मंदार मंजिरी - मंदार मंजिरी

भिन्न भिन्न वेळी भिन्न भिन्न मासिकात छापलेली अशी कांही आणि आजपर्यंत मुळींच कोठेहीं न छापलेली कांही निवडक काव्ये.


मंदार ह्या नावाच्या एका गडयाला शिवाजीने मुसलमानांच्या ताब्यातील एका किल्ल्यासंबंधाची माहिती आणावायासाठी हेर पाठविले होते. हा गडी वयाने पंचविशीच्या आतं असून शरीराने गोंडस आणि भाषणांत चतुर होता. त्यानं मी मुसलमान आहे असे सांगून त्या किल्ल्याच्या अधिकाराची मर्जी संपादन करून घेतली, आणि त्याच्या हाताखालच्या नोकरचाकरांचा तो प्यारा झाला. आपणावरचा बहीम टाळावयासाठी एकदा तर तो त्या मुसलमान अधिकार्‍याच्या ताटांतून जेवला देखील. जरूर ती माहिती मिळताच तो त्या किल्ल्यातून निसटून बाहेर पडून शिवाजीस भेटला. शिवाजीनें त्याची महत्वाची कामगिरी मनांत आणून त्याला एक सोन्याचें कडे बक्षीस दिलें, आणि शास्त्री, पंडित, वगैरेंच्या संमतीनें त्याला प्रायश्चित्त देऊन परत जातीमध्ये घेतलें, अशी गोष्ट ह्या काव्यांत ग्रथित केली आहे.
शिवबाचें कार्य सफल करुनी, संक्षिप्त कथुनि तें त्याला।
मंदार त्या स्थलाहुनि भेटाया स्त्रीस सत्वर निघाला ॥१॥
चंपापुरास येउनि शिरला मंदार आपुल्या उटजी।
त्याची वस्त्रे मळली होती चालूनि मार्ग दीर्घ रजी ॥२॥
पतिला पुढती बघतां गृहकृत्यें त्यजुनि मंजरी आली।
आनंदभराने ती पुलकिततनु तेघवां अहो! झाली ॥३॥
स्तिमितक्रिय ही दोघें अन्वोन्यमुखांवरी स्थिर करोन-।
दृष्टि ठेली क्षणभर, जाणों पाषाणमूर्ति त्या दोन ॥४॥
मग मंजरिने पुशिलें बहु कुशलप्रश्न आपुल्या पतिला।
त्यानेंहि अल्पशब्दात्मक वृत्तांत स्त्रियेस जाणविला ॥५॥
स्वामीच्या कार्याची मंदारें सफलता तिला कथिली।
विस्तर न तयें केला, कार्याची कल्पनाच तीस दिली ॥६॥
गात्रें आलस्यान्वित, भाषण मितशब्द, वदन सुकलेले।
ह्याहीं तिज जाणविलें पतिचित्तीं दु:ख तीव्र भिनलेले ॥७॥
बाह्याभ्यंतरि, अपुला पति न यथापूर्व हें तिला कळलें।
चाणाक्ष ती, तिचें मन दु:खकुतुकविस्मयादिहीं भरलें ॥८॥
स्वस्थानी वृत्ति नसे पतिची हें तत्क्षणीं तिला कळलें।
कारण अज्ञात तरी चित्त तिचें फार फार हळहळलें ॥९॥
स्वेच्छेने पति कळविल ते परिसावें अशा विचारानें-
न विशेष तिनें पुशिलें; ही तिज वर्तनदिशा बहू माने ॥१०॥
केला मंदारने मग अल्प असा घरीं उपाहार।
चित्त व्यग्र तयाचे दिसलें, की तो न बोलला फार ॥११॥
करुनि उपाहार असा भेटाया स्वामिला जवें उठला।
चित्ता करुनि नियंत्रित घ्याया स्त्रीचा निरोप तो सजला ॥१२॥
तो वदला तिजला,“ मी जातों, न दिसेन या पुढें तुजला”।
हें तो वदुनि शुगाविल पविहते गिरिसा महीतली पडला ॥१३॥
जें दु:ख रोधिले मनिं त्याने तोवरि न रोध तें साहे।
सेतु फुटुनि जल सिंधू तेवि तुटुनि धीर बीष्प तो वाहे ॥१४॥
पाहुन पतीस रडता स्त्रीही नेणून कारणा रडली।
कोणा आर्यस्त्रीस न पतिसुखदु:खें स्वकीयशीं गमली? ॥१५॥
बाष्पजलाच्या स्त्रुतिनें ओसरतां दु;ख तो तिला बोले।
मन मोकळें करुनि मग, वस्त्रे डोळे पुसून जे ओले ॥१६॥
“सांगोपांग सफल मी शिवबाचें कार्य करुनियां आलों,।
परि मंजरी खरें तुज कथितों मान फारसा न मी घालों ॥१७॥
स्वामीच्या कार्यास्तव उचित असे देह घालणें अनली।
विष खाणें, की घेणे स्वच्छेने उदधिच्या उडीहि जलीं ॥१८॥
परि तें कार्य कराया मी सफल अतीव घोर अघ केलें।
जाणुन बुझून केलें, पुण्यविचार न तदा मानिं उदेले ॥१९॥
ज्या युक्तिनें धन्याचें केलें मी कार्य सफल तीनेंच।
मोतेरे स्वात्म्याचे केलें, कळला मला न हा पेंच ॥२०॥
स्वामीच्या कार्याचे झाले साफल्य, मम न जन्माचे।
मी घोर पाप केलें जे मंजरि मज न वदवते वाचें ॥२१॥
स्वामीच्या कार्यास्तव मरणें जरि सेवका असे उचित।
तरि जी पापकृती ती क्षम्य गणिल धर्मकोविद न खचिता ॥२२॥
मरण पुरवलें, परि अघ अघमतम करोनि न नरका जाणें।
स्वाम्यर्थ मरण देतें स्वर्ग, नरक अध अहेतु, मी जाणें ॥२३॥
स्वाम्यर्थ जरी येतें मरण तरी तें न मम मना डसतें।
परि मम मनास डसतें जें म्यां केलें अधोरतम अघ तें ॥२४॥
नकळत केले क्षमिजे पाप, असो तें कसेहि, काहीही।
तरिहि प्रायश्चित्तचि बुध्दिपुरस्सर अघा स्मृतित नाहीं ॥२५॥
तुज सारख्या स्त्रियेला, धर्माला, जातिला, समाजाला-
मी मुकलों, मी केलें प्रायश्चित्त नसे विहित ज्याला ॥२६॥
तुजशी तूंच पवित्रा, मजसा अपिवित्र मंजरी मीच।
तुजला मी स्पर्शिन तर मजसा जगिं मीच गणिल बुध नीच ॥२७॥
यास्तव मी तुज सोडुनि जातों, तुजला पुन्हा न भेटेन ।
कीं मत्संगतिनें तुज माझें भोवेल निश्चये ऐने ॥२८॥
धर्मत्याग अगोदर, तत्क्षालनिं विसरणें तदनु देश।
अघभार द्विविध असा सहबेल न पामरा मला लेश ॥२९॥
देशप्रतीस माझ्या अवसर लाधेल यापुढें न कधीं,।
त्या सेवीन न मी ज्या यवनपवनभुजगभुज गणी मम घी ॥३०॥
सरला ऋणानुबंध प्रिय भायें आपुला; दिशा दोन-।
झाल्या, इत:पर तुला जाणारचि मी असाच सोडोन ॥३१॥
तुज सोडुनि जाणें हें येतें माझ्या प्रिये जिवावरती ।
तरि मी जाणारचि हें निश्चित, मज आढळे न गती ॥३२॥
शेवटीचीच समज ही भेंट, पुन्हा मी तुला न भेटेन।
स्पर्शू न शके तुज कीं तूच विटाळील घोर मम एन ॥३३॥
शेतीभाती अपुली आहे पुष्कळ, पुरेल ती तुजला।
देवास आळवित जा प्रतिदिन, कीं तो क्षमा करो मजला ॥३४॥
शिवरायाला भेटुनि त्याचा घेउनि निरोप शेवटला।
जाइन काशीक्षेत्री, तेथें वास्तव बहु रुचेल मला” ॥३५॥
परिसुनि पतिभाषण हें स्मनिं ती अतिवेल मंजरी भ्याली।
दु:खोद्भव बाष्पाच्या साध्वी सलिलें सचैल ती न्हाली ॥३६॥
सांत्वायास्तव तिजला मंदार असें तिला वचन वदला,।
“तव रोदन आवर हें तव रोदन दु;ख देतसें मजला ॥३७॥
त्यजुनि तुला जाणें मम भोग्य तसें मजविना तुझें जगणें।
तें आपण भोगलियाविण मुक्ति न आपणा, न तें टळणें ॥३८॥
झालें तें परत न ये, रडतेस कशास मंजिरी वायां? ।
पापाने मळली हा स्पर्शिल मम या पुढें तव न काया” ॥३९॥
ऐकूनि भाषण पतिचें हें ती वदली असें तयास सती,।
“मी न तुम्हाला सोडुनि राहिन, तुमचेच पाय मजसि गती ॥४०॥
काहीही पाप असो तुमचें मज तुम्हिच शरण या जगतिं।
जलधि असो वडवावामय, त्या संगे करि नदी सदा वसती ॥४१॥
तुमचे काहिहिं असो पाप, कितीही, कसेंहि केलेलें।
सोडुनि तुम्हांस जगणें याहुनि तुमच्या, पदी बरी मेलें ॥४२॥
मी अर्धांगी तुमची, तुमचे मजला न पाप भिववील।
केले काय तुम्हि तें सांगा, काढा मनातलां कील ॥४३॥
दंष्ट्रानखरबलानें, क्रूरत्वाने, पलाशनत्वानें।
सिंह नरास भयंकर, सिहींस न, तिज तसाच तो माने ॥४४॥
कृति तुमची मज कळवा, न तुम्हि मज तुच्छ निंद्य वाटाल ।
सर्व देशांत तुम्ही मज मानाला योग्य भाजन असाल ॥४५॥
काहींही पाप असो तुमचे, वंद्यचि तुम्ही सदा मजला।
तुमच्या संगे मजला नरकी दाविल वसती मला त्रिदिव्यभव्य ॥४७॥
अतिघोर परस्त्रीरत, तदधिक गोविप्रहनन हें एन।
देशद्रोहण तदधिक, हें तुम्हि करुनिहि तुम्हासह वसेन ॥४८॥
याहुन घोरतर नसे अघ जें तुम्हि करुनि मजसि भिववाल।
तुम्हि केलें काय वदा प्रायश्चित्तात्म ज्या नसे ढाल ॥४९॥
तुमच्या पायांची मी दासी, सोडीन मी तुम्हा न कधीं।
तुमची संगति नसतां स्वर्ग नरकसम गणील हो मम घी” ॥५०॥
ऐकूनि मंजरीचें भाषण मंदार तिजसि हें वदला।
मन मोकळें करुनि, “मी माझें अघ सांगतो परिस तुजला ॥५१॥
घेनूची, विप्राची, देशाची, वा न मजकडून हत्या -।
झाली आहे, ही मम वाचा तूं जाण मंजरी सत्या ॥५२॥
ह्यातुंन पाप न एकहि, कीं त्याचें सारिखे दुजे काहीं- ।
केलें मी पाप, तुझ्या आण गळ्याचीच मी प्रिये वाहीं ॥५३॥
मंजरि मी केले तें पाप असें भिन्न जाण याहून।
मी स्वामिकार्य केले दुर्गाधिपतीस पूर्ण चकवून ॥५४॥
यवनी वस्त्रें ल्यालो, शेंडी काढून टाकिली पार।
गंधहि पुशिलें, झाला यवनाच्या सारखा मदाकार ॥५५॥
इतुकेच मंजिरी मी करितो तर पाप फारसें नव्हतें।
परि संशय वाराया यवनान्नहि भक्षिले, अभक्ष्यच तें ॥५६॥
हें अन्न न मी खातो तर कंठस्नान घालिता यवन।
तप्तात्रिं सेविले मी तत्सेवित अन्न दृढ करोनि मन ॥५७॥
केलें अभक्ष्यभक्षण शंकित मज वधिल तो म्हणुनि भ्यालों।
उच्छिष्टहि मी त्याचें सेवुनि मी बाटलों, पतित झालों ॥५८॥
धर्मात कुटुंबाची, आत्म्याची, जातिची, समाजाची-।
स्थिति; धर्मक्षत होतां क्षत काय न मम? मनास हें जाची ॥५९॥
स्वामीच्या कार्यास्तव धर्मच्युतिरुप पाप म्यां केलें।
यवनान्नोदकसेवन करतां हिंदुत्व मम लया गेलें” ॥६०॥
ऐकूनि पतिभाषण हें त्या स्त्रीचें हृदय जाहलें हलकें।
ज्याला पतिचें होते अविदित अघ देत परुषत्तम हिसके ॥६१॥
गोविप्रदेशहस्यात्मक अघ पतिचें नव्हे असें कळतां।
हृदय सतीचें उसळे जैसें धनु सज्ज शिंजिनी तुटतां ॥६२॥
पतिनें कृत अघ कळतां वदली हर्षे असें तयास सती,।
“ तुम्हि कल्प्तितां तसें हें अघ घोर न मानिते मदीय मती ॥६३॥
देशहितास्तव रिपुला वंचाया वाटणें नसे पाप।
पय दाखवून फसवुनि पाप न बुध मानि मारणें साप ॥६४॥
तुम्हि केलें तें अल्पचि अघ, अथवा अघचि तें न म्हणवेल।
किंबहुना तें पुण्यचि, सुज्ञाने स्तुत्य वंद्य गणिजेल ॥६५॥
देशहितास्तव असलीं शंभर केलीं जरी तुम्हि पापें।
तरि मज वंद्य असालच, त्यांच्या मन चिंतेने मम न कापें ॥६६॥
ज्यास तुम्ही म्हणतां अघ तेंच तुम्हा वंद्य मम न करितें।
यवना फसवाया तुम्हि केली ती युक्ति मज सुखें भरिते ॥६७॥
मी स्त्री, मन्मत राहो, शिवरायांचेच मत विचारा हो।
शिवबास शीघ्र भेटा, जा, मी न विलंब हा शकें साहों” ॥६८॥
स्त्रीचा विचार कळतां मंदारा जाहला बहू हर्ष।
त्या चातकास तो स्त्रीसुविचार नवांबुचा जणो वर्ष ॥६९॥
घेऊनि मंजरीचा मंदार निरोप तेथुनी उठला।
शिवबा होता तेथें जायाला त्या दिशेकडे वळला ॥७०॥
शिवबाची एकांती मंदारें गांठ घेउनि तयाला।
वृत्त सविस्तर कथिलें अथपासुनि अनुसरोनि कालाला ॥७१॥
दाढी राखुनि शेंडी तासूनि आहिंदु मी कसा झालों।
यवनीनीं लावुनि मज तेलें त्यांच्या जलें कसा न्हालो ॥७२॥
शंका येतां यवना सेवुनि तप्तात्रगत कसें अन्न।
त्यास चकविलें, जरि तें सेवन हिंदूस अति अनुपन्न ॥७३॥
यवनास आपलासा केला मतिच्या कसा अवार्य बळें।
पोटांत शिरुनी त्याचें हृद्भतही काढिलें कसें सगळें ॥७४॥
मम गोंडस आकृतिला यवन कसा पाहताच तो भुलला।
मम मधुर विनोदी तो संभाषणरीतीनें कसा खुलला ॥७५॥
दुर्गाच्या संस्थेतील चातुर्यें हुडकिले कसे दोष,
इत्यादि वृत्त सांगुनि मंदाराने नृपा दिला तोष ॥७६॥
शिवबाने हातातींल मंदाराने द्यावयास काढून-।
केलें कटक पुढारां कांचनमय पारितोषिक म्हणून ॥७७॥
तें घेऊन तें सादर लावूनि शिरास ठेवुनि क्षितिला।
मग कर जोडुनि वदला मंदार करोनि नृपतिला नतिला ॥७८॥
“केलें मी कार्य तयें संतोषविलें तुम्हांस हेंच पुरें।
पतिता कशास कटकें, अघमारे विभवभोगरुचिच नुरे ॥७९॥
मुकलो अभक्ष्य भक्षुनि धर्माला, जातिला, समाजाला,।
स्त्रीला, कीं मी केलें प्रायश्चित्त नसे विहीत ज्याला ॥८०॥
जाउनि येथुनि काशीक्षेत्रा, आमरण तेथ राहीन।
न महाराष्ट्रामध्यें पुनरपि केव्हांहि कधिहिं येईन” ॥८१॥
हासुनि शिवबा वदला, “वेडा तूं मजसि दिससि मंदारा।
अल्प प्रायश्चिते जन तुज पावन करील गा सारा ॥८२॥
धर्मज्ञ सुज्ञ कथितिल तें प्रायश्चित्त घे, त्यजीं भीति।
धर्मज्ञ सुज्ञ सांगति पतितपरावर्तना अशी रीति ॥८३॥
प्रायश्चित्त यथाविधि घेऊनि तूं शुध्द होइं मंदारा।
मी तव पंक्तिस जेविन, येइल या विधिस मावळा सारा ॥८४॥
केशव देशाहितास्तव, न स्वहितास्तव, करी नर अगत्या-।
तें पाप बुध न म्हणती, ही अल्पांशेंहि उक्ति न असल्या ॥८५॥
देशाचा चालावा स्थिर योगक्षेम या विचारानें।
केले धर्मांतर जें तें गणिजे क्षम्यरुप विबुधानें ॥८६॥
आमुचिया देशाचे आम्हीच प्रभु, तुम्ही असा दूर।
हें दावाया हावें परदास्य न आर्य पथकरी शूर ॥८७॥
परकरगत ह्या भूमिस आर्य कसे पाहतील जे शूर?।
स्पर्शिल मातेस तया चिरुन तनय वाहविल रुधिरपूर ॥८८॥
जे आर्यधर्म बुडविति, जे तुडविति आर्यदेश निर्लज्ज।
त्या परक्यास असावे आपण रोधावया सदा सज्ज ॥८९॥
आगंतुक जो त्याणें यजमाना दास करुनि यजमान-।
आपण होणें हें क्षण आर्यमहीच्या सहेल तनयां न ॥९०॥
आगंतुक जे परके त्यांशी विश्वासघात पाप नसे।
देशहितास्तव करणें कपट तयांशी सदैव उचित असे ॥९१॥
स्वामित्व गाजवावें परक्यांनी हिंदभूस येऊन।
अत्रत्यातें द्यावे दास्य, असें बघुनि होइ मन दून ॥९२॥
अपुल्या लोकांचे हें राज्य असें आपुलेच ते जपणें।
हा धर्म असे अपुला, हें पुण्य असे, असेंच विबुध म्हणे ॥९३॥
पिउनि अपेय, अमेध्यहि भक्षूनि न होतसे मनुज पतित।
जर हें कृत्य तो करि साधाया सन्मनें स्वदेशहित ॥९४॥
निजदेशबांधवांशी नीत्युल्लंघन करूं नये लवही।
कीं ते दोषहि असे,तें टाळा, जेविं टाळि लोक अही ॥९५॥
सामान्य व्यवहारी नीत्युल्लंघन जरी असे पाप।
तरि देशांच्या रिपुशीं नीतीला हें न लाविजे माप ॥९६॥
स्वार्थास्तव शत्रूशी सख्य करुनि देशबांधवां मारी।
तो यमपुरीस जातां त्यास डसति सर्प संतत विषारी ॥९७॥
स्वपुखार्थ पाप करि तो नरका निम्ना जलौघसा जाय।
सान असो की मोठें, पाप करो रंक कीं करो राय ॥९८॥
जी वंचना रिपूशी केल्यानें साध्य होइ देशहित।
ती करणें क्षम्य असे, हा म्हणतो साधु मार्ग अघरहित ॥९९॥
विश्वासघात करणें, कीं खोटे बोलणें स्वदेशहितीं।
हें म्हणिजे क्षम्य बुधें, सत्पुत्र सदैव मार्ग हा वरिती ॥१००॥
रे आपुल्या स्त्रियेला, धर्मालाम जातिला, समाजाला,।
तूं मुकलास न कीं तूं देशाच्या जागलास विभवाला” ॥१०१॥
ह्या सरणीने दावुनि मंदारा नीतिचे विविध भेद।
शिवबाने लोपविला तन्मनिचा धर्मभंगभव खेद ॥१०२॥
नीती असते कैशी व्यक्तीची, नृपतिची, समाजाची।
हें स्पष्टपणे कथिलें शिवबाने, शुध्द मति सदा ज्याची ॥१०३॥
विवरण हें नीतीचे मंदारे परिशिलें प्रशांत मनें।
त्याच्या प्रकाश पडला चित्ती ह्या विवरणाचिया मननें ॥१०४॥
विस्तर कशास, रायें आमंत्रण पाठवून आणविले-।
शास्त्री पंडित, त्यातें मंदाराचे चरित्र जाणविलें ॥१०५॥
त्यांनी विचार केला, प्रायश्चित्तप्रकार साचार-।
निश्चित्त केला, झाला आनंदोदधिनिमग्न मंदार ॥१०६॥
पतितपरावर्तनविधि झाला दुसर्‍या दिनींच साचार।
मग शिवबाला वंदुनि आला चंपापुरास मंदार ॥१०७॥
शिवबाकडचें सगळे वृत्त तयें कळविले स्वप्तपत्नीला।
पर्यवसान सुखाचे झालेले बघुनि हर्ष हो तीला ॥१०८॥
कोण्या एका कथिली गोष्ट मला वृध्द मावळ्याने तीं।
कथिली मी लोकांतें, तीं मिळवो स्थान त्यांचिया चेतीं ॥१०९॥
“मंदारमंजरी” नाम काव्य वामननंदने।
केले विद्याधरें, त्यातें आदरावे सदा जनें ॥११०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP