अथवा, एकदेशविवर्ति याचा खालीलप्रमाणें (ही) अर्थ करतां येईलः-
ज्यांतील विषयी, अनेक अवयवांपैकी एखाद्या अवयवांत, शब्दानें स्पष्ट सांगितल्यामुळें, विशेष प्रकारें स्पष्ट भासतो, त्याला ‘एकदेशविवर्ति’ (रूपक) म्हणावें.
आतां ह्यांपैकीं समस्तवस्तुविषय सावयव रूपकाचें उदाहरण असें-
‘‘अत्यंत स्वच्छ मोती ह्याच जिच्यांतील तारका आहेत; शुभ्र, वस्त्ररूपी चांदण्याचा जिंच्यांत चमत्कार आहे व वदनरूपी पूर्णचंद्र जिच्यांत आहे, अशा हे सुंदरी, तूं पौर्णिमेची रात्र आहेस, याविषयीं (मला) संदेह नाहीं.’’
ह्या श्र्लोकांत अनेक अवयवरूपकें असून, त्या सर्वांचें मिळून एक समुदायात्मक रूपक झालें आहे. ह्या समुदायात्मक एक रूपकांतील सर्व अवयवरूपकांचा एकमेकांशी सारखाच (समर्थ्यसमर्थकभावरूप) संबंध आहे. कारण ह्यांतील प्रत्येक रूपकाचें दुसर्या रूपकानें समर्थन केलें जाते. तरीपण, कवीच्या मनांत मात्र, येथे पौर्णिमेच्या रात्रींच्या, सुंदरीशीं असलेल्या अभेदाचें, इतर अवयवरूपकांनी समर्थन व्हावें असें आहे. व तें समर्थन करण्याकरतां त्यानें बाकीची रूपकें (श्र्लोकांत) आणली आहेत, असें दिसतें. अशी वस्तुस्थिति असल्यानें, (म्हणजे ह्या श्र्लोकांत एक मुख्य समर्थ्य-रूपक व त्याचें समर्थन करणारी बाकीची समर्थक-रूपकें, अशी वस्तुस्थिति असल्यानें,) (समर्थक) म्ह० अवयवरूपकांतील विषय व विषयी ह्यांची विभक्ति पृथक् असल्याचें दिसून येत नसल्यामुळें, तीं सर्व समर्थक रूपकें अनुवाद्य कोटींत जातात व मुख्य समर्थ्य रूपकाच्या, (‘हे सुंदरी, तूं पौर्णिमेची रात्र आहेस.’ ह्या) वाक्यांत विषय व विषयी यांच्या विभक्ति निराळ्या दिसत असल्यानें, तें रूपक येथें विधेय कोटींत जातें. (म्हणजे या मुख्य रूपकांत सुंदरी हा विषय उद्देश्य, व पौर्णिमेची रात्र हा विषयी विधेय असल्यानें, हें विधेय रूपक आहे.) आणि मुख्य रूपकांतील हा उद्देश्यविधेयभाव (ध्यानांत) घेऊनच, येथील सावयव रूपकालाही विधेय म्हटलें आहे. ज्याप्रमाणें अनेक योद्ध्यांच्या समूहामध्यें असलेल्या एखाद्या मुख्य योद्ध्याच्या जय अथवा पराजयावरून त्या सबंध योद्ध्यांच्या समूहाला ‘ह्यानें जिकलें’; अथवा ‘ह्याचा पराभव झाला’ असें म्हणण्यांत येतें, (त्याप्रमाणें मुख्य रूपकांच्या विधेयत्वावरून, सबंध सावयव रूपकालाही येथें विधेय म्हटलें आहे.)
पण, ‘‘विस्तीर्ण आकाश हेंच (कोणी एक) सरोवर आहे; त्या आकाशाचा नीलवर्ण हेंच त्यांतील म्ह० (सरोवरांतील स्वर्गीय जल; तारकांच्या पंक्तिरूप कळ्यांच्या समूहानें तें (सरोवर) भूषित झालें आहे; त्यांतील चंद्ररूपी श्र्वेतकलम षोडशकलारूपी पाकळ्यांनीं युक्त आहे; त्यावर कलंक रूपी भुंगा (बसला) आहे व सूर्याकडे तोंड करून विकास पावत असलेलें तें शोभत आहे.
ह्या श्र्लोकांतील मुख्य सावयवरूपक अनुवाद्यच आहे, ह्या श्र्लोकांतील पूर्णचंद्र हा पौर्णिमेच्या रात्री सूर्याकडे तोंड करून उदय पावतो, ही गोष्ट ज्योतिष शास्त्रामध्यें प्रसिद्ध आहे. तेव्हां येथील पूर्ण चंद्राचे सूर्याकडे तोंड असल्यानें त्याचा पूर्ण प्रकाश कसा पसरेल अशी शंका घेऊं नये.
एक देशविवर्ति, सावयव रूपकाचें उदाहरण हें-
‘‘संसाररूपी ग्रीष्म ऋतूंतील कडक उन्हानें ज्यांची शरीरें होरपळून गेलीं आहेत असे-पुप्यशाली लोक, अविवेक रूपी साखळदंडाला एकदम जोरानें तोडून, अत्यंत शूद्ध व नैराश्यरूपी थंडपणानें युक्त अशा आत्मारूपी अमृत सरोवरामध्यें, स्वतःचें पापरूपी मालिन्य धुऊन टाकून अवगाहन करतात.’’
ह्या ठिकाणी अविवेकरूपी साखळदंड इत्यादि एकत्र आलेल्या अनेक रूपकांवरून, पुण्यशाली लोकांच्यावर हत्तीच्या रूपकाचा (म्ह० अभेदाचा) आक्षेप केला आहे. (म्हणजे अर्थबलानें, हत्तीचें रूपक मानण्यांत आलें आहे.) अथवा, एकदेशविवर्ति रूपकाचें हें दुसरें उदाहरण-
‘‘रूप हेंच जिचें जल आहे, जिचे डोळे चंचल आहेत, जिची नाभी हा भोंवरा आहे, जिचा केशपाश सर्प आहे; अशी ती तरूणीरूपी नदी भयंकर आहे; हिच्यांत सज्जन लोक अवगाहन करतात.’’