ह्या एकदेश-विवर्ति रूपकांतील वरील दोन उदाहरणांपैकी पहिल्या उदाहरणांत कवीला समर्थ्य म्हणून इष्ट असलेल्या रूपकाचा आक्षेप केला आहे. पण दुसर्या श्र्लोकांत, समर्थक म्हणून इष्ट असलेल्या ‘नयनरूपी मीन’ ह्या रूपकाचा आक्षेप केला आहे, हा या दोन श्र्लोकांत फरक. वरील सावयव रूपक, अनेक रूपकांच्या समूहानें तयार झालेलें असलें तरी, त्या समूहरूपकानें विशिष्ट प्रकारचा चमत्कार उत्पन्न होत असल्यानें, रूपक अलंकाराच्या अनेक प्रकारापैकीं एक (विशिष्ट) प्रकार म्हणून त्याची गणना केली आहे. ज्याप्रमाणें, मोत्याच्या अलंकारांच्या प्रकारांची यादी करतांना, नाकांतील एक मोत्याचा अलंकार म्ह० नासामौत्त्किक अलंकाराच्या प्रकाराप्रमाणें अनेक मोत्यांच्या योजनेनें तयार होणार्या मंजरी वगैरे अलंकारांचीही पृथक् अलंकार म्हणून गणना होते; (त्याप्रमाणें येथेंही समजावें.) असें जर न मानलें तर, मालोपमा ह्या प्रकाराची, उपमेच्या अनेक प्रकारांपैकी एक प्रकार म्हणून गणना करतां येणार नाहीं. अशी ही व्यवस्था येथें योग्य असल्यानें, ह्या बाबतीत कुणी ‘‘गाईंच्या विविध प्रकारांत कपिला गाय वगैरे प्रकारांची गणना करतां येते; पण गाईंचा समूह हा गाईचा एक प्रकार म्हणून काही गणला जात नाहीं; त्याप्रमाणें, रूपकांच्या (विविध) प्रकारांची यादी चालू असतां, अनेक रूपकांच्या समूहाची म्हणजे सावयव रूपकाची, रूपकाचा एक प्रकार म्हणून गणना करतां येणार नाहीं,’’ असें जें म्हटलें आहे त्याचे खंडन झालें. त्याचप्रमाणें, ह्या समूहात्मक सावयव रूपकाहून मालारूपकाचा, ही दोन्हीही रूपकें समुदायात्मक असल्यानें ह्या दोहोंत, बाह्यतः फरक कांहीही दिसत नसला तरी, सावयव-रूपकांतील सर्व रूपकांचा एकच विषय असतो, व मालारूपकांतील रूपकें एकमेकांची अपेक्षा बाळगत नाहींत, हा ह्या दोन रूपकांच्या प्रकारामध्यें मोठाच फरक आहे.
आतां निरवयव केवल रूपकांचें उदाहरण हे :-
‘‘बुद्धि ही जगांत दिव्याची ज्योत आहे, तिच्या योगानें, सर्व वस्तु प्रकाशमान होतात; व अबुद्धि म्हणजे अज्ञान ही काळोखी रात्र आहे; कारण तिच्यांत कांहीच दिसत नाही.’’
ह्या श्र्लोकांत दोन रूपकें आहेत. ह्या दोन्ही रूपकांचें मिळून, समूह-रूपक होऊं शकत असलें तरी ती दोन्ही रूपकें परस्परनिरपेक्ष असल्यामुळें, ह्या दोन्हीहि रूपकांना दोन (स्वतंत्र) निरवयव रूपकें म्हणावी. (या श्र्लोकांत) विषयींचा एकच विषयावर एकामागून एक असा, आरोप नसल्यामुळें, ह्याला मालारूपकही म्हणतां येणार नाही. म्हणूनच ह्याला केवल निरवयवरूपक म्हटलें आहे.
(आतां) निरवयव मालारूपकाचे उदाहरण हें-
‘‘धर्माचा आत्मा, क्षमेचें भाग्य, सृष्टीचें सार, शारदेचा प्राण, वेदमूर्ति, ब्रह्मायाची साक्षात् आज्ञा, असा हा राजा कल्पांतापर्यंत प्रकाशमान राहो.’’
एकच विषयावर नानापदार्थांच्या आरोपाची ह्यांत माला असल्यामुळें, हें मालारूपक समजावें व ह्यांतील आरोपांना परस्परांची अपेक्षा नसल्यानें, हें निरवयव मालारूपक समजावें.