महाभारताच्या वनपर्वातील एकशें बावीस आणि एकशें तेवीस ह्या दोन अध्यायांत आलेली सुकन्येची कथा ह्या काव्यांत आम्ही संक्षेपाने सांगितली आहे. शर्याति ह्या नावाचा एक सूर्यकुलोत्पन्न राजा मृगयेसाठीं वनांत गेला असतां त्याची सुकन्या नांवाची कन्या त्याचे बरोबर होती. ती त्या वनांत फिरतां फिरतां च्यवन मुनि जेथें समाधि लावून बसला होता, तेथें आली. ह्या मुनीच्या अंगाभोवती वारूळ वाढलें होतें. सुकन्या येण्याला आणि मुनीनें समाधि उतरून डोळे उघडण्याला एक गांठ पडली. हें काय चमकत आहे. म्हणून जिज्ञासेनें प्रेरित होत्सात्या सुकन्येनें त्या दोन तेजांचा झाडाच्या कांट्यानें वेध केला. मुनीचे डोळे फुटले. तेव्हां तो क्रुद झाला आणि त्यानें शर्यातीच्या सैनिकांना मलमूत्रांचा अवष्टंभ करून जर्जर केलें. शर्यातीनें मुनीला आपली मुलगी सुकन्या अर्पण करून त्याचा राग शांत केला आणि आपल्या सैनिकांना अवष्टंभापासून मुक्त करून घेतलें सुकन्या पतीच्या शुश्रूषेंत तत्पर होउन त्याच्यापाशीं राहिली. पुढें च्यवनानें अश्विनीकुमारांना ‘मी तुम्हांला यज्ञांत सोमरस देववीन,’ असे सांगून त्यांच्या प्रसादानें तारुण्य आणि नेत्र मागून घेतले. मग च्यवन आणि सुकन्या आनंदानें राहूं लागली. हा कथाभाग ह्या काव्यांत संक्षेपाने वर्णिला आहे.
इंद्र सुरांत स्वर्गी तैसा भुवि मानवांत शर्याति- ।
गणिजे श्रेष्ठ, तयाची सर्वत्र सदैव, कीर्ति जन गाती ॥१॥
होउनि गेले राजे आजवरि अनेक मेदिनीवरती ।
परि शर्यातीचे परि शर्याति असेंच सर्व बुध म्हणती ॥२॥
प्रकृतिक्षेमार्थ सुताक्षेम तयें चिरडिलें नृपें सकळ ।
नररिपुस चिरडिती बहु, परि चिरडिति मोहरिपुस ते विरळ ॥३॥
लक्ष रिपूंस रणीं जे जेणिति ते वीर विपुल जगिं बघतों ।
परि लक्षांत न एकहि जेणूं चित्तस्थ रिपुस जो शकतो ॥४॥
शर्यातिं कार्यभारें श्रमला, घ्यायास अल्प विश्रांती ।
नगर त्यजूनि गेला, ठेला तो सैनिकांसह वनांती ॥५॥
आवश्यक हें तो गणि अंगीं सामर्थ्य यावया नव्य ।
धनु सज्ज सदैव मन व्यग्र शकेना करूं स्वकर्तव्य ॥६॥
मन विटतें मनुजाचें तीं तींच मुखें सदैव पाहून ।
त्या त्या स्थलींच राहुनि, कामें तीं तींच संतत करून ॥७॥
आयुष्यक्रमणीं तो पालट गेला वनांत व्हायाला ।
नगरवनांतिल होईल भेद मना सुखद वाटलें त्याला ॥८॥
नरकृति सृष्टिकृती ह्या सापेक्षत्वें मनास रंजविती ।
तुलनेनें दिन्हीही प्रीति मनीं अननुभूत चेतविती ॥९॥
रथसंघोषम कशाध्वनि, कृत्रिम वर्तन, मनुष्यकृति तिकडे ।
विहगारव, पशुनर्दन अनरविवर्तित, निसर्गही इकडे ॥१०॥
कुट्टिमतल, घंटोपथ, सौध, विपणि, पण्यवीथिका तिकडे ।
पाउलवाटा असरल, वृक्ष दिवंकष, लता निविड इकडे ॥११॥
नित्य महानगरांतील जनसंमर्दांत राहतो नर तो ।
वननिर्जनतेमध्यें काहीं दिन घालवून बहु रमतो ॥१२॥
त्याच्यासंगे गेली होती त्याची वनास त्या दुहिता ।
अभिघा तिची ‘सुकन्या’, ती रूपगुणादिंही तिला उचिता ॥१३॥
पुरजनपदभेद तिच्या सर्वाही इंद्रियांस मोदकर- ।
झाला; वन सुखद असे, पर्यायें सुखद मानवा नगर ॥१४॥
ही वनभागांत तिला नूतनतासुभंग वाटली सृष्टि ।
जें जें ती अवलोकी तें तें संतोषवी तिची दृष्टि ॥१५॥
सलिलें सकमल, कमलें सभ्रमर, भ्रमर समद पाहून- ।
त्या विपिनांतिल तिजला होई आनंद अंतरि अनून ॥१६॥
वृक्ष दिवंकष तेथें, वेलींची वेष्टनें तयां दाट ।
त्यांचे सभोवतालीं पक्ष्यांचा सर्वदा किलबिलाट ॥१७॥
नित्य सखींसह हिंडे देखावे बघत ती वनांतील ।
नगरांतील मुलीला कां ते सुखकर न सर्व होतील? ॥१८॥
एके दिनिं ती आली आली सहिता तिथें नृपतिदुहिता ।
च्यवर्षि जिथें होता लावुनि समाधि दीर्घकालमिता ॥१९॥
स्थाणूपरि तो निश्चल लावूनि समाधि जाहला असतां ।
कालें पडलें होतें वल्मीकाचें कडें तया भवतां ॥२०॥
तेथ सुकन्या आली तों उतरुनि मुनि समाधि नेत्रातें ।
उघडुनि निश्चल होता, तत्तेंजें व्यापितीं दश दिशातें ॥२१॥
हीं तेजे कसलीं ही जिज्ञासा तीचिया मनिं उदेली ।
तरुकंटकें तिनें तीं तेजें संविध्द तेधवां केली ॥२२॥
तेजें तीं च्यवनाची होतां संविध्द लोचनें फुटली ।
झाला अंध च्यवन, क्रीडा बालिश तिची अशी फळली ॥२३॥
फुटल्या मुनिनेत्रांतून रुधिर भळभळां बहू तदा स्त्रवलें ।
रुधिर न तें, मुनिंचे अवलोकनसामर्थ्य जें गळुनि पडलें ॥२४॥
च्यवनर्षि अंध झाला, मुलगी तच्चर्मचक्षुंस न दिसली ।
परि अंतर्ज्ञाने ती अपराध्दा त्यास तत्क्षणी कळली ॥२५॥
शर्यताची कन्या अपराध्दा निश्चयें मुनिस कळली ।
क्रोधाची तीव्र लहर उठली तध्ददयिं मारुनी उसळी ॥२६॥
क्रोधवश च्यवन मुनी भूपतिच्या सैनिकांस दंड करी ।
बुध म्हणती वेडाचा झटका क्रोधास, तो विवेक हरी ॥२७॥
अपराध सुकन्येचा, झाला शर्यातिसैनिकां दंड ।
रावण सीतेस हरी, सिंधूला सेतुबंध उद्दंड ॥२८॥
मलमूत्रावष्टभें सैनिक शर्यातिचे विकळ झाले ।
कोणा भिषग्वराचा काहीं न उपाय तेधवां चाले ॥२९॥
क्षितिवरि सैनिक पडले भोगित मर्मान्त यातना सारे ।
मलमूत्राशय फुगले, पोटांचे जाहले जणुं नगारे ॥३०॥
ही आकस्मिक आली आपत्ति तिचें निदान वा रूप ।
कळलें कोणालाहि न जनदु:ख बघों शके न तो भूप ॥३१॥
हळहळला, कळवळला, वळवळला नृप जनार्ति पाहून ।
तो सुनृप सत्य, कुनृप न पाहून जनार्ति होइ लव दून ॥३२॥
करितां शोध नृपतिला कळलें कन्याच हेतु दु:खा या ।
उठला तत्क्षणिं गेला तो च्यवनाचा प्रसाद साधाया ॥३३॥
जोडुनि कर मुनिपुढती नृपति स्वीकारुनि नम्र भावाला ।
दीनस्वरें असें वच वदला सांत्वावयास कुपिताला ॥३४॥
“कन्या अजाण माझी, केलें भलतें असें तिनें कृत्य ।
तिजसाठी मीं तुमची तुमचा ही याचितों क्षमा भृत्य ॥३५॥
अंधत्व तुम्हां आलें, हानि महा ही भरून न निघेल ।
दण्ड करा खरतर मज तो तुमच्या मतिस योग्य वाटेल ॥३६॥
कन्यापराध घाला पोटांत, कृपा करा, मुने पावा ।
मम सैनिकांचिया खर दु:खा सरवा, दया तयां दावा ॥३७॥
बालिश जिज्ञासेनें प्रेरित होओनि जो तिनें केला ।
तो अपराध गुरु असो, माना माझ्या क्षमार्ह दुहितेला ॥३८॥
तुमच्या कोपपविस हें भूभृच्छिर उचित वीर्य दावाया ।
मज दण्ड करा, उठवा सैनिक पुरवा मदीय कामा या” ॥३९॥
ऐकुनि शर्यतीचा विनति अशी बोलला तया च्यवन ।
“नृपते, त्वकन्येचा अपराध मला गमे क्षमोचित न ॥४०॥
झालों मी अंध नृपा, त्वत्कन्येच्याच बालिश कृतीनें ।
तीच मला दे पत्नी शर्याते, शास्त्रसंमत विधीनें ॥४१॥
त्वसैनिकां निरामय ह्या क्षणि मी करिन गा धरापाला ।
जर तव कन्या पत्नी शर्याते, शास्त्रसंमत विधीनें ॥४२॥
अवलोकनशक्ति जिणें मम लोपविली तिनेंच मज वाटे ।
न्यावें हात धरुनि हा उचित असे तिजासि दण्ड मज वाटे ॥४३॥
च्यवनयोक्ति नव्हे ती, ती तप्तायोरसनदीच जी श्रवणीं- ।
पडली शर्यातीच्या, विधिची ही स्तिमित त्या करी सरणी ॥४४॥
च्यवयोक्ति आयकुनि ती दु:ख नृपा होइ कल्पनातीत ।
डोळे मिटोनि ठेला निश्चल चित्तांत चिंतन करीत ॥४५॥
जरठ, विलासापराङमुख, भार्गव, आसन्नमरण मुनि कोठें? ।
कोठें सुखार्ह बाला? गणि नृप तद्योग सांकडें मोठें ॥४६॥
कन्या जरठा देणें हें तिज कूपांत खोल पाडविणें ।
म्हणुनि मुनीची उक्ती परिसुनी तो नृप मनांत फार शिणे ॥४७॥
प्रिय कन्या, प्रिय सैनिक ह्यांस न तो त्यजुं शके न वा तीस ।
कतर धरावा पुढचा पथ तो दिसला तदीय न मतीस ॥४८॥
दोलाधिरुढ झाली शर्यातीची मती तया समयीं ।
ह्या क्षणिं इकडे, त्या क्षणिं तिकडे, स्थिति ते महोग्रमोहमयी ॥४८॥
नृपतिजनकयुध्द तदा झालें, तो ह्यास, हा तया ढकली ।
अन्तीं जनकपराभव झाला, युध्दांत नृपति होय बली ॥४९॥
मग शमवाया सैनिकदु:खे मन दृढ करी महीपति तो ।
कन्या च्यवना द्याया सजला, जनहित गुरू सुनृप गणितो ॥५०॥
शर्याति रामसा नृप, रामहि शर्यातिसा प्रजानिष्ठ ।
स्त्री कन्या प्रिय हो तो दूर करी कीं प्रजासुख गरिष्ठ ॥५२॥
पाशवसामर्थ्यवरि नव्हता शर्याति विश्वसून कधीं ।
जनयोगक्षेम गणी राज्यस्थैर्यासि हेतु उन्नतघी ॥५४॥
च्यवना कन्या देणें ही अप्रिय गोष्ट पथकरी नृप तो ।
प्रकृतिक्षेमा सुप्रभु आत्मीयांच्या सुखापरिस जपतो ॥५५॥
केलें कन्यादान च्यवनप्रति वनिं नृपें अमृतसंधें ।
जुळलीं च्यवनसुकन्या पतिपत्नींच्या अभेद्य संबंधें ॥५६॥
ठेवुनि कन्येस वनीं खिन्न मेनं परतला नृप पुरास ।
कन्यावियोग होतो कोणा अतिदु;खकर न जनकास? ॥५७॥
अंध, स्थविर, फलाशन, जमाता वन्य, मी श्वशुर नृपती ।
ही तुलना तदध्दयीं चालुनि तो दु:ख भोगि तीव्र अती ॥५८॥
शर्याति गेलियावरि मग्न सुकन्या स्वभर्तृसेवेंत- ।
झाली, कीं ती जाणे तीणें भोगील दिव्य सुख चेत ॥५९॥
जननी, जनक, सखीजन, दासी, संगीत, मंदिरनिवास ।
गळुनि अतां तिज अंध, स्थाविर पति अरण्य निर्जन उदास ॥६०॥
कोठें तें आयुष्यक्रमण विविध दिव्य सुखविलासांत? ।
कोठें कंदफलाशन शीतातपकष्ट निर्जन वनांत? ॥६१॥
कोठें मृद्वंगी ती जी राहे नित्य सुखविलासांत? ।
कोठें निर्जन विपिनीं वसति हिमातसमीरदु:खात ॥६२॥
परि पति हें गुरु दैवत मानुनि त्याचीच ती करी सेवा ।
स्वसुखनिरामिलाषा ती पतिसुखवर्धन गणी महा केवा ॥६३॥
प्रतिदिनिं अंधपतिस ती नेइ नदिस पंचधावनार्थ सती ।
हात धरुनि वाटेनें स्वीकारुनि तत्सुखार्थ मंद गती ॥६४॥
पतिच्या आहारास्तव पाणी फलकंदमूलसंभार ।
पतिनें खाउनि उरलें जें त्यावरि ती करी निजाहार ॥६५॥
पतिच्या शयनास्तव ती सुकलीं कोमल तृणें स्वयें पसरी ।
प्रेमानें ती तत्पदसंवाहन त्याचिया सुखार्थ करी ॥६६॥
तो निजतां तीहि निजे विश्रांतीस्तव तयाचिया जवळ ।
उठुनि सकाळीं लागे त्याच्या सेवेस दवाडितां न पळ ॥६७॥
जे जे सुखद पतीला तें तें ती करि, चुके कधीं न सती ।
सारांश निजपतीची शुश्रूषा मानि धर्म उत्तम ती ॥६८॥
पति अंध जरठ असतां, तत्सेवा तिजसि कष्टवित असतां ।
नैराश्य पुढें असतां पतिनिष्ठा धरि तिची परमदृढता ॥६९॥
ती सानंद वसे वनिं नसतां मंदिर न वा विविध खाद्यें ।
नसतां दास सखीजन मृदुतल्पीं शयन वा मधुर वाद्यें ॥७०॥
तीचे अनेक वत्सर पतिच्या सेवेंत यापरी गेले ।
न उपक्षेचें पातक मतिनें कृतिनें तिनें कधीं केले ॥७१॥
मुनि तोषला बघुनि ही पतिनिष्ठा कष्टलाहि तो च्यवन ।
मी सफल करुं कसें तज्जीवित ह्यांचे करी मुनी मनन ॥७२॥
धन्य सुकन्या तिनें पतिमन आकर्षिलें निज गुणांहीं ।
वरि उचलि सागरोदक ही ज्योत्स्नेची स्तुती अणू नाहीं ॥७३॥
नासत्यांची करुणा भाकुनि त्यांचा प्रसाद मिळवाया ।
तो सजला मुनिं तत्क्षणिं कालाच्या न व्यया करुनि वाया ॥७४॥
नासत्यांची यापरि मनिं कर तो प्रार्थना मुनि च्यवन ।
“पुरवां माझी इच्छा, होओ करुणार्द्र युष्मदीय मन ॥७५॥
मम भार्या नृपदुहिता, बाला, तज्जन्म सार्थक कराया ।
द्या मज बल, माझ्या तुम्हि, पावा, पुरवा मनोरथाला या ॥७६॥
तुमचें कारुण्य फळो, द्या मज तारुण्य, वार्धक गळों हें ।
परिवर्तन घडवा हें कठिण तुम्हां हें भिषग्वरां नोहे ॥७७॥
तुमच्या उपकारांची फेड करिन मी जशी तुम्हां मिष्ट ।
इंद्रासमक्ष करविन सोमाचें पान मी तुम्हां मिष्ट ॥७८॥
नासत्य हो असत्य न होइल मत्कृत कधीं प्रतिज्ञा ही ।
हें वाक्य घोषणा मी करुनि वदें भरुनि ह्या दिशा दाही ॥७९॥
मुनिची विनती झाली मान्या ही अश्विनीकुमारांना ।
ते त्या अंधा घेउनि गेले एका सराप्रति स्नाना ॥८०॥
मुनि उतरला सरोजलिं, भिजलिं अंगें जलें तदा त्याचीं ।
तत्क्षणिं दस्त्रवराच्या विभवानें होइ तो निराळाची ॥८१॥
तो अंध अवीर्य जरठ झाला डोळस सवीर्य तरुण मुनी ।
आनंद पावली तद्भार्या रूपान्तरास ह्या बघुनी ॥८२॥
च्यवन सुकन्या प्रेमें जायापति नांदलीं इत:पर: तीं ।
तत्प्रेममहोदधिला स्थिति ठावी एकमात्र, ती भरती ॥८३॥
झाले च्यवनदशान्तर सुखकर शर्यातिच्या मनाला हें ।
अभिनंदनार्थ त्याच्या सांगेन आला वनास लवलाहें ॥८४॥
मग योग्य समय बघुनी च्यवनप्रोत्साहनें मख नृपानें- ।
केला, त्यांत च्यवनें सुखवियलें दस्त्र सोमपानानें ॥८५॥
शर्यातिला जो रुचला न आधीं विवाह तो अन्तिं तदिष्ट साधी ।
आपातिं दावो भय पुण्यकृत्य, फळे शुभीं तें ध्रुव हेंच सत्य ॥८६॥
सुकन्येची कथा लोकां सांगे वामननन्दन ।
कवीला शम ती देओ लोकांचें रंजवो मन ॥८७॥