मंदार मंजिरी - गुलाबाच्या फुलांचे भाषण.

भिन्न भिन्न वेळी भिन्न भिन्न मासिकात छापलेली अशी कांही आणि आजपर्यंत मुळींच कोठेहीं न छापलेली कवी विद्याधर वामन भिडे यांची कांही निवडक काव्ये.


फिरतां मी उद्यानी पडला संवाद माझिया कानीं ।
तो कळवितो जनातें जाणुनि होईल बोधद तयातें ॥१॥
बघुनि गुलाबा त्यातें धिक्कारुनी बोलला नर वचातें ।
“ तूं कुसुमजातिलांच्छ्न, तव दुष्टत्वे विषण्ण होइ मन ॥२॥
तुज पाहूनि गुलाबा येतो अतिशयित कोप मजला बा ।
न दिसेल फुला तुजसम कोणी कोठेहि दृष्ट वा अधम ॥३॥
जनसुख भंगुनि तुजला होतो आनंद फार फार खला ।
रुपें मोहविसि परी जाउं न इच्छिसि कुणाचियाहि करीं ॥४॥
तुज तोडूं सरसावे जो रुप तुझें बघेन या भावें ।
कंटक बोचून तया पावसि आनंद रे सुमा अदया ॥५॥
घ्यावा तव वास तुला जर कोणीं तोडिलें जपून फुला ।
तर पाकळ्या भराभर गाळिसि कुसुमा समस्त भूमिवर ॥६॥
ही दृष्टता कितितरी? येईल कुणासही तुझी न सरी ।
तव वसति योग्य रानीं, योग्य न तूं यावयास उद्यानी” ॥७॥
हें वचन त्या नराचें परिसुनि सुम बोललें गुलाबाचें ।
“सजलास कसा द्याया दोष मला जो वसे तुझ्या ठाया ॥८॥
अधम खुशाल मला म्हण, परि सौजन्य न तुम्हा नरांत कण ।
नर दिसति अधम मातें, गणितो मी अदय सर्वहि नरातें ॥९॥
स्वसुखास्तव नर तोडिति कुसुमें, त्यांच्या न लक्ष्य देत्ति हित्तीं ।
सुंदर असतां हातीं धरुनि सकौतुक सुमें नर पहाती ॥१०॥
तद्गंधहि नर घेती परि सुकतां स्थान अवकरी देती ।
जों वस्तु सुखद तोंवर आदर, मग तुच्छ लेखितात नर” ॥११॥
“सुमोक्ति” नाम हें काव्य रची वामननंदन ।
अन्योक्तिरूप बोधें तें जनांचे तोषवो मन ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP