शाहीर हैबती - गणित काव्य
शाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.
शास्त्रमताचें ज्ञान काय माहित अडाण्याला ।
हें उघड दिसते पुसावें उत्तर शहाण्याला ॥ध्रु०॥
समयोचित बोलणें सुचावें प्रति उत्तर ।
तेच कविचे शब्द जाणता कवि मतांतर ।
गैर अर्थ आक्षर काय करणें त्या गाण्याला ॥१॥
अर्थ एक पुसतो आतां शास्त्राची खुणगांठ ।
उत्तर करण्यावरून समजल ज्ञानाचा घाट ।
कोसाचे किती हात किती बोटें हात वहिवाट ।
किती जवाचे बोट कोणती खूण जव भरण्याला ॥२॥
शोध जवाचा लावुन आकार घाला कोसाचा ।
च्यार कोस झाल्यावर ठरला नेम योजनाचा ।
किती योजनें झालीं म्हणजे देश म्हणायाचा ।
किती देशाचें मंडळ बोला नेम करून त्याचा ।
किती मंडळें खंड मोजण्याला ॥३॥
शास्त्रावांचुन खरें मानिना कोणी वचनाला ।
गणित श्लोक पाहिजेत तेव्हां येतें ध्यानाला ।
घडघड बोलावें अंतर पडो नये याला ।
कविराज हैबती करी शास्त्र अन्वयाला ॥४॥
२७
( उत्तर )
तुम्ही चतुर बैसला म्हणून बोलावें अनुमान ।
पृथ्वीची मोजणी गणित ऐकुन घ्या परिमान ॥ध्रु०॥
दोन अणुचा एक आहे त्रसरेणू नांवाला ।
त्रसरेणू आठ धरिले तेव्हां रथरेणु झाला ।
रथरेणू ते आठ असे म्हणती बालाग्राला ।
आठ बालाग्री लिक्षा, आठ लिक्षांस यूका याला ।
आठ यूका जव झाला ऐसा याचा आहे मान ॥१॥
आठा जवाचें बोट मूठ झाली चव बोटाची ।
साहा मुठीचा हात बोली ही आहे प्रत्ययाची ।
चार हाताचें धनुष्य आहे बोली शास्त्राची ।
दोन सहस्र धनुष्य मोजणी भरली कोसाची ।
चार कोस झालीया एक योजन हें संधान ॥२॥
शंभर गांवें पृथ्वी जेव्हां आली मोजाला ।
तेव्हां गुणी राजसा संदीस एक देश झाला ।
शत देशाचें मंडळ, मंडळ ऐसें नांव आहे त्याला ।
शत मंडळातें खंड एक आलें बेताला ।
ऐसी ही नवखंडे गणिलीं लिलावतर्कानं ॥३॥
पृथ्वी नव खंड असी मोजणिला सापडली ।
किती कोसाचे जव किती जव नव खंडे भरलीं ।
आतां सहज अटकळ गणित जव बोटें सांगितलीं ।
कवि हैबती म्हणे असी गणती याची ठरली ।
शिरी कृपासावली नाथ निरजन वरदान ॥४॥
२८
( चढ )
कवि बस झोका खाली । आतां वेळ प्रसंगाची आली ॥ध्रु०॥
तुम्ही तर थोरले गाणार । शहरामधी राहणार ।
सिद्ध ग्रंथ पाहणार । अक्षरवटी कविता करणार ।
चतुरता ऐकुन मर्जी खुश झाली ॥१॥
म्हणती वनस्पती आठराभार वृक्षाचा संभार ।
भार किती वृक्षाचा वद परभार । तुझ्या शिरावर भार ।
बैसली सभा नदर कर भवताली ॥२॥
आठरा भार गणित किती योजावे । अंतरांत समजावे ।
भर मजलसींत सत्वर गर्जावे । गैरशब्द वर्जावे ।
बोलु धिटपणा कर अवधारे ॥३॥
मध्यम थोर लहान गणती करकी । बोलावे लवकर करकी ।
जरी सुचेना उत्तर की । मग आली अब्रु वर की ।
म्हणे हैबती तेचि वाली पुरते ॥४॥
२९
( उत्तर )
तुम्ही चतुर बैसला म्हणुन कथितो शास्त्राधार ।
वनस्पतीचा भार सांगतो ऐका निर्धार ॥ध्रु०॥
वनस्पती आठरा भार बोली सर्वत्रांची ।
भार आहे केवढा खबर नाहीं त्या भाराची ।
आहे श्लोकाची गणित सांगणी लिलावतर्काची ।
श्लोकाचा अर्थ सांगतो गनती नेमाची ।
स्वस्ती करून चित्ताची पहावा निर्णय साचार ॥१॥
क्रोड एक दहा लक्ष वरते सहस्र एक्याऐसी ।
या अंकाची दुणा करावी मोजुन अंखासी ।
दोन क्रोड एकवीस लक्ष ऐका वचनासी ।
वर सहस्र बासष्ट आला एक भार ताळयासी ।
ऐसे अठरा भार वनस्पती म्हणती शास्त्राकार ॥२॥
एकंदर अठरा भार किती परिमान ।
सकळ जमा सांगतो करून भर भंडीचा मान ।
एकुन चाळीस त्रेपन्न लक्ष एकुण नव्वद पाहणं ।
वर ते सोळा सहस्र झाले गणती संधान ।
आतां सांगतो लहान थोर मध्यमा आकार ॥३॥
सतरा कोटी लक्ष एकुणीस बावन हजार ।
तेरा कोटी लक्ष अठावीस सहस्र बहात्तर ।
नव कोटी चाळीस लक्ष ब्याण्णव सहस्र ।
कवि हैबती म्हणे वनस्पतीचा हा प्रकार ।
प्रसन्न नाथ महाराज देत तार्किक मती विस्तार ॥४॥
३०
( चढ )
ज्ञानवंत बसला थोरले कवीश्वर । एक पुसतो पूस
शीघ्र बोलावें उत्तर ॥ध्रु०॥
ऐकत होतों कीर्ति फार नांवाचा बडिवार ।
कवि ब्रिदाचे भले जाणते शास्त्रांतील सार ।
मनांत होता गांठ पडण्याचा विचार ।
तो दिन आला आज भेट झाली समयानुसार ।
प्रश्न सुचला एक नाहीं बहुतेक अगोचर ॥१॥
एक पळाची साठ अक्षरें ऐसी आहे बोली ।
एक अक्षरामधीं चाल सूर्याची किती झाली ।
साठ पळाची घडी घडीमध्यें किती गावें भरली ।
तिसा घडींचा दिन दिनाचें प्रमाण कोठेवर ॥२॥
तिसा दिसाचा मास योजनें किती झाली त्याचीं ।
एक वर्षामधे योजनें कितीक नेमाचीं ।
ऐसी गणती करून सांगा शंभर वर्षाची ।
किती योजनें झाली गणती सांगा कोसाची ।
किती एकंदर बेरिज होती वदावी सत्वर ॥३॥
नका उशीर करूं जरा मोल जलदिला आहे आतां ।
उत्तर कल्यविण रिकाम्या काय करून वाता ।
समजल अवघें ज्ञान तुम्ही जातीचें कवन गातां ।
कविराज हैबती अखंडित मनी आठवी नाथा ।
कवितेसी वर देता कृपाहस्त शिरावर ॥४॥
३१
( उत्तर )
तुम्ही चतुर बैसला आतां परिसावी गणित कविता ।
परीमाण सांगतों पाहा चालतो किती सविता ॥ध्रु०॥
एक अक्षरामधे एक रवि किती चाले ।
चार सहस्र चारशेचार योजनें गणित आलें ।
साठ अक्षरें पळ, पळामधें काय गणित जाहलें ।
दोन लक्ष चौसष्ट सहस्र दोनशे च्याळीस कळले ।
साठ पआळ्ची घडी किती ऐका त्याची गणिता ॥१॥
क्रोड एक आठावन लक्ष चोपन हजार ।
वर आणिक चारशे पुढील ऐकावा प्रकार ।
तिसा घडीचा दिन दिनाचा कितिक आकार ।
सत्तेचाळीस क्रोड लक्ष छपन ते साचार ।
वर ते बत्तीस सहस्र आला ताळा याचा गुणीता ॥२॥
एक मास दिन तीस आर्व चवदा क्रोड सविस ।
ऐकुन नवद लक्ष साठ सहस्र मोजणीस ।
वर्षाचे एक खर्व आर्व एकाहत्तर खास ।
वरते बावीस क्रोड लक्ष्य पंचाहत्तर नेमास ।
वरते झाले विस सहस्र समजले ध्यानासी आणता ॥३॥
ऐसी शंभर वर्षे झाली चाल भास्कराची ।
येक निशी खर्वें एकाहत्तर गणित याची ।
बावीस आवीवर क्रोड पंचाहत्तर बेताची ।
विस लक्ष बेरीज असि गणती झाली त्याची ।
कवि हैबती म्हणे कवनमती नाथाची चालविता ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : March 16, 2017
TOP