ह्या श्र्लोकांत सुंदर स्त्री ही विषय आहे व तिच्या ठिकाणीं, पौर्णिमेच्या रात्रीच्या तादात्म्याची प्रतीति होत असल्यानें, उघडच, ह्या ठिकाणीं, राकारूपक झालें आहे. आतां ह्या राकारूपकाला अनुकूल व्हावीं म्हणून पहिल्या तीन चरणांतील समासगत रूपकें आणली असलीं तरी, तीं (राकारूपकाला) अनुकूल होत नाहींत.
वरील तीन चरणांतील तारा व मौक्तिक ही एक जोडी, चंद्रिका व धवलांशुक ही दुसरी जोडी, आणि पूर्णचंद्र व वदन ही तिसरी जोडी, ह्या तिन्ही जोड्यांतील पदार्थांत परस्पर अभेद सिद्ध असला तरी त्या अभेदाच्या योगानें (होणार्या रूपकांनीं) सुंदर स्त्रीच्या ठिकाणी असलेल्या राकेच्या तादात्म्याची सिद्धि होऊ शकत नाहीं. उलट, त्या अवयव-रूपकांच्यामुळें, राकेच्या ठिकाणीं सुंदरीच्या तादात्म्याची विपरीत प्रतीति होऊ लागते. कारण कीं, वरील अवयवरूपकांच्या समासांतील सर्व उत्तरपदें राकेशीं संबंध ठेवणारी आहेत; आणि त्यांनी होणारीं रूपकें-मोक्तिकरूपक अंशुकरूपक व वदनरूपक हीं राकारूपकाला प्रतिकूल आहेत. त्यामुळें सर्वच घोटाळा होतो.
ह्या शंकेवर (कांहीं विद्वानांचे) उत्तर असें-
अभेद हा विशेषणविशेष्यभावरूपसंबंध आहे. (आणि म्हणूनच तो विशेषण व विशेष्यभाव प्रसंगवशात् उलटसुलटही होऊ शकतो.) हा अभेदसंबंध, ‘मुखं चंद्रः’ इत्यादि वाक्यांत आलेल्या रूपकांत ज्याप्रमाणें अभेदाचा प्रतियोगी चंद्र व अनुयोगी मुख ह्या दोहोंमध्ये विशेषण-विशेष्यभाव स्थापित करतो, (म्ह० प्रतियोगी चंद्र हें विशेषण व अनुयोगी मुख हें विशेष्य असा संबंध दाखवतो.) त्याचप्रमाणें, ‘मुखचंद्र’ ह्या समासांत आलेल्या रूपकांतही अभेदाचे अनुयोगी मुख व प्रतियोगी चंद्र ह्या उभयतांमध्येंही विशेषण-विशेष्यभाव स्थापित करूं शकतो. पण या समासगत रूपकांत प्रतियोगी चंद्र हा विशेष्य व अनुयोगी मुख हें विशेषण असा उलटा विशेषण-विशेष्यभाव असतो. वरील दोन्हीही रूपकांत वस्तुतः चंद्राभेद (म्ह० चंद्रप्रतियोगिक व मुखानुयोगिक अभेद) हाच संबंध आहे, पण तो अभेद-संबंध (वाक्यांत व समासांत) कुठें प्रथम अनुयोगीचा निर्देश करून, तर कुठें प्रथम प्रतियोगीचा निर्देश करून जो येतो, तो विशेषण-विशेष्यभावाच्या उलटापालटीमुळेंच केवळ. अशा रीतीनें अभेदाचा विशेषण-विशेष्यभावाच्या उलटापालटीमुळेंच केवळ. अशा रीतीनें अभेदाचा विशेषण-विशेष्यभाव जरी बदलला तरी, मुख व चंद्र ह्यांच्यामधील अभेदाच्या स्वरूपांत फरक होत नाहीं. म्ह० ‘चंद्राच्या ठिकाणीं मुखाचा अभेद’ असें कधींही होत नाहीं; म्हणजे असा उलटा अभेदसंबंध कधींही होत नाहीं. तसा होतो असें मानले तर मात्र, चंद्राचा मुखाच्या ठिकाणी अभेद असणारें रूपक होणार नाहीं व चंद्राच्या ठिकाणीं मुखाचा अभेद असणारें रूपक मानण्याचा प्रसंग येईल. अभेदाचा प्रतियोगी जो (उदा० चंद्र) असतो तोच नेहमीं विशेषण असतो; आणि अभेदाचा अनुयोगी जो असतो (उदा० मुख) तो कधीही विशेषण होत नाही असे म्हणणें हा दुराग्रह आहे. तेव्हां सौजन्यचंद्रिका इत्यादि समासगत रूपकांतही, खरें पाहतां सौजन्याचा अभेद हा, चंद्रिकेचें विशेषण असलेल्या सौजन्याचा चंद्रिकेच्या ठिकाणीं राहणारा अभेद-संबंध नसून, चंद्रिकेचा सौजन्याच्या ठिकाणी राहणारा तादात्म्यरूप अभेदसंबंधच आहे, आणि म्हणूनच शेवटीं, सौजन्याच्या ठिकाणीं असलेल्या अभेदाची चंद्रिका ही प्रतियोगिनी आहे असा शाब्दबोध होत असल्यानें, ह्या ठिकाणी सौजन्याच्या ठिकाणीं चंद्रिकेच्या तादात्म्यरूप अभेदाची सिद्धि निराळ्या प्रकारानें होते एवढेंच; पण ती झाल्याबरोबर, राजाच्या ठिकाणीं चंद्राचा तादात्म्याभेदसुद्धां सिद्ध होत असल्यानें, वरील उदाहरणांत परंपरित रूपक मानण्यांत, कसलीच अडचण नाहीं. ‘शशि-पुंडरीक’ इत्यादि समासगत रूपकांतही शशीच्या ठिकाणीं असलेल्या अभेदाचें प्रतियोगिक पुंडरीक, असा शेवटीं शाब्दबोध होत असल्यानें, (श्र्लोकांत,) पुंडरीकाच्या, शशीच्या ठिकाणीं असलेल्या अभेदाचेंच भान होतें व अशा रीतीनें पुंडरीकाचें रूपक निर्वेधपणें होऊं शकतें. याच पद्धतीनें, दुसर्याही अवयवरूपकांच्या बाबतींत होतें, असें समजावें. ह्याचप्रमाणें, ‘सुविमलमौक्तिक-तारे०’ इत्यादि श्र्लोकांतही तारा वगैरेंचा अभेद मौक्तिक वगैरेंच्या ठिकाणी होऊन, तारा वगैरेंची विशेषणें जीं मौक्तिक वगैरे, त्यांच्याशीं, तो अभेद (विशेष्यरूप) संबंध ठेवूनही शेवटीं तीं सर्व अवयवरूपकें राकारूपकाचीं समर्थकच होतात व अशा रीतीनें सर्वच गोष्टी व्यवस्थित होतात.
अशा रीतीच्या ह्या अभेदसंबंधांत, ज्या ठिकाणी प्रारंभी अनुयोगी असतो त्या ठिकाणचें रूपक विधेयरूपक होतें आणि ज्या ठिकाणीं त्या अभेद-संबंधांतील प्रतियोगी हा प्रारंभी असतो, त्या ठिकाणचें रूपक अनुवाद्यरूपक होतें, असा हा विषय थोडक्यांत सांगितला.