अर्जुन म्हणाला:
ब्रह्म ते बोलिले काय काय अध्यात्म कर्म ते
अधिभूत कसे सांग अधिदैवहि ते तसे ॥१॥
मग म्हणे अर्जुन । अहो, द्यावे जी ध्यान । देवा, मी पुसेन । ते निरूपावे ॥१॥
सांगा कवण ते ब्रह्र । कशासि नाव कर्म । अथवा अध्यात्म । म्हणजे काय? । ॥२॥
अधिभूत ते कैसे । अधिदैव कवण असे । हे मज समजेलसे । उलगडुनी सांगा, जी ॥३॥
अधियज्ञ कसा कोण ह्या देहीं बोलिला असे
प्रयाणींहि कसे योगी निग्रही तुज जानती ॥२॥
देवा, अधियज्ञ काय आहे । या देहीं तो कोण आहे । हे अनुमानें पाहताहे । परि न ये ध्यानीं ॥४॥
अंतःकरण स्वाधीन केले ज्यांनी । ते तुज न जाणती प्रयाणीं । हे कैसे शारंगपाणी? । ऐकवा मज ॥५॥
चिंतामणिरत्न असे ज्या गृहीं । तेथ भाग्यवंत बरळे झोपेतही । तरी ते शब्दही । व्यर्थ नच जाती ॥६॥
ऐसे बोले अर्जुन । तोंचि म्हणती श्रीकृष्ण । पुससी ते सांगेन । ऐक नीट ॥७॥
अर्जुन कामधेनूचे वासरू । वरी मांडव असे कल्पतरू । नवल नव्हे, इच्छा लागे करू । मनोरथसिद्धीची ॥८॥
श्रीकृष्ण क्रोधें जयां मारिती । तेही परब्रह्मरूपा पावती । मग जया उपदेशिती । तो का न पावे? ॥९॥
कृष्णाचे व्हावे आपण । कृष्ण होय अपुले अंतःकरण । मग संकल्पाचे अंगण । राखिती महासिद्धी ॥१०॥
परि ऐसे जे प्रेम । ते अर्जुनाचेचि निःसीम । म्हणोनि तयाचे काम । सदा सफल ॥११॥
याकारणें अनंतें । मनोगत तयाचे पुरते -। जाणुनि, ताट आयते । वाढुनी ठेविले ॥१२॥
तान्हुले स्तनपानावरि जगे । तयाची भूक मातेसीचि लागे । ते शब्दांनी काय सांगे । दूध दे आई? ॥१३॥
म्हणोनि कृपाळू गुरूचे ठायी । हे नवल नसे पाही । ऐकावे आता काही । जे देव बोलिले ॥१४॥
श्रीभगवान् म्हणाले:
ब्रह्म अक्षर ते थोर अध्यात्म निजभाव जो
भूतसृष्टि घडे सारी तो जो व्यापार कर्म ते ॥३॥
मग म्हणे सर्वेश्वर, पाही - । जे या फुटक्या देहीं- । कोंदले असताही । न गळे कोणे काळीं ॥१५॥
सूक्ष्मपण तयाचे पहावे । परि शून्यचि नव्हे स्वभावे । वरि गगनाचे पल्लवें । गाळुनी घेतले ॥१६॥
ऐसे सूक्ष्म परि विरळ सगळे । या प्रपंचाचे झोळीत हालवले । तरीही कधी न गळे । ते परब्रह्म ॥१७॥
आणि साकार जरि होत । तरि जे न जन्मत । आकार जरि लोपत । तरि न विनाशे ॥१८॥
आपुल्या सहजस्थितीत । जे ब्रह्मतत्त्व नित । अर्जुना, त्यासचि म्हणत । अध्यात्म गा ॥१९॥
नग निरभ्र गगनीं । न जाणे कैसी कोठुनी । घनपटले येती दाटुनी । नाना रंगीं; ॥२०॥
तैसे विशुद्ध आणि अमूर्त । तेथ उत्पन्न होत । प्रकृतिभेदांनी युक्त । आकार ब्रह्मांडाचे ॥२१॥
निर्विकल्प ब्रह्माचे मालावर । फुटे आदिसंकल्पाचा अंकुर । तो लहडुन्ति येई सत्वर । ब्रह्मगोलकांनी ॥२२॥
दृष्टि टाकिता त्या एकेकात । ब्रह्मबीजेचि भरली दिसत । तयातुनी होत जात । अगणित जीव ॥२३॥
मग या ब्रह्मांडात । असंख्य अंशरूप जीव प्रसवीत । अनेकपरीं बहरत । सृष्टी वाढे ॥२४॥
परि दुजे न काही तेथ । परब्रह्मचि भरुनि राहत । अनेकत्वाचा येत । पूरचि जैसा ॥२५॥
सम-विषम समजेना कैचे । फुकाचि चराचर रचे । प्रसविल्या योनींचे । लक्ष दिसती ॥२६॥
अनेक जीवांचा विस्तार । अमर्याद ऐसा थोर । कोण प्रसवी अपरंपार । दिसे शून्य ब्रह्म ॥२७॥
मुळातचि कर्ता न दिसे । शेवटी कारणहि काही नसे । मध्ये कार्यचि आपोआप ऐसे । वाढू लागे ॥२८॥
ऐसा कर्त्याविण गोचर । अव्यक्तीं हा आकार । निपजे जो व्यवहार । तया नाव कर्म ॥२९॥
अधिभूत विनाशी जे जीवत्व अधिदैवत
अधियज्ञ असे मीचि ह्या देहीं यज्ञपूत जो ॥४॥
आता अधिभूत जया म्हणत । तेही सांगतो संक्षिप्त । जे दिसत आणि हरपत । अभ्र जैसे ॥३०॥
तैसे असतेपण वरवरचेच । न होणे हेचि साच । रूपा आणित जया महाभूते पाच । मिळोनिया; ॥३१॥
भूतांचे आश्रये वसे । भूतसंयोगेंचि दिसे । भूतवियोगेंचि विनाशे । जो नामरूपादिक देह; ॥३२॥
त्या देहा अधिभूत म्हणावे । मग जीवा अधिदैव जाणावे । जयाने भोग भोगावे । प्रकृतीचे ॥३३॥
जो चेतनेचा अक्ष । इंद्रियदेशींचा अध्यक्ष । देहांतकाळीं वृक्ष । आसरा संकल्पपक्ष्यांसी; ॥३४॥
जो परमात्माचि परि दुसरा । जो घेत अहंकारानिद्रा । म्हणोनि स्वप्नींचिये व्यप्नींचिये व्यवहारें, पुरा - । संतोषे, शिणे; ॥३५॥
जीव या नावें । जया ओळखावे स्वभावें । ते अधिदैव जाणावे । या पंचायतनींचे ॥३६॥
आता या शरीरग्रामीं । जो शारीरभाषा उपशमी । तो अधिभूत येथ गा मी । पंडुकुमरा ॥३७॥
एरवी अधिदैव, अधिभूत । तेही मीचि साच समस्त । चोख सोने हीणा मिळत । तर ते न हो का हीण? ॥३८॥
तरि सोनेपण न मळत । ते डाकरूप न होत । परि जोवरि असे त्यासंगत । हिणकसचि म्हणती ॥३९॥
तैसे अधिभूतादि आघवे । अज्ञानाचे पल्लवें । झाकले तोंवरि मानावे । वेगळे ऐसे ॥४०॥
तेचि अज्ञानपटल फिटे । भेदभावाचे अंतर तुटे । मग म्हणू, एक होऊनि आटे - । तर काय दोन होती? ॥४१॥
केसांची गुंडाळी केली । वरि स्फटिकशिळा ठेविली । वरवर पाहता, भेदली - । ऐसे गमे ॥४२॥
मागाहुनि केस दुरी सारिले । भेदलेपण दिसेना जाहले । मग काय डाग देउनि सांधले । त्या शिळेसी? ॥४३॥
नव्हे, ती अखंडचि आयती । परि केसांसंगे भिन्न गमे ती । ते दुरी सरिता मागुती । जैशीची तैशी ॥४४॥
तैसाचि अहंभाव जाय । तर ऐक्य आधीचि होय । हा जेथ ये प्रत्यय - । तो अधियज्ञ मी ॥४५॥
अगा, आम्ही तुज येथ । सकळ यज्ञ कर्मातुनि उपजत । हे सांगितले काही मनात । हेतू धरुनी; ॥४६॥
जो हा सकळ जीवांचा विसावा । ब्रह्मसुखाचा ठेवा । परि उघड करुनि पांडवा, । दावितसे तुज ॥४७॥
आधी वैराग्यइंधन परिपूर्ण करित । इंद्रियाग्नी ठेवित प्रदीप्त । विषयद्रव्यांच्या आहुती त्यात; । देऊनिया ॥४८॥
वज्रासन जणु भूमी बरवी । मूळबंधासन करावे त्य ठायी । वेदी रचावी मांडवीं । शरीराचिया ॥४९॥
तेथ संयमाग्नीचे कुंडात । विपुल इंद्रियद्रव्यांसहित । उदंड योगमंत्रघोषात । हवन करावे ॥५०॥
मग मन, प्राण, संयम, जेथ । हवनद्रव्यसंपत्ती होत । तो ज्ञानाग्नी धूम्ररहित । संतोषवावा ॥५१॥
ऐसे सकळ ज्ञानीं समर्पित । ते ज्ञान ज्ञेयीं हरपत । मग ज्ञेयचि स्वस्वरूपात । केवळ उरे ॥५२॥
त्याचेचि नाव अधियज्ञ । ऐने बोलता कृष्ण सर्वज्ञ । प्रज्ञांवंत अर्जुना सुज्ञ । तया पावले ते ॥५३॥
हे जाणोनि म्हटले देवें, । पार्था, परिसत आहेसी बरवे । या कृष्णाचे बोलासवे । अर्जुन सुखी जाहला ॥५४॥
बालकाचे तृप्ततेने व्हावे तृप्त । शिष्याचे कृतकृत्यतेने असावे कृतार्थ । हे सद्गुरुचि एक जाणत । आणि जन्मदात्री ॥५५॥
म्हणोनि अष्टसात्त्विकभावांची गर्दी । कृष्णाअंगीं अर्जुनाआधी । न समावे, परि बुद्धी - । सावरुनी देव; ॥५६॥
मग पिकल्या सुखाचा परिमळ । की अमृतलाट शीतल । तैसा मृदु आणि सरलं । बोल बोलिले ॥५७॥
म्हणे, श्रोत्यांचिया राया, । ऐक बापा धनंयजा, । ज्ञानें जाळुनि सरता माया । तेथ जाळिते तेहि जळे ॥५८॥
अंतकाळींही माझेचि चित्तीं स्मरण राखुनी
देह सोडूनि गेला तो मिळे मज न संशय ॥५॥
अगा, आधीचि सांगितले । अधियज्ञ जया म्हटले । त्या मज जयांनी जाणिले । अंताआधी आणि अंती; ॥५९॥
ते देह मिथ्या मानुनी - । राहती आपणचि ब्रह्म होउनी । जैसे घर अवकाशें भरुनी । अवकाशींचि असे ॥६०॥
अनुभवाचिया माजघरीं । ज अया निश्चयाची ओवरी । म्हणोनि बाह्मविषयांची अंतरीं । वार्ताचि नसे ॥६१॥
ऐसे अंतर्बाह्य ऐक्य भरले । आणि मद्रूप होऊनि राहिले । बाहेरी पंचमहाभूतांची खवले । नकळताचि पडली ॥६२॥
उभ्या न जाणवे उभेपण । मग पडणे काय कठीण? । प्रतीतीपोटींचे म्हणून । पाणी न हाले ॥६३॥
प्रतीतिमूर्त ऐक्यरसें ओतली । नित्यतेचे ह्रदयीं घातली । पूर्णानंदसमुद्रीं धुतली । कामादिकें न मळे ॥६४॥
अथांग जळीं घट बुडला । आतबाहेरी उदकें भरला । मागुनि दैवगत्या जरि फुटला । तरि उदक काय फुटे? ॥६५॥
नातरि सर्पें कात टाकिली । वा उकाडयाने वस्त्रे फेडिली । तर काय मोडतोड झाली । अवयवांमाजी? ॥६६॥
तैसा भंगे वरवरचा आकार । एरवी ब्रह्म भरूनि सर्वत्र । ते ब्रह्मचि बुद्धी होय तर - । कासाविशी कासया? ॥६७॥
म्हणोनि अंतकाळात । माझे स्मरण करीत - । जे देह ठेवितात । ते मीचि होती ॥६८॥
एरवी तर साधारण । उरीं आदळता मरण । अंतःकरणीं जयाचे स्मरण । तेचि तो होई ॥६९॥
जैसा कोणी एक भयभीत । पवनगतीने पळत । दोन्ही पाउली अवचित । आडामाजी पडला ॥७०॥
तया पडन्याआधी काही । चुकवावया दुसरे नाही । म्हणोनि त्या ठायी । पडावेचि लागे; ॥७१॥
तैसे मृत्यूचे वेळे एके । जे जीवासमोरी ठाके । ते होणे मग न चुके । कोणेही रीती ॥७२॥
आणि जागा जोवरि असे । तोवरि ज्याचा ध्यास घेतसे । डोळा लागता दिसे । तेचि स्वप्न ॥७३॥
जो जो आठवुनी भाव शेवटी देह सोडितो
मिळे त्या त्याचि भावास सदा त्यातचि रंगला ॥६॥
तैसे जिवंतपणीं । जे जीवीं उरे आवडोनी । तेचि वारंवार येई मनीं । मरणसमयीं ॥७४॥
आणि मरताना जया जे आठवे । तो तीचि गती पावे
म्हणूनि सगळा काळ मज आठव झुंज तू
मन बुद्धि समर्पूनि मज निःशंक पावसी ॥७॥
म्हणोनि सदा स्मरावे । मजचि तुवा ॥७५॥
डोळ्यांनी जे देखावे । कानांनी जे ऐकावे । मनीं जे चिंतावे । बोलावे वाचेने; ॥७६॥
आतबाहेरी आघवे । तुवा मीचि होऊनि करावे । मग सर्वकाळीं स्वभावे । मीचि आहे ॥७७॥
अगा ऐसे होता । न मरसी देह जाता । मग संग्राम करिता । भय काय तुज? ॥७८॥
तू मन बुद्धि साच ऐसी । जर माझिया स्वरूपीं अर्पिसी । तर मजचि गा पावसी । सांगे प्रतिज्ञापूर्वक ॥७९॥
हेचि होई कैसे । ऐसे जर मनीं वसे । तर आधी पहावे अभ्यासें - । न हो तर कोपावे ॥८०॥
अभ्यासीं चित्त जोडूनि योगी अन्य न लक्षुनी
पुरुषास महा दिव्य पावे संतत चिंतुनी ॥८॥
अभ्यासाची ऐसी । सांगड घालावी चित्तासी । पंगूही लंघे गिरीसी । यत्नबलेंचि; ॥८१॥
तैसे सदभ्यासें निरंतर । चित्तीं परमपुरुषाचे ध्यान जर । तर मग कोण हे शरीर ? । राहो अथवा जावो ॥८२॥
जे पावे नाना गतींसी । ते चित्त वरील आत्म्यासी । तर कोण आठवे देहासी । गेला की आहे? ॥८३॥
धोधार ओघासंगे । जळ मिळे समुद्रा वेगें । तेथ काय घडे मागे । म्हणोनि का पाहण्या ये ? ॥८४॥
ना, ते समुद्रचि होऊनि राहिले । तैसे चित्त आत्म्यासि मिळाले । जेथ जन्म-मरण सरले । परमानंदचि तेथ ॥८५॥
सर्वज्ञ कर्ता गुरु पुराण
सूक्ष्माहुनी सूक्ष्म अचिंत्यरूप
गिळुनि अंधार उजेडला जो
तो चिंतुनीया प्रभु सूर्यवर्ण ॥९॥
जयाचे आकाराविण असणे । जया जन्मणे ना मरणे । जे सर्वत्र सर्वपणे । देखत असे ॥८६॥
जे गगनाहूनि जुने । जे परमाणुहूनि साने । जयाचे सान्निध्याने । विश्व चाले; ॥८७॥
जे सर्वां या प्रसवीत । विश्व सर्व जेणे जगत । तर्क जया भीत । जे कल्पनेपार; ॥८८॥
पहा, वाळवी न विस्तव चरे । तेजीं तिमिर न शिरे । जे दिवसाही अंधारे । चर्मचक्षूसी ॥८९॥
धवल सूर्यकिरणांच्या राशी । जे नित्य प्रकाश ज्ञानियांसी । अस्तमानाचे जयासी । नाव नाही ॥९०॥
प्रयाणकाळीं स्थिर चित्त राखे
प्रेमें तसा योगबळें कसूनि
भ्रूसंगमीं प्राण जडूनि ठेवी
तेव्हा मिळे त्या पुरुषास दिव्य ॥१०॥
प्रयाणवेळ जवळी येते । तेव्हा जो स्थिरावल्या चित्तें । त्या अव्यंग ब्रह्माते । जाणोनि स्मरे; ॥९१॥
बाहेरी पद्मासन घालुनी । उत्तराभिमुख बैसुनी । जीवीं सुख साठवुनी । कर्मयोगाचे; ॥९२॥
आत एकाग्रचित्ताने । स्वरूपप्राप्तीचे प्रेमाने । आपुल्याचिठायीं त्वरेने । ब्रह्मासी मिळावया; ॥९३॥
आकळल्या योगें । सुषुम्नेचे मध्यमार्गे । अग्निस्थानातुनी निघे । ब्रह्मरंध्राकडे; ॥९४॥
अचेत चित्ताचे संगत । वरवरचे मैत्र दिसत । जेथ प्राण संचरत । मूर्ध्निआकाशीं; ॥९५॥
मनाचे स्थैर्यं बांधिला । भक्तिभावें भरला । योगबळें आकारला । सज्ज होउनी ॥९६॥
जो जड-अजडाते विरवीत । भ्रूलतेमाजी संचरत । जैसा घंटानाद लय पावत । घंटेतचि; ॥९७॥
घटाखाली झाकला दिवा । नकळे काय जाहला केधवा । या रीतीने जो पांडवा । देह ठेवी; ॥९८॥
तो केवळ परब्रह्म । जया परमपुरुष ऐसे नाम । जे माझे निजधाम । ते तो होऊनि राहे ॥९९॥
जे घोकिती अक्षर वेदवेत्ते
विरक्त यत्नें मिळती जयास
जे ब्रह्मचर्यें पद इच्छिताती
ते सांगतो मी तुज तत्त्वसार ॥११॥
जेथ सकळ ज्ञानांची समाप्ती । ऐशा ज्ञानाची जे खाण असती । ते ज्ञानी बुद्धिमान म्हणती । अक्षर जया; ॥१००॥
झंझावातेंही न मोडेल । ऐसे गगनचि केवळ । तेथ कैसे उरेल । मेघपटल? ॥१०१॥
ज्ञाना जे विषय जाहले । ते ज्ञानेंचि मापले गेले । मग ज्ञानचि जेथ लय पावले । तया म्हटले अक्षर सहजे ॥१०२॥
म्हणोनि वेदविद्यावंत । अक्षर जया म्हणत । ते मायेपार वसत । परमात्मरूप; ॥१०३॥
विषयांचे विष लवंडुनी । इंद्रियांचे दमन करुनी । झाडातळीं आहेत बैसुनी । हेहाचिया; ॥१०४॥
ते यापरी विरक्त । परब्रह्माची नित वाट पाहत । निष्कामासी आवडत । सर्वदा जो ॥१०५॥
जयाचे प्रेमापुढे होय । ब्रह्मचर्यादि साकडी नगण्य । करिती ते इंद्रियनिग्रह । निष्ठुर होउनी ॥१०६॥
अगा, ऐसे जे पद । दुर्लभ आणि अगाध । जयाचे याचि थडीसी वेद । डुंबत राहती; ॥१०७॥
त्या पदा ते पावती । जे यापरी देह ठेविती । म्हणोनि पार्था, हीचि स्थिती । एकवेळ सांगतसे ॥१०८॥
तेथ अर्जुन म्हणे स्वामी, । हेचि पुसणार होतो मी । तों सहजी कृपा केली तुम्ही । तेव्हा बोलावे जी, ॥१०९॥
परि बोलावे सोपे करून । तेथ म्हणे त्रिभुवनदीप कृष्ण । जाणुनी तुज सांगेन । संक्षेपाने ॥११०॥
मन हे हिंडे द्वाड । स्वाभाविक ती सवय मोड । ते ह्रदयाचे डोहीं गाढ । बुडेल ऐसे करी ॥१११॥
लावूनि सगळी द्वारे कोंडूनि मन अंतरीं
मस्तकीं प्राण राखूनि चढला धारणेवरी ॥१२॥
परि हे घडेल तरचि । जर अखंडित संयमेंचि । सर्वेंद्रिया कवाडे निग्रहाची । लाविली सतत ॥११२॥
मग सहजी मन कोंडित । ह्रदयीं राही निवांत । जैसे हातपाय मोडता न सोडित । घर कोणी ॥११३॥
तैसे चित्त राहता, पांडवा, । प्राणायामें ॐ कार ध्यावा । सुषुम्नेंमार्गें प्रान आणावा । मूर्ध्निआकाशीं ॥११४॥
तेथ आकाशीं मिळे न मिळे । तैसाचि धरावा धारणाबळें । जेव्हा अर्धमात्रेत मावळे - । अकार उकार मकार ॥११५॥
तो प्राणवायू तोंवर । मूर्ध्निआकाशीं करावा स्थिर । मग मात्रात्रयऐक्यीं ॐ कार । तैसा ब्रह्मीं विलसे ॥११६॥
मुखें ॐ ब्रह्म उच्चारी अंतरीं मज आठवी
ह्यापरी देह ठेवूनि जाय थोर गतीस तो ॥१३॥
तैसे ॐ हे सरे स्मरण । आणि तेथचि लय पावे प्राण । मग ॐ कारापार राहे उरून । पूर्णब्रह्म ॥११७॥
म्हणोनि प्रणव एक नाम । हे एकाक्षर ब्रह्म । जे माझे स्वरूप परम । स्मरत असता; ॥११८॥
यापरी जे त्यजिती देहाते । निश्चयें पावती मज ते । जयां या पावण्यापरते । आणिक पावणे नाही ॥११९॥
अगा अर्जुना यासमयीं । तुझें मनीं जरि ऐसे येई । हे स्मरण मग कैसे होई । अंतकाळी? ॥१२०॥
इंद्रिये संकटीं पडता । जीविताचे सुख बुडता । आतबाहेरी उघड दिसता । मृत्युचिन्हे; ॥१२१॥
त्यावेळी मग इंद्रियनिग्रह करुनी । योगसाधनेसि बैसावे कोणी? । तेथ कोण्या अंतःकरणीं । प्रणव स्मरावा? ॥१२२॥
ऐसा संशय न मनीं धरावा । जो नित्य करी माझी सेवा । तयाचे अंतसमयीं पांडवा, । मी सेवक होई ॥१२३॥
अनन्यचित्त जो नित्य स्मरे मज निरंतर
सदा मिसळला योगी तो सुखें मज पावतो ॥१४॥
पावले मोक्षसिद्धीस महात्मे मज भेटुनी
दुःखाचे घर तो जन्म न घेतीचि अशाश्वत ॥१५॥
जे विषयां तिलांजली देउनी । प्रवृत्तिसि बेडी घालुनी । ह्रदयीं मज साठवुनी । सुख भोगिती ॥१२४॥
परि भोगिताहि न समाधान । नच आठवे भूकतहान । तेथ बापडे नेत्र आणि कोण । यांचा काय पाड? ॥१२५॥
निरंतर एकवटले । जे अंतःकरणें मज जडले । मजस्वरूपीं तल्लीन जाहले । मज उपासिती ॥१२६॥
समीप येई देहावसान । तेव्हाचि होईल माझे स्मरण । मगचि मी जर पावेन । तर उपासना कासवा? ॥१२७॥
कुणी बापडा संकटीं पडल्याने । काकुळतीने धावा धावा म्हणे । तयाचे दुःखसमयीं धावणे । काय न होय मज? ॥१२८॥
जर तीचि दशा भक्तासी । तर भक्तीचा सोस कशासी? । म्हणोनि या संशयासी । न मानावे ॥१२९॥
तयांनी ज्यावेळी मज स्मरावे । त्यावेळीं स्मरताचि मी पावावे । भक्तीचे ओझे नच साहवे । माझिया जीवा ॥१३०॥
आपुले ऋणीपण जाणत । त्या ऋणातुनि मुक्त होत । भक्ताची सेवा मी करीत । अंतकाळीं ॥१३१॥
देहांतींचा व्याकुळ वारा । न लागो माझ्या सुकुमारा । म्हणोनि आत्मबोधाचा पिंजरा । करी तयास्तव ॥१३२॥
वरि माझे स्मरणाची विशाल । सावली धरी शीतल । आत्म्याचे नित्यतेची दृढमूल । बुद्धी तया देई ॥१३३॥
म्हणोनि देहांतींचे साकडे । माझिय़ा भक्तां कधी न पडे । आपुले म्हटल्या आपुल्याकडे । मी सुखेंचि आणी ॥१३४॥
देहाची गवसणी काढुनी । मिथ्या अहंकाराची धूळ झाडुनी । शुद्ध वासना निवहुनी । आपणात मेळवी ॥१३५॥
आणि भक्तां तर देही, । विशेष जिव्हाळा नाही । म्हणोनि देह त्यागिताही । वियोग नच वाटे ॥१३६॥
नातरि देहांतींचि मी यावे । मग आपणाकडे न्यावे । हे न लागे तयांस्तव करावे । जे आधीचि मज मिळाले ॥१३७॥
या शरीराचे जळीं । भक्त जणु असती साउली । चांदणे जरि पृथ्वीतळीं । ते चंद्रातचि असे ॥१३८॥
ऐसे जे मद्रूप होत । तयां सुलभ मी सतत । म्हणोनि देहान्ती ते निश्चित । मीचि होती ॥१३९॥
शरीर जे क्लेशतरूंची वाडी । तापत्रयाग्नीची शेगडी । की उतरुनि टाकिलि उंडी । मृत्युकावळ्यासी ॥१४०॥
शरीर जे दैन्या प्रसविते । जे महाभया वाढविते । जे सकळ दुःखाचे पुरते । भांडवल; ॥१४१॥
जे दुर्मतीचे मूळ । जे कुकर्माचे फळ । जे भ्रांतीचे केवळ । स्वरूपचि; ॥१४२॥
जे मूळ संसाराचे । जे उद्यान विकारांचे । जे ताट सकळ रोगांचे । वाढिले असे ॥१४३॥
जे उष्टी खिचडी काळाची । जे मूर्तिमंत आशाचि । जे वहिवाट जन्ममरणाची । स्वाभाविक; ॥१४४॥
जे भ्रमाचे भरीव । जे विकल्पाचे ओतीव । किंबहुना पेव । विंचवांचे ॥१४५॥
जि व्याघ्राचे क्षेत्र । जे वारांगनेचे मैत्र । जे विषयविज्ञानाचे यंत्र । सुपूजित ॥१४६॥
जे कळवळा लावेचा । जे घोट थंड विषाचा । जे विश्वास सावचोराचा । मिळविलेला; ॥१४७॥
जे कुष्ठरोग्याचे आलिंगन । जे काळसर्पाचे मऊपण । जे पारध्याचे गायन । स्वाभाविक ॥१४८॥
जे वैर्याकडुनी पाहुणेर । जे दुर्जनाकडुनी आदर । हे असो, जे सागर । अनर्थाचा ॥१४९॥
जे स्वप्नीं देखिले स्वप्न । जे मृगजळें बहरले वन । जे धूम्रकणांचे गगन । घडले असे; ॥१५०॥
ऐसे जे हे शरीर । ते नच पावती पुन्हा नर । जे होऊनि राहिले अपार । स्वरूप माझे ॥१५१॥
ब्रह्यादि लोक ते सारे माघारे घालिती पुन्हा
माझी भेट घडे तेव्हा जन्मणे मग खुंटले ॥१६॥
ब्रह्मदेव जरी थोर । न चुके जन्ममरणाची येरझार । जैसे निवर्तल्यावर । पोट न दुखे ॥१५२॥
अथवा जागे जाहल्यावरी । बुडती स्वप्नींचे महापुरीं । तैसे मज पावती ते संसारीं । लिप्त न होती ॥१५३॥
जे जगदाकाराचे शिर । जे चिरस्थायीतुनि श्रेष्ठतर । जे त्रैलोक्यपर्वताचे शिखर । ब्रह्मभुवन ॥१५४॥
ब्रह्मलोकींचा प्रहर न लोटे । तों एका इंद्राचे आयुष्य खुंटे । चौदा इंद्रांची पंगत उठे । एका दिवशी ॥१५५॥
होतसे ब्रह्मदेवाचा सहस्त्रयुग तों दिन
तेवढीचि तशी रात्र कालोपासक जाणती ॥१७॥
युगांच्या सहस्त्र चौकडया जात । तेव्हा ब्रहम्याचा पूर्ण दिवस होत । तैशा सहस्त्र चौकडया भरत । तेव्हा रात्र पूर्ण होई ॥१५६॥
इतुका दिन इतुकी रात । जितेपणीं जे पाहत । ते स्वर्गींचे होत । चिरंजीव ॥१५७॥
अन्य सुरगणांचे नवाईस । काय सांगावे येथ विशेष । पाही मुख्य इंद्राचेचि दशेस । जे दिवसाचे चौदा ॥१५८॥
परी ब्रहम्याचेही आठ प्रहर । डोळ्यांनी देखती खरोखर । तयां म्हणती जाणकार । ब्रहम्याच्या दिनरात्रींचे ॥१५९॥
अव्यक्तापासुनी होती भूते व्यक्त दिनोदयीं
रात्र होता लया जाती सगळी मग त्यातचि ॥१८॥
तीचि तीचि पुन्हा भूते त्यांचे काही न चालता
दिनांतीं मरती सारी उदयीं जन्म पावती ॥१९॥
ब्रह्मलोकीं दिवस उगवे । तेव्हा गणनाहि न करवे । ऐसे अव्यक्तातुनि जन्म पावे । व्यक्त विश्व ॥१६०॥
दिवसाचे होती आठ प्रहर । तेव्हा आटे हा आकारसागर । मग पहाट झाल्यावर । भरू लागे ॥१६१॥
शरदऋतूचे प्रवेशीं । अभ्रे विरती आकाशीं । मग ग्राष्मांतीं जैसी । पुन्हा दिसू लागती ॥१६२॥
तैसे दिवस उगवता पाहे । भूतसृष्टिचे समूह हे । अस्तित्व त्यांचे राहे । सहस्त्र युगचौकडया ॥१६३॥
मग रात्रीचा अवसर येई । विश्व अव्यक्तीं लया जाई । सहस्त्रचौकडया काळ जाई । पुन्हा तैसेचि रचे ॥१६४॥
सांगण्याचे कारण काय । जगाची उत्पत्ति आणि लय । दिवसरात्रीमाजी होय । ब्रह्मदेवाचिया ॥१६५॥
ब्रह्मचेव केवढा थोर । तो सृष्टिबीजाचे भांडार । जन्म-मृत्यूचे फेर्याची अपार । शीग तो होई ॥१६६॥
एरवी त्रैलौक्य हे धनुर्धरा, । तयाचे गावींचा पसारा । तो हा हिनोदयीं व्यापणारा । मांडतसे ॥१६७॥
मग रात्रीचा समय येई । आणि आपीआप लया जाई । स्वाभाविक लीन होई । मूळ बीजीं ॥१६८॥
जैसे वृक्षपण बीजा आले । की मेघ गगनरूप जाहले । तैसे अनेकत्व जेथ सामावले । तया साम्य म्हणती ॥१६९॥
अव्यक्त दुसरे तत्त्व त्या अवक्तापलीकडे
नाशता सगळी भूते न नाशे जे सनातन ॥२०॥
तेथ सम-विषम न दिसे काही । म्हणोनि भूते ही भाष जाई । जैसे दुधचि होता दही । दुधाचे नाव रूप जाय ॥१७०॥
आकारलोपासरशी तैसे । जगाचे जगपण नाशे । परि जैसेच्या तैसेचि असे । जेथूनि जाहले ते ॥१७१॥
स्वाभाविक तया म्हणती अव्यक्त । आकारता तेचि व्यक्त । एकेका नावे दिली जात । एरवी दोन नसती ॥१७२॥
आटल्या स्वरूपें जैसे । सोने लगडरूपें असे । मग तो घनाकार हरपतसे । तेव्हा अलंकार होती ॥१७३॥
या देहींचे होण्यात । एक सोनेचि आधारभूत । व्यक्त-अव्यक्त विचारात । चैतन्य तैसेचि ॥१७४॥
ते व्यक्त ना अव्यक्त । नित्य ना नाशिवंत । या दोन्ही भावांअतीत । अनादिसिद्ध ॥१७५॥
चैतन्य विश्वचि होउनि असे । विश्व विनाशे ते न नाशे । अक्षरे पुसताहि न पुसे । अर्थ जैसा; ॥१७६॥
पहा तरंग होत जात । परि उदक असे अखंड तेथ । तैसे जरि भूतसृष्टि नाशिवंत । अविनाशी जे ॥१७७॥
नातरि आटल्या अलंकारीं । आटे सोने ज्यापरी । तैसे मर्त्य जीवाकारीं । अमर जे असे ॥१७८॥
त्यास अक्षर हे तोचि शेवटचि गति
माझे परम ते धाम जेथूनि परतेचिना ॥२१॥
लाभे अनन्य-भक्तीने पार्था पुरुष थोर तो
ज्यात ही राहती भूते ज्याने विस्तारले जग ॥२२॥
जया म्हणावे अव्यक्ल । तर ती स्तुति न होत । कारण ते न गवसत । मनबुद्धीसी ॥१७९॥
आणि आकारा जरि येई । तरी निराकारपण न जाई । आकारलोपें ढळत नाही । नित्यता जयाची ॥१८०॥
म्हणोनि जया म्हणती अक्षर । तैसे म्हणता बोध हो सत्वर । जयापार न दिसे विस्तार । जया नाव परमगती ॥१८१॥
अवघ्या य देहनगरीं । आहे जो निजल्यापरी । व्यवहार करवी ना करी । उदासीन जैसा ॥१८२॥
एरवी जो शरीरव्यापार मोठा । त्यात एकही न थोपे सुभटा । दाही इंद्रियांच्या वाटा । वाहतचि राहती ॥१८३॥
असे गा मनाचा चव्हाटा । वरि विषयांचिया बाजारपेठा । सुखदुःखाच्या राजवाटा । अंतर्यामीं पावे ॥१८४॥
राजा जरि सुखें पहुडला । तरि देशींचा व्यापार न थांबला । प्रजा अभिलाषेने, आपुलाला-। करीतचि राही; ॥१८५॥
तैसे बुद्धीचे जाणणे । वा मनाचे देणे घेणे । इंद्रियांचे कार्य करणे । स्फुरण प्राणवायूचे; ॥१८६॥
ही देहक्रिया आघवी । न करविता होई बरवी । जैसा न चालवी रवी । तरी विश्व चाले ॥१८७॥
अगा, देख ऐशापरी । निजल्यापरि असे शरीरीं । म्हणोनि जया धनुर्धारी, । पुरुष असे म्हणती ॥१८८॥
आणि पतिव्रता प्रकृतिसहित । आचरी जो एकपत्नीव्रत । याहिकारणें म्हणता येत । जया पुरुष; ॥१८९॥
वेंदांचे सर्वज्ञपण । देखू न शके जयाचे अंगण । जे गगनाचे पांघरूण । होय देखा ॥१९०॥
ऐसे जाणूनि योगीश्वर । जया म्हणती परमेश्वर । जो एकनिष्ठ भक्तांचे घर । शोधित येई ॥१९१॥
जे तनुवाचाचितें । न ऐकती दुज्या गोष्टीते । तयां एकनिष्ठेचे पिकते । सुक्षेत्र जे ॥१९२॥
हे त्रैलोक्यचि पुरुषोत्तम । ऐसा जयांचा मनोधर्म । तयां आस्तिकांचा आश्रम । अगा पांडवा ॥१९३॥
जे निगर्वी जनांचा गौरव । जे गुणातीतांची जाणीव । जे सुखाचे राजवैभव । निस्पृहांसी; ॥१९४॥
जे संतुष्टा वाढिले ताट । जे निश्चिंत अनाथांचे मायपोट । भक्ती ही सरळवाट । पावण्य़ा ज्या गावा ॥१९५॥
हे एकेक सांगोनि धनंयजा, । फार किती वर्णू वाया? । अगा जाता जया ठाया । तो टावचि व्हावे ॥१९६॥
झुळुकेचे थंडाव्यात । ऊन पाणी थंड होत । की आदित्य येता पुढयात । तमचि प्रकाश होय; ॥१९७॥
तैसा संसार परमात्मगावा । गेला असता, पांडवा । होऊनि ठाके आघवा । मोक्षाचाच ॥१९८॥
जैसे अग्नीमाजी आले । इंधनचि अग्नी जाहले । मग निवडिता न ये वेगळे । काष्ठपण तयाचे; ॥१९९॥
अथवा साखरेचा मागुता । बुद्धिमंतपणेही करिता । ऊस न होय, पंडुसुता, । ज्यापरी गा; ॥२००॥
लोहाचे कनक जाहले । ते एके परिसेंचि केले । आता पुन्हा कैसे ते गेलेले- । लोहत्व परतुनी आणी? ॥२०१॥
जैसे तूप होउनी । दूधपण न ये परतुनी । तैसे तया पावोनी । पुनर्जन्म नसे ॥२०२॥
ते माझे परम । साचचि गा निजधाम । हे अंतर्यामींचे वर्म । तुज सांगतसे ॥२०३॥
कोण्या काळीं कसा देह ठेवुनी येथ साधक
संसारीं पडतो किंवा पावतो सिद्धि ऐक ते ॥२३॥
तैसे आणिकही एके परी । हे जाणता सोपे, धनु्र्धारी । देह सोडण्याचे अवसरीं । जेथ मिळती योगी; ॥२०४॥
अथवा अचानक ऐसे घडे । जो अकाली देह सोडे । तया माघारी येणे पडे । देहासीचि; ॥२०५॥
म्हणोनि शुध्द काळीं देह ठेविती । तर ठेविताचि ब्रह्म होती । एरवी अकालीं देह त्यजिती । ते पुन्हा संसारीं येती ॥२०६॥
मोक्ष आणि पुनर्जन्मप्राप्ती । काळाआधीन असती । तो काळ तुजप्रती । या प्रसंतो सांगतो ॥२०७॥
ऐक गा हे नीट । मरणकाळ येता निकट । पंचमहाभूते आपुलाली वाट । धरिती अंतीं ॥२०८॥
ऐशा प्राप्त प्रयाणकाळीं । बुध्दीसी भ्रम न गिळी । स्मृति न होय आंधळी । न मरे मन ॥२०९॥
या चेतना मरणकाळात । अवघ्या असती टवटवीत । अनुभविल्या ब्रह्मभावाप्रत । गवसणी होउनी ॥२१०॥
ऐसा हा समुदाय सावधान । आणि निर्वाणापावत सावधपण । हे तरचि येत घडून । जर अग्नी असे साहाय्या ॥२११॥
अगा, वार्याने वा उदकें । दिव्याचे दिवेपण झाके । तर काय देखू शके । दॄष्टी असुनी? ॥२१२॥
देहांतीचे वायुप्रकोपें । आतबाहेरी कफ व्यापे अग्नितेज विझोनि लोपे । ज्यावेळी गा; ॥२१३॥
त्यावेळीं प्राणासीचि न अवसान । तर काय करी बुध्दि असून । म्हणोनि देहीं अग्नीविण । चेतना न ठरे ॥२१४॥
अगा देहींचा अग्नि जर गेला । तर देह नव्हे, चिखल ओला । वाया आयुष्यवेळ आपुला । अंधारीं चाचपडे ॥२१५॥
आणि मागिल स्मरण आघवे । त्या अवसरीं सांभाळावे । मग देह त्यजूनि मिळावे । परमात्मरूपीं ॥२१६॥
ज्या देह्श्लेष्याचे चिखलीं । चेतनाचि बुडोनि गेली । तेथ मागली पुढली थबकली । आठवण सहजी ॥२१७॥
जन्मभरी जो अभ्यास केला । मरण न येताचि नाश पावला । ठेविले न दिसता मालवला । दीप जैसा हातींचा ॥२१८॥
आता असो हे सकळ । जाण गा ज्ञानासि अग्नि मूळ । प्रयाणीं त्या अग्नीचे बळ । संपूर्ण असावे ॥२१९॥
अग्नीने दिन शुक्लार्ध उत्तरायण जोडुनी
जाय तो गाठतो ब्रह्म शेवटी ब्रह्म जाणुनी ॥२४॥
आत अग्नि ज्योतीचा प्रकाश । बाहेरी शुक्लपक्ष आणि दिवस । सहा मासांतिल मास । उत्तरायणींचा ॥२२०॥
ऐशा सुयोगाची प्राप्ती-। होउनि, जे देह ठेविती । ते ब्रह्मविद होती । परब्रह्म ॥२२१॥
ऐक गा धनुर्धरा, । येथवरी सामर्थ्य या अवसरा । म्हणोनि हा सरळ मार्ग बरा । आत्मस्वरूपीं यावया ॥२२२॥
येथ अग्नि ही पहिली पायरी । ज्योतिर्मयता ही दुसरी । दिवस पायरी तिसरी । चौथी शुक्लपक्ष ॥२२३॥
आणि सहा मास उत्तरायण । सोपानाची वरिल पायरी जाण । ऐसे मोक्षसिध्दिसदन । पावती योगी ॥२२४॥
हा उत्तम काळ जाणावा । हाचि अर्चिरादि मार्ग समजावा । आता अकाळ तोही ऐकावा । सांगतो सहज ॥२२५॥
धूमाने रात्र कृष्णार्ध दक्षिणायन जोडुनी
जाय तो परते येथ चंद्रलोकास पावुनी ॥२५॥
तर प्रयाणाचे अवसरे । देहीं कफवात भरे । तेणें अंतःकरण अंधारें । कोंदले असे ॥२२६॥
सर्वेंद्निये होत लाकडे । स्मृति भ्रमामाजी बुडे । मन होय वेडे । कोंडे प्राण ॥२२७॥
अग्नीचे अग्निपण जाई । मग तो धूम्रचि अवघा होई । तेणें चेतना आच्छादिली जाई । शरीरींची ॥२२८॥
जैसे चंद्राआड आभाळ । दाटुनि येई सजळ । मग गडद ना उजळ । ऐसे झावळे होई ॥२२९॥
ना मृत ना सावध । ऐसे जीवित होई स्तब्ध । आयुष्या लागती वेध । मरणवेळेचे ॥२३०॥
मन - बुद्धि - इंद्रियांनिकट । कोंडुनि राही धूर दाट । जन्मभरी जोडिली अभ्यासवाट । पूर्ण नष्ट होई ॥२३१॥
अगा, हातींचे ज्यावेळी जाय । त्यावेळी पूर्ण लाभाची गोष्ट काय?। म्हणोनि प्रयाणीं तर होय । ऐसी द्शा ॥२३२॥
ऐशी स्थिती देहाआत । बाहेरी कृष्णपक्ष वरि रात । आणि सहामासही ते ओढवत । दक्षिणायनाचे ॥२३३॥
जन्ममरणफेर्यांची घराणी । अवघी एकवटती जयाचे प्रयाणीं । तो स्वरूपसिद्धीची कहाणी । कैसी ऐके? ॥२३४॥
ऐसा जयाचा देह पडे । तया चंद्रलोकीं जाणे घडे । मग फिरुनि मागुता तो सापडे । संसारीं या ॥२३५॥
आम्ही अकाळ जो पांडवा -। म्हटला तो हा जाणावा । आणि हाचि धूम्रमार्ग ये गावा । पुनर्जन्माचिया ॥२३६॥
दुसरा तो अर्चिरादि पथ । सु़गम आणि वाहता सतत । कल्याणकारी भला, नेत -। मोक्षाप्रती ॥२३७॥
उजेड आणि अंधार दोन्ही मार्ग अनादि हे
सुटका करितो एक एक फेर्यात टाकितो ॥२६॥
ऐशा अनादि या वाटा दोन । एक सरळ, एक आडवाट जाण । बुद्ध्याचि दोन्ही वाटा म्हणुन । दाविल्या तुज ॥२३८॥
कारण मार्ग - अमार्ग देखावे । साचलटिके ओळखावे । हित - अहित जाणावे । स्वहितासाठी ॥२३९॥
नाव चांगली दिसताही । कोण उडी घे अथांग डोहीं? । राजमार्ग जाणताही । अरण्यीं कोण शिरे? ॥२४०॥
विष - अमृत ओळखे । तो अमृत का टाकू शके? । तैसे सरळ वाट देखे । तो आडवाटेने न जाय ॥२४१॥
म्हणोनि निश्चित पारखावे । साच - लटिके ओळखावे । देखिले तर न घडावे । अनुचित काही ॥२४२॥
एरवी देहान्ती बिकट । धूम्रमार्गाचे घोर संकट । जन्मभरी अभ्यासिले नीट । ते जाईल वाया ॥२४३॥
जर अर्चिरादि मार्ग चुके । अचानक धूम्रमार्गीं ठाके । तर संसारचक्रा जुंपे एके । फिरतचि राही ॥२४४॥
हे सायास देखोनि मोठे । हे कैसे निभेल बा वाटे । म्हणोनि योगमार्ग गोमटे । शोधिले दोन्ही ॥२४५॥
तर एक ब्रह्मत्वासी नेई । एक पुनर्जन्माप्रत येई । परि लाभे जो दैवगत्याही । तोचि देहान्ती भेटे ॥२४६॥
असे हे मार्ग जाणूनि यो़गी मोह न पावतो
म्हणूनि सर्वदा राहे यो़गाने जोडिलाचि तू ॥२७॥
देव म्हणे, हे जे चिंतावे व्यर्थ । प्रारब्धें काय न पावे अवचित? । म्हणोनि ब्रह्म व्हावे देह त्यजित -। कोणें मार्गेंचि कासया? ॥२४७॥
तर आता देह जाई अथवा राही । आम्ही तों ब्रह्मचि ठायी । दोराचे सर्पत्व लटिके, पाही -। दोराचे दृष्टीने ॥२४८॥
तरंगपण असे की नसे । हे उदका कोठे भासे? । ते केव्हाही जैसेच्या तैसे । उदकचि की ॥२४९॥
तरंगाकारें न जन्मत । तरंगलोपें न विनाशत । तैसे देहींचि, देहासहित । ब्रह्म जाहले जे ॥२५०॥
आता शरीराविषयी तयांते । नावापुरतेहि काही नुरते । तर कोणे काळीं काय ते । नाश पावे? ॥२५१॥
मग मार्ग कासया शोधावे? । कोणी कोठुनि कोठे जावे? । जर देशकालादि आघवे । आपणचि असू ? ॥२५२॥
ज्यावेळी घट फुटे, देखसी । आतले आकाश लागे नीट वाटेसी । काय तरचि मिळे गगनासी । एरवी का चुके? ॥२५३॥
पाहे बा हे ऐसे होई । की तो घटाकारचि जाई । एरवी गगन तर गगनाचेचि ठायी । घटत्वा़चेहि आधी ॥२५४॥
ऐसिया ज्ञानप्राप्तीपुढे । मार्ग - अमार्गाचे साकडे । तयां सोऽहंसिध्दां न पडे । योगियांसी ॥२५५॥
याकारणें पांडवा, । योगयुक्त्त व्हावे तुवा । इतुक्यानेही ब्रह्मत्वा । आपोआप पावसी ॥२५६॥
मग कोठेही केधवा । देहबंध असावा वा जावा । बंधरहित अखंड ब्रह्मभावा । बिघाड नाही ॥२५७॥
कल्पारंभीं जन्मा न येई । कल्पांती उ बुडे मरणप्रळयीं । मध्ये स्वर्ग - संसारें मोहमयी । फसेना जो; ॥२५८॥
ऐशा बोधें जो योगी होई । तया या योगाचेचि नीटपणही । तो स्वर्ग - संसार तोलुनि पाही । आणि निजरूपा येतसे ॥२५९॥
पहा इंद्रादिक देवता । चौफेर गाजत्या तयांच्या सत्ता । उतरल्या घासापरी, पंडुसुता, । डावली जो ॥२६०॥
यजात दानात तपात तैसे
जे बोलिले अध्ययनात पुण्य
ते लंघितो सर्वचि जाणुनी हे
योगी चढे आद्य पदास थोर ॥२८॥
वेदाध्ययनाचे पुण्य लाभले । वा यज्ञाचे शेतचि पिकले । किंवा तप - दानाचे जोडिले । सर्वस्व जरी; - ॥२६१॥
त्या अवघ्याचि पुण्याचा मळा । फळ भारें जरि बहरला । तरि निर्मळ परब्रह्माशी तुळा । न होई तयाची ॥२६२॥
जे नित्यानंदाचे मानाने । उपमचे काटयावरि न साने । पहा, वेदयज्ञदि साधने । ज्या स्वर्गसुखालागी; ॥२६३॥
जे न सरे न विटे । भोगणार्याचे कोड पुरवी गोमटे । जे ब्रह्मसुखाचे धाकचे । भावंडचि; ॥२६४॥
ऐसे दृष्टीसी सुखकारक । जया अदृष्टाची बैठक । शतयज्ञेंही कोणी एक । करू शकेना साध्य ॥२६५॥
ते स्वर्गसुख घेउनि हातीं । योगी दिव्यदृष्टिने अनुमानिती । आणि हलके ऐसे जाणिती । सहजपणें ॥२६६॥
मग त्या सुखाची, धनुर्धारी, । करुनी गा पायरी । ते परब्रह्मपदावरी । आरूढती ॥२६७॥
ऐसे चराचराचे एक भाग्य । ब्रह्मदेवा - शिवा आराध्य । योगियांचे भोग्य । भो़गधन जे; ॥२६८॥
जो सकळ कळांची कळा । जो परमानंदाचा पुतळा । जो जिवाचा जिव्हाळा । विश्वाचिया; ॥२६९॥
कुलदीपक यादवकुळींचा । जो ओलावा सर्वज्ञतेचा । तो श्रीकृष्ण, सखा पांडवांचा । तया बोलिला ॥२७०॥
ऐसा कुरुश्रेत्रींचा वृत्तांत । संजय धृतराष्ट्रासी असे सांगत । तेचि ऐका पुढे, म्हणत - । ज्ञानदेव निवृत्तीचा ॥२७१॥