समओवी ज्ञानेश्वरी - अध्याय सतरावा

ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी या तिन्ही ग्रंथांतून काव्य आणि तत्वज्ञान संत ज्ञानेश्वर आपल्या विलक्षण भाषासौंदर्याने मराठी माणसाला विस्तारून सांगतात.


जगद्‌रूप प्रफुल्ल मुद्रेसी या । प्रकट करी तव योगमाया । तया नमो जी गणराया । सद‌गुरु श्रीनिवृत्तिनाथा तुज ॥१॥

त्रिगुणत्रिपुरारींनी वेढिला । जीवत्वदुर्गीं अडकला । तो आत्मा शंभूने सोडविला । तुझिये स्मरणें ॥२॥

म्हणोनि शिवासह करिता तुळा । गुरुत्वें तूचि आगळा । परि हलकाफूल की भोपळा । मायाजळीं तारिसी ॥३॥

जे तुजविषयीं मूढ । तयांस्तव तू वक्रतुंड । ज्ञानियांसी तर अखंड । सन्मुखचि तू ॥४॥

तव नेत्र पाहता सान । तरि तयांचे उघडझापीतून । उत्पत्ति प्रळय या दोन । लीलाचि करिसी ॥५॥

प्रवृत्तिकर्णांचे हालचालींनी । मदगंध दरवळुनी । जीवभृंग नीलकमलांनी । पूजिती तुज ॥६॥

निवृत्तिकर्णांचे हालचालीने । बांधिली ती पूजा उधळणे । मग मिरविसी मोकळे तेणे अंगाचे लेणे ॥७॥

वामांगीं मायेचा नृत्यविलास । हा जगद्‌रूप आभास । तांडवमिषें सकल कलांस । दाविसी तू ॥८॥

हे असो, नवल गुरुवरा । तू होसी जयाचा सोयरा । सोयरिकेचे व्यवहारा । मुकेचि तो ॥९॥

फेडिसी बंधनाचा ठाव । तू जगद्‌बंधू ऐसा भाव । आनंदें आश्रय तव । अंगींचि घेई ॥१०॥

दुज्याचे नावें तया । देहहि नुरेचि गुरुराया । जेणे तू स्वरूपीं तया । आपुला केला ॥११॥

तुज करुनी पुढती । जे अनेक साधनीं धावती । तयां ठेविसी मागुती । बहुतचि तू ॥१२॥

जो ध्यानें ठेवी मानसीं । तयास्तव न तू तयाचे देशीं । ऐक्यें ध्यानहि विसरे त्यासी । प्रेमभाव तुझा ॥१३॥

तू सिद्धचि, परि जो न जाणे । तो नांदे सर्वज्ञपणें । वेदांचेही एवढे बोलणे । न घेसी कानीं ॥१४॥

मौन गा तुझे राशिनाव । आता स्तोत्रीं काय बांधू हाव ? । दिससी तितुकी मायाचि तव । भजना मग वाव कैसा ? ॥१५॥

तव सेवक होऊ पाही । तर एकरसीं सेव्य-सेवक भाव येई । म्हणोनि आता नोहे काही । तुजलागी जी, ॥१६॥

व्हावे जेव्हा सर्वही सर्वथा । पावावे तुज अद्वयानंदा । हे जाणे मी वर्म तुझे गुरुनाथा । आराध्यमूर्ती ॥१७॥

तर वेगळेपणे नुरोन । उदकीं एकवटे लवण । तैसे हे माझे नमन । बहु काय बोलू ? ॥१८॥

रिता कुंब समुद्रीं रिघे । तो भरोनि उचंबळत निघे । अथवा वात दीपासंगे । दीपचि होय ॥१९॥

तैसा तुजसी प्रणिपात करून । गुरुवरा, जाहलो मी परिपूर्ण । आता अभिव्यक्ती करीन । गोतार्थाची ॥२०॥

तर सोळावे अध्यायीं । समाप्तीचे ठायी । ऐसा निश्चयपूर्वक सिद्धांतही । ठेविला देवें; ॥२१॥

की कृत्य-अकृत्य व्यवस्था । अनुष्ठावया पार्था । शास्त्रचि एक सर्वथा । प्रमाण तुज; ॥२२॥

तर अर्जुन मनीं म्हणतसे । अहो हे ऐसे कैसे । की शास्त्राविण नसे । सुटका कर्मा ? ॥२३॥

तर तक्षकाचे फडेवरी ठाकोनि । कैसा तो काढी मणी ? । कैसा नाकींचा केस आणी । सिंहाचिया ? ॥२४॥

मग त्यात त्या मण्या ओवावे । तरचि जणु लेणे त्यावे । एरवी काय असावे- । रिक्तकंठी ? ॥२५॥

तैसी शास्त्रांची मतभिन्नता । कैसी कोणा ये आकळता ? । मग एकवाक्यतेचे फळ हाता । यावे कैसे ? ॥२६॥

आणि एकवाक्यताहि होता । आचरण्या वेळ मिले का पुरता ? । कोठला विस्तार जीविता । एवढा गा ? ॥२७॥

आणि शास्त्रें अर्थें देशें काळें । या चहूंनी जे एक फले । तो योग कैसा मिळे । अवघ्यांसी ? ॥२८॥

म्हणोनि हे शास्त्रोक्त घडावे । परि ते असंभवनीय आहे । तर अज्ञानी मुमुक्षू पावे । कोणती गति बा ? ॥२९॥

हा पुसावया अभिप्राय । जो अर्जुन करि प्रस्ताव । सांगितले ते सर्व । सतराव्या अध्यायीं ॥३०॥

सर्व विषयीं उदासीन । सकल कलांत प्रवीन । कृष्णाही नवल कृष्ण । अर्जुनरूपें जो ॥३१॥

शौर्या जोडिला आधार । जो प्रज्ञेचा प्रियोत्तम । ब्रह्यविद्येचा विश्राम । सहचर मनोधर्म । देवाचा जो ॥३३॥

अर्जुन म्हणाला:

जे शास्त्रमार्ग सोडूनि श्रद्धापूर्वक पूजिती
त्यांची सात्त्विक ती निष्ठा किंवा राजस तामस ॥१॥

अगा तमालपत्रनीलवर्ण शामा । इंद्रियांनी अनुभविल्या ब्रह्मा । तुझा बोल संशयीं घाली आम्हा । अर्जुन म्हणे ॥३४॥

तर शास्त्रज्ञानावाचुन । प्राण्यां न होय स्वामोक्षदर्शन । ऐसे कोणत्या पक्षा धरून । बोलिलासी ? ॥३५॥

तर न मिळेचि तो देश । नव्हेचि काळासि तेवढा अवकाश । जो करवी शास्त्राभ्यास । तो गुरुही दुरी ॥३६॥

आणि अभ्यासा साहाय्यक । जी सामुग्री आवश्यक । ती अनुकूल नसे देख । त्यावेळी जर ॥३७॥

पारब्ध अनुकूल नसे जाण । ना प्रजेचे होय संवाहन । ऐसे खुंटे संपादन । शास्त्राचे तया ॥३८॥

किंबहुना शास्त्रविषयीं । आधार नखभरही नाही । म्हणोनि त्या उठाठेवी । सोडिल्या ज्यांनी ॥३९॥

परि शास्त्रे विचारपूर्वक अभ्यासिती । शास्त्रार्थानुसार आचरण करिती । परलोकीं आनंदें नांदती । खरोखरी जे ॥४०॥

तयांऐसे आपण व्हावे । ऐसी आस बांधोनि जीवें । घेती तयांचे मागोवे । आचरावया ॥४१॥

पाहुनि धडयातील अक्षरां । बाळ लिही, प्रभुवरा । वा डोळसा करनि पुढारा । मागे अंध चाले ॥४२॥

तैसे सर्वशास्त्रनिपुण । तयांचे जे आचरण । तेचि करिती प्रमाण । आपुल्या श्रद्धेसी ॥४३॥

मग शिवादिक पूजने । भूमीआदिक महादाने । अग्निहोत्रादि यजने । करितो जे श्रद्धेनें ॥४४॥

तयां सत्त्व-रज-तमां । कोणती गति हे पुरुषोत्तमा, । ते सांगावे जी, आम्हां । स्पष्ट करून ॥४५॥

तर वैकुंठपीठींचे लिंग । जो वेदकमळातिल पराग । जयाचे अंगच्छायेत हे जग । जगतसे ॥४६॥

काळाची सहज प्रबलता । लोकोत्तर प्रौढता । अद्वितीय गूढता । आनंदघनताही ॥४७॥

हे गुण ज्या बळें विख्यात । ते जयाचे अंगीं पूर्ण वसत । तो श्रीकृष्ण स्वमुखें येथ । बोलत असे ॥४८॥

श्रीभगवान् म्हणाले:

तिन्ही प्रकारची श्रद्धा स्वभावें जीव मेळवी
ऐक सात्त्विक ती होय तशी राजस तामस ॥२॥

म्हणे अगा तुझा कल । आम्ही जाणतो सकल । शास्त्राभ्यासासी केवळ । अडसर मानिसी ॥४९॥

नुसती घेऊनि श्रद्धा । झोंबू पाहसी परमपदा । परि तैसे हे प्रबुद्धा । सोपे नव्हे ॥५०॥

श्रद्धा म्हणता कार्यभाग होई । ऐसे विसंबूनि राहू नाही । काय अधमाचे घसटीनेही । उत्तम अधम न होय़ ? ॥५१॥

गंगोदक जरि होय । तरि मद्यपात्री ये, यास्तव । ते घ्यावे काय ? । विचार करी बा ॥५२॥

चंदन शीतळचि स्वभावें । परि अग्नीसी मेळ पावे । तर हाती धरिता आघवे । जाळू न शके काय ? ॥५३॥

हिणकस आटवित असता । चोख त्यात पडता । ते चोखचि म्हणुनि घेता । काय न नागवी सोनेही ? ॥५४॥

श्रद्धेचे रूप तैसे । स्वभावें चोख असे । परि प्राण्यांचे वाटयासी ऐसे । येई जेव्हा; ॥५५॥

प्राणी तर स्वभावें । अनादि मायेचे प्रभावें । त्रिगुणांचेचि आघवे । घडिले असती; ॥५६॥

तेथही दोन गुण घटती । एक करी उन्नती । तेव्हा ऐशाचि होती वृत्ती । जीवांचिया ॥५७॥

वृत्तीऐसे संकल्प धरिती । मनाऐशा क्रिया करिती । केल्या कर्मानुसार मिळविती । दुजा देह ॥५८॥

बीजाचेचि झाड होत । झाड मोडे बीजीं समावत । ऐसे कल्पकोटी जात । परि वृक्षजाति न नाशे ॥५९॥

तयापरी ही अपार बरे, । होत जात जन्मांतरे । त्रिगुणत्व तैसेचि उरे । प्राण्यांचे या ॥६०॥

म्हणोनि प्राण्यांचे वाटयासी । जी ये श्रद्धा ऐसी । ती होय गुणांसरिसी । तिन्ही या ॥६१॥

सत्त्वगुण वाढे शुद्ध । तेव्हा ज्ञानासि घाली साद । परि त्या एकाविरुद्ध । अन्य दोन असती ॥६२॥

सत्त्वगुणासंगे निर्मळ । श्रद्धा पावे मोक्षफळ । तेव्हा उगे कैसे बैसतील । रज तम मग ? ॥६३॥

सत्त्वाचे बळ करी नष्ट । रजोगुण होय पुष्ट । तेव्हा तीचि श्रद्धा सरसकट । सर्व कर्मे करी ॥६४॥

मग तमाची उठे आग । तेव्हा तीचि श्रद्धा पावे भंग । मग भोगू पाहे भोग । कोणतेही ॥६५॥

जसा स्वभाव तो ज्याचा श्रद्धा त्याची तशी असे
श्रद्धेचा घडिला जीव जशी श्रद्धा तसाचि तो ॥३॥

ऐसी सत्त्व-रज-तम-रहित । श्रद्धा वीरोत्तमा येथ । नाही या जीवग्रामांत । ऐक नीट ॥६६॥

म्हणोनि श्रद्धा स्वाभाविक । असे गा त्रिगुणात्मक । रज-तम-सात्त्विक । भेदीं या ॥६७॥

प्राणिमात्रां जीवनचि उदक । परि विषें होय मारक । मिर्‍यांमाजी तिखट देख । उसात गोड ॥६८॥

तैसा भरला तमें । जो मरे जन्मे । तेथ श्रद्धा परिणमे । तमचि होउनी ॥६९॥

काजळ आणि शाई । यात न दिसे भेद काही ॥ तैसी तामस श्रद्धा नाही । वेगळी तमाहुनी ॥७०॥

तैसीचि राजस जीवीं । रजोमय जाणावी । सात्त्विक जीवीं आघवी । सत्त्वाचीच ॥७१॥

ऐसे हे सकळ । जगडंबर निखिल । श्रद्धेचेचि केवळ ओतिले असे ॥७२॥

तर गुणत्रयवशें । त्रिविधपणाए ठसे । श्रद्धेवरिहि उठले ऐसे । ओळख तू ॥७३॥

जाणावे झाड फुलांवरुनी । तैसे मानस बोलांवरुनी । या जन्मींचे भोगांवरुनी । पूर्वजन्मीं जे केले ॥७४॥

तैसी ज्या ज्या चिन्हीं । श्रद्धेची रूपे तिन्ही । देखिली जाती नाना परींनी । ते अवधारी ॥७५॥

सत्त्वस्थ पूजिती देव यक्ष-राक्षस राजस
प्रेते आणि भुतेथेते पूजिति लोक तामस ॥४॥

तर सात्त्विक्त श्रद्धा । हा जयांचा बांधा । तयांची बहुतकरुनि मेधा । स्वार्गीं असे ॥७६॥

ते विद्याजात पढती । यज्ञक्रिया निवडिती । किंबुना पडाती । देवलोकीं ॥७७॥

आणि गा हे परियेस । जे श्रद्धेने घडिले राजस । ते यक्ष आणि राक्षस । यांसी भजती ॥७८॥

श्रद्धा जी का तामसी । ती मी सांगेन गुजसी । जी केवळ पापांच्या राशी । अति कठोर निर्दय ॥७९॥

जीववधें साधुनि बळी । भूतप्रेतकुळे अमंगळ काळीं । ठेवुनी स्मशानी कातरवेळीं । पूजिती ते ॥८०॥

तमोगुणाचे सार । काढुनी, निर्मिले ते नर । अगा, जाण ते घर । तामसी श्रद्धेचे ॥८१॥

ऐसी या तिन्ही अंगीं । त्रिविध श्रद्धा गा जगीं । परि हे यालागी । सांगत असे; ॥८२॥

जी ही सात्त्विक श्रद्धा । ती जतन करणे साधा । अन्य दोन्ही विरुद्ध, प्रबुद्धा, । त्यजाव्याचि त्या ॥८३॥

सात्त्विक मतीवरि होय । जयाचा निर्वाह । तया न गमेचि कैवल्य । बागुलबुवा ॥८४॥

तो न पढो ब्रह्मसूत्र । न चाखो सर्व शास्त्र । न होवोत सिद्धांत स्वतंत्र । तयाहातून; ॥८५॥

परि श्रुति-स्मृतींचे अर्थ । जे आपण होउनि मूर्त । अंगिकारुनि जगा देत । थोर जे जे ॥८६॥

तयांची आचरती पाउले । पावोनि, सात्त्विक श्रद्धेने चाले । तो तेचि फळ ठेविले- । ऐसे, मिळवी ॥८७॥

एक दीप लावी सायासें । दुसरा तेथ लावो बैसे । तर तो काय प्रकाशें । वंचित होई ? ॥८८॥

अगा, एकें मोल अपार । वेचुनी बांधिले घर । तर ती सुखसोय वस्तीकर । न भोगी काय ? ॥८९॥

हे असो, जो तळे करी । ते तयाचीच तृषा हरी । की रांधणार्‍याचि अन्न घरीं । इतरां नोहे ? ॥९०॥

बहुत काय बोलावे गा ? । एके गौतमासीचि गंगा । काय अन्य समस्त जगा, । ओहोळ जाहली ? ॥९१॥

म्हणोनि आपुल्याहुनी । जो शास्त्रानुष्ठानाच्या कुसरी कोणी- । जाणे, तया श्रद्धेने आचरुनी । तो मूर्खही तरे ॥९२॥

शास्त्रें निषेधिले घोर दंभें आचरिती तप
अभिमानास पेटूनि काम-रागें बळावले ॥५॥

शास्त्रज्ञांने नावेंहि खरोखरी । जीवें खाकरुहि न जाणती, परी । टेकूहि न देती शिवेवरी । शास्त्रज्ञांसी ॥९३॥

वडिलांचिया कृती । देखोनि वाकुल्या दाविती । आणि चुटक्या वाजविती । पंडितांसी ॥९४॥

आपुलेचि अभिमानें फुगती । श्रीमंतीचा दर्प दाविती । साचचि ते अंगिकारिती । पाखंडयांची तपे ॥९५॥

आपुल्या आणि इतरांच्या कोणी । अंगी कोयते घालुनी । रक्तमांसें भरभरूनी । यज्ञपात्रे; ॥९६॥

रिचविती जळत्या कुंडीं । लाविती समंधातोंडीं । नवसा देतीं उंडी । बालकाची ॥९७॥

क्षुद्र देवताचि श्रेष्ठ- । ऐसा घेऊनि हट्ट । अन्नत्यागाचे कष्ट । आचरिती काही ॥९८॥

अगा, आत्म-पर-पीडेचे । बीज तमक्षेत्रींचे । पेरिती, मग पुढचे । तेचि पीक ॥९९॥

नाहीत समर्थ बाहूही । आणि त्यजिले नावेसीही । मग तया जैसे होई । समुद्रीं गा ॥१००॥

जो वैद्याचा राग करी । औषधा लाथ मारी । तो रोगी कधी तरी । होई का यातनामुक्त ? ॥१०१॥

अथवा डोळसाचे द्वेषें । काढी आपुलेचि डोळे जैसे । मग तो अंध बैसे । माजघर धरुनी ॥१०२॥

तैसे होय त्या असुरांचे गा, । जे निंदिती शास्त्रमार्गां । मग सैरावैरा धावती उगा । अविचारें रानोमाळ ॥१०३॥

काम करवी ते करिती । क्रोध मारवी तयां मारिती । किंबहुना मज पुरती । दुःख शिळेतळीं ॥१०४॥

देहधातूंस शोषूनि मज आत्म्यास पीडिती
विवेकहीन जे त्यांची निष्ठा ती जाण आसुरी ॥६॥

आपुल्या वा परक्या देहीं । दुःख देती जे जे काही । मज आत्म्यासी तितुकाही । होय शीण ॥१०५॥

वाचेचेही पल्लवें । पाप्यां तयां न शिवावे । परि लागे सांगावे । त्यागावया त्यांसी ॥१०६॥

स्पर्शावे लागे प्रेत न्यावया । बोलणे पडे अधमा घालवाया । तैसे मळ धुवावया । लागे हात ॥१०७॥

तेथ शुद्धीचिये आशेवरि मग । न मानावे ते संसर्ग । तैसा त्याजावा तो आसुरवर्ग । म्हणूनि कथिला येथ ॥१०८॥

परि अर्जुना तू तयां देखसी । तेव्हा स्मर हो मजसी । अन्य प्रायश्चित्त या गोष्टीसी । नसे उपयुक्त ॥१०९॥

म्हणोनि श्रद्धा सात्त्विक । पुन्हा पुन्हा तीचि एक । जतन करावी चोख । सर्वपरींनी ॥११०॥

तर संगत तैसीचि धरावी । जेणे सात्त्विक वृत्ति पोषावी । सत्त्वगुणाची वृद्धि व्हावी । ऐसाचि घ्यावा आहार ॥१११॥

एरवी तरी पाही । या स्वभाववृद्धी चे ठायी । आहारावाचुनि नाही । सबळ कारण ॥११२॥

प्रत्यक्ष पाहे बा वीरा, । सावधपणे जो घेई मदिरा । तोही तत्क्षणीं ठाके पुरा । उन्मत्त होउनी ॥११३॥

जो मनसोक्त सेवी अन्नाते । तो व्यापे कफ-वात-पित्तें । काय ज्वरें फणफणत्या निवविते । दुध आदिक ? ॥११४॥

नातरी अमृत ज्यापरी । घेता मरण निवारी । अथवा विखार करी । जैसे विष;अ ॥११५॥

त्यापरी घ्यावा आहार । तैसा देहधातुहि घे आकार । आणि देहधातुबरोबर । आंतरभावहि पोषे ॥११६॥

भांडयाचे तापें जैसे । आतले उदकही तापतसे । तैसी व्यापे धातुवशें । चित्तवृत्ती ॥११७॥

म्हणोनि सात्त्विक अन्न सेवून । सात्तिक भावचि होय उत्पन्न । राजस-तामसांची वाढ जाण । अन्य रसीं होय ॥११८॥

तर सात्त्विक आहार कोणता । राजस-तामसाचे स्वरूप आता । सांगतो गा पांडुसुता । ध्यान देई ॥११९॥

आहारातहि सर्वांच्या तीन भेद यथारुचि
तसे यज्ञीं तपीं दानीं सांगतो भेद ऐक ते ॥७॥

आणि एकचि असता आहार । कैसे जाहले तीन प्रकार । तेही आता बरोबर । रोकडे दावू ॥१२०॥

जैसी जेवणार्‍याची रुची । तैसी निष्पत्ती भोजनाची । आणि जेवणारा तर याचि । त्रिगुणाचा दास ॥१२१॥

जो जीव कर्ता भोक्ता । ती त्रिगुणांनी स्वभावता । पावोनि त्रिविधता । वागे त्रिधा ॥१२२॥

म्हणोनि त्रिविध आहार । यज्ञाचेही तीन प्रकार । तप-दान-आदि व्यवहार । त्रिविधचि ते ॥१२३॥

परि आहारलक्षण पाहिले । सांगू जे म्हटले । ते ऐक गा भले । स्पष्ट करू ॥१२४॥

सत्त्व प्रीति सुख स्वास्थ्य आयुष्य बळ वाढवी
रसाळ मधुर स्निग्ध स्थिर आहार सात्त्विक ॥८॥

तर सत्त्वगुणाकडे । दैवयोगें भोक्ता पडे । मग मधुर रसीं जडे । आवड तयाची ॥१२५॥

जे अंगेंचि रसभरित । जे अंगेंचि गोड पदार्थ । अंगेंचि स्निग्ध बहुत । परिपक्व जे; ॥१२६॥

आकारें न ढगळ । स्पर्शें अति मवाळ । जिभेलागी  स्नेहाळ । स्वाद जयां; ॥१२७॥

रसें गाढी वर ढिली । मधुर रसें भरलेली । जागोजाग न करपली । अग्नितापें ॥१२८॥

अंगें सान परिणामें थोर । जैसे गुरुमुखींचे अक्षर । तैसे अल्प असताहि अपार । तृप्ती लाभे; ॥१२९॥

मुखीं गोड लागे जैसे । तैसेचि हितकर आत असे । त्या अन्नीं प्रीती वाढतसे । सात्त्विकांची ॥१३०॥

ऐसे ज्या पदार्थाचे गुणलक्षण । ते सात्त्विक अन्न जाण । जीविताचे संरक्षण । नित्य नवे हे ॥१३१॥

या सात्त्विक रसोत्कर्षें । जेव्हा देहीं मेघ वर्षे । तेव्हा आयुष्यनदी भरे हर्षें । दिवसेंदिवस ॥१३२॥

सत्त्वाचिये पोषणा । हा आहारचि जाणा । दिवसाचे उन्नतीसी अर्जुना । भानू जैसा ॥१३३॥

आणि मानसा तैसे शरीरा । बळाचा गा आसरा । तर कैसा हा आहार वीरा, । ठाव होईल रोगां ? ॥१३४॥

हा सात्त्विक होय भोग्य । तेव्हा भोगाया आरोग्य । शरीराचे भाग्य । उदयले जाण ॥१३५॥

आणि सुखाचे देणे घेने । पावे उत्कर्षा येणे । हे असो मैत्र वाढणे । आनंदासी ॥१३६॥

ऐसा सात्त्विक आहार । परिणामीं थोर । करी हा उपकार । सबाह्यासी ॥१३७॥

आता राजसा प्रीत ऐसी । असे ज्या रसीं । करू व्यक्त त्यासी । या प्रसंगीं ॥१३८॥

खारे रूक्ष कडू तीक अम्ल अत्युष्ण दाहक
दुःखशोकद आहार रोगवर्धक राजस ॥९॥

उणे इतुकेचि, नसे प्राणसंकट । परि काळकूटाहून कडवट । वा चुन्याहुनीही तिखट । चटके आम्लपणें ॥१३९॥

कणकीत जितुके पाणी । तितुकेचि मीठ घालुनी । तैसीचि करी मिळवणी । अन्य पदार्थीं; ॥१४०॥

अपार खारट एवढे । राजसा त्या आवडे । कढत इतुके तोंडे- । जैसी आगचि गिळी ॥१४१॥

वाफेचिये शिगेठायी । वातहि लाविता लागावी । इतुके कढत खाई । रजोगुणी तो ॥१४२॥

मागे सरे वावटळही । की प्रहार करी  पहारही । ऐसे तिखट तो खाई । जे घावाविण रुपत ॥१४३॥

आणि राखेहुनि कोरडे । खाता आत-बाहेरी भरडे । तो जिव्हादंश आवडे । बहु तया ॥१४४॥

परस्परांसी दातां । आदळ होय खाता । तो घास तोंडीं घेता । तोषू लागे ॥१४५॥

आधीचि झणझणीत । वरी मोहरी । लावित । खाता वाफा येत । नाकीं तोंडीं ॥१४६॥

उगे म्हणे आगीते । तैसे ते रायते । प्रिय प्राणापरते । राजसासी ॥१४७॥

न पुरोनि तोंडा । जिभेने केला वेडा । अन्नमिषें अग्नि भडाडा । पोटीं भरी ॥१४८॥

तैसाचि दाह उठे । भुई-शेजेवरि लोटे । पाण्याचे नच सुटे । तोंडातुनी भांडे ॥१४९॥

तो आहार नसती घेतले । व्याधिसाप जे निजले । ते चेवविण्या घातले । माजवण पोटीं ॥१५०॥

तैसे एकमेकांचे सळें । रोग उठती एके वेळे । ऐसा रजोगुणी आहार फळे । केवळ दुःखें ॥१५१॥

ऐसे राजस आहारा । वर्णियेले धनुर्धरा । परिणामाचेही विचारा । कथन केले ॥१५२॥

आता तया तामसा । आवडे आहार जैसा । तेही सांगू परिसा । किळस न येवो तुज ॥१५३॥

तर खाई उष्टे कुजले । न मानी अनहित-भले । जैसे की गिळे- । म्हैस आंबोण ॥१५४॥

रसहीन निवालेले शिळे दुर्गंधयुक्त जे
निषिद्ध आणि उष्टेहि तामसप्रिय भोजन ॥१०॥

शिजविलेली अन्ने तैशी । दोनप्रहरी की दुसरे दिवशी । अति आवडीने तो तामसी । घेत असे ॥१५५॥

अथवा अर्धवट उकडले । वा पार करपोनि गेले । जे गोडीसी मुकले । तैसेही खाई ॥१५६॥

जे उत्तम रांधिले । मधुर चवीने भरले । ते अन्न न गमले । तामसा कधी ॥१५७॥

तशात कधी अवचित । सदन्न होय प्राप्त । तरि घाण सुटेतों ठेवित । वाघ जैसा ॥१५८॥

बहुत दिवसांचे शिळे । स्वादें त्यागिले । शुष्क अथवा सडले । किडेहि पडलेले ॥१५९॥

की बाळांचे हातांनी । राड करी चिवडुनी । कुटुंबासवे बैसोनी । गोतभोजन करी ॥१६०॥

ऐसे अमंगळ खाय । ते तया सुखभोजन होय । परि तेणेही तृप्त हो काय- । पाणी तो ? ॥१६१॥

मग चमत्कार देखा पुढे । शास्त्रनिषेधाचा शिंतोडा उडे । ज्या कुद्रव्यांवरि पडे । दोषयुक्त; ॥१६२॥

त्या अपेयांचे पानीं । अखाद्यांचे भोजनीं ।  उत्कट हाव मनीं । वाढवी तामस ॥१६३॥

ऐसा तामस जेवणारा । ऐसी आवड तया वीरा, । याचे फळ मिळण्या दुसरा । क्षण न लागे ॥१६४॥

जेव्हा या अन्नासि अपवित्र । शिवे त्याचे तोंड मात्र । तेव्हाचि पापासि पात्र । जाहला तो ॥१६५॥

यापरते जे जेवी । ती जेवण्याची रीत न म्हणावी । पोटभरती जाणावी । यातना ती ॥१६६॥

शिरच्छेदें काय व्हावे । की आगीत शिरता कैसे आहे । हे जाणावे काय पाहे ? । परि तो साहतचि असे ॥१६७॥

अगा अर्जुना म्हणून । हे तामस अन्न । कैसे परिणसे भिन्न । हे सांगणेचि नलगे ॥१६८॥

आता यावरी । आहारांच्या परी । यज्ञही अवधारी । त्रिधा असे ॥१६९॥

परि तिहींमाजी प्रथम । सात्त्विक यज्ञाचे कर्म । ऐक गा श्रेष्ठतम- । शिरोमणी ॥१७०॥

फलाभिलाष सोडूनि कर्तव्यचि म्हणूनिया
विधीने मन लावूनि होय तो यज्ञ सात्त्विक ॥११॥

तर प्रियोत्तमावाचुनि एका । वाढो न दे काम जी का । ऐसा मनोधर्म देखा । पतिव्रतेचा ॥१७१॥

वा सागरासी मिळता गंगा । पुढे धाव घेईना, अगा । वा वेद राहिला उगा । देखोनि आत्म्यासी; ॥१७२॥

तैसे जे आपुल्या स्वहितीं । वेचूनिया चित्तवृत्ती । नुरविती अहं-वृत्ती । फळालागी ॥१७३॥

पावता झाडाचे मूळ । मागुते सरो न जाणे जळ । जिरले की केवळ । तयाचेचि अंगी; ॥१७४॥

तैसे मन-देह दोन्ही । यजननिश्चयाचे ठायी । हरपोनि जे काही । न वांछिती; ॥१७५॥

ते फळवांछात्यागी । स्वधर्मावाचुनि सर्वत्र विरागी । करिती जो यज्ञ सर्वांगीं । अलंकृत ॥१७६॥

आपण आपणा आयनीं । पाहावे जैसे डोळ्यांनी । वा तलहातीचे रत्न दिव्यांनी । अंधारीं दिसे ॥१७७॥

अथवा सूर्याचे उदयें । मार्ग दृष्टिपथीं ये । तैसे वेदांचे साहाय्यें । आचरुनी मार्ग; ॥१७८॥

कुंडे मंडप वेदी । आणिकही संसारसमृद्धी । ती जुळवाजुळव केली आधी । शास्त्रांनीचि स्वयें ॥१७९॥

सकळ अवयव उचित । लेणी घातली अंगात । तैसे पदार्थ जेथल्या तेथ । विनियोगुनी ॥१८०॥

काय वर्णावे शब्दांनी । जैसी सर्व आभरणीं लहडुनी । ती यज्ञविद्याचि साक्षात येउनी । ठाकली यजनमिषें; ॥१८१॥

तैसा सांगोपांग । निपजे जो याग । उठू न देता अंग । प्रतिष्ठेचे ॥१८२॥

प्रतिपाळ तर महत्त्वाचा । झाडांमाजी तुळशीचा । परि फळे-फुले छाया यांचा । हेतु नसावा ॥१८३॥

किंबहुना फलाशेविण । ऐशा निगुतीने होय निर्माण । तो यज्ञ जाण । सात्त्विक गा ॥१८४॥

फळाचे अनुसंधान राखुनी दंभपूर्वक
लोकात यजिला जाय जाण तो यज्ञ राजस ॥१२॥

आता राजस यज्ञ वीरेशा, । तोही गा याचिऐसा । श्राद्धालागी जैसा । आमंत्रिला राजा ॥१८५॥

राजा घरीं ये । तर बहुत उपयोग आहे । श्राद्धीं उणे न पडे, । कीर्तीही मिळे ॥१८६॥

ऐसा आवाका घेता । म्हणे स्वर्ग लाभेल आयता । लोकमान्य दीक्षित होता । घडेल याग ॥१८७॥

केवळ फळालागी । महत्त्व पुकारावया जगीं । ही निष्पत्ती ज्या यागीं । पार्था, राजस तो ॥१८८॥

नसे विधि नसे मंत्र अन्नोत्पत्ति नसे जिथे
नसे श्रद्धा नसे त्याग बोलिला यज्ञ तामस ॥१३॥

पशु-पक्ष्यांचे विवाहीं । भट कामचि एक, पाही । तैसे तामसयज्ञाठायी । आग्रहचि मूळ ॥१८९॥

वार्‍या वाट न लाहे । मरण मुहूर्त पाहे । निषद्धा जाळण्या भिये । आग जर; ॥१९०॥

तरचि तामसाच्या आचारा । धरबंध शास्त्राचा, वीरा, । एरवी तो पुरा । उच्छृंखल ॥१९१॥

तेथ नाही विधींची पर्वा । मंत्रादिक न लागे तया । माशीसीहि न मिळे वा- । अन्न जेथ; ॥१९२॥

वैरभाव पंडितांसी । तेथ दक्षिणा कायसी ? । अग्नि करी वावटाळीसी । साहाय्य जैसे; ॥१९३॥

तैसे वायाचि सर्वही वेचे । मुख न पाहता श्रद्धेचे । नागवावे निपुत्रिकाचे । घर जैसे ॥१९४॥

ऐसा जो यज्ञाभास । तया नाव यग तामस । ऐक म्हणे श्रीनिवास । लक्ष्मीचा तो ॥१९५॥

आता गंगेचे पाणी । गेले अन्य अन्य ओघांनी । एक मळे, एक आणी । शुद्धत्व जैसे; ॥१९६॥

तैसे तीन गुणीं तप । येथ जाहले आहे त्रिरूप । ते एक केले देई पाप । उद्धरी एक ॥१९७॥

तर तेचि तीन भेदीं । कैसे बा म्हणोनि सुबुद्धी । जाणू पाहसी तर आधी । तपचि काय ते जाण ॥१९८॥

येथ तप म्हणजे काय । ते स्वरूप दावू अवश्य । तिन्ही गुणीं भेदिले होय । ते मग बोलू ॥१९९॥

तर तप जे का सम्यक । तेही त्रिविध ऐक । कायिक वाचिक मानसिक । अगा सुमनसा ॥२००॥

या तिन्हीत धनुर्धारी । शारीर तप अवधारी । तर शंभू अथवा श्रीहरी । जो आवडता होय; ॥२०१॥

गुरु-देवादिकीं पूजा स्वच्छता वीर्यसंग्रह
अहिंसा ऋजुता अंगीं देहाचे तप बोलिले ॥१४॥

त्या प्रिय देवतालयांसी । यात्रादिक करावयासी । अष्टौप्रहर जैसा पायासी । भोवरा बांधिला ॥२०२॥

देवांगण सजविण्या । पूजोपचार पुरविण्या । शास्त्राज्ञेने ऐसे करण्या । शोभती हात ॥२०३॥

शिवलिंग की विष्णुमूर्तीवरि दिठी । पडताचि अंग लोटी । साष्टांग दंडवतासाठी । जणु पडली काठी ॥२०४॥

आणि शास्त्रोक्त आचरण नम्रता । या गुणीं जे श्रेष्ठ पार्था, । तयां ज्येष्ठांसी सेविता । ऐकनिष्ठ सेवक तो होय ॥२५०५॥

प्रवासें वा पीडेने शिणती । वा संकटे जया ग्रासिती । तयां तो सुखप्राप्ती । करुनी देईअ ॥२०६॥

सकळ तीर्थांमध्ये थोर । जे का माता-पितर । तयांचे सेवेसी शरीर । ओवाळुनी टाकी ॥२०७॥

आणि जो भेटताचि हरी शीण । संसारा ऐसा दारुण । त्या ज्ञानदानी सकरुण । भजे ऐशा गुरूसी ॥२०८॥

आणि स्वधर्माचे आगटीत । अभ्यासाची पुटे देत । देहाभिमानाचे जाळित । हिणकस ॥२०९॥

भूतमात्रात ब्रह्मासि नमावे । तत्पर परोपकारी असावे । स्त्रीविषयीं नियमन करावे । क्षणोक्षणी ॥२१०॥

केवळ जन्माचे प्रसंगें । स्त्रीदेह शिवणे अंगें । तेथूनि जन्मभरी सर्वांगें । सोवळे करी ॥२११॥

जीवमात्रांचे नावें । तृणही न तुडवावे । किंबहुना सोडावे । छेद-भेद ॥२१२॥

ऐशा वर्तनाचा देहीं । जेव्हा उत्कर्ष होई । तेव्हा भरास येई । शारीर तप जाण ॥२१३॥

पार्था, समस्त हे करणे । देहाचेचि प्राधान्याने । म्हणोनि यासि मी म्हणे । शरीर तप ॥२१४॥

ऐसे जे शारीर तप । तयाचे दाविले रूप । आता ऐक निष्पाप । वाङ्‌मय तप ॥२१५॥

हितार्थ बोलणे सत्य प्रेमाने न खुपेलसे
स्वाध्याय करणे नित्य वाणीचे तप बोलिले ॥१५॥

लोहाचे वजन, आकारमान । न घटविता सुवर्ण । केले असे जाण । परिसाने; ॥२१६॥

तैसे न दुखविता सहजही । सुक होई जवळच्याही । ऐसे साधुत्व पाही । वाणीत ज्या ॥२१७॥

पाणी मुख्यत्वें झाडा जाई । तृण पाटाकाठी जगे, पाही । तैसे एका बोलता होई । सर्वाही हितकारक ॥२१८॥

गंगा जोडे अमृताची माधुरी । प्राण्यां अमर करी । स्नानें पाप ताप वारी । गोडीही देई ॥२१९॥

तैसे अज्ञानही फिटे । आपुले अनादित्व भेटे । सोविता रुचि न विटे । अमृतीं जैसी ॥२२०॥

जर कोणी पुसावे । तर बोलणे ऐसे व्हावे । नातरी आवर्ताचे । वेद वा हरिनाम ॥२२१॥

ऋग्वेदादि तिन्ही । प्रतिष्ठापिती वाग्भुवनीं । केली जैसी वदनीं । ब्रह्मशाळा ॥२२२॥

अथवा एखादे नाव । ते शीव असो वा वैष्णव । वाचेत वसे ते वाग्भव- । तप जाणावे ॥२२३॥

आता तप जे मानसिक । तेही सांगू ऐक । म्हणे लोकनाथनायक । श्रीकृष्णराय ॥२२४॥

प्रसन्नवृत्ति सौम्यत्व आत्मचिंतन संयम
भावना राखणे शुद्ध मनाचे तप बोलिले ॥१६॥

तर सरोवर तरंगांनी । त्यागिले आकाश मेघांनी । अथवा जैसे सर्पांनी । चंदनउद्यान ॥२२५॥

कलांचे अधिकउण्याने चंद्र । वा चिंतेने त्यागिला नरेंद्र । अथवा क्षीरसमुद्र । मंदराचळें; ॥२२६॥

तैसे नाना विकल्पमेळ । सोडुनि जाता सकळ । मन राहे केवळ । स्वरूपें जे ॥२२७॥

तापाविण प्रकाश । जाडयाविण अन्नीं रस । की पोकळीविण आकाश । होय जैसे ॥२२८॥

मन देखे आत्मस्थळा । आणि तयें स्वभाव त्यजिला । जैसे न कापे हिवाळा । अंगचे हिवें ॥२२९॥

अचल कलंकहीन । शशिबिंब जैसे परिपूर्ण । तैसे चोख सुंदरपण । मनाचे जे ॥२३०॥

वैराग्याची काहिली बुझली । मनाची धापकाप जिरली । तेथ भूमिका जाहली । निखळ निजबोधाची ॥२३१॥

म्हणोनि पुसावया शास्त्रादिक । चालवावे जे मुख । ते वाचेचेही सूत्र एक । हातीं न धरी ॥२३२॥

ते स्वरूप लाभल्याने । मन मनपणही धरू न जाणे । जळ शिवता लवणें । होय जैसे ॥२३३॥

तेथ कैसे उठती ते भाव । जयांनी इंद्रियमार्गीं धाव । घेउनी गाठवे गाव । विषयांचे ते ॥२३४॥

म्हणोनि त्या मानसीं चोख । संकल्प-विकल्प न वसे देख । केस जैसा न एक । तळहातावरी ॥२३५॥

 काय बहु बोलू अर्जुना, । ऐसी ही दशा ये मना । तेव्हा मानसतप या अभिधाना । पात्र होय ॥२३६॥

परि ते असो, हे जाण । मानसतपाचे लक्षण । देव म्हणे संपूर्ण । सांगितले ॥२३७॥

म्हणोनि देह-वाचा-चित्तें । जे पावले त्रिविध तपाते । सामान्य तप तुजसि ते । एकविले गा ॥२३८॥

आता गुणत्रयसंगाठायी । हेचि त्रिविध होई । ऐक ध्यान देत तेही । प्रज्ञाबळें ॥२३९॥

तिहेरी तप ते सारे श्रद्धा उत्कट जोडुनी
समत्वें फळ सोडूनि घडले जान सात्त्विक ॥१७॥

तर हेचि फळ त्रिधा । दाविले तुज प्रबुद्धा, । तेचि ठेवुनि पूर्ण श्रद्धा । त्यागुनी फळ; ॥२४०॥

जेव्हा पूर्ण सत्त्वशुद्धीने । आचरावे आस्तिक्यबुद्धीने । तेव्हा सात्त्विक तप म्हणे । बुद्धिमंत तया ॥२४१॥

सत्कारादिक इच्छूनि केले जे दंभ राखुनी
ते चंचळ इथे जाण तप राजस अस्थिर ॥१८॥

नातरी तपस्थापनेलागी । द्वैवभाव मांडूनि जागीं । महत्तमतेचे अग्रभागी । बैसावया; ॥२४२॥

त्रिभुवनाचे सन्मानविभवें । अन्य ठायी न जावे । आसन पहिले लाभावे । भोजनाचे पंक्तीत; ॥२४३॥

विश्वें आपुलेचि स्तोत्र गावे । आपण तया पात्र व्हावे । विश्वें यात्रेसी यावे । आपुल्याचि ठायी ॥२४४॥

विविध पूजा लोकांचिया । दुज्या कोणा न लाभाव्या । भोग भोगावे प्रतिष्ठेचिया । पांघरुणाखाली; ॥२४५॥

देह विकाया ज्यापरी । गणिका शृंगार करी । अंग बोल त्यापरी । तपाने माखुनी; ॥२४६॥

धनमानीं  वाढवुनी आस । तयालागी करिती सायास । तेव्हा तेचि तप राजस । म्हणावे गा ॥२४७॥

पहुरणी किडा लागे ओटीसी । तर विताहि गाय दूध न दे जैसी । उभे चारिले शेतासी । पिकाया न पुरे ॥२४८॥

पुकारोनि तप तैसे । केले जे सायासें । ते फळीं जातसे । व्यर्थचि पुरते ॥२४९॥

ऐसे निष्फळ देखोनी । करिता, मध्येचि सोडुनी । नाही गा स्थिरता म्हणोनि । तपासी तया ॥२५०॥

एरवी तरि जो आकाश भरी । गजोंनि ब्रह्मांड चिरी । राहे का तो घडिभर तरी । अकाळींचा मेघ ? ॥२५१॥

तैसे राजस तप जे होई । ते फळीं वांझ जाई । परि आचरणींही नाही । निर्वाह तया ॥२५२॥

आता तेचि तप पुढतीही । तमोगुणाचे रीतीने पाही । परत्र, कीर्ती दोहींसीही । मुकवी ते ॥२५३॥

दुराग्रहोंचि जे होय अंतरात्म्यास पीडुनी
किंवा परघातार्थ जाण तामस ते तप ॥१९॥

केवळ मूर्खपणाचा वारा । जीवीं घेऊनि धनुर्धरा, । वैरीचि जे शरीरा । मानिती गा ॥२५४॥

पंचाग्नीच्या ज्वाला । लाविती शरीराला । इंधन करुनि तयाला । आगीत लोटिती ॥२५५॥

गुग्गुळ माथ्यावरी जाळिती । गळ पाठीत घालिती । अग्नीत अंग टाकिती । भिववित्या ॥२५६॥

थोपवुनी श्वासोच्छ्‌वास । करिती उगा उपवास । घेती धुराचे घास । उलटे टांगुनी;  ॥२५७॥

आकंठ हिमोदकीं । बैसोनि तटीं वा खडकीं । लचके मांसाचे जिवंत की । तोडिती तेथ; ॥२५८॥

ऐसी नानापरींनी ही काया । पीडिती गा धनंजया, । तप करिती नाशावया । इतरांसी ॥२५९॥

अंगभारें सुटला धोंडा । आपण फुटोनि होय तुकडा तुकडा । आड आलेल्यांचा रगडा । करी जैसा; ॥२६०॥

तैसे देह आटवुनिया । सुखें वसत्या प्राणियां । ईष्येंने जिंकावया । करिती जे गा; ॥२६१॥

किंबहुना ही विपरीत । घेउनी क्लेशाची रीत । तप जे निपजत । ते तामस होय ॥२६२॥

ऐसे सत्त्वादि गुणांअंगीं । तप जाहले तीन भागीं । तेही भले तुजलागी । केले व्यक्त ॥२६३॥

आता प्रसंगोपात । बोलता करू मूर्त । त्रिविधांगीं येथ । दानलक्षणांसी ॥३६४॥

येथ गुणयोगें भले । दानहि त्रिविध जाहले । तेचि ऐक पहिले । सात्त्विक ऐसे ॥२६५॥

देशीं काळीं तसे पात्रीं उपकार न इच्छिता
धर्मभावेंचि जे देणे जाण ते दान सात्त्विक ॥२०॥

तर स्वधर्माचरण करिता, पाहे । जे जे आपणा लाभावे । ते ते देत राहावे । सन्मानपूर्वक ॥२६६॥

लाभे उत्तम बीज एक । परि उणीव शेताची सुपीक । तैसाचि योग सात्त्विक- । दानाचा हा ॥२६७॥

अमोल रत्न हातीं येते । परि सुवर्णाची वाण पडते । दोन्ही मिळे तरि न भेटते । लेते अंग ॥२६८॥

परि सण सुहृद् संपत्ती । तिन्ही एके ठायी मिळती । तेव्हा भाग्य करी उन्नती । आपुल्या ठायी ॥२६९॥

तैसे हातुनि दान घडणे होय । तेव्हा लाभे सत्त्वगुणाचे साहाय्य । देश काळ पात्र द्रव्य । होय प्राप्त ॥२७०॥

आधी तर करुनि प्रयत्न । गाठावे कुरुक्षेत्र वा काशीस्थान । वा यांसी तोडीचा कवण । देश असो; ॥२७१॥

ऐशा या स्थळीं पावन । होता चंद्र-वा सूर्यग्रहण । वा करण्या दान प्रदान । आणिकही पुण्यकाळ ॥२७२॥

ऐशा पुण्यकाळीं त्या स्थळीं । पात्र-संपत्ती असावी भली । जैसी मूर्ति आहे धरिली । शुचित्वाची ॥२७३॥

सदाचाराचे मूळ ठिकान । वेदांचे वसतिस्थान । तेथ ज्याने केले वेदाध्ययन । तया आदरूनिया; ॥२७४॥

मग तयाठायी अर्पुनि वित्ता । लोपवावी स्वसत्ता । प्रियतमापुढे कांता । सर्वस्व अर्पी जैसे; ॥२७५॥

वा जयाचे घेतले काही । ते देउनि व्हावे उतराई । सेवक विडा देई । धन्यासी जैसा ॥२७६॥

तैसे निष्काम जीवें । भूमिआदिक अर्पावे । किंबहुना उठो न द्यावे । फलेच्छेसी ॥२७७॥

आणि दान जया द्यावे । तयासी ऐसे पाहावे । घेतले फेडिता न ये । अल्पहि जया ॥२७८॥

साद घालिता आकाशा । प्रतिसाद न ये जैसा । प्रतिबिंब दावीना आरसा । पाहाता तयामागे ॥२७९॥

पाण्याचे पृष्ठभागावरी । चेंडू आपटला जरी । उसळोनि मागुता वरी । न ये हाता ॥२८०॥

प्रेमें चारा घातला पोळासी । वा हुंगिले कृतघ्नाचे माथ्यासी । न दे प्रतिसादासी । उपकारा जैसा ॥२८१॥

दात्याने काही द्यावे । ते तयें फेडू न शकावे । दाता-ऋणिया भेद न राहे । तया अर्पिता ॥२८२॥

ऐशा सामुग्रीने आघव्या । निपजे दान जे धनंजया, । ते सर्वही दानीं या । सात्त्विक जाण ॥२८३॥

आणि तैसाचि स्थळ-काळ । तैसाचि पात्रमेळ । परि ते दानही निर्मळ । शास्त्रशुद्ध असावे ॥२८४॥

उपकार अपेक्षूनि अथवा फल वांछुनी
क्लेशपूर्वक जे देणे जाण ते दान राजस ॥२१॥

परि मनीं धरुनि दुभते । चारावे जैसे गाईते । की पेव करुनि आयते । पेरू जावे ॥२८५॥

वा दृष्टी ठेवुनि आहेरा । आमंत्रावा सोयरा । वान धाडावे ऐशा घरा । जी वाणवसा करी; ॥२८६॥

आधी व्याज गाठीसी बांधावे । मगचि कोणाचे काम करावे । द्रव्य घ्यावे मग औषध द्यावे । पीडितांसी ॥२८७॥

ऐसे जया जे दान देणे । तो तेणेंचि लाभल्या जीवनें । आपणा वाखाणी या भावनेने । द्यावे जे का ॥२८८॥

तर जाता वाटेने एके । घेतले फेडू न शके । ऐसा जर कोणी ठाके । द्विजोत्तम; ॥२८९॥

तर एका कवडीसाठीही । सर्व गोत्राचीच पाही । प्रायश्चित्ते मुठीत ठेवी । तयाचिया; ॥२९०॥

तेवीचि पारलौकिक । फळे वांछी अनेक । आणि देई तरी भूक । एकवेळचीही न भागे ॥२९१॥

ते अत्यल्प घेऊनि याचक सरे । को हा हानीचे शिणे झुरे । सर्वस्व जणु चोरें । नागवुनी नेले; ॥२९२॥

काय बहु सांगू हे किती ? । जे या वृत्तीने देती । ते दान गा त्रिजगतीं । राजस होय ॥२९३॥

करूनि भावना तुच्छ देशादिक न पाहता
अनादरेंचि जे देणे जाण ते दान तामस ॥२२॥

मग अधम वस्त्या, राने । तंबू वा गलिच्छ ठिकाणे । चव्हाटे, गुप्त स्थाने । नगरीची ती; ॥२९४॥

त्या त्या ठायी जमोनी । समय सांजवेळ की रजनी । तेव्हा उदार होणे धनीं । चोरीचिया ॥२९५॥

गारुडी जुगारी चेटक्या । भाट बाजारबसव्या । पात्रे जी मूर्तिमंत भुरळ तयां । भुलोनि जाय ॥२९६॥

रूपानृत्याची पुरवणी । तीचि पुढे डोळेभारणी । गीत भाटाचे श्रवणीं । तोचि कर्णजप ॥२९७॥

त्याहीवरी जेव्हा अंमळ । घेई गुग्गुळधूपपरिमळ । तेव्हा भ्रमाचा तो वेताळ । अवतरे तेथ ॥२९८॥

मग जगासि लुटुनी । आणिले पदार्थ गोळा करूनी । तेणे घालू लागे फुशारुनी । अन्नछत्र ॥२९९॥

ऐसे जे जे दणे । ते तामसदान मी म्हणे । आणि घडे दैवगुणें । आणिकही एक ॥३००॥

लाकडात किडा अक्षर कोरिल । वा टाळीत कावळा सापडेल । तैसे चुकूनिचि तामसा भेटेला । पर्वकाळ वा पुण्यस्थळ ॥३०१॥

देखोनि तया संपन्ना । कोणी ये मागण्या दाना । आणि हाही चढे माना । भांबावे जरी ॥३०२॥

तरि श्रद्धा न धरि जीवीं । तयापुढे माथाहि न लववी । स्वयें न करी न करवी । अर्घ्यादिक ॥३०३॥

आलेल्या न घाली बैसण्यासी । तेथ गंधाक्षतांची गोष्ट कायसी ? । अप्रतिष्ठा अतिथीची ऐसी । करी तामसी ॥३०४॥

बोळवावा ऋणाइत । तैसा चकवी तयाचा हात । अरेतुरेचा बहुत । प्रयोग तेथ ॥३०५॥

आणि जया जे देई, किरीटी, । तयाते मापी त्यापोटीं । मग अपशब्दें तया लोटी । वा अपमानें ॥३०६॥

हे बहु असो, यापरी । द्र्व्य वेचणे जे, अवधारी । तया नाव चराचरीं । तामस दान ॥३०७॥

ऐसी आपुलाल्या चिन्हीं । अलंकृत दाने तिन्ही । लाविली तुझिये अवधानीं । त्यजावया ॥३०८॥

परि मी जाणतसे । क्यचित् गा ऐसे । कल्पिशील मानसें । विचक्षणा; ॥३०९॥

तर भवबंधमोचक । केले कर्म सात्त्विक । तर आम्ही का घातक । अन्य बोलावी ? ॥३१०॥

पिशाच्या न करिता दूर । ठेव्यासी भेटणे दुष्कर । जैसे न साहता धूर । वात न लागे ॥३११॥

शुद्ध सत्त्वाआड । रज-तमाचे कवाड । ते भेदणे अवघड । कैसे म्हणावे गा ? ॥३१२॥

श्राद्धादि दानापावत । समस्तहि क्रियाजात । सांगितले व्याप्त । तीन गुणीं; ॥३१३॥

तेथ सांगायाचे न तिन्ही । हे भरवशाने मानी । सत्त्वगुण दावावया, दोन्ही । बोलिलो अन्य ॥३१४॥

दोहींमाजी तिजे असे । दोन्ही त्यजिताचि ते दिसे । दिवसरात्रत्यागें जैसे । संध्यारूप ॥३१५॥

तैसे रजतमविनाशें । तिजे जे उत्तम दिसे । ते सत्त्व, हे सहजसे । कळोनि ये ॥३१६॥

दावावया सत्त्वगुण तुज । निरूपिले तम-रज । ते सोडोनि सत्त्वगुणें काज । साधी आपुले ॥३१७॥

सत्त्वेंचि येणे एक । करी सकळ यज्ञादिक । पावसी मग स्वरूप चोख । आपुले करतळीं ॥३१८॥

सूर्य जेथ प्रकाश । काय न एक तेथ दिसे ? । सत्त्वगुणें केले तैसे । काय फळा न ये ? ॥३१९॥

ऐसी फलसूचक सर्वपरींनी पाही । ही सत्त्वगुणी रीत बरवी । त्या एकें मोक्षाठायी । एकरूप होता ये ॥३२०॥

आणिकही एक होय । तयाचे लाभता साहाय्य । तेव्हा होई शिरकाव । मोक्षाचेही गावीं ॥३२१॥

असे सुवर्ण चोख जरी । येता राजमुद्रेची अक्षरे त्वावरी । तेव्हाचि चाले व्यवहारीं । ज्यापरी गा ॥३२२॥

स्वच्छ सुगंधित शीतल । सुखप्रद होय जल । परि पवित्रत्व लाभेल । तीर्थांचेचि जवळिकेने; ॥३२३॥

नदी असो केवढीही थोर । परि गंगा करि अंगिकार । तेव्हांचि तिज सागर । भेटे अगा ॥३२४॥

तैसे सात्त्विक कर्म, किरीटी, । येता मोक्षाचिये भेटीसाठी । ज्यायोगें न ये आडकाठी । ते वेगळेचि आहे; ॥३२५॥

हा बोल ऐकताचि तेवी । उत्कंठा न समावे पार्थाचे जीवीं । म्हणे देवें कृपा करावी । सांगावे ते ॥३२६॥

तेथ कृपाळूंचा राणा कृष्ण । म्हणे ऐक तयाचे लक्षण । ज्यायोगें सात्त्विक गुण । मुक्तिरल मेळवी ॥३२७॥

ॐ तत्-सत् ह्यापरी ब्रह्म तिहेरी स्मरले असे
त्यातूनि निर्मिले पूर्वी वेद यज्ञ उपासक ॥२३॥

तर अनादि परब्रह्य । जगदादि विश्रामधाम । तयाचे एक नाम । त्रिधा असे ॥३२८॥

ते तर अनाम अजाति । परि ओळखावया अज्ञानरातीं । खूण करिती श्रुती । ते तयाचे नाव ॥३२९॥

उपजल्या बालका । नाव नसे देखा । ते ठेविल्या नावें एका । ओ देत उठे ॥३००॥

कष्टले संसारशीणें । जे सांगो येती ब्रह्मासि गार्‍हाणे । तयाते ओ दे नावें जेणे । तो संकेत हा ॥३३१॥

जीव-ब्रह्माचे फिटावे अबोले । अद्वैतत्वें ब्रह्म गमावे भेटले । कणवेने ऐसे मंत्र शोधिले । बाप वेदें ॥३३२॥

मग नामें जेणें एके । ब्रह्मासि आळविता कवतिकें । मागे असताही ठाके । पुढे उभे सन्मुख ॥३३३॥

परि वेदाचलशिखरीं । उपनिषदार्थनगरीं । बैसत ब्रह्माचे एकेहारीं । तयासीचि कळे ॥३३४॥

हे असो, प्रजापतीचे मनीं । सृष्टिकर्ती जी शक्ति वसे कोणी । ती ज्या एके आवर्तनीं । नामाचिया ॥३३५॥

उपक्रमापूर्वी सृष्टीचिया । अगा सुजाण धनंजया, । ब्रह्मदेवासि एकल्या । लागले पिसे ॥३३६॥

मज ईश्वरा न ओळखे । सृष्टीही करू न शके । तया समर्थ केले एकें । नामें जेणें ॥३३७॥

जयाचा अर्थ जीवीं चिंचिता । ॐ तत् सत् हे वर्णत्रयचि जपता । विश्वसृजनयोग्यता । आली तया ॥३३८॥

तेव्हा निर्मिले विद्वज्जन । तयां वेदांचे दिधले आज्ञापन । यज्ञाऐसे आचरण । उपजीविकेसी केले ॥३३९॥

मग न जाणे किती इतर । सृजिले लोक अपार । जाहली ब्रह्मदत्त वतने वर । तिन्ही भुवने ॥३४०॥

जेणें नाममंत्रें पाहे । ब्रह्मदेवहि श्रेष्ठत्व पावे । तयाचे स्वरूप ऐक म्हणे हे । श्रीकांत तो ॥३४१॥

तर राजा मंत्राचा सर्व । आदिमंत्र प्रणव । आणि दुजा तो तत्‌कार होय । तिजा सत्‌कार ॥३४२॥

ऐसे ॐ तत् सत् आकारें । ब्रह्मनाम हे तीन प्रकारें । हे फूल हुंगी सुंदर मोहविणारे । उपनिषद ते ॥३४३॥

याचेसह गा होउनी एक । जेव्हा चाले कर्म सात्त्विक । तेव्हा ते कैवल्यासी पाईक । घरचे करी ॥३४४॥

परि कापुराचे दागिने । आणुनी दिले दैवाने । तरि ते लेवू जाणणे । संकट बाप्पा ॥३४५॥

तैसे आरंभिले सत्कर्म । उच्चारिले ब्रह्मनाम । तरि न जाणे जर वर्म । विनियोगाचे ॥३४६॥

तर साधुसंत किती । कौतुकें घरा येती । तयां न आदरुनी अंतीं । पुण्यक्षय होई ॥३४७॥

वा ल्यावया पुनीत । जडाव सुवर्ण एकत्रित । करुनि, बांधिली गळ्यात । मोट जैसी; ॥३४८॥

तैसे मुखीं ब्रह्मनाम । हातीं ते सात्त्विक कर्म । परि विनियोगाविण ते काम । विफल होय ॥३४९॥

अगा अन्न आणि भूक । यांची असून जवळीक । जेवू न जाणे बालक । तर तया लंघनचि की ॥३५०॥

तेल वात आणि अग्नी । असताहि एके ठिकाणी । लाविण्याची हातोटी ना जाणी । तर प्रकाश नोहे ॥३५१॥

तैसे पर्वकाळीं कर्म करावे । तेथला मंत्रही आठवे । परि ते व्यर्थ आघवे । विनियोगाविण ॥३५२॥

म्हणोनि तीन अक्षरी । हे जे ब्रह्मनाम, धनुर्धारी, । विनियोग तयाचा ठेव अंतरीं । ऐकूनिया ॥३५३॥

म्हणूनि आधी ॐ कार उच्चारूनि उपासक
यज्ञ-दान-तपे उक्त निरंतर अनुष्ठिती ॥२४॥

या नामाची अक्षरे तिन्ही । कर्माचे आदि-मध्य-अंतस्थानीं । प्रयोजावी या तीन ठिकाणीं । ऐशापरी गा ॥३४५॥

याचि एके हातोटीसी । घेऊनिया गा देखसी । ब्रह्मविद आले भेटीसी । ब्रह्माचिया ॥३५५॥

ब्रह्मासवे व्हावया एक । न त्यागिती यज्ञादिक । जे सांगती ओळख । शास्त्रांसवे ॥३५६॥

तो आदि तर ॐ कार । ध्यानें करिती गोचर । मग आणिती उच्चार । वाचेसीही तो ॥३५७॥

तो ध्यानें होता प्रकट । प्रणवोच्चार स्पष्ट । धरिती मग वाट । कर्माची गा ॥३५८॥

अंधारीं जैसा अभंग दिवा । अरण्यीं समर्थ सांगाती हवा । तैसा कर्मारंभीं जाणावा । प्रणव तो ॥३५९॥

वेदोक्त देवतांचे उद्देशें । धर्मार्जित बहुत द्रव्यें ऐसे । द्विजद्वारा  अग्निवशें । यजिती ते ॥३६०॥

आहवनीयादि अग्नीत । ते त्यागरूप हवने तेथ । अगा, यजन करितात । विधिपूर्वक ॥३६१॥

किंबहुना नाना याग करिती । व्यवस्थित पार पाडिती । अहंकारादि उपाधि त्यजिती । आवडत्या ॥३६२॥

न्यायें लाभले पवित्र । आपुले भूमि आदि क्षेत्र । देख्नोनि स्थळ-काळ-पात्र । देती दान; ॥३६३॥

अथवा दिवसाआड भोजन । कृच्छ्र आणि चांद्रायण । करिती एक मास उपोषण । ऐसी देहशोषण तपे ॥३६४॥

ऐसी यज्ञ-दान-तपे । जी गाजती बंधनरूपें । तयांनीचि होय सोपे । मोक्षाचे तयां ॥३६५॥

जड भासे नाव तीरीं । परि जळीं तीचि तारी । बंधक कर्मातुनी खरोखरी । सुटावे नामें येणें ॥३६६॥

हे असो, ऐशा या । यज्ञदानादि क्रिया । ॐ कार येता साहाय्या । होत असती ॥३६७॥

त्या अल्पशाही फळीं । शिरू पाहती, न्याहाळी । प्रयोजिती त्या काळीं । तत् शब्द तो ॥३६८॥

तत्-कार-स्मरणें सर्व तोडूनि फलवासना
नाना यज्ञ तपे दाने करिती मोक्ष लक्षुनी ॥२५॥

जी सर्वाही जगा अतीत । जी एक सर्वही देखत । ती तत् शब्दें बोलत । पैल वस्तु ॥३६९॥

ती सर्वारंभींची ऐसे जाणिती । अगा तिच्या स्वरूपाचे ध्यान करिती । उच्चारेंही व्यक्त करिती । वाणीतुनी ॥३७०॥

म्हणती तत्‌रूप ब्रह्मा त्या । फळासह क्रिया या । अर्पण होवोत, भोगावया- । काहीचि नुरो ॥३७१॥

ऐसे तत्‌आत्मक ब्रह्म । तेथ ससर्पुनी कर्म । अंग झाडिती, न मम- । या बोलें ॥३७२॥

आता ॐ कारें आरंभिले । तत्‌कारें समर्पिले । या रीतीने ज्या आले । ब्रह्मत्व कर्मा; ॥३७३॥

ते कर्म ब्रह्मरूप जाहले खरे । परि तेवढयानेहि न सरे । कर्ता-कर्म भेद उरे । म्हणोनिया ॥३७४॥

मीठ अंगें जळीं विरे । परी क्षारता वेगळी उरे । तैसे कर्म गमे ब्रह्माकारें । ते द्वैत गा ॥३७५॥

आणि द्वैत जों जों घडे । तों तों संसारभय जोडे । देव आपुले तोंडें । आणि वेद बोलती ॥३७६॥

म्हणोनि ब्रह्य असे परत्वें । ते देखावे आत्मत्वें । या उद्देशें योजिला देवें । तत् शब्द ॥३७७॥

तर ॐ कार-तत्‌कारें केले । ब्रह्मरूप कर्म जे देहीं भले । जे प्रशस्त आदि बोलें । वाखाणिले; ॥३७८॥

त्या प्रशस्त कर्मीं गा । सत् शब्द ये विनियोगा । तोचि असे ऐकण्याजोगा । सांगे तुज ॥३७९॥

सत्‌कारस्मरणें लाभे सत्यता आणि साधुता
तशी सुंदरता कर्मीं सत्‌कारें बोलिली असे ॥२६॥

तर सत् शब्दें येणें । आटवुनी असत्‌चे नाणे । दाविले जाय निष्कलंकपणें । आत्मसत्तेचे रूप ॥३८०॥

जे सत्‌चि देशें काळें । होऊ न जाणेचि वेगळे । ते आपणचि ठायी आपुले । अखंडित; ॥३८१॥

हे दिसत जितुके आहे पाही । ते असत्  म्हणोनि ते नाही । ऐसे जाणता लाभ होई । जयाचे रूपाचा ॥३८२॥

तयासह प्रशस्त ते कर्म । जे जाहले सर्वात्मक ब्रह्म । ते देखावे करुनी सम । ऐक्यबोधें ॥३८३॥

तर ॐकार-तत्‌कारें । जे कर्म दाविले ब्रह्माकारें । ते टाकुनि व्हावे एकसरें । सन्मात्रचि ॥३८४॥

ऐसा हा अंतरंगस्थ । विनियोग शब्दाचा या सत् । म्हणती श्रीकृष्णनाथ । मी न म्हणे हो ॥३८५॥

अथवा मीचि जरि म्हणे । तरि श्रीरंगीं द्वैत हेचि उणे । म्हणोनि ते बोलणे । देवाचेचि ॥३८६॥

आता आणिकही परींनी । सत् शब्द घे जाणुनी । सात्त्विक कर्मावरि राहे करुनी । उपकार जो ॥३८७॥

तर सत्कर्मे चांगली । अधिकारपरत्वें चालली । परि जेव्हा उणावली । एखादे अंगे; ॥३८८॥

जैसे उणे एके अवयवें । शरीर थोपे आघवे । वा चाक गळता थंडावे । रथाची गती ॥३८९॥

तैसे एकेचि सत्त्वगुणाविण । सत्कर्मचि परि असत्‌पण । कर्म धरी जाण । ज्यावेळी गा ॥३९०॥

तेव्हा ॐ कार-तत्‌कारीं । साह्य केलेला चांगल्या परी । सत् शब्द कर्माचा करी । जीर्णोद्धार ॥३९१॥

निजसत्त्वसामर्थ्यानिशी । असत्‌पण कर्माचे नाशी । तया आणी सद्‌भावपथासी । सत् शब्द हा ॥३९२॥

दिव्यौषध जैसे रोग्या । वा साह्य भंगलेल्या । तैसा सत् शब्द न्यूनत्व पावल्या । कर्मासी जाण ॥३९३॥

अथवा काही प्रमादें ऐसे । कर्म आपुली मर्यादा सोडितसे । निषिद्ध वाटेसी लागतसे । चुकूनि कधी ॥३९४॥

चालत्याचाहि मार्ग खुंटे । पारख्याहि मिळे नाणे खोटे । अगा, व्यवहारीं न भेटे । काय काय ? ॥३९५॥

म्हणोनि कर्म वीरोत्तमा, । अविचारें सोडी सीमा । दुष्कर्माचिये नामा । येऊ पाहे जेव्हा; ॥३९६॥

तेव्हा गा सत् शब्द । अन्य दोहोंहुनि प्रबुद्ध । प्रयोजिता करी शुद्ध । कर्मा तया ॥३९७॥

घसट लोहा-परिसाची । भेट ओहोळा-गंगेची । वा वृष्टी अमृताची । जैसी मृता; ॥३९८॥

अगा सदोष कर्मा तैसा । सत्‌शब्दप्रयोग वीरेशा, । हे असो, गौरवचि ऐसा । नामाचा या ॥३९९॥

घेऊनि हे वर्म । जेव्हा चिंतिसी हे नाम । तेव्हा केवळ हेचि ब्रह्म । ऐसे जाणसी तू ॥४००॥

पाहे बा ॐ तत्सत् ऐसे । बोलणे तेथ नेतसे । जेथुनी हे प्रकाशे । दृश्यजात ॥४०१॥

ते तर निर्धर्म देख । शुद्ध परब्रह्म एक । तयाचे हे अंतर्यामदर्शक । नाम असे ॥४०२॥

परि आश्रय आकाशा । आकाशचि की जैसा । या नामाचा ब्रह्मीं तैसा । अभेद असे ॥४०३॥

उदयला आकाशीं । रवीचि रवीते प्रकाशी । हे नाम अभिव्यक्ती तैसी । ब्रह्माची करी ॥४०४॥

म्हणोनि त्रि-अक्षर नाम । नामचि नव्हे केवळ ब्रह्म । यालागी कर्म । जे जे करावे; ॥४०५॥

यज्ञ-दान-तपे किंवा कर्मे जी त्यास साधक
वागणे ह्यापरी त्यात सत्-कार-फळ बोलिले ॥२७॥

ते याग अथवा दान । तपादिक गहन । पूर्ण होवो वा न्यून- । राहोनि ठाको ॥४०६॥

लोहा-परिसाची कसोटी लाविली । तेथ नसे चोखहिणकस बोली । तैसी ब्रह्मीं कर्मे अर्पिली । ती ब्रह्मचि होती ॥४०७॥

उण्यापुर्‍याची परी । नुरेचि तेथ अवधारी । निवडता न येती सागरीं । जैशा नद्या ॥४०८॥

ऐसी पार्था तुजप्रती । ब्रह्मनामाची ही शक्ती सांगितली उपपत्ती । डोळसा गा, ॥४०९॥

आणि एकेक अक्षराचा त्या । वेगवेगळा विनियोग करावया । रीती बोलिलो भल्या । वीरा तुज ॥४१०॥

आता ऐसे हे सुमहिम । जे असे ब्रह्मनाम । जाणिले काय तयाचे वर्म । राया तुवा ? ॥४११॥

तर यावरीचि श्रद्धा । ठेविली असो सर्वदा । जे जन्मबंधा । उरो न देई ॥४१२॥

ज्या कर्मीं हा प्रयोग । अनुष्ठिती सविनियोग । तेथ अनुष्ठिला सर्वांग । वेदचि जाण ॥४१३॥

यज्ञ दाने तपे कर्मे अश्रद्धेने अनुष्ठिली
बोलिली सर्व ती मिथ्या दोन्ही लोकात निष्फळ ॥२८॥

वा हे मार्ग सोडावे ॥ श्रद्धेचे आधार मोडावे । आणि वाढवावे । दुराग्रहाचे बळा ॥४१४॥

मग अश्वमेध कोटी केले । रत्नें भरोनि पृथ्वीचे दान दिले । एके अंगुष्ठावरि तप आचरिले । सहस्त्र तपे ॥४१५॥

जलाशयाचे नावें । समुद्रा केले नवे । तरी होय आघवे । व्यर्थचि ते ॥४१६॥

खडकावरी वर्षात व्हावे । वा भस्मीं हवन करावे । की आलिंगन द्यावे । साउलीसी; ॥४१७॥

अथवा चापट जैसी । हाणिली गगनासी । यातायात व्यर्थ तैसी । गेलीचि ती ॥४१८॥

दगडगोटे घाण्यात गाळिले । तेथ तेल ना पेंड मिळे । तैसे दारिद्रय तेवढे ठेविलेले । अंगीं जैसे ॥४१९॥

गाठीशी बांधिली खापरी । येथ वा पैलतीरीं । मोल न येता मारी- । उपाशी गा ॥४२०॥

तैसे कर्मजातें येणें । नाही ऐहिकींचे भोगणे । मग परत्र तर कोणें । अपेक्षावे ? ॥४२१॥

म्हणोनि ब्रह्मनामश्रद्धा । सोडुनी केला जो धंदा । तो शीणचि नुसता, प्रबुद्धा, ॥ इहपरलोकीं ॥४२२॥

पापरूप हत्तींसी नाशते सिंह । त्रिविधतापतमासी सूर्य । श्रीवीरवर नरहरी यादवराय । श्रीकृष्ण बोलिले ॥४२३॥

बहु निजानंदीं तेथ । पार्थ हरपला अवचित । टिपुर चांदण्यात । चंद्र जैसा ॥४२४॥

अहो संग्राम हा वाणी । बाणांचे अग्रीं मापुनी । घेतसे तोलुनी । जीवितासह ॥४२५॥

कर्णकर्कश समयीं ऐसे । पहा आनंदराज्य हा भोगी कैसे । आज भाग्योदय नसे । आणिक कोणे ठायी ॥४२६॥

संजय म्हणे, कौरवराया, । गुणीं रिझावे रिपूचिया । हा तर गुरुहि आमुचिया । सुखाचा येथ ॥४२७॥

पार्थ जर न पुसता ही गोष्ट । तर देव का सोडिती गाठ ? । मग कैसी आम्हा हो भेट । परमार्थासी ? ॥४२८॥

होतो अज्ञानअंधारीं । तुडवित जन्ममरणमार्गा खरोखरी । तों आत्मप्रकाशमंदिरीं । आणिले याने ॥४२९॥

एवढा आम्हातुम्हावरी थोर । या अर्जुनाने केला उपकार । म्हणोनि हा व्याससहोदर । गुरुत्वें होय ॥४३०॥

मग संजय म्हणे चित्तीं । या धृतराष्ट्रनृपा ही अर्जुनस्तुती । खुपेल, तरी किती- । बोलत राहिलो ॥४३१॥

ऐसी ही बोली सोडिली । मग दुसरीचि गोष्ट आरंभिली । पार्थे जी पुसिली । श्रीकृष्णाते ॥४३२॥

संजयाचे जैसे करणे । तैसे मीही करीन बोलणे । ऐकावे, ज्ञानदेव म्हणे । निवृत्तीचा ॥४३३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP