अगस्त्यगीता - आरोग्यव्रत
अगस्त्य, एक वैदिक ॠषि होते. ते वशिष्ठ मुनिंचे वडील बंधू होत. यांचा जन्म श्रावण शुक्ल पंचमी (ई.पू. ३०००) ला काशीमध्ये झाला.
अध्याय बारावा
आरोग्यव्रत
अगस्त्य म्हणाले -
आता मी आरोग्यव्रतासंबंधी सांगतो, जे केले असता सर्व पाप नष्ट होते. ॥१॥
सूर्याची आदित्य, भास्कर, रवी, भानु, सूर्य, दिवाकर, प्रभाकर या नावे पूजा करावी. ॥२॥
षष्ठीला भोजन करावे. सप्तमीला उपवास करून सूर्याची पूजा करावी आणि अष्टमीला पुन: भोजन करावे असा नियम आहे. ॥३॥
जो एक वर्षभर हे व्रत निष्ठेने करील त्याला या जन्मी आरोग्य, धन-धान्य तर मिळेल. ॥४॥
त्याला परलोकात शाश्वत असे स्थान प्राप्त होते. फार पूर्वी विख्यात आणि प्रतापी राजा याने या व्रताने सूर्योपासना केली. फलत: सूर्यदेवाने प्रसन्न होऊन त्याला उत्तम आरोग्य दिले. ॥५-६॥
भद्राश्व म्हणाला -
हे मुनी, त्या राजाला आरोग्य मिळाले म्हणजे तो पूर्वी रोगी होता का ? त्याला हा रोग कसा झाला ? ॥७॥
अगस्त्य म्हणाले -
तो राजा वैभवशाली, विख्यात, सुंदर, पराक्रमी आणि आरोग्यसंपन्न होता. ॥८॥
एकदा तो मानससरोवराकडे गेला, ज्या ठिकाणी देवांचे समूह येत असतात. सरोवराच्या मध्यभागी त्याने एक मोठे श्वेतकमल पाहिले. ॥९॥
आणि त्या कमळात अंगठ्याच्या आकाराचा द्विभुज आणि रक्त - रेशमी वस्त्र ल्यालेला एक पुरुष त्याने पाहिला. ॥१०॥
त्याला पाहून त्याने आपल्या सारथ्याला बोलावले आणि म्हटले, ते कमळ माझ्यासाठी घेऊन ये. ते कमळ मी माझ्या शिरावर धारण करीन. ॥११॥
तसे केल्याने मी अत्यंत प्रशंसनीय होईन. तरी ते लवकर आण. आज्ञेप्रमाणे सारथ्याने तळ्यात प्रवेश केला. ॥१२॥
त्या कमळाला धरण्यासाठी तो जवळ जाताक्षणी स्फोटासारखा आवाज होऊन त्या आवाजाच्या भीतीने तो मरूण पडला. त्या आवाजाच्या दणक्याने राजाचे रंगरूप आणि सामर्थ्य नष्ट झाले आणि तो कुष्ठरोगी झाला. असे एकदम परिवर्तन झालेले पाहून राजा दु:खी झाला आणि हे कसे झाले याचा विचार करू लागला. ॥१३-१५॥
तो असा विचार करीत असता ब्रम्हदेवाचे पुत्र वसिष्ठमुनी तेथे आले आणि त्यांनी विचारले -
हे राजा ! तुझ्या शरीराला हे काय झाले आहे ? आणि तुझ्यासाठी मी काय करू ? ते मला सांग. ॥१६-१७॥
वसिष्ठांनी असे विचारल्यावर राजाने कमळासंबंधी झालेली घटना सांगितली. ते ऐकून ऋषी म्हणाले, "राजा ! तू सुदैवी आहेत. पण तू दुर्दैवीही आहेस आणि म्हणून कुष्ठरोगी झालास. ॥१८-१९॥
असे सांगितल्यावर राजा भीतीने थरथर कापू लागला आणि हात जोडून तो म्हणाला - ॥२०॥
हे मुने ! मी सुदैवी तसेच दुर्दैवी कसा ? कृपा करून माझ्या कुष्ठरोगाचे कारण सांगा. ॥२१॥
वसिष्ठ म्हणाले -
या कमलास ब्रम्हपद्म म्हणतात आणि ते त्रैलोक्यात माहीत आहे. त्याचे दर्शन देवांच्या दर्शनासमान आहे. ॥२२॥
या तळ्यात कुठेतरी ते सहा महिने दिसत राहाते. त्याल पाहून जो तळ्यात उतरतो त्याची पापे नष्ट होतात आणि तो ब्रम्हपदी जातो. हे ब्रम्हाचे आरंभरुप आहे. ॥२३-२४॥
त्याला पाहून पाण्यात बुडी घेतली असता मुक्ती मिळते. हे राजा ! तुझ्या सारथ्याने हे पाहिले आणि तो पाण्यात बुडाला, परंतु तू हे कमळ घेण्यासाठी आलास आणि मोठे पाप केलेस म्हणून तुला हा रोग झाला. ॥२५-२६॥
तू हे कमळ घेण्याचा मूर्खपणा केलास म्हणून मी तुला दुर्दैवी म्हणतो. ॥२७॥
राजाला हे सांगून झाल्यावर वसिष्ठ अंतर्धान पावले. राजा वसिष्ठाने काय सांगितले याचा विचार करीत रोज तेथे येऊन कमलातील भगवंताला पाहू लागला. देव सुद्धा त्याला स्वर्णपद्म म्हणतात. मानससरोवरातील ब्रम्हपद्मातील हरीला पाहून घेतल्यास मुक्ती मिळते. ॥२८-३०॥
हे राजा ! कुष्ठरोग होण्याचे अजून एक कारण आहे ते ऐक. सूर्य स्वत: या कमलातच राहतो. ॥३१॥
तोच अनंत परमात्मा आहे. तुझा विचार ते कमल डोक्यावर ठेऊन विख्यात होण्याचा होता. ॥३२॥
म्हणून तू सारथ्याला ते आणण्यास पाठविलेस आणि त्याचक्षणी तो मृत झाला आणि तू कुष्ठरोगी झालास. ॥३३॥
म्हणून हे राजा ! तू या व्रताचे आचरण कर. त्याच्या प्रभावाने तुझा रोग नाहीसा होईल. ॥३४॥
अगस्त्यगीतेमधील आरोग्यव्रत नावाचा बारावा अध्याय समाप्त ॥
N/A
References : N/A
Last Updated : March 04, 2018
TOP