प्रसंग अठरावा - साधूंस तळमळ
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
धन्य धन्य निंदकांची माउली । साधूंच्या उपयोगा व्याली । जैसी खात्यानें कातर करून दिधली । नापिकाचें हातीं ॥१३७॥
जैसी धान्यें निंदिल्या उपरी । पिको न लागती घुमरी । तैसें निंदकांनीं परोपरी । साधूस केलें ॥१३८॥
साधु दरुषनें पाप कोडी । दहन होती न लागतां क्षण घडी । साडे अठरा विश्र्वें पाप जोडी । निंदकाचे परियेसा ॥१३९॥
जिव्हेसारखी प्रचंड शिळा । निंदक धावधांवोंनि काढिती मळा । निमिष न लागतांचि सोंवळा । साधूनें शुद्ध केलें असे ॥१४०॥
श्र्वाना न कळे भला बुरा । तैसा निंदक भुंके सैरावैरा । ते तुज वंचले ईश्र्वरा । पाखांड बुद्धि ॥१४१॥
पुण्य साधकाचें मनीं वसे । जे उद्धरावे चांडाळ पिसे । प्रालब्धें विरळा विश्र्वासें । संचित सांचल्या ॥१४२॥
निंदकाची वाटे काकुलती । कैसी यमयातना सोशिती । स्वहित अज्ञानें न करिती । सद्गुरुसंगें ॥१४३॥
पूर्वीं पाप केलें शिंदळीनें । क्षोभवली बहुतेकांचीं मनें । तरुवर होऊनि दिधलें उसणें । तिस सेविल्या तैसेंच होईल ॥१४४॥
तांब्याची पुतळी संवताड । आंतून ज्वाळा निघती धडधड । तिस नेऊनि भेटविती ज्यास वेड । बहु परस्त्रीचें ॥१४५॥
अठरा योजनें फेरा । भरला कुंभपाकाचा डेरा । त्यांत बुडवितील केल्या अनाचारा । युगानयुगीं ॥१४६॥
तापली तांब्याची मेदिनी । तयेवरी लोळविती परद्वारिणी । करिती अनेक अनेक जाचणी । परियेसा जन हो ॥१४७॥
गुदगुद खाजविल्या थोडी थोडी । तैसी ओळखा विषयाची गोडी । नेटानें खाजविल्या चरफडी । अशुद्ध सांडे ॥१४८॥
शेख महंमद म्हणे निंदकालागून । तुम्ही आमुचे सखे सज्जन । तुमच्या उपकाराचें भूषण । वर्णिता न ये मज ॥१४९॥
सगुण आचरावें असो यातिहीन । जैसी कस्तुरी जन्मली मृगनाभीहून । लल्लाटी चर्चिली टिळा करून । शेख महंमद पवित्रें ॥१५०॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP