रूपक अलंकार - लक्षण ११

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


आतां दुसरी एक शंकाः-
‘सौजन्य-चंद्रिका-चंद्रो राजा’ (सौजन्यरूपी चंद्रिकेनें युक्त असलेला साक्षात्‌ चंद्रच असा हा राजा आहे.) ह्या परंपरित रूपकाच्या वाक्‍यांत रूपक आहे, असें कसें म्‍हणतां? कारण कीं, ह्या वाक्‍यांत (सौजन्य व चन्द्रिका या दोहोंत) अभेदारोप असला तरी तो सादृश्यमूलक नाही. (आणि सादृश्यमूलक आरोप असल्‍याशिवाय रूपक होऊं शकत नाही.) (ह्या शंकेवर जगन्नाथाचें) उत्तरः- शंकाकारांचें हें म्‍हणणें बरोबर नाहीं.कारण कीं, वरील वाक्‍यांत राजावर केलेल्‍या चंद्राच्या आरोपाचें समर्थन करणारा जो, सौजन्यावर चंद्रिकेचा आरोप, त्‍याच्या योगानें राजा व चंद्र ह्या दोहोंमधील साधारणधर्म तयार होतो. आणि जेथे साधारणधर्म आहे तेथें सादृश्य असायला कसलीच आडकाठी नाहीं. (आणि अशारीतीनें येथे सादृश्यमूलकत्‍व असल्‍यामुळें वरील वाक्‍यांत रूपकही होणारच.)
ह्यावर (हे मान्य करूनही पुन्हां) एक शंका-तुम्‍ही म्‍हणतां तसें झालें असतें; पण ‘सौजन्य-चंद्रिका-चंद्रः ’ ह्या सामासिक शब्‍दांत, सबंध समास षष्‍ठीतत्‍पुरुष असून, (सौजन्यचंद्रिका हा) समास त्‍या षष्‍ठीतत्‍पुरुषाचा एक अवयव आहे. ह्या समानाधिकरण-तत्‍पुरुष (म्‍हणजे कर्मधारय) समासांत (सौजन्य-चंद्रिका ह्या समासांत) अभेद-संबंधानें सौजन्य हे चंद्रिकेचें विशेषण आहे; व त्‍या विशेषणामुळें प्रतीत होणारा (म्‍ह० सौजन्यप्रतियोगिक) चंद्रिकेत राहणारा (म्‍ह० चंद्रिकानुयोगिक) अभेद राजाच्या ठिकाणीं असणार्‍या म्‍ह० राजानुयोगिक चंद्राभेदात्‍मक म्‍ह० चंद्रप्रतियोगिक रूपकाचें समर्थन करूं शकणार नाहीं. कारण, ‘‘ज्‍या संबंधी पदार्थांचा, दुसर्‍या संबंधी पदार्थांशीं अभेद असतो, त्‍या दोन संबंधी पदार्थांशीं (अनुक्रमे) संबंद्ध असलेल्‍या पदार्थांपैकी पहिल्‍याचा दुसर्‍या संबद्ध पदार्थाशीं अभेद असतो.’’ हा न्यायशास्‍त्राचा सिद्धांत, पूर्वी सांगितला आहे. आतां, वरील संबंध समासांतील पहिला समास सौजन्यचन्द्रिका हा, मुख्य षष्‍ठीतत्‍पुरुषाचा अवयव असून, कर्मधारय आहे. ह्या कर्मधारयांत, सौजन्य हें पद अभेदसंबंधानें चंद्रिकेचें विशेषण आहे व चंद्रिका हें विशेष्‍य आहे. त्‍यामुळें, ‘सैजन्यप्रतियौगिकः चंद्रिकानुयोगिकः’ असा शाब्‍दबोध प्रतीत होतो. ह्या शब्‍दबोधावरून, ह्या समासांतील चंद्रिका हा विषय व सौजन्य हा विषयी (असा विषय विषयिभाव) होत असल्‍यानें हें रूपक, ‘राजा हा चन्द्र आहे,’ या दुसर्‍या रूपकाचें समर्थक होऊं शकणार नाहीं; कारण ह्या दुसर्‍या (समर्थ्य) रूपकांत, राजा हा विषय, अभेदाचा अनुयोगी असून विशेष्‍य आहे; व चन्द्र हा विषयी, अभेदाचा प्रतियोगी असून, (विधेय) विशेषण आहे. [आणि वर सांगितलेल्‍या न्यायशास्त्राच्या सिद्धांताप्रमाणें हीं दोन रूपकें तपासून पाहतां, पहिल्‍या रूपकांतील सौजन्यप्रतियोगिक व चंद्रिकानुयोगिक अभेद (म्‍ह० रूपक) दुसर्‍या, राजानुयोगिक व चंद्रप्रतियोगिक अभेदाचें म्‍ह० रूपकाचें समर्थन कसें करील?] पहिल्‍या रूपकांत, सौजन्य हा विषय, व अभेदाचा अनुयोगी असता, व चंद्रिका हा विषयी व अभेदाचा प्रतियोगी असता तर, ह्या पहिल्‍या रूपकानें दुसर्‍या रूपकाचें समर्थन होऊ शकलें असतें. (उदाहरणार्थ-) ‘‘हे राजा, तुझें सौजन्य, साक्षात्‌ चंद्रिका आहे (आणि म्‍हणूनच,) तूं, साक्षात्‌, चंद्र आहेत.’’ असें जर पहिल्‍या रूपकाचें वाक्‍य असतें तर तें ‘राजा हा चन्द्रच’ ह्या दुसर्‍या रूपक वाक्‍याचें समर्थक झालें असतें. पण उलट आहे, या रूपकाच्या बाबतीत म्‍ह० हें पहिलें रूपक सौजन्यचंद्रिका ह्या समासांत आल्‍यानें, त्‍याचा ‘चंद्रिकाप्रतियोगिकः सौजन्यानुयोगिकः अभेदः’ असा शाब्‍दबोध होणें शक्‍य नाहीं. तुम्‍ही म्‍हणाल कीं, ‘हे दोन्हीही (म्‍हणजे सौजन्य व चंद्रिका हे दोन्ही शब्‍द) एक विभक्ति असण्याच्या संबंधानें, एकाच ज्ञानाचा म्‍ह ० शाब्‍दबोधाचा विषय होतात; तेव्हां त्‍यामधील अभेदाच्या बाबतीत कसलाही घोटाळा होणार नाही,’ पण असें म्‍हणणें शक्‍य नाहीं. कारण प्रत्‍यक्ष ज्ञानाच्या बाबतीत (म्‍ह० त्‍याच्या विषयाचे बाबतीत) एकच प्रकारची सामग्री असेल तर, (म्‍ह० एकाच वेळी अनेक वस्‍तु विषय होत असतील तर) एकाच प्रकारचे ज्ञान होतें, हें कबूल. परंतु शाब्‍दबोध हा एका निराळ्या प्रकारच्याच ज्ञानपद्धतीनें नियंत्रित झालेला असतो. तेव्हां त्‍यांतील प्रत्‍येक पदार्थाचा शाब्‍दबोध पृथक्‌ होतो; त्‍यांत मर्जीप्रमाणें फेरफार करतां येत नाही. अशाच प्रकारें, दुसर्‍याही समासांत आलेल्‍या परंपरित रूपकांतील पहिल्‍या रूपकांत असलेला अभेदारोप, दुसर्‍या रूपकांत असलेल्‍या अभेदारूपाचें समर्थन कसें करू शकेल? ‘शशिपुंडरीक’ ह्या समासांतही (याच न्यायानें) शशीवर पुंडरीकाचा तादात्‍म्‍याभेद तरी कसा करतां येईल? कारण (या समासगत रूपकांत) पुंडरीकाचा व शशीचा अभेद असला तरी, शशीच्या ठिकाणीं पुंडरीकाचें तादाम्‍य मात्र (समासाच्या नियमाप्रमाणें) मुळींच भासत नाहीं. उलट, शशीच्या अभेदाचा पुंडरीकाच्या ठिकाणीं प्रत्‍यय येत असल्‍यानें, पुंडरीक हें शशीच आहे, या वाक्‍याप्रमाणें या समासांतही, पुंडरीकावर शशीचा अभेदारोप होत असल्‍यानें, हें शशिरूपक आहे असें म्‍हणा. याचप्रमाणें ‘नीलिम-दिव्यतोये,’ ‘तारावलीमुकुलमण्डलमण्डिते,’ ‘षोडश-कला-दलं अङ्कभृङ्गम्‌,’ इत्‍यादि (सावयव रूपकाच्या) अवयव-वाक्‍यांत, समासांतील उत्तर पदार्थाच्या ठिकाणी पूर्व पदार्थांचा अभेदच प्रतीत होतो. आणि म्‍हणूनच, त्‍या सर्व समासांत उत्तर पदार्थाच्या ठिकाणीं, पूर्वपदार्थाचा तादात्‍म्‍याभेद असणारीं रूपकें मानण्याची आपत्ति येणारच. ह्याचप्रमाणें.
‘‘अत्‍यंत स्‍वच्छ मोती हींच ज्‍याच्यामधील तारका आहेत, शुभ्र वस्त्ररूपी चंद्रिकेचा जिच्यांत चमत्‍कार आहे, आणि जिच्यांत वदन हाच परिपूर्ण चंद्र आहे. अशा हे सुंदरी, तूं पौर्णिमेची रात्रच आहेस, यांत संशय नाहीं.’’

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP