[ हिर्याचा खडा जरी एकच असला, तरी त्याच्या वेगळ्या वेगळ्या पैलूंवरून वेगवेगळ्या दिशांनी प्रकाशकिरणांचे परावर्तन होतें त्याप्रमाणे साधु पुरुषाचे साधुत्वाचे गुण भिन्न प्रसंगी भिन्न रुपानें आले, तरी त्या सर्वांचे प्रचोदक कारण एकच असतें ह्या दृष्टीने पुढील काव्य वाचिलें असतां त्यात काहीं विसंगतपणा नाही असें वाचकांना आढळून येईल]
स्वद्योतित भास्करसा, धीर अचलसा, गंभीर सागरसा ।
गंगाजलौघसा शुचि, साधुपुरुष न स्तवार्ह होउं कसा? ॥१॥
देणें पात्रिं, विपन्ना जपणें, शुचिपथ जनास दाखविणें ।
हें साधुचें कुलव्रत येणें तो सार्थ करितसे स्वजिणें ॥२॥
धन देउनि साधूला सुपथच्यत जो करूं नर झटेल ।
तो वाहवूं नदीला खालुनि वरती खरोखर शकेल ॥३॥
नीट मनात विचारुनि मग साधु करावयास कार्य सजे ।
कीं ते योग्य न करणें अनुतापा होइ अंति कारण जें ॥४॥
वैभवशाली कोमल उत्पलसें साधुचें हृदय होतें ।
आपत्काली कर्कश होतें क्षोणीधरापरि अहो! तें ॥५॥
चित्तें, वचनें देहें, चितीं, बोले, करी स्वदेशासहित- ।
तो साधु, इहपरत्राहि मनुजात सुरांत होइ तो महित ॥६॥
साधू देशहित करी, रिपुच्या लोभाविजे न लव निधिने ।
देशाच्या हाकेला हा केला द्यावयास ओ विधिने ॥७॥
देशाच्या हाकेला ओ देइल तोचि साधु म्हणविल ।
संकटपंकी रुतला निज देश स्वस्थमन खल बघेल ॥८॥
साधू कोण म्हणावा? जो निज देशार्थ देह झिजवील ।
खल कोण? जो धनास्तव रिपुला निज देश निस्त्रर्प विकील ॥९॥
नीचाच्या संसर्गी साधु असो, साधु नीचता न वरी ।
पंकांत पद्म असतें नित्य तरी पद्म मलिनता न धरी ॥१०॥
सत्सरणिंत साधु सदा स्थिर राहे, शैलसा महीवरती ।
भविं त्यास मोहवात्या प्रहरो, हतशक्ति परतते पर ती ॥११॥
तृषिता, क्षुधिता, अधना द्यावें जल, अन्न, धन यथाशक्ति ।
हें उचित म्हणुनि तें करि साधु जरि नसे तया फलासक्ति ॥१२॥
“ साधुपुरुष असुधाशन देव, ” असें म्हणति तें न वच खोटें ।
पुण्याचरणोत्थ तया शोभवि जें तेज तें असे मोठें ॥१३॥
साधू भवसंतमसी दीप जणों मार्ग दाखवायास- ।
विधि करि, कीं इहलोकी यात्रा होओ जना न सायास ॥१४॥
साधुसमागम लोटी दूर अघप्रवणता, सुकृतसरणी- ।
दावी, पुरुषा लावी निस्वार्थ: मनें स्वदेशहितकरणीं ॥१५॥
साधुसमागम शुचिता, शुचिता घृति स्वजनभक्ति ।
ही स्वजनभक्ति मनुजा देशहित करावया विपुल शक्ति ॥१६॥
आत्मीय म्हणुनि जपला तो जरि झाला कृतघ्न तरि रक्षा ।
वाढविला निंबतरु, तो निपजो कटु, न साधु करि रक्षा ॥१७॥
शांतपणे साधु सही खलकृत अपकार, हात न उगारी ।
विधिविलसितें विचित्रे दंड खलावरि पडे प्रखर भारी ॥१८॥
मंबाजी तुकयाच्या अंगावरि थुकुनि कंड तो पावे ।
छळि साधूला खल परि परिणति उलटुनि खलावरी धावे ॥१९॥
परिचय पृथग्जनाशी परिणति दावी विमानफलक ।
परि परिचय साधूंशी होत असे अंति सौख्यशमजनक ॥२०॥
साधुसमागम सुखकर सोमातपसा सदैव सकलांस ।
परि ह्यास असे वृध्दिक्षय, वृध्दिच केवला असे त्यास ॥२१॥
साधूच्या संगतिने पावे साधुत्व अधम अल्प तरी ।
कार्पासगुण सुमाच्या संसर्गे सुखद सौरभास वरी ॥२२॥
साधू यथार्थनामा एकादा या बघों मिळे जगतीं ।
साधूमन्य शतावधि, भोंदू लक्षावधी जगीं दिसती ॥२३॥
साधूच्या रूपाचें अनुकरण अनेक लोक करितात ।
परि साधूचें पाहो अत्यल्पांशे स्वरुप त्यांच्यात ॥२४॥
भगवीं वस्त्रें लेउनि, राखूनि जटा न साधु नर होतो ।
हावी चेत:शुध्दि बाहेर कसाहि कां नर असो तो ॥२५॥
अनयपथानें चाले दृष्टि म्हणुनि कष्ट भोगितो अंती ।
गेली घडी न येई, निष्फल मग त्यास वाटली खंती ॥२६॥
कपिभल्लुकसाहाय्यें रामे जिणिला दशानन सलील ।
साधुत्वलेशविरहीत होता तो यातुधानं दु:शील ॥२७॥
बोधी साधु जया तो क्षुद्र गणी स्वसुख हा नर पदार्थ ।
शिव रामदासबोंधे राज्य करी जनसुखार्थ, न स्वार्थ ॥२८॥
साधु सदा सकलांना सुचवुनि सरणी सुयोग्य सुखवितसे
ती सरणी अवलंबिति काम तयांचा फलाढय होत असे ॥२९॥
दर्शनही साधूचें सत्याचा उचलवी नरा पक्ष ।
शिवबास भेटतां क्षणि झाला जगदेव देशहितदक्ष ॥३०॥
देशद्रोह गळाला, देशप्रेमा तयाचिया स्थानीं- ।
आला तिरुमल्लमनीं शिवसहवासें असें पडे कानीं ॥३१॥
परक्याचा चरें हरजी आला शिवराज्यरीति हेराया ।
देश्द्रोह गळुनि तो पडला शिवभक्त होउनी पायां॥३२॥
जो आश्रयार्थ जाई साधूला शरण तो लहे काम ।
येतां शरण बिभीषण लंकेचे राज्य त्यास दे राम ॥३३॥
निजदेशहितासाठी स्वार्थ उपेक्षून साधु खटपटतो, ।
क्षणभंगुर लाभास्तव विकितो निजदेश शत्रुला खल तो ॥३४॥
सस्तंग चिरडतो परभाव जसा नृहरिमंत्रजप भूत ।
सत्संगजल क्षालुनि अघमल करि चित्त तूर्ण परिपूत ॥३५॥
साधूला क्षोभविणें, वायूला रोधणें गगनकोणी, ।
वृषभास दोहणें वा, हें केलें आजवर वदा कोणी? ॥३६॥
खलकृत अपकारानें स्पष्ट नराचे जनास गुण दिसती ।
कल्पकता-विद्वत्ता-मतिमत्ता-सहनशीलता-प्रभुती ॥३७॥
कल्पकतेंचे यश शिवराया देई अविधकारा ती ।
अनलीं पडतां कालागुरु तत्सौरभ समीरण वहाती ॥३८॥
साधू दरिद्र तरिहि अनघपथप्रवण तो सदा राहे ।
पंडितशिरोमणीही साधु असुनि गर्व तो न लव वाहे ॥३९॥
आत्मीयांचे रक्षण हा क्रम जो साधु तो सदैव वरी ।
प्रेमे दंडी त्याला, परि साधु न दे तया विपक्षकरी ॥४०॥
पुण्यें पापें करुनी स्वर्ग नरक मिळवितात साधु खल ।
जैसे चरित्र ज्याचे तैसे तो अनुभवी यथाई फळ ॥४१॥
उगवेल कमल गिरिवर, कीं जर वेलेस सिंधु लंघील ।
तर साधु दिल्या वचनाकीं स्वीकारल्या व्रतास सोडील ॥४२॥
रामास सत्यसंधे पाठविलें दशरथें निबीड गहना ।
यश न मळविलें त्याणें आपुलिया लंघुनी अहो! वचना ॥४३॥
सार्याही व्यवहारीं साधुत्वाला असेचि अवकाश ।
साध्वाचरणें सार्या विपदांचा त्वरित होतसे नाश ॥४४॥
वैयक्तिक, सामाजिक, धार्मिक वा राजकीय, नैतिक वा ।
व्यवहार असो काहीं, साधुत्वा विषय, दावि तो विभवा ॥४५॥
साधुत्व प्रकटाया अवकाश न राजकारणांत मिळे ।
हें वचन, अलीक, अनृत, आधारविहीन, भासरुप, शिळें ॥४६॥
राजव्यवहारीं न स्थल साधुत्वा असें म्हणूंच नका ।
प्रभुला प्रकृतीलाही साधुत्वविभंग नेतसे नरका ॥४७॥
साधूच्या सर्व गुणां होणे आधार जरि नसे सुकर ।
तरि साधूचे काहीं गुण अंगी यावया झटोत नर ॥४८॥
ही “पुण्यपंक्ति” तुमच्या चित्तीं स्थिर पद करोनिया राहो ।
तन्मननें होउ तुम्हां शांतीचा इहपरत्रही लाहो ॥४९॥
अनुष्टुभ् छंद.
रचिले “पुण्यपंक्ती” हें काव्य वामननंदनें ।
तें लोकां मार्ग दावूनी त्यांची आनंदवो मनें ॥५०॥