[ह्या काव्यांत कपासून ज्ञपर्यंत सर्व व्यंजनांपैकी एक एक व्यंजन प्रत्येक चरणाच्या प्रारंभी येईल अशी योजना केली आहे,
म्हणून याला व्यंजनांची पंक्ति हा अर्थ दाखविणारें नांव “व्यंजनावली” असें आम्ही दिलें आहे.
ङ, ञ, ण आणि ळ, हीं व्यंजनें शब्दारंभीं येऊं शकत नाहींत म्हणून तीं चरणारंभीं योजतां आली नाहीत. ह्या काव्यांत मूल्यावान् उपदेश आहे.]
करा स्वकर्तव्य खचा न लेशही, खलास टाळा समजूनि त्या अही ।
गजान्तलक्ष्मीहि मिळावयास्तव घडों न द्या पाप, चुकेल रौरव ॥१॥
चढून विद्यागिरि कीर्ति मेळवा, छदामही घ्या न करोनि कैतवा ।
जपून वागा हितशत्रुशी सदा, झटा, स्वधर्माभ्युदयार्थ सर्वदा ॥२॥
टळावया दु:ख शुचित्व आदरा, ठगास टाळा जरि तो दिसे बरा ।
डसेल मर्मास अशी ग गी वदा, ढळो न सत्व, स्थिर तें असो सदा ॥३॥
तरा प्लवें ज्ञानमयें भवार्णवा, थुंकू नका, ज्ञान सयत्न मेळवा ।
दया दरिद्रांवरि सर्वदा करा, धनानिमित्तें अधमार्ग नादरा ॥४॥
नका गुरुची अवहेलना करूं, परस्वलोभास मनीं नका धरूं ।
फसा, न बोलो खल गोड वैखरी, बकापरी सालस तो दिसे तरी ॥५॥
भलेपणानेच मिळेल तें धन महानिधीचे परि तोषवी मन ।
यशास रक्षा, धन अल्पमूल्यक, रमा न दु:संगि, मिळो न नारक ॥६॥
ललाम व्हायास झटा जगीं गुणें, वरोनि नम्रत्व यशा करा दुणें ।
शवत्व द्या वीर्य हरूनिया निकें षडर्युरोगांस विवेकमांत्रिके ॥७॥
सर्पसा पिशुन भावुनी त्यजा, हर्षवूं गुरुस भक्तिने सजा ।
क्षम्य दोष असतां क्षमा करा, ज्ञप्तिनें हृदयशुध्दि आदरा ॥८॥
विद्याधरें चिमुकली अर्पिली व्यंजनावली- ।
बालां, तन्माधुरी त्यांच्या पाहिजे चित्तिं बाणली ॥९॥