मंदार मंजिरी - कवीचा आनंद
भिन्न भिन्न वेळी भिन्न भिन्न मासिकात छापलेली अशी कांही आणि आजपर्यंत मुळींच कोठेहीं न छापलेली कवी विद्याधर वामन भिडे यांची कांही निवडक काव्ये.
कविता रचीत असतां कवीच्या मनास जो आनंद होतो, तो पुढील पांच श्लोकांत वर्णिला आहे. आमच्या ‘मूर्च्छना’ नांवाच्या एका काव्यांतील हा उतारा आहे.
अन्तर्नेत्रें प्रथम बघणें साङग उद्दिष्ट अर्थ,
तो दावाया मग हुडकिणें शब्द जे जे सामर्थ्य ।
मोठा अर्थ प्रकट करणें शब्द योजून थोडे,
थोड्या अर्थें चरण भरणें, हें असे थोर कोडे ॥१॥
वृत्ता, अर्थ अनुगुण पदें सर्व शोधावयाला,
मांडायला मग समुचित स्थानिं त्या त्या पदाला ।
दावायाला श्रम कवि करी कल्पनांचे तरंग,
ते न स्वल्प श्रम तरि कवी होतसे त्यांत दंग ॥२॥
धुंडायाला यमक पडती कष्ट भारी कवीला,
त्यासाठीं तो धडपड करी; घोर ही काव्यलीला ।
केव्हां केव्हां सुमधुर असा श्लोक जन्मे अहो तो,
किंतु स्थानीं यमक न सुचे यामुळें त्याज्य होतो ॥३॥
ऐसे होती बहुविध जरी क्लेश भारी कवीस,
ते आनन्दा तरि वितरती क्लेश त्याच्या मतीस ।
ज्या आनन्दा कवि अनुभवी क्लेशही पावतांना
त्याची गोडी लवहि इतरां कल्पवेना जनांना ॥४॥
होते काव्यग्रथनसमयीं पूर्ण एकाग्रता ती-
चिन्तांतें न स्थल हृदयिं दे, दूर त्या सर्व जाती ।
शुध्दानन्द स्फुरण कविच्या पावतो अन्तरंगीं,
संसाराचे स्मरणहि तया होइना ह्या प्रसंगीं ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP