[दारुच्या नादीं लागलेला मनुष्य आपलें आणि आपल्या आप्तेष्टांचे नुकसान कसें करतो, हें ह्या काव्यांत वर्णिले आहे.]
मोहवी मदिरा मना, नर योग्य रीतिस सोडितो,
सभ्यही पुरुषास शब्द असभ्य भाषणिं योजितो ।
आपुल्या सुहृदांसवे विनयास सांडुनि बोलतो,
स्त्रीसवें तनयांसवे करि वर्तणूक कठोर तो ॥१॥
मोहवी मदिरा मना, नर नीति निर्मल लंधितो,
सत्य वर्तन, सत्य भाषण, सत्य चिंतन सोडितो ।
जें मिळेल तयास तें मदिरेमधें धन वेचितो,
सांचले धन संपता करि चोर्य, लेश न तो भितो ॥२॥
मोहवी मदिरा मना, नर धर्मबंधन तोडितो,
श्राध्दपक्ष न, हव्यकव्य न, देवधर्म न पाळितो ।
मंदधी मदिरेंत होउनि दंग तीतचि रंगतो,
धर्म विस्मरतो, सदा मदिरा पितो जरि खंगतो ॥३॥
मोहवी मदिरा मना, नर लक्षिना स्व अनामया,
व्याधिच्या मदिरा पितां लवमात्र तो न धरी भया ।
घालवी मदिरानिषेवणि तो अनिद्र सदा निशा,
इंद्रिये विकलें म्हणूनिच शून्य होति तया दिशा ॥४॥
मोहवी मदिरा मना, नर सर्व आंचवतो सुखा,
बंधु बांधव त्याचिया नच इच्छितात बघों मुखा ।
त्यास टाळिति लोक तो जणु रक्तपीतिनिपीडित,
हाय हाय! अशापरी दिन कंठितो जनवर्जित ॥५॥
मोहवी मदिरा मना, नर ती अहर्निश सेवितो,
तो पितो मदिरा सदा जणु ती सुधेपरि भावितो ।
अन्न टाकुनि तो पितो मदिरा ,पुन्हा मदिरा पितो,
धर्म यातंच, मोक्ष यातंच, मूर्ख तो जणुं मानितो ॥६॥
मोहवी मदिरा मना, मदमत्त मानव मोडितो-
मार्ग मंगळ, आपुली मग मूर्खता जनिं दावितो ।
त्यापुढेहिं गटारतीर्थजलांत तो करि मज्जन,
धिक्करोनि तया तिरस्करितात सर्वहि सज्जन ॥७॥
जनें बोध स्मरावा कीं मोहवी मदिरा मना ।
अशी खरोखरी आहे वामनात्मजकामना ॥८॥