शिवाजीच्या चारित्र्याचें एक उदाहरण.
कथेचा प्रसंग.
आबाजी सोनदेव नावांच्या एका प्रभु मराठयानें शिवाजीच्या आज्ञेवरून कल्याण सुभा जिंकून घेतला, तेव्हां तेथचा सुभेदार
मौलाना अहमद ह्याची सून ह्या प्रभु वीराच्या हातांत सांपडली. ती अतिशय सुंदर होती, ती शिवाजीला त्यानें नजर केली. परंतु शिवाजीनें तिचा स्वीकार न करतां तिला वस्त्रालंकारांनी विभूषित करून तिला परिजन देऊन परत पाठवून दिले.
ह्या ऐतिहासिक प्रसंगावर अनेक महाराष्ट्रीय शारदाभक्तांनी अनेक मनोहर गद्यपद्य कृति केल्या आहेत. आपणही ह्या प्रसंगावर काहीं तरी लिहावें अशा प्रेरणेने आम्ही हें खंडकाव्य लिहिलें आहे. तें आम्ही प्रेमानें महाराष्ट्रीय वाचकांना सादर करीत आहों.
वृत्त आर्या.
१.
शिवबाच्या अंगीं बहु होते महनीय गुण असामान्य ।
त्यांच्या सामर्थ्यावरि राज्य तयें स्थापिलें जना मान्य ॥१॥
त्या शिवबाचे गावे गुण हा मम काम फार दिवसांचा ।
परिं तें गिर्यारोहण, झाला मम धीर पंगुचा काचा ॥२॥
शिवबाचे गुण गातां टेकिति पंडितशिरोमणिहि हात ।
तर काय कथा माझी? परि पुण्य गमे मला प्रयत्नांत ॥३॥
कोठें लोकोत्तर तो पुरुष जयें राज्य निर्मिलें भव्य? ।
कोठें मी कवि नेणे जो एकहि सरस कल्पना नव्य? ॥४॥
परि सर्व शक्य न म्हणुनि लवहि न करणें नसे मला मान्य ।
गातों त्याचा एकचि चारित्र्यशुचित्व हाच गुण, नान्य ॥५॥
शिवरायाच्या पदरीं आबाजी सोनदेव नांवाचा ।
कायस्थ प्रभु होता, स्वामीच्या पूर्ण तो भरंवशाचा ॥६॥
मतिनें गुरुसौ, शौर्य मृगपतिसा, शक्तीनें मतंगजसा- ।
तो सुसुत मातृभूचा, प्रिय हो शिवबास जीवसा न कसा? ॥७॥
एके दिवशी त्याला एकान्तीं बोलवून शिवबा हें- ।
वदला, “गा आबाजी, मन्मनिंचा पुरविं काम लवलाहें ॥८॥
मोठया कार्यावरि मी आबाजी, आज धाडितों तुजला ।
ह्या कार्याला तुजसा उचित न दुसरा दिसे पुरुष मजला ॥९॥
सर्व मर्हाठयांमध्ये शूर चतुर तुजसमान तूं, नान्य ।
करशील तूंच आबा, मद्योजित कार्य हें असामान्य ॥१०॥
तूं जंबुकसा धूर्त, प्रतिभय हरिसा, समीरसा चपळ ।
कल्याण सुभा यवनांपासुनि घ्यायास शीघ्र जाच, पळ ॥११॥
यवन सुभेदार तिथें विषयी न करूं शके प्रकृतिभव्य ।
कथिं कल्याणकरांच्या करि कल्याणार्थ काय कर्तव्य? ॥१२॥
म्रुदु शय्येवरि त्याचा लोळे संतत सुखामधें काय ।
कथिं कल्याणकरांच्या कुशलाची काळजी करी काय? ॥१३॥
सुनृप सुखवि सुसरणिनें सकल समाजास सत्य संकल्पें ।
सुसरणिसमुद्भव सुखें संतोषवितीं सदा जरी स्वल्पें ॥१४॥
परि हे असती यवन प्रभु सतत दंग सुखविलासांत ।
दासांपरि, न सुतांपरि,हिंदूना हे प्रभू समजतात ॥१५॥
कल्याणकरां झालें आहे दे माय धरणि ठाय असें ।
सोडविल्याविण त्यांना स्वस्थ मला बैसवेल सांग कसे ॥१६॥
आगंतुक यवन इथें, यजमानपणा अलज्ज गाजविती ।
दुर्वर्तनें तयांची अबाजी, सांगू सांग तो किती ॥१७॥
हे यवन वसोत इथें, परि बंधुत्वास ठेवुनी चित्तीं ।
हिंदूंशी हे प्रेमें होउत वाटेकरी सुखीं वित्तीं ॥१८॥
परि यवन विसरती हें बंधुत्वाचें पदोपदीं नातें ।
तुजसे सहाय मिळतां निर्मद मी करूं शकेन रें त्यातें ॥१९॥
यवनांच्या हाते जें, आबा, कल्याण तें अकल्याण ।
कल्याण सार्थ करिं जा तेथें भगवें उभारुनि निशाण ॥२०॥
कल्याण सुभ्यामध्यें भगवा झेंडा उभार आबा, जा ।
घेउनि सैन्य पुरेसें साधुनि ये शीघ्र या महाकाजा ॥२१॥
आबाजिस शिवरायें यवनांवरि धाडिलें लढायास ।
असुरांवरि इंद्राने जैसें सेनानि कार्तिकेयास ॥२२॥
कल्याण सुभ्यावरि हा आबाजी शांत रीतिनें गेला ।
जलमार्गें स्थलमार्गे सार्या रोखोनि तो दिशा ठेला ॥२३॥
आबाजीनें धाडुनि हेर सुभ्यांतील भेद आणविला ।
मग उघड वैर मांडुनि मौलानाला निरोप पाठविला ॥२४॥
“शिवरायाचा सेनापति मी, मध्दस्तगत सुभा कर हा ।
नातरि सिध्द रणा हो, हिंदूचें अतुल शौर्य वीर्य पहा” ॥२५॥
आबास अहमदानें पाठविला उलट यापरि निरोप ।
“तूं काफिर, मज सर्पा तुडवुनि कां व्यर्थ आणिसी कोप? ॥२६॥
मौलाना अहमद मी हरि, तूं गजशीव, उगचि बडबडसी ।
ये काफिरा शरण मज, नातरि वासूनि तोंड तूं पडसी ॥२७॥
धेनूच्या चालाव्या कैशा रे खाटिकापुढें गमजा? ।
त्वद्देहाचे तुकडे करणें ही तव पुरे मदास सजा ॥२८॥
तव मद शिगेस चढला, कोपविसी व्यर्थ मजसि आबाजी ।
ठाक उभा संग्रामा, ये तुजला हात दावितों आजी” ॥२९॥
येतां निरोप उलटुनि मौलाना अहमदाकडून असा ।
आबा रणार्थ उठला, हिंदूला यवनमद रुचेल कसा? ॥३०॥
संग्राम जाहला तो श्रोत्यांना विस्तरें न कळवीन ।
झाले यवन पराजित, कीं ते होते खरेच बलहीन ॥३१॥
कल्याण सुभा जिणिला आबाजीनें समस्त लवलाहें ।
जिकडे तिकडे भगवा झेंडा फडकत समीरणीं राहे ॥३२॥
आबाचें बल भंगिन, त्यास पराभवीन, संयत करीन ।
ही यवनाशा जिरली, अनुभवि तो ती दशा स्वयें दीन ॥३३॥
मौलाना अहमद तो संयत केला, न निहत आबानें ।
त्याच्या अधिकाराला योग्य अशा त्यास वागवुनि मानें ॥३४॥
जे लोक शरण आले त्यांस दिलें जीवदान आबानें ॥३५॥
ह्या विजयाची वार्ता आबानें कळविली शिवाजीस- ।
धाडुनि चर आर्धी, मग रायाच्या तोहि जाय भेटीस ॥३६॥
२.
मौलानाची होती रूपवती सून, रति जणों दुसरी ।
लीला नाम तियेचें, दिसली आबास त्याचियाच घरीं ॥३७॥
सौंदर्यनदी, यौवनमूर्ती, कर्पूरवर्ति नयनाला ।
विधिनिर्माणकुशलता आबाच्या येइ दृष्टिपथिं बाला ॥३८॥
ही युवती दिसतांक्षणि आबाजीनें विचार मनिं केला ।
“होइल तुष्ट धनी मम, त्यासचि देईन भेट लीलेला ॥३९॥
विधिचातुरी सदेहा, जननेत्रां कौमुदीच ही बाला ।
मदनविलासी वसती, धन्य खचित ती करील शिवबाला ॥४०॥
मोहक मुख, गोंडस, वपु तरल विलोकित, विलासयुत गमन ।
भाषण गोड इचें, शिवरायाचें तोषविल नित्य मन ॥४१॥
लावण्यमधुपरिप्लुप्त शिवरायविलोचनद्विरकेफांस ।
ह्या यवनी रमणीचें मुख देइल खचित निर्भरसुखास ॥४२॥
ठेवूनि रक्षणास्तव सैन्य सुभ्याच्या शिवास भेटाया ।
आबा उठला तेथुनि कालाच्या न व्यया करुनि वाया ॥४३॥
लीलेला घेउनि तो आला भेटावयास शिवबाला ।
त्यानें वंदन केलें स्वामीच्या स्पर्शुनी शुभ पदाला ॥४४॥
आबास पाहतांक्षणिं शिवराया पावुनी परम हर्ष ।
वदला, “तुजसे सत्सुत असतां ही भू बघेल उत्कर्षं” ॥४५॥
कल्याण सुभा कैसा जिणिला हें विस्तरें निवेदून ।
आबानें शिवबाच्या आनंद दिला मनाप्रति अनून ॥४६॥
वृतान्त आयकुनी तो शिवबाला वाटलें समाधान ।
मग वदला शिव, “आबा, मजसि तुझा वाटतोच अभिमान ॥४७॥
हे यवन आर्यभूला छळिती हें प्रखर शल्य मज सलतें ।
तव धन्यवाद गावे तितुके थोडे असेंच मज गमते ॥४८॥
तुजसे मम सहाय्या जय दैवें वीर लाधले शतशा ।
तर आर्यभूमिची मी नष्ट करिन ही असह्य दीन दशा ॥४९॥
कल्याण तें न खेडें, आर्य महीचेंच मूर्त कल्याण ।
तें परत आणुनी त्वां मातेच्या देहिं घातला प्राण ॥५०॥
कल्याण आर्यभूचें जें होतें सुचिर यवनहस्तगत ।
तें शौर्य चातुर्यें हिसकावुनि आणिलें तुवां परत ॥५१॥
तुज योग्य पारितोषिक देइन, कीं येसि होउनी विजयी ।
परि धन्यवाद देणें करितों इतुकेंच आज ह्या समयीं” ॥५२॥
हा योग्य समय ऐसें जाणुनि लीलेस आणवुनि पुढती- ।
वदला आबा, “घ्या ही बाला, पुरवा मदीय ही विनती” ॥५३॥
लीलेच्या सौंदर्य झाला आश्चर्यचकित शिवराया ।
विधिनिर्मित कौतुक हें स्तब्धक्रिय करि मुहूर्त तत्काया ॥५४॥
क्षणभरचि विलोकुनि हा विधिनिर्मितिकुशलतापरमसार ।
बसला स्तब्ध करित तो बोलावें काय हा मनिं विचार ॥५५॥
लीलेच्या सौंदर्ये जन तेथिल इतर जाहले चकित ।
बसले बघत तिजकडे करुनि दृशा जणुं निमेषबलरहित ॥५६॥
जन म्हणति मनीं “कौशिक गलितव्रत बघुनि मेनका झाला ।
ही मोहवील लीला काय न संसारमग्न शिवबाला?” ॥५७॥
मग लीलेला काहीं बैसवुनी अंतरावरी दूर ।
शिवबा वदला समरीं तैसा नयरक्षणींहि जो शूर ॥५८॥
“तूं मजला भक्तीनें ही देऊ भेट पाहसी बाला ।
गुण काय बघुनि माझे ठायीं त्वन्मनिं विचार हा आला ॥५९॥
नेत्रें विशाल तैजस, अधर रुधिर, देह केतकाभ इचें ।
शकती मोहूं न मला, विषयाग्निमुखें न साधुहीर पिचे ॥६०॥
न त्वद्वर्तन कोपें, परि आश्चर्येंच मम मनास भरी ।
कीं मत्सहवासीं तूं असुनिहि कळलों तुला न आजवरी ॥६१॥
धिङ् मम चारित्र्या कीं गमलों मी ह्या उपायना उचित ।
स्वीकारिन मी ईतें हा ग्रह तव मद्यशा मळवि खचित ॥६२॥
नवलचि हें की असुनी तूं प्रभु कायस्थ चांद्रसेनीय ।
कळली तुला न शुचिता चारित्रयाची परावधि मदीय ॥६३॥
कायस्थ प्रभु मानवहृदयपरीक्षण करी, चुके न कधीं ।
परि चुकली रत्नींशी मंदाची दृष्टि मध्दृदयिं तव धी ॥६४॥
मम कोणत्या कृतीनें द्याया ही भेट वळविलें तुजसी? ।
भलत्याला भलती तूं अर्पण वस्तू कशी करूं बघसी । ॥६५॥
ज्वरिताला पय देशी, मणिकांचनभूषणें विरक्ताला ।
अंधाला दर्पण कीं, आबा, ही मजसि देउनी बाला ॥६६॥
गंगाजलसें मम मन शुचि, तें शुचिता कधीं न सोडील ।
या बालेचें मजला सौंदर्य न लवहि मोह पाडील ॥६७॥
सौंदर्यबडिश टाकुनि मज मीना नयसरामधुनि खेची ।
तो वारणा बिसाने बांधुनि खिळवावया स्वबल वेची ॥६८॥
सौंदर्य मला भुलविल जर विझविल चुलुकमित जल दवासे ।
करतल लपवील रविस, कीं टिटवी आटविल समुद्रास ॥६९॥
रविनें ताप त्यजिला तर मी स्पर्शीन ह्या कुमारीला ।
मज जननीपरि वंद्या, हृद्यो भगिनी सुतेपरी लीला ॥७०॥
अबलेचा छल करणें हें बिरुद नव्हेच ह्या शिवाजींचे ।
करणें हारविणें सौभाग्य मदीय विभवलक्ष्मीचें ॥७१॥
ह्या बालेचे बघतो डोळ्यांनी रूप मी मनोहारी ।
विधिनिर्मिति ही प्रेक्ष्या, परि न स्पृश्या म्हणे मन विचारीं ॥७२॥
देशास्तव शत्रूशीं प्रच्छन्न कधीं, कधीं उघड वैर- ।
करणें उचित असें तरि उचित नसे नीति बहकणें स्वैर ॥७३॥
विषयसुखास्वादार्थ न, जनहितकरणार्थ हा मदवतार ।
अवतार कृत्य हें कीं यवन प्रभु दूर लोटणें पार ॥७४॥
मी जातीचा क्षत्रिय, चातुर्वण्यदिरक्षणा झटणें ।
हें मत्कर्तव्य असे, हें करणें हेंच मम असे जगणें ॥७५॥
गोब्राम्हणावनास्तव देशाचा मी करीन उध्दार ।
मी क्षत्रिय, या योगें मज्जन्म करीन मी फलितसार ॥७६॥
माझे ठायीं आहे जें अल्प स्वल्प वीर्य आबाजी ।
तें मी वेचीन सदा गोविप्रावन अशा महाकाजीं ॥७७॥
माझी माता असती अर्धांशेही सुरेख इजमानें ।
तर मी तत्सुत नसतों आहें इतुका कुरूप रूपानें ॥७८॥
ही बाला मधुर असे, परि मज ती जेंवि तुळस गणपतिला ।
जननी, भगिनी, कन्या. यांपरि ती वाटेतच मम मतिला ॥७९॥
जननीपरि, भगिनीपरि, कन्येपरि ही प्रिया मला यवनी ।
न विलासिनिपरी; हा तव न उदेला कसा विचार मनीं? ॥८०॥
जननीभगिनीकन्यापदिं उचित, विलासिनीपदिं न व्हावी ।
देवाच्या मूर्तीनें पुंगी खायास केंवि फोडावी? ॥८१॥
आबाजी, तूं बहु दिन माझें वर्तन पहात आलास ।
परि वोळखिलें कैसें न कळे, त्वां मन्मन: शुचित्वास? ॥८२॥
क्रूराशीं क्रौर्य करिन, समरीं शतसंख्य वीरहि वधीन ।
कपट्याशीं कपट करिन, परि अकलत्रा न भोग्य भावीन ॥८३॥
झालें तें झालें, परि पुनरपि ऐसें करूं नको कृत्य ।
कीं ते चरित्रयाला माझ्या लावील डाग हें सत्य ॥८४॥
परिजनसंरक्षित ही सुखवो जनकास पतिस भेटोन ।
तर त्यांकडे इला तूं धाडुनि दे, कालहरण हो ओ न” ॥८५॥
मग लीलेला वदला आश्वासनावर असें वचन राया ।
“स्वजनांकडे तुजसि मी पाठवितों, जा तयांस भेटाया ॥८६॥
परिवार तुला देतों, त्यासंगे शीघ्र जा स्वकीय घरीं ।
आप्तांस भेट देउनि लीले, वंदुनि सुखाढ्य त्यांस करीं ॥८७॥
जा मेहुण्यास माझ्या, कीं माझ्या जावयांस धन्य करीं ।
घडलें वृत्त इथें तें विसरुनि लीले, मनीं न कोप धरीं” ॥८८॥
ऐसें वदुनि शिवें तिज परिवार महार्ह भूषणें वित्तें ।
यांसह निरोप दिधला, ती जाया सिध्द हो अभय चित्तें ॥८९॥
पर्यवसाने सुखाचें झाल्याने तोषली मनी लीला ।
मग ती गेली करुनी जनकास तशी शिवाजिस नतीला ॥९०॥
नर तोचि शुध्द गणिजे काया वाचा मनांत हो शुध्द ।
ह्या सरणीच्या गेला शिवबा न कधींहि लेशहि विरुध्द ॥९१॥
लीले, तूं धन्य खरी, व्याघ्राबिलीं भीत भीत आलीस ।
व्याघ्रमुखीं पडलीस न, जीवनदयामूर्ति बघुनि धालीस ॥९२॥
महाराष्ट्रांमध्ये अगणित गुणीं जो झळकला ।
मर्हाठयांची ज्याणें जगिं पसरली कीर्ति विमला ॥९३॥
शिवाजीच्या शिचित्वाची कथा वामननंदन ।
सांगे ती सर्व लोकांचे नीत्युन्मुख ॥९४॥