आतां कांहीं ठिकाणीं हा रूपकांतील अभेद, विशेषणरूपानेंही येतो. उदाहरणार्थ-
‘‘हे सुंदरी, ज्याच्या शक्तीच्या ऐश्र्वर्याची कल्पनाही करतां येणार नाहीं, अशा प्रख्यात मदनाच्या प्रभावामुळें, तुझें मुख संपूर्णपणें (तमां) चंद्रत्व पावलें आहे; व तुझ्या डोळ्यांनी थेट कमळांच्या पाकळ्यांचा अभेद धारण केला आहे.’’
ह्या श्र्लोकांत, विधुभाव (म्हणजेच विधुतेचा अभेद) हा अचंति क्रियापदाचें कर्म आहे, म्हणून तें विशेषण झालें आहे. आणि भांव ह्यांतील द्वितीया विभक्तीच्या कर्म या अर्थाचें, भाव हें विशेषण आहे. आणि (विधुत्वाचा अर्थ चंद्राचा अभेद असाच असल्यामुळें) विशेषणरूपानें हा अभेद येथें आला आहे.
मुखचंद्रः हा जर उपमितसमास मानला तर, त्या ठिकाणीं उपमाच होणार. पण त्याला विशेषणसमास मानलें तर त्या ठिकाणीं रूपकच होणार. या रूपकवाक्याचा शाब्दबोध पूर्वी आम्ही शशिपुंडरीक ह्या समासाच्या बाबतीत सांगितलेल्या पद्धतीप्रमाणें होतो असें समजावें.
‘डोळ्यांमुळें ही मीनयुक्ता आहे, हात व पाय ह्यांच्या योगानें ही प्रफुल्ल कमलानें युक्त अशी आहे; केसांच्या योगानें ही शेवाळांनी युक्त अशी आहे; आणि म्हणूनच ही सुंदरी एक सुरस सरोवर (पुष्करिणीच) आहे.
ह्या श्र्लोकांतील तृतीया विभक्तीचा अर्थ अभेद हा आहे; व पूर्वी सांगितलेल्या पद्धतीनें, अर्थाच्या बलावर, त्या अभेदाचा मीनवती ह्या तद्धितपदांत प्रथम आलेल्या प्रतियोगीशीं अन्वय केला आहे. आणि म्हणूनच ’नयनाच्या ठिकाणीं असलेल्या अभेदाचा प्रतियोगी जो मीन त्यानें ही युक्त आहे,’ असा येथे शाब्दबोध झाला आहे. आतां, ‘मीनयुक्त असणें’ हें (सुंदरीच्या बाबतींत वाच्यार्थानें शक्य नसल्यामुळें,) स्वतः मीनाशीं अभिन्न असलेले जे डोळे त्या द्वारा उपपन्न आहे (असें समजावें); किंबहुना असें म्हणता यावें म्हणूनच, ‘नयनाच्या योगानें,’ असे श्र्लोकांत म्हटलें आहे. मीनाशीं अभिन्न असे जे नयन तद्युक्त सुंदरी, असाच शेवटी ह्या वाक्याचा अर्थ होतो; परंतु, नयनाचा अभेद मीनाच्या ठिकाणीं राहतो, असा जर येथील अभेदाचा अर्थ केला तर मुख्य असलेल्या सरोवराच्या रूपकाला तो (अर्थ) पोषक होणार नाहीं, असें आम्ही पूर्वी म्हटलेंच आहे. उपमेप्रमाणें, ह्या रूपकांतील साधारण धर्मही कुठें अनुगामी, कुठें बिंबप्रतिबिंबभावयुक्त, कुठें लाक्षणिक, तर कुठें केवळ शब्दरूप असा असतो. आणि पुन्हां हे सर्व साधारण धर्म कुठे शब्दांनी सांगितलेले असतात, तर कुठें सूचित होत असल्यानें, शब्दांनी सांगितलेले नसतात.
शब्दानें सांगितलेल्या अनुगामी साधारणधर्माचें उदाहरण हेः.-
‘‘मूर्ख, आंधळे, पांगळे, जन्मापासून बहिरे, बोलण्यांत दोष असलेले, ग्रहांनीं झपाटलेले, ज्यांच्या पापाचा निस्तार करण्याचे सर्व मार्ग बंद झालेले आहेत असे, देवांनी ज्यांना (निराश होऊन) सोडून दिले आहे असे, व जे नरकांत खितपत पडले आहेत, अशा लोकांचें रक्षण करण्याकरतां हे आई (गंगे), तूं उत्कृष्ट औषध आहेस.’’
ह्या श्र्लोकांत त्रातुं ह्या हेत्वर्थकृदन्त शब्दानें सांगितलेला, मूर्ख आंधळे वगैरेंचें रक्षण करणें हा साधारणधर्म, औषध व गंगा ह्या दोहोंचा अनुगामी आहे.
(व तो उपात्त आहे).