अगस्त्यगीता - सौभाग्यव्रत
अगस्त्य, एक वैदिक ॠषि होते. ते वशिष्ठ मुनिंचे वडील बंधू होत. यांचा जन्म श्रावण शुक्ल पंचमी (ई.पू. ३०००) ला काशीमध्ये झाला.
अध्याय आठवा
सौभाग्यव्रत
अगस्ती म्हणाले -
आता मी तुम्हाला सौभाग्याव्रताविषयी सांगतो, जे केल्यामुळे स्त्रीपुरुषांना लवकर वैभव मिळते. ॥१॥
फाल्गुन मासाच्या शुक्ल तृतीयेस पवित्र शरीर आणि मनाने रात्री हे व्रत करावे. ॥२॥
हरीची लक्ष्मीसहित किंवा रुद्राची उमेसहित पूजा करावी. लक्ष्मी आणि उमा, हरी आणि रुद्र हे एकरुपच आहेत. ॥३॥
शास्त्र पुराणांत असेच सांगितले असून ज्या शास्त्रांत आणि काव्यांत याविरुद्ध सांगितले असेल ते यथार्थ नाही.
विष्णुलाच रुद्र म्हटले पाहिजे आणि लक्ष्मीला गौरी. ॥४-५॥
जो यामधे अंतर करतो तो अधम असून नास्तिक मानावा आणि धर्मक्षेत्राच्या बाहेरचा मानावा. ॥६॥
हे सर्व जाणून सपत्निक हरीची विधियुक्त या मंत्रासह पूजा करावी. ॥७॥
पायांची गंभीर म्हणून, कमरेची सुभग म्हणून, उदराची देव देव म्हणून, मुखाचीए त्रिनेत्र म्हणून, डोक्याची वाचस्पती म्हणून, आणि सर्व शरीराची रुद्र
म्हणून पूजा करावी. अशा प्रकारे लक्ष्मीसहित विष्णूची पूजा करावी. ॥८-९॥
चंदन आणि फुलांनी शिवपार्वतीची पूजा करावी.
मूर्तीसमोर मध, तूप, आणि तीळ यांचा सौभाग्यवतीच्या नावे होम करावा. मीठ आणि तेल न घातलेला, शिजवलेला गहू त्याचे सेवन करावे. वद्य पक्षातही
असेच करावे. आषाढ द्वितीयेला पारणा करावी. ॥१०-१२॥
त्यानंतरचे तीन महिने यवान्नाचे व्रत करावे. कार्तिकापुढच्या महिन्यात हे राजा, श्यामाक धान्यापासून बनवलेले अन्न घ्यावे. ॥१३॥
नंतर माघ शुक्ल तृतीयेस हरी, लक्ष्मीची किंवा रुद्रगौरीची एकत्र सुवर्णप्रतिमा यथाशक्ती करावी. नंतर ती योग्य अशा ब्राम्हणाला द्यावी. ॥१४-१५॥
ही प्रतिमा वेदज्ञ अशा योग्य ब्राम्हणाला दान करावी, जो ब्राम्हण शास्त्राचरण करणारा आहे. ज्याला उपजिविकेचे साधन नाही आणि विशेषत:
जो विष्णुभक्त आहे त्याला द्यावी. ॥१६॥
अशा ब्राम्हणाला सहा भांडी दिल्यास अधिक पुण्यकारक आहे.
प्रत्येक भांड्यात क्रमश: मध, तूप, तिळाचे तेल, गूळ , मीठ आणि गायीचे दूध भरून ही पात्रे द्यावीत. हे व्रत केल्याने स्त्री किंवा पुरुषाच्या पुढील
सात जन्मांत वैभव आणी सौंदर्य प्राप्त होते. ॥१७-१८॥
अगस्त्यगीतेमधील सौभाग्यव्रत नावाचा आठवा अध्याय समाप्त ॥
N/A
References : N/A
Last Updated : March 04, 2018
TOP