रूपक अलंकार - लक्षण १

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


आतां अभेदप्रधान अलंकारांमध्ये ( मुख्य असलेल्या ) रूपका-लंकाराचें निरूपण करतों- “ उपमेच्या विशिष्ट धर्माचा ( म्ह० उपमेयत्वाचा ) पुरस्कार करून ( म्हणजे त्याला महत्त्व देऊन ) शब्दांच्या द्वारां, जेथें उपमेयाचे ठिकाणीं उपमानाच्या तादात्म्याचा निश्चय केला जातो, ( म्हणजे तादात्म्य निश्चयानें सांगितले जातें. ) त्याला रूपक म्हणावें; व तें ( प्रधान वाक्यार्थाला ) उपस्कारक होत असेल तर, त्याला अलंकार म्हणावें. ”
‘ उपमेयाच्या विशिष्ट धर्माला महत्त्व देऊन ’ अशा अर्थाचें लक्षणांत जें विशेषण घातलें आहे, त्याच्या योगानें अपह्लुति, भ्रांतिमान्‍, अतिशयोक्ति व निदर्शना या चार अलंकारांचें निवारण होतें. कारण कीं, अपह्लुति अलं-कारांत उपमेयाच्या विशिष्ट धर्माचा ( उपमेयत्वाचा ) वक्त्याकडून स्वेच्छापूर्वक ( जाणूनबुजून ) निषेध केला जातो. त्याचप्रमाणें, भ्रांतिमान्‍ अलंकारांत भ्रांतीनें उत्पन्न केलेल्या दोषामुळें, उपमेयाच्या विशिष्ट धर्माचा, पूर्ण प्रतिबंध झालेला असतो. ( म्हणजे त्याचें भान होत नाहीं. ) आणि अतिशयोक्ति व निदर्शना ह्या दोन्हीही अलंकारांच्या मुळाशीं साध्यवसानलक्षणा असल्यामुळें, त्या ठिकाणीं उपमेयाचाय उल्लेख नसतो. ( मग उपमेयाच्या विशिष्ट धर्माचें भान कोठून असणार ? )
लक्षणांतील, ‘ शब्दद्बारा ’ या ( अर्थाच्या ) विशेषणानें, मुखं इदं चंद्र: ( हें मुख चंद्र आहे. ) असा, प्रत्यक्ष मुख पाहून, व त्याला बुद्धयाच
हा चंद्र आहे असें मानून, त्यावर ( मुखावर ) जो चंद्राच्या तादात्म्याचा आरोप केला जातो, त्याचा निरास केला जातो. ( म्हणजे रूपकांतील उपमानतादात्म हें शब्दानें मानलेलें असलें पाहिजे; प्रत्यक्ष उपमेय पाहून त्यावर चंद्रतादात्म्याचा निश्चय केल्यास तेथें रूपकालंकार होणार नाहीं. ) आतां लक्षणांत ‘ निश्चीयमान ’ ( म्हणजे निश्चित मानलें गेलेलें ) असें जें तादात्म्याला विशेषण दिलें आहे, त्याच्या योगानें, संभावना जिचें स्वरूप आहे अशा, ‘ नूनं मुखं चंद्र: । ’ ( मला वाटतें, हें मुख चंद्र आहे.  ) इत्यादि वाक्यांत होत असलेल्या उत्प्रेक्षेची, ह्या अलंकारांतून व्यावृत्ति केली गेली आहे. उपमान व उपमेय हे शब्द, लक्षणांत, ( तादात्म्याचीं ) विशेषणें म्हणून आले आहेत; त्यामुळें त्या दोहोंमधील सादृश्यसंबंधही आपोआपच आला; ( आणि त्यामुळें रूपकालंकारांत सादृश्यसंबंधानें आलेल्या दोन पदार्थापैकीं, उपमेयावर उपमानाचा आरोप होतो, असा अर्थ निष्पन्न झाला; ) आणि म्हणूनच, ‘ सुखं मनोरमा रामा ’ [ मनोहर स्त्री ही ( साक्षात्‍ ) सुख आहे. ] इत्यादि वाक्यांत होणार्‍या शुद्धारोपमूलक तादात्माचें, ( ह्या अलंकारांतून ) निराकरण झालें; ( असें समजावें; ) कारण कीं, तादात्म्य जेथें सादृश्यमूलक असतें तेथेंच रूपक अलंकार होतो, असें मानतात. आणि म्हणूनच शास्त्रकारांनीं म्हटलें आहे कीं, -
“ उपमान आणि उपमेय यांचा जो अभेद तेंच रूपक. ” ( का-प्र. सू. १०। १३९ )
“ ज्यांतील भेद नाहींसा झाला आहे अशा उपमेलाच रूपक म्हणतात. ”

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP