[ कोणचा देश जित म्हणावयाचा, आणि कोणचा देश अजित म्हणावयाचा, हें ह्या कव्यांत सांगितले आहे. ]
देखों देश प्रसम जिणिले विक्रमाढ्या नृपांहीं,
हत्यायोगें क्षिति भिजवली शोणिताच्या प्रवाहीं ।
शस्त्रें अस्त्रें सकल हरिलीं निर्जितांची तयांनी,
त्या देशांतें तरि कवणही जेणिलेसे न मानी ॥१॥
शस्त्रें सारीं हरुनि जरिहि देश नि:शस्त्र केले ।
होती नैव स्तिमितबल ते तत्वता जिंकियेले ।
शस्त्रें तीक्ष्णें हिसकुनि कधीं जिंकिजेति न देश,
शस्त्रांमध्ये प्रतिभय असा नैव सामर्थ्यलेश ॥२॥
घालो कारागृहिं जित जना क्रूर जेता बलानें,
रोधो त्यांच्या चलनवलना शृंखलाबंधनानें ।
जेता ऐसें बलमदभरें कौर्यदपें करो तो,
तेणें देश प्रहत तरिहि जिंकलासा न होतो ॥३॥
कारावासें नर न जिणिजे, शृंखलाबंधनें वा ।
जों जेत्यानें मन न जिणिलें तों फुका लाभ केंवा ।
कारा देहा, अवयवगणा शृंखला रोधिते कीं,
किंतु स्वेच्छागति मन कधीं राहिना ठायिं एकीं ॥४॥
जेत्यांनों! कां मनिं धरितसा व्यर्थ जेतृत्वगर्व?
जिंका आधीं जितजनमना दर्प सांडोनि सर्व ।
जो जिंकील प्रभु जितमना तोचि मानास पात्र,
तो कव्याद प्रभु गणियला जिंकि जो देहमात्र ॥५॥
खङ्गे युध्दीं जय मिळवुनी, संघ घालोनि शोकीं,
लाखों दीनां पकडुनि कोणी जिंकिला देश लोकीं?
मानूं जेता बहुजनमनोरंजनी जो समर्थ,
देहा जिंकी परि नचि मना तो न जेता सदर्थ ॥६॥
खङ्गाघातें करुनि भयदा निर्जितप्राणहानी ,
सत्य, न्याय्य, प्रिय तदितरां शब्द लावोनि मानीं ।
किंवा मान्यां श्वगणसमशी तुच्छता दाखवूनी
नाना देश स्फुट अजवरी जिंकिले किंप्रभूंनी ॥७॥
बीजोच्छेदा, अमृत वचना, मानभंगा करूनी
देश प्राज्य प्रहतमतिंनीं जिंकिले किंप्रभूनीं ।
त्यांची कृत्ये कधिहिं न जगीं मान्यता पावतात,
तन्नामातें श्रवणिं पडतां लोक धिक्कारितात ॥८॥
जो राज्याला प्रभु असिबलें स्थैर्य आणूं बघेल
तो वाळूचा घडवुनि जिना स्वर्ग पाहूं उठेल ।
कीं होडीनें तरुनि उदधी पैल गांठूं सजेल,
कीं तंतूनें द्विरद खिळवूं कोळियाच्या निघेल ॥९॥
साधूंच्या जो जयपथ मना वाटला नित्य मान्य-
तो ऐका; तो जितजनमनोरंजनाहून नान्य ।
धर्में न्यायें पथ उचित तो सुप्रभु स्वीकरीतो,
स्वर्गी देवां, क्षितिवरि नरां कौतुकें गाववीतो ॥१०॥
“जिताजित” समाख्याही विद्याधर करी कृती ।
तेणें तो शम लाहोनी निरंजन असो कृती ॥११॥