आतां या रूपकाचा ध्वनि सांगतों :---
त्यापैकीं प्रथम शब्दशक्तिमूलकध्वनि असलेल्या रूपकाचें उदाहरण हें :---
हे राजा, तुझ्या सभेंतील विद्वानांच्या वृंदामध्यें विज्ञत्व आहे, [(१) विशेषज्ञता आहे. (२) बुध ग्रहाचा गुण आहे.] तुझ्या सभेंतील कविकुलामध्यें उत्तम कविता रचण्याचा गुण आहे. (व, शुक्र ह्या ग्रहाचा गुण आहे.) तुझी स्वत:च्या लोकांविषयी मांगल्या म्हणजे कल्याण करण्याची वृत्ति आहे, (व मंगळ ग्रहाचा गुण आहे.) सर्व लोकांविषयीं तुझा आदरभाव आहे (व, गुरु ह्या ग्रहाचा गुण आहे.) वाईट आचरणांच्या लोकांविषयीं तूं साक्षात् वज्र आहेस, (व शनि या ग्रहाचा गुण आहे.) राजे लोकांच्या समूहांत तुझा राजेपणा निष्प्रतिबंध चालतो (व चंद्र ह्या ग्रहाचा गुण आहे) शिवाय दरिद्री लोकांच्या ठिकाणीं तुझें मित्रत्व आहे, (व सूर्य ह्या ग्रहाचा गुण आहे) अशा रीतीचा असणारा तूं एकच ह्या पृथ्वीवर आहेस.”
ह्या ठिकाणीं अभिधाव्यापाराचें प्रथम, प्रकरणानें नियंत्रण झालें असलें तरी, त्यानंतर, बुध, शुक्र, ग्रहांशीं राजाचा अभेद सूचित झाल्याकारणानें, ह्या ठिकाणीं रूपक - ध्वनि आहे.
अथवा,
“सतत गळणार्या दानाच्या उदकाच्या धारांनी ज्यानें सर्व पृथ्वीतल भिजवून टाकलें आहे; व संपत्तीचें दान करणार्यांमध्यें जो अग्रस्थानी आहे असा तूं, हे राजा, सार्वभौम आहेस. (व सार्वभौम नांवाचा दिग्गज आहेस, (असा दुसरा अर्थ) ह्या श्लोकांतील विशेषणें दिग्गजास लावतांना त्यांतील श्लिष्ट शब्दांचा दिग्गजास लागू पडणारा अर्थ असा :--- दान = मद; धनद - कुबेर.)”
अर्थशाक्तिमूलक रूपक ध्वनीचें उदाहरण हें :---
“गडे, तूं कस्तुरीचा टिळा लावून, संध्याकाळीं हसर्या चेहेर्यानें एकदम वरच्या गच्चीवर जाऊन बैस; म्हणजे चंद्रविकासी कमळें अत्यंत विकसित होतील (अत्यंत आनंद पावतील)’ व सर्व दिशांची तोंडे उजळतील.”
वरील श्लोकांत, तुझें मुख, कलंक व चांदणें यानें युक्त असलेल्या चंद्राशीं अभिन्न आहे हें रूपक, कमळांचा विकास वगैरेंच्या योगानें सूचित झालें आहे. ह्या ठिकाणीं भ्रांतिमान् ध्वनि आहे असें समजूं नये. कारण कीं, चंद्रविकासी कमळें व दिशा ह्या अचेतन असल्यानें, त्यांच्या ठिकाणीं भ्रांति संभवत नाहीं. ह्यावर कुणी म्हणतील कीं, अचेतन वस्तूंच्या ठिकाणीं आनंद वगैरेंचा संभव नसल्यामुळें त्या कमल वगैरे अचेतन वस्तूंवर चेतनाचा आरोप करणे आवश्यक आहे; व तो तसा केल्यास भ्रांतिमान् ध्वनि सिद्ध होऊं शकेल. पण हें म्हणणें बरोबर नाहीं. कारण कीं, वरील श्लोकांतील मुद् ह्या शब्दावर ( त्याच्या आनंद ह्या अर्थाचा बाध झाल्यानें) लक्षणा करून त्याचा विकास हा अर्थ केला आहे; आणि म्हणूनच येथें रुपक ध्वनि आहे. अथवा रूपकाचें दुसरें स्वतंत्र उदाहरण (पाहिजे असल्यास) हें घ्या :---
“दिशांच्या मध्यें पसरलेला अंध:कार दूर करतात; व संतापानें संतप्त झालेल्यांचा ताप नाहींसा करतात हे चकोरनेत्रि, तुझ्या मुखाच्या कांति कमळांच्या शोभेला पूर्णपणें नष्ट करून टाकतात.”
ह्या श्लोकांतही ‘मुख चंद्रच आहे.’ असें व्यंजनेनें सूचित केलें आहे.
आतां आनंदवर्धनाचार्यांनीं जें म्हटएं आहे कीं :---
“ ‘ह्याला लक्ष्मी त्र केव्हांच प्राप्त झाली आहे, मग हा पुन्हां मला घुसळण्याचे कष्ट कशाला देईल ? ह्याचें मन नेहमीं जागरूक असतें; तेव्हां ह्याच्या ठिकाणीं पूर्वींची योगनिद्रा कधींही संभवणार नाहीं. सर्व देशांचे राजे ह्याचे अनुयायी झाले असतां, त्यांना जिंकण्याकरितां पुन्हां हा सेतु कशाला बांधील ? अशा रीतीनें हे राजा, तूं जवळ आला असतां, समुद्र नानाप्रकारचे तर्कवितर्क करीत असावा, असें त्याच्या कंपावरून दिसतें.’
ह्या ठिकाणीं रूपकाचा आश्रय करून सुंदर काव्य निर्माण केलें असल्यामुळें येथें रूपक - ध्वनि आहे.”
हें त्यांचें म्हणणें मनाला पटत नाहीं. ह्या श्लोकांत, समुद्राच्या कंपाचें कारण म्हणून तीन तर्कांची कल्पना केली आहे. पण ते तिन्ही
तर्क, प्रस्तुत राजाशीं समुद्राच्या मनाला विष्णूचेम खरोखरीच तादात्म्य वाटणें हें ज्या भ्रांतीचें स्वरूप आहे तिचा आक्षेप करतात; म्हणून ह्या श्लोकांत भ्रांतिमान् अलंकाराचा ध्वनि आहे, रुपकाचा ध्वनि नाहीं. रूपकाला प्राणभूत असलेल्या आहार्य म्ह० बुदध्या केलेल्या विष्णुतादात्म्याचा येथें निश्चय असतां तर, त्याच्यायोगानें समुद्रामध्यें कंप उप्तन्न झालाच नसता. शिवाय, आहार्य विष्णुतादात्म्य सुद्धां कंपाला कारण होऊ शकतें असें मानलें तरी, वरील आहार्यतादाम्त्यनिश्चय कवीला झालेला आहे, व कंप तर समुद्राला झालेला आहे; अशा या दोघांच्या, म्ह० आहार्यतादात्म्यनिश्चय व कंप ह्यांच्या, जागा (अधिकरणें) निराळ्या आहेत. राजाचें विष्णूशीं तादात्म्य असलें तरी तें कवीलाच माहीत असल्यानें, व समुद्राला माहीत नसल्यानें, त्या तादात्म्याचा समुद्राला कापरें भरण्याच्या बाबतींत कांहीं उपयोग नाहीं. तेव्हां ह्या श्लोकांत भ्रांतीचाच चमत्कार आहे व म्हणून ह्या ठिकाणीं तिचाच ध्वनि मानणें युक्त आहे.
आतां, कवींच्या संप्रदायाच्या विरुद्ध असलेले जे लिंगभेद वगैरे दोष ते, चमत्काराचा अपकर्ष करीत असल्यामुळें, येथेंहि दोष म्हणून संभवतात. उदाहरणार्थ :---
“हे राजा, तुझी बुद्धि समुद्र आहे. तुझें यश साक्षात् भागीरथी आहे व तुझीं कृत्यें साक्षात् शरद् ऋतूंतील सुंदर चंद्राचें चांदणेच आहे.”
ह्या लोकांतील विषय व विषयी ह्यांच्यामध्यें लिंग, वचन वगैरेमुंळें भेद उत्पन्न झाल्यामुळें, त्यांच्या ताद्रूप्याच्या ज्ञानाला तो भेद प्रतिकूल आहे.
कुठें कुठें कवींच्या संप्रदायाला मान्य झालेले लिंगभेदादि दोष, त्यापासून चमत्काराची हानि होत नसल्यामुळें, दोष म्हणून गणले जात नाहींत. उदाहरणार्थ :---
“संतापाची शांति करीत असल्यामुळें तुझें तोंड चंद्रमा आहे.” इत्यादि हेतु-रूपकांत वदन व चंद्रमा ह्यांमधील लिंगभेद, दोष म्हणून गणला जात नाहीं
येथें रसगंगाधरांतील रूपक प्रकरण समाप्त झालें.