(कारण तुम्ही याला अपह्नुति म्हणता). शिवाय तुम्ही असें जें म्हटलें आहे कीं, ‘आम्ही या लक्षणांत अव्यंगत्व हें विशेषण दिल्यामुळें, अलंकार असणार्या रूपकाचेंही हें लक्षण होऊं शकेल.’’ पण तसेंही होणार नाहीं. कारण कीं, व्यंग असणें आणि अलंकार असणें ह्या दोहोंचा विरोध मुळीच नाही. आतां प्रधान व्यंग्याचें निवारण करण्याकरितां मात्र उपस्कारकत्व हें विशेषण देणें योग्य होईल असें आम्ही अनेक वेळेला पूर्वी सांगितलें आहे. ज्यांत व्यंग प्रधान आहे असें रूपक व ज्यांत वाच्य प्रधान आहे असें रूपक हीं दोन्हीही सारखीच असून, अलंकार न होण्याच्या बाबतींतही सारखाच असल्यामुळें, ज्यांत वाच्य प्रधान आहे अशा रूपकाचें निवारण करण्यांसाठी अव्यंग्याहून निराळें असें विशेषण तुम्हांला द्यावेंच लागणार. आणि तसें विशेषण तुम्ही तुमच्या (या रूपकाच्या) लक्षणांत दिलेलें नसल्यामुळें तुमचें लक्षण (वाच्यप्रधान रूपकांत) अतिव्याप्त होण्याचा प्रसंग येईल.
आतां ह्या रूपकाची ‘उपमान व उपमेय ह्या दोहोंचा जो अभेद त्यालाच रूपक म्हणावें.’ अशी जी प्राचीनांनी (मम्मटभट्टांनीं) व्याख्या केली आहे, ती विचाराला पटत नाहीं. कारण कीं, अपह्नुति वगैरे अलंकारांतही उपमान व उपमेय ह्या दोहोंमधील अभेद अनुभवसिद्ध असल्यामुळें तुमचें हें रूपकाचें लक्षण त्या अपह्नुति वगैरे अलंकारांत अतिव्याप्त होऊं लागेल. यावर तुम्ही असें म्हणाल कीं, ‘‘उपमान व उपमेय हे दोन शब्द रूपकाच्या आमच्या लक्षणांत असल्यामुळें, त्या शब्दांतून, ’उपमेयाच्या विशिष्ट धर्माला धरूनच म्ह० त्या धर्मानें युक्त असलेल्या उपमेयाशीं उपमानाच्या विशिष्ट धर्मानें युक्त जें उपमान त्याचा अभेद, रूपकांत सांगितला जातो’, असा अर्थ हातीं येतो. आणि अपह्नुतींत तर उपमेयाच्या विशिष्ट धर्माचा पुरस्कार नसतो. त्यामुळें, रूपकाच्या लक्षणाचा अपह्नुतींत अतिप्रसंग होणारच नाहीं.’’ पण हें तुमचें म्हणणें बरोबर नाहीं. कारण, अपह्नुतींत अतिव्याप्ति होत नसेल तर, ‘हें मुख मला तर चंद्रच वाटतें.’ ह्या उत्प्रेक्षेच्या वाक्यांत तरी तुमच्या रूपकाच्या लक्षणाची अतिव्याप्ति होणारच. यावर तुम्ही म्हणाल कीं,
‘‘प्राकृताचा निषेध करून अप्रकृताची ज्या ठिकाणी सिद्धि केली जाते, तिला अपह्नुति म्हणावे.’’ (तसेंच) ‘‘जेथें प्राकृतावर अप्रकृताची संभावना केली असेल ती उत्प्रेक्षा.’’
अशा अपह्नुति व उत्प्रेक्षा ह्यांच्या (अनुक्रमें) व्याख्या असल्यामुळें, त्या दोन्हीही, रूपकाच्या बाधक आहेत. (म्हणजे रूपकाच्या अभेदाला ह्या दोन्हीही अलंकारांतील अभेद अपवादक ठरतो.) आणि म्हणूनच ह्या दोन्ही अलंकारांचा जो विषय, त्याला वगळून बाकीच्या ठिकाणी ‘मुख हाच चंद्र’ इत्यादि वाक्यें होऊं शकतील. जसें-यज्ञ-प्रकरणांत, ‘लव्हाळ्याची दर्भमुष्टि अभिचार-यज्ञांत असावी व अभिचारयज्ञ हा विषय सोडून इतर ठिकाणीं (सामान्य यज्ञांत) दर्भाची मुष्टि वापरता येईल.’ (असे म्हटलें आहे; त्याप्रमाणें येथेंही समजावें.) अथवा व्याकरण-शास्त्रांत ‘‘ ‘क्स’ ह्या आदेशाचा विषय सोडून बाकीच्या ठिकाणी ‘सिच्’ हा प्रत्यय लावावा असें म्हटलें आहे. व्यवहारांतही ‘ह्या ब्राह्मणांना दहीं द्यावें पण कौण्डिन्याला ताक द्यावें’ असें म्हटल्यानें कौण्डिन्य ह्या ब्राह्मणाला ताक देऊन बाकीच्या ब्राह्मणांना दही द्यावें, असा अर्थ होतो. त्याप्रमाणें, येथेही अभेद-मूलक अपह्नुति व उत्प्रेक्षा ह्या दोन अलंकारांचे विषय सोडून बाकीच्या ठिकाणी रूपक होऊं शेकल’’
पण हें तुमचें (जगन्नाथाच्या पूर्वपक्षाचें) म्हणणें बरोबर नाहीं. कारण कीं, तुम्ही दिलेल्या उदाहरणांत, व प्रस्तुत विषयांत मोठाच फरक आहे.