प्रसंग अठरावा - कर्कोटक कथा
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
प्रेम प्रीति लावावी नामासी । मग अवतारावें भलतेच वेशीं । कार्य नाहीं उत्तम यातीसीं । भक्तिभावाविण ॥८५॥
जो भाव भक्तीस असे गोमटा । तो जाणिजे सायुज्येचा दारवंटा । प्रभा फांकतसे त्याचिया ओंठा । वैकुंठाचि पैं ॥८६॥
तो कृत्याविण स्वयें अकृत्य जाला । विश्र्वासें विश्र्वलोक वंदी त्याला । तीर्थें म्हणती आमचें भागीं निपजला । उद्धारावया कुकुटन्यायें ॥८७॥
कोणी अमान्य करिती या वचनासी । कुर्कोट होता तेथून तीन कोस काशी । तेणें जाऊन नाहीं पाहिलें तियेसी । तीर्थ उद्धरन असे ॥८८॥
कापडी पुसती कर्कोटकासी । येथून सांगावी कितीक दूर काशी । येरु म्हणे ठाऊक नाहीं आम्हासी । काशी वाशी कवण ॥८९॥
मग कापडी बोलती अशुभ वचन । आजी चांडाळाचें जालें दरुषण । इतुकें म्हणतां कुष्ट जोडलें सांगेन वचन । परियेसा श्रोतेसज्जन ॥९०॥
कापडी बोलती वचन थोरी । आम्ही प्रश्र्निक राजेश्र्वरी । द्रव्य मेळवूनियां परोपरी । सायासें आलों काशीस ॥९१॥
एकमेकांसी बोलती अपवित्रपणें । त्यास काशी नाहीं घडली चांडाळपणें । समीप अघोरी ठेविला देवानें । अशुचपणें ॥९२॥
ऐसे कापडी निंदेतें पातले । काशीपावेंतों निंदा करीत गेले । आंघोळी करितां शुभ्र होऊनियां ठेले । अंगीं उदक लागतांच ॥९३॥
प्रयोग सांगावया मिळाले भट । कापडी कोडी होतां देखिलें सादृष्ट । येर म्हणती आलों तेव्हां होतों चोखट । स्नानें पाप घडलें ॥९४॥
मोक्षदायक पंचक्रोशी वाराणसी । पडल्या उद्धरण करी श्र्वानशूकरासी । तेथें कोड जडला कापडियांसी । साधूंचें निंदें गुणें ॥९५॥
शहाणें थोर मिळाले भट । यावेगळें पंडित चतुष्ट । म्हणती तीर्थमहिमेची उतरली उट । विवंचना करावी ॥९६॥
श्रेष्ठ पुसती कापड्यालागुन । तुम्ही सांगा आपले गुण अवगुण । शुभ्र झालेत हे कवण विंदान । रचिलें तुम्हांस ॥९७॥
मग बोलती कापडी । फेडावया आलों पापाच्या कोडी । तंव तीर्थी जाली आम्हांस अधिक जोडी । प्रगट पापाची ॥९८॥
कापडी अवगुण लोपोन गुण सांगती । द्रव्य सोडूनियां पंडितास दाविती । येथें हें वेंचावयास आलों सती । ते हे जोडी जाली आम्हां ॥९९॥
चर्चा करिती पंडित भट मिळोन । परी न कळे इहीं केलें कुर्कोटकाचें निंदन । मग भार घालोन वाराणसीलागून । आम्हांस न कळे सांगा ॥१००॥
पंडित भट बोलती वचन । आंघोळी करून निजभाव धरून । मग जें दिसेल स्वप्न । त्याप्रमाणें वर्तावें ॥१०१॥
समस्त म्हणती वो वाराणसी । हे शुभ्र परतोन गेल्या देवासी । अमान्य करितील तुझिये मोहिमेसी । नव खंड पृथ्वीचें ॥१०२॥
इतकें बोलिले समस्त उत्तरें । मग आसरणी जाली एकसरें । म्हणे तीर्थ उद्धरोन कुर्कोटक बैसला सत्वधारें । त्याची यास निंदा घडली ॥१०३॥
मग कापडी बोलों लागले नीट । म्हणती कवण कैंचा तो कुर्कोट । ठावा नाहीं आम्हांस तो चतुष्ट । म्हणती सत्य निंदा घडली ॥१०४॥
कापडी म्हणती हे सत्यार्थ हो आसरणी । येथून तीन कोस आहे तो प्राणी । त्या ग्रामांत नोळखती तयालागुनी । वेडेपणें तो असे ॥१०५॥
काशीचे म्हणती तुम्ही तेथें जावें । त्यास प्रार्थूनियां उद्धरण मागावें । मग कापडी चालले भावें । आले त्या ग्रामासी ॥१०६॥
दिवस मावळला जाली अंधारी । कापडी म्हणती दुरून करूं याची हेरी । हा रात्रसमयीं येथें काय करी । तें पाहों मग भेटों ॥१०७॥
रात्र पावलिया माध्यान्ह काळा । तंव तेथें आल्या चवघी बाळा । त्या पवित्रा सांगेन वेल्हाळा । शेख महंमद म्हणे ॥१०८॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP