शंका नको. ॥१८॥
मी केवळ वेद, पांचरात्र, भक्ती आणि यज्ञ यांद्वारेच प्राप्त होतो. इतर कोणतेही उपाय करोडो वर्षे केले तरी प्राप्त होत नाही. ॥१९॥
नारदाला हे सांगून भगवान अंतर्धान पावले आणि नारदही स्वर्गाकडे निघून गेले. ॥२०॥
अगस्त्यगीतेमधील नारदीएय पंचरात्र नावाचा सोळावा अध्याय समाप्त ॥
N/A
References : N/A
Last Updated : March 04, 2018
TOP