प्रसंग अठरावा - हरिनाम श्रवण
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
हरिनाम ऐकतां लागे बोध । ऐसा तुम्ही सगुण गावा भेद । तेणें शीघ्र तुटेल अनुवाद । सभे श्रोत्यांचा ॥२१४॥
हरिकथेमधीं लालमलाला । तो दीप विषयाचा चढला । हरि जवळ असोनि दुरावला । चंचळ चित्तागुणें ॥२१५॥
शृंगार लाघवें बुरबुरी । तों तों सकळ सभा होय बाबरी । चंचळपणें उन्मत्त अविचारी । दीपांत पतंग जैसा ॥२१६॥
यालागी नीट विवेकाचा भाला । पाहिजे करीं हरिदासें घेतला । भाविक शूर सन्मुख खोंचिला । संत श्रोत्यांमाजी ॥२१७॥
गळित कथेसी वोडवला रस । ऐसा हेरून काढिला निस । याहूनि सांगतां उदास । मज शंका वाटे ॥२१८॥
क्षौर करूनि डोळां काजळ । दिसे स्त्रीहूनि देहे ढाळ । तेथें पहातां करिती तळमळ । महा व्यसनीं उन्मत्त ॥२१९॥
बाप पुत्र जांवई पिशुन । सासरा भाचा मेहुणा बंधुजन । नातु चुलता साडु सोयरे सज्जन । पापरूपें पाहाती ॥२२०॥
अवघेचि पातले चंचल अनुसंधानीं । मागें सांगितलीं तीं नाती गेली मोडुनी । अवघे काय होत एकमेकांलागुनी । ते ओळखावें श्रोतेजनीं ॥२२१॥
पुरुष स्त्रीरूपें नट्या नटला । पापरूपें सभेनें अभिलाषिला । तों पापाचा संग्रह प्रबळ जाला । मृगजळ जैसा डोहो ॥२२२॥
नट्या देखोनि ईश्र्वरातें ध्यातु । ऐसा विरळा कोणी पुण्यवंतु । येर भूतें जैसे अवगुणाइतु । टकमकां पाहाती ॥२२३॥
जो अखंड ईश्र्वरीं पवित्रपणें । तो ते वेळीं पाहील नामस्मरणें । खांद्यावरी शूळ पाहिला तस्करानें । तदन्याय त्याचा ॥२२४॥
निज कथेमाजी भक्तिज्ञान । प्रेमें हरिनाम संपूर्ण । तेणें निवालें हृदय अंतःकरण । श्रोत्यांचे परियेसा ॥२२५॥
प्रेमनामाचा होतसे गजर । भाविक बैसले सुरनर । तेथें उभा परमेश्र्वर । तिष्ठत असे ॥२२६॥
हें वचन नव्हें असत्य । ग्वाही देतील वेदश्रुती । सत्य निष्कलंक शुद्धमती । आचरण आचरावें ॥२२७॥
एकचित्त बैसावें कथेसी । जैसें लय ध्यान त्या बकासी । डळे ढळे तो मच्छांसी । उचलोन घेतो ॥२२८॥
कवडा आकाशीं थरथरी । नदीमाजी दृष्टी फेरी । तैसा हृदयीं निज टेरी । शेख महंमद बोधें ॥२२९॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP