मंदार मंजिरी - मेषपेषण

भिन्न भिन्न वेळी भिन्न भिन्न मासिकात छापलेली अशी कांही आणि आजपर्यंत मुळींच कोठेहीं न छापलेली कवी विद्याधर वामन भिडे यांची कांही निवडक काव्ये.


[ वातापि आणि इल्वल ह्या नावांचे दोन दैत्य तपस्व्यांना भारी उपद्रव करीत असत. त्या दैत्यांचा अगत्य मुनीनें कसा नाश केला, हें ह्या काव्यांत सांगितले आहे. मेष ह० बोकड, पेषण ह० चिरडून पीठ करणें.]
वातापि इल्वल असे होते दैत्य निशाचर ।
मुनिवृंदास पीडाया सदा ते सिध्द सोदर ॥१॥
तच्छरीरस्य सामर्थ्य सत्य सर्पमुखी गर ।
साधुपीडाफल बल अधमाचे खरोखर ॥२॥
तापसां दैत्य हे दोघे क्रूरात्मे भेडसाविती
वंचिती, छळिती, नित्य उपद्रविती, गांजिती ॥३॥
तपश्चर्यात असा साधू त्यांस न पाहवे ।
मृत्तिकेचा कण कधीं लोचनांस न साहवे ॥४॥
जें किंप्रभूसि दंडाया लाविजे बल तें बल ।
बल तें न प्रशंसार्ह करीं जें साधुचा छल ॥५॥
ह्या दैत्यांचा बल सदा पीडादायक सज्जना ।
न तें वंद्य, न तें स्तुत्य, न योग्य अभिवादना ॥६॥
दंडकावनिं हें दोघे राहिले दैत्य दुष्टघी ।
मुनीतें छद्मयोगें ते लोटिती व्यसनामघीं ॥७॥
धरोनी द्विजरूपातें वदे संस्कृत इल्वल ।
विविधछद्मयोगानें करी तो ब्राम्हनच्छल ॥८॥
श्राध्दकर्मनिमित्ताने आमंत्री द्विज इल्वल ।
वातापी मेषरूपातें घरीं मायाबले खल ॥९॥
हा मेष इल्वल चिरी करी आस्वाद्य वन्हिनें ।
आघ्राणसुखदायी तो द्विजा वाढावयासि ने ॥१०॥
मेष हा मिष्ट भक्षोनी तृप्तीतें द्विज पावती ।
परंतु न कळे घोर परिणाम तयांप्रति, ॥११॥
द्विजांच्या उदरी ग्वाद्य हें गेल्यावरि इल्वल ।
सोदरासि समाव्हान करी, “बाहेर ये चल ॥१२॥
वातापे! निजरूपाने ये बाहेर सहोदरा! ।
द्विजोदरनिवासातें सोडी गा! ये करीं त्वरा” ॥१३॥
ऐकतां हें समाव्हान निजरूप धरी खल ।
फोडी द्विजोदर न लागावा एकही पल ॥१४॥
करोनी कपटें ऐशी वातापील्वल पापधी ।
पीडिती सर्वदा विप्र दंडविपिनामधीं ॥१५॥
कोठें तामस ते दैत्य? कोठें सत्वगुणी जन?
झालें तें मुनिवासला अत्ययोग्य असें वन ॥१६॥
भुजंगयुक्त सदन, दैत्यापद्रुत आश्रम ।
हसंतीपाश्वशयन चित्ताचा हरिती शम ॥१७॥
घोरें हीं अतिघोरें हीं दैत्यकृत्यें खरोखर ।
आश्रमीं आश्रमी झाला हाहाकार भयंकर ॥१८॥
ह्या दैत्यांच्या कुकर्मांनी वन उध्वस्त जाहलें ।
“हाय हाय” असा नित्य विलाप करिती भले ॥१९॥
बहु वर्षे क्रम असा चालला ह्या वनामधीं ।
गांजले, पीडले भारी, दंडकावनिं पुण्यधी ॥२०॥
देवहि जाहले त्रस्त, दैत्यताप न थांबला ।
उपाय न सुचे त्यांना वारावें केवि तद्वला ॥२१॥
गेले शरण ते देव अगत्य ऋषिला तदा ।
कर जोडोनि वदले, “ वारीं ह्या जगदापदा” ॥२२॥
मान्य केली अगत्यानें तेधवां देवयाचना ।
बोलला, “मी पुरवितों तुमची शीघ्र कामना” ॥२३॥
निरोप मुनिनें देतां गेलें देव निजायला ।
दैत्यद्वय मरे आतां म्हणोनी हर्ष हो तयां ॥२४॥
स्थविरद्विजरूपातें अगस्त्यें धरिले तदा ।
यष्टि घेवोनियां गेला हळूं टाकित तो पदा ॥२५॥
इल्वलें मुनिंचें केलें व्याजस्वागत तेधवां ।
बाहिलें भोजना त्यातें प्रेमा दावोनिया नवा ॥२६॥
भोजनामंत्रण तिथें स्वीकारी मुनि निर्भय ।
हर्षला इल्वल अती, वातापीहि दुराशय ॥२७॥
त्यांसि तेथें बसवुनी दैत्य गेलें महानसीं ।
कराया पाकनिष्पत्ति हर्ष पावोनि मानसीं ॥२८॥
मायानिपुण तो दैत्य वातापी मेष जाहला ।
कळला न तदा भावी परिणाम तया खला ॥२९॥
पचतां एक दुष्कर्म दुजें मूढ करावया ।
सिध्द होतो असें नित्य पाहतों जगतात या ॥३०॥
एक दुष्कृत्य पचतां दुसरेही पचलेसें ।
मूर्खाला वाटतें, त्याच्या विवेक हृदयी नसे ॥३१॥
दुष्कर्मिसिध्दि दुष्टाला उत्तेजित करीतसे ।
आज्यधारा कृशानूला प्रवातीं बल देतसे ॥३२॥
लाभार्थ वा विनोदार्थ पापें खल करीतसे ।
धरोनि ऐसा क्रम तो परिणामीं सदा फसे ॥३३॥
शांतवृत्ति प्रजा सोशी किंप्रभूचा महाच्छल ।
परि तो दंडय दंडाते पावतो शेवटी खल ॥३४॥
असो हा विस्तर पुरे, चिरिला मेष इल्वलें ।
शिजवोनि अगत्यानें खाद्य तें अर्पिलें खलें ॥३५॥
भक्षितां खाद्य मुनि हा “सुसंपन्न” असें वदे ।
“तृप्तोप्ति” हा शब्द त्याचा इल्वला बहु तोष दे ॥३६॥
मग हर्षसमाविष्टें इल्वलें त्या दुराशयें ।
वातापी बाहिला “ये रे! शीघ्र बाहेर शीघ्र ये ॥३७॥
मेषरूपासि सोडोनि, जोडोनी निजविग्रहा!
फोडोनि ऋषिचा देह ये, आंत न सख्या! रहा” ॥३८॥
अगस्त्य तेधवां मंद करोनी स्मित बोलला ।
“तुझा भ्राता जिरवला उदरें मम इल्वला ॥३९॥
दैत्यता वा मेषता वा मुकला तव सोदर ।
पावला पंचता मात्र मरणार्ह खरोखर ॥४०॥
मेषपेषण म्यां केलें, मेषता नष्ट जाहली ।
निशे:ष म्यां जिरविली तच्छरीरकणावली ॥४१॥
गांजी विप्रास जो मर्त्य तो पावे नित्य हे स्थिती ।
आव्हेरिती तया साधु, न तया बहु मानिती ॥४२॥
तुमचे छ्द्म मी जाणें, शठ दोघे तुम्ही खरे ।
माझ्यापुढेम परि कसें तुमचें शाठय तें ठरे? ॥४३॥
तुम्ही कांच हिरा मीही, तुम्ही सौधाट्ट, मी वट ।
दोघे मतगंज तुम्ही, मी मृगाधिप उत्सट ॥४४॥
महाशठा मज कसें फसवाल तुम्ही शठ? ।
मृगेंद्राच्या पुढें कैसा कलभांचा टिके हठ?” ॥४५॥
शब्द हे ऐकतां धावे अगस्त्यावरि इल्वल ।
परि त्यासि मुनिश्रेष्ठे जगों नच दिलें पल ॥४६॥
अगस्त्यनयनें कोपें वमली वन्हिकीलक ।
ज्वालामुखीमुखें जाणों भूगर्भोष्मा भयानक ॥४७॥
शिवानें स्मरसा भस्मरूप तो दैत्य दुष्टधी- ।
नेत्रवन्हिबळें केला अगत्यानें क्षणामधीं ॥४८॥
लोकांस हा दैत्यनाश जाहला शमदायक ।
सुखावे देह निघतां रुतला पदिं कंटक ॥४९॥
दैत्यनाशें हरपल्या मुनींच्या घोर आपदा ।
दंडकारण्य ह्या योगें योग्य वासास हो तदा ॥५०॥
वातापील्वलनाशातें बघतां देव हर्षले ।
कल्पपुष्पसुगंधाढ्य जलातें मेघ वर्षले ॥५१॥
जिकडे तिकडे झाला तदा आनंद निर्भर ।
सर्वांची दिसली वक्त्रें फुल्लपद्मविकस्वर ॥५२॥
मुनिपीडा जयां गोड पहाया वा करावया ।
पळाले सर्व ते नीच, राहिले न वनांत या ॥५३॥
दैत्यांच्या निधनें झालें दंडकावन निर्भय ।
स्वाश्रमीं राहते झाले सुखें मुनि महाशय ॥५४॥
शा.वि.- पीडादायक यत्पराक्रम असे तो दंड्य होतो नर,
हा जो इल्वलवृत्त बोध करि, तो पावो जनीं आदर ।
साधुक्लेश सरो, सुखें जग भरा, हो प्रेम वृध्दिंगत,
हा विद्याधरही उमात्मज कवी लाहो शमा संतत ॥५५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP