समओवी ज्ञानेश्वरी - अध्याय दहावा

ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी या तिन्ही ग्रंथांतून काव्य आणि तत्वज्ञान संत ज्ञानेश्वर आपल्या विलक्षण भाषासौंदर्याने मराठी माणसाला विस्तारून सांगतात.


प्रबोधनीं कुशल अससी । विद्याकमलविकासी । परावाणीसंगे विलासी । नमो श्रीगुरुराया ॥१॥

सूर्य तू संसारतमहर्ता । अप्रतिम परमसमर्था । तरुण तुर्यावस्थेचा तू लालनकर्ता । तुज नमो ॥२॥

नमो अखिलजगत्पालना । मंगलमणिनिधाना । आत्मानुभवनरेंद्रा । वेदार्थसमुद्रा । मदनगर्वनाशका ॥४॥

भावयुक्त भजना योग्य अससी । संसारगजगंडस्थळ फोडिसी । श्रीगुरुराया नमस्कार तुजसी । जगदुत्पत्तिस्थाना ॥५॥

तुमचा अनुभव हाचि गणेश । आपुला प्रसाद दे भक्तांस । तेव्हा सर्व विद्यांमाजी प्रवेश । बालकाचाहि होय ॥६॥

श्रीगुरूंचे उदार वाणीतून । लाभे जेव्हा अभयवचर । तेव्हा थांग लागे पूर्ण । नवरसामृतसागराचा ॥७॥

आपुल्या स्नेहाची वागेश्वरी । जेव्हा मुक्यासी अंगिकारी । तेव्हा तो वाचस्पतीसी करी । वादस्पर्धा ॥८॥

कृपादृष्टी झळके जयावरी । हा वरदहस्त पडे माथ्यावरी । तो जीवचि परि बरोबरी । महेशासी करी ॥९॥

एवढे ज्या महिम्याचे करणे । ते वाचाबळें म्यां वानावे कवणे? । काय सूर्याचे अंगा उटणे । लावावे लागे? ॥१०॥

कल्पतरु फळण्या कशास फुलोरा? । कायसा पाहुणेर क्षीरसागरा? । कवणें वासें कापुरा । सुवास द्यावा? ॥११॥

चंदना उटणे कैसे चर्चावे? । अमृता कैसे रांधावे? । गगनाहिवरी काही उभारावे । हे घडेल कैसे? ॥१२॥

तैसे श्रीगुरूंचे महिमान । आकळण्या कोठे साधर? । हे जाणोनि मी नमन । निवांत केले ॥१३॥

प्रज्ञेचे संपन्नत्वें । श्रीगुरुंचे सामर्थ्य वर्णावे । तर मोत्यासि अभ्रकें लेपावे । ऐसे होईल ॥१४॥

द्यावे चोख सोन्या रुप्याचे पाणी । तैसी ही स्तुतीची बोलणी । त्यापरिस माथा ठेवावा चरणीं । हेचि भले ॥१५॥

मग म्हटले, जी स्वामी, । भले ममत्वें देखिले तुम्ही । म्हणोनि श्रीकृष्णार्जुनसंगमीं । प्रयागवड जाहलो ॥१६॥

मागे ‘दूध दे,’ म्हटले म्हणुनी । अवघ्या क्षीराब्धीची वाटी करुनी । उपमन्यूस्तव श्रीशंकरांनी । ठेविली जैसी; ॥१७॥

अथवा वैकुंठयायकें । रुसल्या ध्रुवा कवतिकें । शांतविले देउनी भातुके । ध्रुवपदाचे; ॥१८॥

तैसी ब्रह्मविद्येची सम्राजी पावन । सकळ शास्त्रांचे विश्रांतिस्थान । ती भगवद्‍गीता गावी ओवीतून । ऐसे केले ॥१९॥

माझिये बोलांचे रानीं हिंडता । ऐकू न ये फळल्या अक्षरांची वार्ता । परि ती वाचाचि केली कल्पलता । विवेकाची ॥२०॥

बुद्धि देहतात्म्यातुनि सोडविली- । तीत आनंद भांडारे मांडिली । मनास्तव शय्या केली । गीतार्थसागरीं ॥२१॥

ऐसे एकेक गुरूंचे करणे । ते अपार कैसे मी जाणे? । तरी अनुवादिले धीटपणो । ते साहुनी घ्यावे जी ॥२२॥

आता आपुले कृपाप्रसादें । मी भगवद्‌गीता ओवीछंडें । पूर्वखंड आनंदें । वर्णियेला ॥२३॥

प्रथमाध्यायीं अर्जुनविषाद । दुसर्‍यात केला कर्मयोग विशद । ज्ञानयोगासी भेद । दावूनिया ॥२४॥

तिसर्‍यात कर्म प्रतिष्ठिले । तेचि चवथ्यात ज्ञानासह प्रकटिले । पाचव्यात सांगितले । योगतत्त्व ॥२५॥

तेचि सहाव्यात प्रगट । आसनापासुनि केले सुस्पष्ट । जीवात्मभाव एकवट । होती जेणे; ॥२६॥

तैसीचि जी योगस्थिती । आणि योगभ्रष्टां जी गती । ती आघवीचि उपपत्ती । सांगितली ॥२७॥

प्रकृति-परिहार उपक्रम सांगुनी । आर्त, जिज्ञासू, अर्थार्थीं, ज्ञानी । हे चारही भक्त वर्णुनी । सातवे अध्यायीं; ॥२८॥

पुढती सात प्रश्न चर्चिले । प्रयाणसिद्धीचे प्रकार कथिले । ऐसे सकळ प्रश्न उकलिले । आठवे अध्यायीं ॥२९॥

असंख्य वेदांमध्ये अभिप्राय जितुका । तितुकाचि महाभारतीं एका । लक्ष श्लोकांतुनी देखा । लाभतसे ॥३०॥

जे भारताचे अठरा पर्वांत । ते लाभे श्रीकृष्णार्जुनसंवादात । आणि जे गीतेचे सातशे श्लेकात । ते एके नववे अध्यायीं ॥३१॥

म्हणोनि अध्याय नववा । समाप्त जाहला म्हणावया- । भ्यालो मी, वाया-। गर्व का करू? ॥३२॥

अहो गूळ, ढेप, साखर । एकाचि रसाचे आकार । परि स्वाद गोडीचे तर- । अन्य अन्य जैसे; ॥३३॥

काही अध्याय वर्णिती ब्रह्मही । तैसे ब्रह्मस्थान दर्शविती काही । काहींत जाणणाराचि हरपुनि जाई । जाणण्याचे गुणासह ॥३४॥

ऐसे हे गीतेचे अध्याय । परि नववा अगाध, अनिर्वचनीय । तो अनुवादिला हे सामर्थ्य-। प्रभुजी तुमचे ॥३५॥

सूर्यापरि प्रकाशली वसिष्ठांची छाटी । विश्वामित्रें निर्मिली प्रतिसृष्टी । रामचंद्रें उतरविली सैन्ये मोठी । सागरीं पाषाण टाकुनी; ॥३६॥

हनुमंतें आकाशीं सूर्य धरिला । अगस्तीने समुद्र चुळीत भरिला । तैसा मज अजाणाकरवी बोलविला । नववा अध्याय तुम्ही ॥३७॥

परि हे अनुपमेय ऐसे- । की राम- रावण झुंजले कैसे । तर राम-रावण जैसे । भिडले समरीं ॥३८॥

तैसे नवव्यात कृष्णाचे बोलणे । ते नवव्याचिऐसे मी म्हणे । हा निवाडा तत्त्वज्ञ जाणे । गीतार्थ जयाहातीं ॥३९॥

ऐसे काही अध्याय पहिले । मी मतीऐसे वर्णियेले । आता व्याख्यान आरंभिले । उत्तरखंडाचे ॥४०॥

जेथ विभूति मुख्य आणि गौण । सांगती अर्जुनासी श्रीकृष्ण । चतुर रसभरित कथा संपूर्ण । सांगतो ऐका ॥४१॥

सौंदर्यांने मराठीचिया । शांतरस जिंकेल शृंगाररसा त्या । लेणे होतील ओव्या । साहित्यासी ॥४२॥

मूळ गीताग्रंथ संस्कृत । तरि हा मराठी वाचा प्रस्तुत । आकळता भाव उचित । मूळ कोणता न कळे ॥४३॥

अंगाचे सुंदरपणें । लेन्यासि अगचि होय लेणे । अलंकारिले कवणा कवणें । सांगता न ये ॥४४॥

ऐसी मराठी आणि संस्कृत वाणी । एका भावार्थाचे सुखासनीं । दिसताती शोभुनी । चतुर जनहो ऐका ॥४५॥

उसळते अभिप्राय घेती रूप । रसवृत्तीची वृष्टी आपोआप । चातुर्य म्हणे प्रतिष्ठा अमाप । प्राप्त आम्हा ॥४६॥

तैसे मराठीचे लुटुनि लावण्य । नवरसां आणिले तारुण्य । मग रचिले अगण्य । गीतातत्त्व ॥४७॥

ऐसा चराचरा परमगुरुवर । चतुर चित्तां आल्हादकर । तो ऐका, यादवेश्वर । बोलता जाहला ॥४८॥

ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे । ऐसे बोलले श्रीहरी प्रेमाने । अर्जुना, सर्वपरी अंतःकरणें । समर्थ आहेसी ॥४९॥

श्रीभगवान् म्हणालेः

फिरूनि सांगतो ऐक वाक्य उत्तम मी तुज
राखसी श्रवणीं गोडी तुझे मी हित इच्छितो ॥१॥

आम्ही मागिल जे निरूपणा केले । ते तुझे अवधानचि पाहिले । ते टाचके नव्हे भले । पुरते आहे ॥५०॥

घटीं अल्प उदक घालावे-। न गळे तर अधिक भरावे । तैसे तुज सांगता, आणिक सांगावे-। ऐसेचि होतसे ॥५१॥

अवचित आलेल्या सर्वस्व द्यावे । चोख दिसता कोषाध्यक्ष करावे । तैसे तू आता व्हावे । निजधाम माझे ॥५२॥

पाहोनि अर्जुना ऐसे  सवेंश्वर बोलिले उल्हासें । गिरी देखोनि जैसे । मेघ भरुनि येती ॥५३॥

म्हणे कृपाळांचा राणा तेथ । हे महाबाहो, तुजप्रत । कथिलाचि अभिप्राय कथित । अवधारी पुन्हा ॥५४॥

प्रतिवर्षी क्षेत्र पेरावे । पिके तरि मशागतीसि न उबगावे । उत्पन्न आले तर पाहावे । अधिकाधिक; ॥५५॥

पुन्हा पुन्हा तावूनिया । कस वाढे सहजतया । ते सोने चोख करावया । आवडे गा; ॥५६॥

तैसे येथ पार्था । तुजवरि उपकार न सर्वथा । आम्ही स्वार्थाचिकरिता । बोलतो पुढती ॥५७॥

बालका लेववावे लेणे । ते अलंकार काय जाणे? । तो सुखसोहळा माउलीने । भोगावा आपुले दिठीने ॥५८॥

तैसे तुझे हित आघवे । जों जों तुज आकळावे । तों तों आमुचे सुख दुणावे । ऐसे होई ॥५९॥

आता असो हे अलंकारिक भाषण । मम प्रीती तुजवरि उघड, जाण । तृप्तीची पूर्तता अवघड म्हणून । बोलता कितीहि ॥६०॥

आम्हा याचि कारणें । तेचि ते तुजसी बोलणे । परि असो हे, अंत:करणें- । अवधान देई ॥६१॥

ऐक ऐक हे सुवर्म, । वाक्य माझे परम । जे अक्षरे लेवुनि परब्रह्म । तुज आलिंगिण्या आले ॥६२॥

परि किरीटी तू मजसी । निश्चितचि न जाणिसी । तर अगा, जो मी येथ देखमी-। ते विश्वचि हे ॥६३॥

न देव जाणती माझा प्रभाव न महर्षिहि
सर्वथा मीचि देवांचे महर्षींचेहि मूळ की ॥२॥

जेथ वेद मुके जाहले । मन प्राण पांगुळले । रात्रीविण मावळले । रविशशी ॥६४॥

उदरींचा गर्भ काही । मातेचे वय जाणत नाही । तैसा मी देवासीही । आकळेना ॥६५॥

जलचरां न ये साररमापन । चिलटां न ओलांडवे गगा । तैसे महर्षींचे ज्ञान । मजसि न जाणे ॥६६॥

मी केवढा, कोणाचा कोण । केव्हा जाहलो निर्माण । निर्णय करिता या सार्‍यातुन । युगे गेली ॥६७॥

महर्षी आणि या देवां । इतर भूतजाता सर्वां । मी मूळ म्हणोनि, पांडवा, । जाणणे अवघड ॥६८॥

उतरले उदक पर्वतावरि वळेल । तरु शेंडयांकडूनी मुळाकडे वाढेल । तरचि जग मज जाणील । जे मी निर्मिले; ॥६९॥

सुक्ष्मांकुरीं वड सापडेल । तरंगीं सागर साठेल । वा परमाणूंत सामावेला । पृथ्वीगोल हा; ॥७०॥

तरचि मजपासुन जाहल्या जीवां । महर्षी अथवा देवां । मज जाणावयाचा, पांडवा, । संभव गा ॥७१॥

ऐस मी जरि कठीण जाणण्या । तरि जो प्रवृत्तिची वाट सोडुनिया । सर्वेंद्रियां जिंकूनिया । पाठमोरा होई; ॥७२॥

प्रवृत्त होत जरी । वेगें फिरे माघारी । महाभूतांचे चढे माथ्यावरी । देह मागे टाकुनी ॥७३॥

ओळखे जो  अजन्मा मी स्वयंभू विश्वचालक
निमोंह तो मनुष्यात सुटला पातकातुनी ॥३॥

तैसा राहोनि स्थिरचित्त । निर्मळ आत्मप्रकाशात । अजन्मत्व माझे देखत । आपुलिये डोळ्यांनी: ॥७४॥

मी आरंभापार । आणि सकळलोकसहेश्वर । ऐसिया मज जो खरोखर । यापरी जाणे; ॥७५॥

तो पाषणांत परीस । रसांत अमृतरस । तैसा मनुष्याकृती अंश । तो माझाचि जाण ॥७६॥

चालते बिंब तो ज्ञानाचे । तद्याचे अवयव कोंभ सुखाचे । परी माणूसपण तयाचे । हा लौकिकीं भ्रमचि ॥७७॥

अगा अवचित कापुरात । हिरा सापडत । परि वरि पडल्या नीरात । नच विरघळे; ॥७८॥

तैसा मनुष्यलोकांत । तो जाहला देहवंत । परि प्रकृतिदोषाची तेथ । नसे गोष्ट ॥७९॥

पापे तया त्यजिती आपोआप । जैसे जळत्या चंदनवृक्षा साप । तैसे वर्जिती गा संकल्प-। मज जाणे तयासी ॥८०॥

तेचि मज कैसे जाणावे सहजे । ऐसे कल्पी जरि चित्त तुझे । तरिमी ऐसा, हे माझे । भाव ऐक ॥८१॥

जे वेगळाल्या भूतीं । त्यांचे त्यांचे प्रकृतिऐसे होती । आणि अवघ्या जगतीं । विखुरले असली ॥८२॥

बुद्धि निमोंहता ज्ञान सत्यता शम निग्रह
जन्म नाश सुखे दुःखे लाभालाभ भयाभय ॥४॥

तप दातृत्व संतोष अहिंसा समता क्षमा
माझ्याचिपासुनी भूतीं भाव हे वेगवेगळे ॥५॥

तेथ प्रथम बुद्धी जाण । मग अमर्याद ज्ञान । असंमोह, सहजसिद्धीचे मर्म । क्षमा, सत्य ॥८३॥

मग शम दम दोन्ही । सुख दुःख जे वर्तत जनीं । अर्जुना, असणे-नसणे मानी । मम भावाचिमाजी ॥८४॥

आता भय आणि निर्भयता । अहिंसा आणि समता । हे मम रूपचि पांडुसुता । ओळख तू ॥८५॥

दान, यश, अपकीर्ती-। हे जे भाव सर्वत्र वसती । ते मजचिपासुनी होती । भूतांचे ठायी ॥८६॥

भूते असती वेगळाली जाण । तैसेचि हे वेगळाले माग । उपजती माझिया ज्ञानातून । तेही न जाणती मज ॥८७॥

अगा प्रकाश अंधार जैसे । एका सूर्यामुळेचि होतसे । प्रकाश उदयीं दिसे । तम अस्तासी ॥८८॥

आणि मज जाणणे न जाणणे । ते भूतांचिया दैवाचे करणे । म्हणोनि भूतीं विकारभावांचे होणे । वेगवेगळे घडे ॥८९॥

यापरी माझे भावीं । ही जीवसृष्टी आघवी । गुंतली असे जाणावी । पंडुकुमरा ॥९०॥

आता या सृष्टीचे पालक । जयांआधीन वर्तती लोक । ते अकरा भाव आणिक । सांगेन तुज ॥९१॥

महर्षि सात पूर्वीचे चौघे मनु तसेचि ते
माझे संकल्पिले भाव ज्यांची लोकात ही प्रजा ॥६॥

अवघ्याचि गुणांनी सिद्ध । जे महर्षींमाजी प्रबुद्ध । कश्यपादि प्रसिद्ध । सात ऋषी; ॥९२॥

आणिकही कथिले जातील । जे चौदा मनूतील । स्वयंभू मुख्य मूळ । चार मनू ॥९३॥

ऐसे हे अकरा । माझिया मनातुनि धनुर्धरा, । जाहले सृष्टीचे व्यापारा । चालवावया ॥९४॥

जेव्हा स्वर्गादि लोकव्यवस्था नव्हती-। सृष्टीची मांडामांडहि पुरती । तेव्हा महाभूतांचे समूह भोवती । निष्क्रिय होते ॥९५॥

तेव्हाचि हे अकरा जाहले । यांनी आठ लोकपाल निर्मिले । तयां अध्यक्ष नेमूनि ठेविले । या जगतीं ॥९६॥

म्हणोनि अकरा हे राजा । इतर लोक यांची प्रजा । तैसा हा विस्तार माझा । ओळख तू ॥९७॥

पहा आरंभी बीज एकले । मग तेचि वाढता बुंधा झाले । बुंध्यावरि कोंभ निघाले । डहाळ्यांचे ॥९८॥

मग फांद्यांपासुनि एकेका । फुटल्या शाखोपशाखा । शाखांपासुनी देखा । पल्लव पाने; ॥९९॥

पालवी, फूल, फळ । ऐसे वृक्षत्व जाहले सफळ । विचार करिता केवळ । बीजचि ते ॥१००॥

ऐसा मी एकलाचि होतो प्रथम । त्या मी सृसिले मना मम । तेथ जाहला जन्म । सात ऋषी, चार मनूंचा ॥१०१॥

यांनीचि लोकपाल निर्मिले । तयांनी विविध लोक स्त्रजिले । लोकांपासुनी निपजले । प्रजाजात ॥१०२॥

ऐसे हे विश्व येथ । मीचि स्त्रजिले निश्चित । परि जो हा भाव धरित । तोचि मानी ॥१०३॥

हा योगयुक्त विस्तार माझा जो नीट ओळखे
त्यास निष्कंप तो योग लाभे ह्यात न संशय ॥७॥

यालागी धनंजया । हे भाव विभूति माझिया । आणि व्याप्तीने यांचिया । व्यापिले पूर्व विश्व ॥१०४॥

म्हणोनि गा या विश्वीं । ब्रहम्यापासुनि मुंगीपावतही । मजवाचूनि नाही । दुसरी गोष्ट ॥१०५॥

ऐसे जाणे जो साचे  । तया तांबड फुटले ज्ञानाचे । म्हणोनि उत्तम-अधम भेदाचे । दुःस्वप्न न देखे ॥१०६॥

मी, माझ्या विभूति सर्व । आणि विभूतींनी व्यापिले विश्व । हे ऐक्याची होऊनि जाणीव । जो जाणे गा ॥१०७॥

म्हणोनि निःशंक या महायोगें । मज एकवटला मनाचे अंगें । येथ संशय करणे नलगे । तो कृतार्थ जाहला ॥१०८॥

कारण की ऐसा अखंडित । जो मज अभेद दृष्टीने भजत । तयाचे भजनाचे छंदात । प्रवेश मज ॥१०९॥

भक्तियोग ऐसा अभेद भला । शंका नसे, ना खंड तयाला । आचरिता थोपे, तरि चांगला । कथिले सहावे अध्यायीं ॥११०॥

तोचि अभेद कैसा । हे जाणावया मानसा-। साद आली, तर परिसा । करू विशद ॥१११॥

सर्वांचे मूळ माझ्यात प्रेरणा मजपासुनी
हे ओळखूनि भक्तीने जाणे भजती मज ॥८॥

तर मीचि एक सर्वथा । जगा या जन्मदाता । आणि मजचिपासुनि पार्था । निर्वाह यांचा ॥११२॥

लाटांच्या माळा अनंत त्या । जळींचि गा उपजल्या । जळचि आश्रय तयां । जीवनही जळ; ॥११३॥

तयां अवघ्याचि ठायी । जळचि जैसे, पाही । तैसे मजवाचून नाही । विश्वीं काही ॥११४॥

ऐसे मानिति, मज सर्वव्यापका । कोण्याही स्थानीं भजती देखा । परि ते भजन उदये एका-। उत्स्फूर्त प्रेमभावें; ॥११५॥

अवघे देशकाळवर्तमान । जाणती मजसि अभिन्न । जैसा वायू होउनि गगन । गगनींचि वावरे ॥११६॥

ऐसे जे आत्मज्ञानी । ते खेळत सुखें त्रिभुवनीं । मज जगद्रूपा मनीं । साठवुनी ॥११७॥

जे जे भेटे भूत । ते ते मानावे भगवंत । हा भक्तियोग निश्चित । जाण माझा ॥११८॥

चित्तें प्राणें जसे मीचि एकमेकांस बोधिती
भरूनि कीर्तनें माझ्या ते आनंदात खेळती ॥९॥

ते चित्तें मीचि जाहले । मजयोगेंचि संतोषले । जन्म-मरण विसरले । आत्मज्ञानाचे भुलीने ॥११९॥

मग त्या बोधमदाने । नाचती संवादसुखमोदाने । आता एकमेकां देणे-घेणे । ज्ञानचि खरे ॥१२०॥

जवळची सरोवरे उसळती । आणि परस्परांत मिसळती । मग तरंगांसी घरे होती । तरंगचि ॥१२१॥

तैसी एकमेकांचे मीलनीं । गुंफित आनंदकल्लोळांची वेणी । तेथ बोध बोधाची लेणी । बोधेंचि मिरवी ॥१२२॥

जैसे सूर्यें सूर्या ओवाळावे । की चंद्रे चंद्रम्या आलिंगावे । अथवा सरिसेचि मिसळावे । दोन्ही ओघ ॥१२३॥

तैसे प्रयागतीर्थ सामरस्याचे । वरि अष्टसात्त्विकभाव तरत साचे । ते भक्त संवादचव्हाटयाचे । गणेश जाहले ॥१२४॥

तेव्हा त्या महासुखाचे भरात । देहापार धावत । माझिये प्राप्तीचे आनंदात । लागती गर्जू ॥१२५॥

गुरु-शिष्यांचे एकांतीं । जो एकाक्षर मंत्र घोषिती । तो मेघांपरी त्रिजगतीं । गर्जती सर्वत्र ॥१२६॥

जैसी कमलकलिका उत्फुल्लपणे । ह्रदयींचे सुवासा झाकू न जाणे । करी रावा-रंका पारणे । आनंदाचे ॥१२७॥

तैसेचि मज विश्वीं गाती । गानानंदें भान विसरती । मग त्या विसरात विरुनि जाती । अंगेंजिवें ॥१२८॥

ऐशा प्रेमळ उत्कर्षें । रात-दिन हे भान नसे । ऐसे पूर्णसुख मम आपलेसे । करुनि घेतले ज्यांनी; ॥१२९॥

असे जे रंगले नित्य भजती प्रीतिपूर्वक
त्यांस मी भेटवी माते देउनी बुद्धियोग तो ॥१०॥

तयां मग आम्हीही । जे जे द्यावे काही । ते तेचि घेती त्या त्या ठायी । जे जे वेचक ॥१३०॥

कारण ते मजकडे यावया- । निघाले असता धनंजया, । फुटती आडवाटा या- । स्वर्ग-मोक्षाच्या ॥१३१॥

म्हणोनि तयांनी जे प्रेम धरिले । तेणेचि देणेकरी आम्हा केले । वरि आम्ही द्यावे ते त्यांनीचि मिळविले । आपण होउनी ॥१३२॥

आता यावरि इतुके तरि घडो । तेचि सुख आगळे वाढो । आणि काळाची दिठी न पडो । हेचि आम्हा करणे ॥१३३॥

लाडक्या बालकासी । शाल करुनि प्रेमदिठीसी । ते खेळता पाठोपाठ जैसी । माउली धावे; ॥१३४॥

जों जों बाळ लीला दावी । तों तों आणिक खेळ पुढे ठेवी । तैसी उपासकाची पदवी । पोषित मी; ॥१३५॥

ज्या पदवीचे पोषणें । ते मज पावती सहजपणे । तैसे तयांचे पालन करणे । मज आवडे विशेष ॥१३६॥

अगा भक्तांसी माझे कोड । मज तयांचे अनन्यगतीची चाड । कारण प्रेमळांची उणीव उघड । आमुचे घरीं ॥१३७॥

आम्ही स्वर्ग-मोक्ष निर्मिले । दोन्ही मार्ग भक्तांस्वाधीन केले । आम्ही शरीरही शेषा दिधले । लक्ष्मीसह ॥१३८॥

बाह्य सुखाहुनि जे एक । ते तैसेचि सुख साजुक । प्रेमळ भक्तांसाठी देख । ठेविले जपुनी ॥१३९॥

येथवरी हे किरीटी, । आम्ही प्रेमळां घेतो आपलेपणापोटीं । शब्दांनी सांगाव्या ऐशा गोष्टी- । नसती गा या ॥१४०॥

करूनि करुणा त्यांची ह्रदयी राहुनी स्वयें
तेजस्वी ज्ञानदीपाने अज्ञानतम घालवी ॥११॥

म्हणोनि माझा आत्मभाव । जयांनी जगण्या केला ठाव । एके मजवाचूनि सर्व-। फोल मानिले जयांनी; ॥१४१॥

त्या तत्त्वज्ञांसी शुब्दास्वरूप । ज्ञानकर्पुराचा दीप- । होउनि मी आपोआप । पुढे चाले ॥१४२॥

अज्ञानाचिये रात्रीं । गाढ अंधार भक्तासमोरी । तो नाशुनी दूर सारी । करी नित्य ज्ञानोदय ॥१४३॥

ऐसे प्रेमळांचे प्रियोत्तमें । बोलिले जेथ पुरुषोत्तमें । तेथ अर्जुन मनोधर्में । निवालो म्हणतसे ॥१४४॥

अहो जी, मुक्त केले मजला । जन्ममरणाचा केर काढिला । जननीजठराग्नीवेगळा । जाहलो प्रभू ॥१४५॥

ज्ञानीं जन्मलेपण आपुले । हे आज मी डोळ्यांनी देखिले । जीवित हातीं आले । मज वाटे ॥१४६॥

आज आयुष्य सफल जाहले । दैवाचे भाग्य उदयले । कृपावचन लाभले । देवमुखें ॥१४७॥

आता या वचनतेजाकारें । फिटले आतिल बाहेरिल अंधारे । म्हणोनि देखे खरेखुरे । स्वरूप तुझे ॥१४८॥

अर्जुन म्हणाला:

पवित्र तू परब्रह्म थोर ते मोक्षधाम तू
आत्मा नित्य अजन्मा तू विभु देवादि दिव्य तू ॥१२॥

तर होसी गा तू परब्रह्म । जे या महाभूतां विश्रामधाम । पवित्र तू परम । जगन्नाथा ॥१४९॥

तू परमदैवत ब्रह्मा विष्णु शिवा । तू चोवीस तत्त्वांपैल पंचविसावा । प्रकृतिभावांपलिकडिल देवा । दिव्य तू ॥१५०॥

अनादिसिद्ध तू स्वामी । आकळसी ना जन्मोजन्मी । तो तू हे आज आम्ही । जाणिले आता ॥१५१॥

या कालयंत्रा तू सूत्रधार । तू जीविता आश्रय खरोखर । तू ब्रह्मांडा आधार । कळले निश्चित ॥१५२॥

ऋषि एकमुखें गाती तसे असित देवल
व्यास नारद देवर्षि तूहि आपण सांगसी ॥१३॥

आणिकही एके प्रकारामुळे । याचि प्रतीतीची थोरवी कळे । मागे ऐसेचि तुज वर्णिले । ऋषीश्वरांनीही ॥१५३॥

तरि त्या वर्णनाचे साचपण । हे आता देखे अंतःकरण । कृपा केली आपण । म्हणोनि देवा ॥१५४॥

एरवी नारद अखंड जवळी येई । तोही ऐसीचि वचने गाई । परि अर्थ न कळोनि काही । मी गीतसुखचि अनुभवे ॥१५५॥

अगा आंधळ्यांचे गावीं । आपण प्रगटला रवि । तरि तयांनी ऊबचि भोगावी । प्रकाश कैसा? ॥१५६॥

एरवी नारद अध्यात्म गाता । वरवर रागांची जी मधुरता । तीचि भावे, दुसरे चित्ता । न कळेचि काही ॥१५७॥

असित देवल ऋषीचेहि मुखें । मी तव स्वरूप ऐके सुखें । परि तेव्हा बुद्धि विषयविषें । गुंगली होती ॥१५८॥

विषयविषाचा प्रताप द्वाड । कंडू लागे परमार्थ गोड । कडू विषय तो गाढ । जिवासि जाहला ॥१५१॥

हे आणिकांचे काय सांगावे । राजगृही स्वयेंचि येउनि व्यासदेवें । तुझे स्वरूप आघवे । सर्वदा सांगितले ॥१६०॥

अंधारीं चिंतामणिरत्न देखिले- । ते नव्हेचि म्हणुनि उपेक्षिले । मग दिनोदयी ओळखिले । होय म्हणोनि ॥१६१॥

ऐसी व्यासादिकांची बोलणी । त्या मजपाशी चिद्‌रत्नांच्या खाणी । परि तुज रवीवाचुनी । जात होत्या उपेक्षिल्या ॥१६२॥

मानितो सत्य हे सारे स्वयें जे सांगसी मज
देव दानव कोणीहि तुझे रूप न जाणती ॥१४॥

आता बोलकिरण तुझे फाकले । आणि ऋषींनी मार्ग होते जे कथिले । त्या अवघ्यांचेचि फिटले । अनोळखीपण ॥१६३॥

ऐसे ज्ञानबीज तयांचे बोल । माझे मनोभूसीत पडले खोल । परि या कृपेची लाभली ओल । म्हणोनि संवादफळ आले ॥१६४॥

अहो, नारदांदिक संतांसी । त्यांचिये भक्तिरूप सरितांसी । मी महासागर जाहलो, हृषिकेशी । संवादसुखाचा ॥१६५॥

प्रभु, हे अवघे जन्म जन्म । मी पुण्ये केली उत्तम । तयांचे नुरले काही काम । सद्‍गुरु तू लाभता ॥१६६॥

एरवी वाडवडिलांचे मुखें । मी सदा तुज कानीं ऐके । परि कृपान केली तुवा एके । तोवरि न कळेचि काही ॥१६७॥

म्हणोनि भाग्य असता अनुकूल । उद्यम होत सदा सफल । ऐकिले, अभ्यासिले सकल । गुरुकृपेंचि लाभे ॥१६८॥

माळी झाडांस्तव कष्ट । जन्मभरी करि आटोकाट । परि फळाची तेव्हाचि भेट । जेव्हा वसंत ये ॥१६९॥

विषमज्वरा पडे उतार । तेव्हा मधुर ते लागे मधुर । तैसे औषध तेव्हाचि रुचिर । जेव्हा आरोग्य लाभे ॥१७०॥

इंद्रिये वाचा प्राण-। यांचे तेव्हाचि सार्थक जाण । जेव्हा चैतन्य स्वयें येऊन । संचरे  तयांमाजी ॥१७१॥

तैसे शास्त्राध्ययन केले । योगादिक जे अभ्यासिले । ते तेव्हाचि म्हणता ये आपुले । जेव्हा अनुकूल गुरू ॥१७२॥

ऐशा प्रतीतीचे भरात । नाचतसे आनंदात । मग देवासि म्हणे पार्थ । रुचले बोल तुझे ॥१७३॥

तरि साचचि हे हृषिकेशी, । मज निश्चित ये अनुभवासी । तू देव-दानवांचे मतीसी । आकलण्याजोगा नससी ॥१७४॥

तुझा उपदेश जाणण्यापूर्वीं । स्वज्ञानेंचि तुज आकळता येई । ऐसे कोणी म्हणतीही । परि देवा, ते अशक्य ॥१७५॥

जाणसी ते तुझे तूचि प्रत्यक्ष पुरुषोत्तमा
देवदेवा जगन्नाथा भूतेशा भूतभावना ॥१५॥

आपुला विस्तार कळणे असंभव । ही आकाशासीचि जाणीव । अथवा मी इतुकी भरीव । हे पृथ्वीचि जाणे; ॥१७६॥

तैसी आपुली सर्व शक्ती । तुझी तूच जाणसी लक्ष्मीपती । अन्य वेदादिक तयांच्या मती । मिरविती उगा ॥१७७॥

अहो, मना मागे टाकावे । पवना कवेत घ्यावे । माया तरोनि जावे । बाहूंनी कैसे? ॥१७८॥

तैसे हे जाणणे असे । म्हणोनि कोणा ठाउकी नसे । आता तुझे ज्ञान होतसे । तुजचियोगें ॥१७९॥

आपण आपणा तूचि जाणसी । आणिकां सांगावयाहि समर्थ होसी । आता एकवेळ घाम पुसी-। मज आर्ताचे कपाळीचा ॥१८०॥

ऐकिले का, सर्व प्राणिमात्रा निर्मित्या, । हे सिंहा, संसारगजनाशित्या । सकळ देवदेवतांसि पूजनीया । जगन्नायायका? ॥१८१॥

थोर तू, योग्य न आम्ही राया-। जवळी उभेहि राहावया । खंत वाटे, परि भ्यालो विनवावया-। तर अन्य उपाय नाही ॥१८२॥

भरले सरिता समुद्र चहूकडे । परि ते चातकासि कोरडे । जेव्हा मेघातुनि थेंब पडे । तेचि पाणी तया ॥१८३॥

तैसे जी, गुरु सर्वत्र असती । परि कृष्णा, आम्हा तूचि गती । हे असो, मजप्रती । सांग विभूति ॥१८४॥

विभूति आपुल्या दिव्य मज निःशेष सांग तू
ज्यांनी हे विश्व तू सारे राहिलास भूरूनिया ॥१६॥

या तुझ्याचि विभूति अवघ्या जाणुन । परि ज्या व्यापक दिव्य शक्तिमान । त्या दावाच्या आपण-। आपुल्या मज ॥१८५॥

ज्या विभूति या महात्त्वपूर्ण । लोकां असती व्यापून । त्या नामांकित, प्रधान । प्रकट करी,

ओगेश्वरा कसे जाणू चिंतनीं चिंतनीं तुज
कोण्या कोण्य़ा स्वरूपात करावे ध्यान मो तुझे ॥१७॥

कैसे मी तुज जाणावे कृष्णजी । काय जाणोनि बुडावे चिंतनामाजी । जर तूचि म्हणू आघवे जी, । तर चिंतनचि न घडे ॥१८७॥

म्हणोनि मागे भाव आपुले । संक्षिप्त तुवा कथिले । आता विस्तारुनि एकवेळे । सांग तैसे ॥१८८॥

ज्या ज्या भावांचे ठायी । तुज चिंतिता सायास नाही । तो सोपा करुनि दावी । योग आपुला ॥१८९॥

त्या विभूति तसा योग आपुला तो सविस्तर
पुन्हा सांग नव्हे तृप्ति सेविता वचनामृत ॥१८॥

मी पुसल्या ज्या विभूती । त्याही सांगाव्या लक्ष्मीपती । येथ म्हणसी जरि, पुनरुक्ती-। काय करू?; ॥१९०॥

तरि हा तव मनिंचा भाव । झणी घेवो अन्य ठाव । अमृतपानाहि सामान्य । ना न म्हणवे जी ॥१९१॥

जे काळकूटाचे भावेंड सख्खे । जे मृत्युभयें प्याले सुखें । तरि इंद्र दिवसासि एके । चौदा होती; ॥१९२॥

ऐसा कोणी एक क्षीराब्धीचा रम । तया वायाचि अमृतपणाचा आभास । तोडी इतुका मिठ्ठास । पुरे म्हणू न दे; ॥१९३॥

येथवरी त्या क्षुद्र अमृताही । गोडीची असे थोरवी । मग हे तर सर्वस्वी । परमामृत साच ॥१९४॥

जे अचल मंदार न हालविता । क्षीरसागर न डहुळता । अनादि जे स्वभावता-। आयते आहे; ॥१९५॥

जे द्रव ना घन । जे रसगंधहीन । जे करिता स्मरण । कोणाही लाभे; ॥१९६॥

जयाची ऐकताचि कथा । अवघा संसार होय वृथा । लाभे अढळ नित्यतां । आपणांसी ॥१९७॥

जन्म-मृत्यूची भाष । हरपूनि जाय निःशेष । अतबाहेरी महासुख । वाढोचि लागे; ॥१९८॥

मग दैवगत्त्या जरि सेवी । तरि आपणचि ते होऊनि राही । तेचि तू देता न महणे पुरेही । चित्त माझे ॥१९९॥

तुझे नावचि जी, आम्हा आवडते । भेट होय आणि जवळीक घडते । मग गोष्टी सांगसी तेथे । आनंदाचे भरात ॥२००॥

आता हे सुख म्हणू कशासारिखे । बोलवेना परि मज तोषे । इतुकेचि जाणे, जे आपल्या मुखें । पुनरुक्तहि व्हावे ॥२०१॥

प्रतिदिनीं ये तो सूर्य काय शिळा? । अग्नि म्हणावा काय ओवळा? । नित्य वाहत्या गंगाजळा । काय पारोसेपण आहे? ॥२०२॥

तुवा स्वमुखें जे बोलिले । ते आम्ही नाद रूप देखिले । आज चंदनतरुची फुले । हुंगित आहों ना? ॥२०३॥

यार्थाचिया बोला । सर्वांगें कृष्ण डोलला । म्हणे भक्ति-ज्ञानाचा जाहला । सागर हा ॥२०४॥

ऐसा प्रेमळाचे तोषाआत । प्रेमाचा आवेग उचंबळत । तो सायासें आवरीत । काय बोले अनंत ॥२०५॥

श्रीभगवान् म्हणाले:

बरे मी सांगतो दिव्य मुख्यमुख्यचि त्या तुज
माझा विभूतिविस्तार न संपोचि कुठे कधी ॥१९॥

मी ब्रह्मदेवाचा पिता- । हे आठविताहि न स्मरे चित्ता । कृष्णा म्हणतसे, बा पांडुसुता । भले केले ॥२०६॥

अर्जुना बा म्हणे श्रीकृष्णराय । याचा आम्हा न विस्मय । तो स्वतः लेकरू नव्हे काय? । नंदराजाचे? ॥२०७॥

परि असो, सांगतो एक । हे करवी प्रेमाचा अतिरेक । मग म्हणे नीट ऐक । धनुर्धरा ॥२०८॥

पुशिल्या विभूति तुवा या । तयांचे अपारपण धनंजया- । त्या माझ्याचि परि माझिया- । मतीसि न आकळती ॥२०९॥

अंगींचे रोम किती । ज्याची त्यास न गणती । तैशा माझ्या विभूति । अगण्य मजही ॥२१०॥

एरवी मी केवढा कैसा । ते मीचि न जाणे वीरेशा, । म्हणोनि प्रधान, सुविख्यात ऐशा । विभूति ऐक ॥२११॥

ज्या काही जाणता विभूती । अवघ्याचि जाणल्या होती । जैसे बीज येता हातीं । तरुचि आला होय ॥२१२॥

वा उद्यान हातीं आले । तर सहज सापडती फुले फळे । तैसे पाहता जया पाहिले । विश्व सकळ ॥२१३॥

एरवी साचचि गा धनुर्धरा, । नाही पार माझ्या विस्तारा । अगा, गगनाऐशा अपारा । मजमाजी ये लपता ॥२१४॥

राहतो आत्मरूपाने सर्वाच्या हृदयात मी
भूतमात्रास मी मूळ मध्य मी मीचि शेवट ॥२०॥

शिरीं काळे कुरळे केस धार्ण । धनुर्विद्येत शंकरापरि निपुण- । ऐशा अर्जुना, अगा जाण । प्राणिमात्रांठायी आत्मा तो मी ॥२१५॥

आत मीच यांचे अंतःकरणी । बाहेरी माझीचि गवसणी । आदि मी, मीच निर्वाणीं । मध्य मीच ॥२१६॥

जैसे मेघां या खाली- वरी । एक आकाशचि आत-बाहेरी । ते आकाशींचि जाहले अवधारी । त्याचे असणेहि आकाशीं ॥२१७॥

मग लया ज्यावेळी जाती । त्यावेळी आकाशचि होउनि राहती । तैसी आदिस्थिती-अंतगती । भूतांसी मी ॥२१८॥

माझे अनेकत्व आणि व्यापकपण । ऐसे विभूतींयोगे जाण । तर जीवचि करोनि कान । ऐकोनि ऐक ॥२१९॥

याहीवरी त्या विभूती । सांगणे राहिले काय तुजप्रती? । सांगेन म्हटले, हे सुभद्रापती, । त्या प्रधान ऐक ॥२२०॥

आदित्यात महाविष्णु ज्योतिष्मंतात सूर्य मी
मरीचि मुख्य वायुत मी नक्षत्रात चंद्रमा ॥२१॥

हे बोलोनि तो कृपावंत-। म्हणे, विष्णु मी बारा आदित्यांत । रवि मी रश्मिवंत-। तेजःपुंजांमाजी ॥२२१॥

मरीचि मी मरुद्‌गणांचे प्रकारीं । श्रीकृष्ण म्हणती । अवधारी । चंद्र मी नक्षत्रीं । तारांगणीं ॥२२२॥

मी सामवेद वेदात असे देवात इंद्र मी
चेतना मीचि भूतात मन ते इंद्रियात मी ॥२२॥

सामवेद जो वेदात चार । तो मी म्हणे शारंगधर । देवांमाजी महेंद्र -। मरुद्‌बंधु तो मी ॥२२३॥
इंद्रियांआत अकरावे । मन ते मी, हे जाणावे । भूतांमाजी स्वभावें । चेतना ती मी ॥२२४॥

कुबेर यक्षरक्षात मी रुद्रात सदाशिव
वसूत मी असे अग्नि असे उंचात मेरु मी ॥२३॥

सकळ रुद्रांत धुरेवर । मदनरिपू जो शंकर । तो मी येथ खरोखर । निःसंशय ॥२२५॥

यक्ष-राक्षसगणांत । शंभूचा सखा जो धनवंत-। तो कुबेर मी, हे अनंत-। म्हणतसे ॥२२६॥

अगा आठाही वसूत । अग्नि तो मी येथ । सर्वतोपरी उंच पर्वतांत । मेरू तो मी ॥२२७॥

पुरोहितात तू जाण मुख्य़ तो मी बृहस्पति
सेनानीत तसा स्कंद जलराशील सागर ॥२४॥

मी एकाक्षर वाणीत महर्षीत असे भृगु
जप मी सर्व यज्ञांत मी स्थिरात हिमालय ॥२५॥

स्वर्गसिंहासना साहाय्य करीत । जो अग्रगण्य सर्वज्ञात । राव जो पुरोहितात । तो बृहस्पती मी ॥२२८॥

जो हरवीर्यें अग्निसंगात-। जाहला कृत्तिकाउदरात । त्रिभुवनींचे मुख्य सेनानींत-। तो कार्तिकस्वामी मी ॥२२९॥

सर्व जलाशयांत थोर । अथांग तो मी सागर । महर्षींत तपोवतार । भृगू तो मी ॥२३०॥

सकळ वाणींमाजी देख । सत्याचा उत्कर्ष चोख । ते ॐ अक्षर मी एक । म्हणे वैकुंठवेल्हाळ ॥२३१॥

समस्त गा यज्ञात । तपयज्ञ मी मृत्युलोकात । जया कर्मत्यागें येथ । ॐ कारादि निपजविती ॥२३२॥

नामजयपज्ञ तो परम् । आड न ये स्वानादि कर्म । नामें पावन धर्म-अधर्म । नाम परब्रह्म, म्हणती ॥२३३॥

अचल गिरिवरात । पुण्यपुंज जो हिमवंत । तो मी म्हणे कांत- । लक्ष्मीचा गा ॥२३४॥
सर्व वृक्षात अश्वत्थ मी देवर्षीत नारद
मी चित्ररथ गंधर्वीं सिद्धीं कपिल मी मुनि ॥२६॥

अश्वीं उच्चैःश्रवा जो मी निघालो अमृतातुनी
ऐरावत गजेंद्रात मी नरात नराधिप ॥२७॥

कल्पवृक्ष पारिजात । गुणीं चंदनही विख्यात । परि या वृक्षजातांत । पिंपळ तो मी ॥२३५॥

सकळ देवर्षींत । नारद तो मी येथ । गंधर्व चित्ररथ । गंधर्वांत मी ॥२३६॥

सर्व सिद्धांमध्ये या । कपिलाचार्य तो मी जाणावा । अश्वांत प्रसिद्ध उच्चैःश्रवा । तोही मीचि ॥२३७॥

राजभूषण गजात । पार्था, मी गा ऐरावत । प्रकटला समुद्र्मंथनात-। अमृतरस तो मी ॥२३८॥

या नरांमाजी राजा । तो विभूतिविशेष माझा । जयासी सकळ प्रजा । आपणहोउनि सेवी ॥२३९॥

मी कामधेनु गाईंत आयुधीं वज्र मी असे उत्पत्ति-हेतु मी काम मी सर्पोत्तम वासुकि ॥२८॥

नागात शेष मी थोर जळीं वरुणदेवता
पितरीं अर्यमा तो मी ओढणारात मी यम ॥२९॥

आघव्या आयुधांतून । वज्र ते मी तीक्ष्ण  । जे असे आरूढोन । शतयज्ञकर्त्या इंद्राहातीं ॥२४०॥

धेनूंत कामधेनू जाण । ती मी म्हणे श्रीकृष्ण । जन्मविणारात मदन । तोही मीचि ॥२४१॥

अधिष्ठाता सर्पकुळात । वासुकि मी समर्थ । नागांमाजी समस्त । अनंत तो मी ॥२४२॥

अगा जलदेवतात । जो पश्चिमप्रमदेचा कांत । तो वरुण मी, हे अनंत- । सांगतसे ॥२४३॥

आणि पितृगणांमाजी सर्व । अर्यमा जो पितृदेव । तो मी हे तत्त्व । सांगे साच ॥२४४॥

जगाची शुभाशुभे लिहिती । प्राण्यांच्या मनाचा झाडा घेती । मग केल्या कर्मानुसार होती । भोगनियंते जे; ॥२४५॥

त्या नियंत्यांमाजी यम । जो कर्मसाक्षी धर्म । तो मी म्हणे आत्माराम । रमापती ॥२४६॥

असे दैत्यात प्रल्हाद मोजणारात काळ मी
श्वापदात असे सिंह पक्ष्यात खगराज मी ॥३०॥

अगा, दैत्यांचिये कुळीं । प्रल्हाद तो मी, न्याहाळी । म्हणोनि आसुरी भावांचे मेळीं । लिप्त न जाहला ॥२४७॥

ग्रासणारात महाकाळ । तो मी म्हणे गोपाळ । श्वापदात शार्दूल । तोही मीचि ॥२४८॥

पक्षिगणांत अति उंच भरारी- । तो गरुड मी अवधारी । यालागी तो पाठीवरी । वाहू शके मज ॥२४९॥

वेगवंतात मी वायु शस्त्रवीरात राम मी
मत्स्यात मी असे नक्र नदी गंगा नद्यात मी ॥३१॥

जे पृथ्वीचिये विस्तारासी । क्षणहि न लागता ऐसी । एकेचि उड्डाणें सप्तसागरांसी । प्रदक्षिणा घालिती ॥२५०॥

असीम गतिमंतात । पवन जो मी वाहत । सकळ शस्त्रवीरात । श्रीराम तो मी; ॥२५१॥

संकटीं धर्माचा कैवारी । केवळ एक धनुष्य साह्यकारी । जयाने त्रेतायुगीं विजयश्री । वळविली आपुल्याकडे; ॥२५२॥

मग सुवेळाचलीं उभा ठाके । लंकेशाची उडवी मस्तके । बळी देत पिशाच्चांचे करतळीं, सुखें । गगनीं उदो उदो म्हणत्या; ॥२५३॥

जयाने देवांचा मान वाढविला । धर्माचा जीर्णोद्धार केला । सूर्यवंशीं उदेला । सूर्य जो जणू; ॥२५४॥

समस्त शस्त्रवीरांत । रामचंद्र मी सीताकांत । मगर मी पुच्छवंत । जळचरांमाजी ॥२५५॥

समस्त ओघीं जी पावन गा । ती भगीरथें आणिता गंगा- । जन्हु ऋषीने गिळिली, मग जांघा- । फाडुनि दिधली; ॥२५६॥

ती त्रिभुवनीं एकचि सरिता । जान्हवी मी पंडुसुता, । समस्त प्रवाहात सर्वथा । जाण अगा ॥२५७॥

वेगळाली नावे घेत । सहस्त्र जन्म जरि जात । तरि अर्ध्याहि न सांगुनि होत- । ऐशा या सृष्टीत विभूती ॥२५८॥

सृष्टीचे मी असे मूळ मुख मी ओघ तोहि मी
विद्यात आत्मविद्या मी वक्त्यांचा तत्त्ववाद मी ॥३२॥

समासात असे द्वंद्व अक्षरात अकार मी
मीचि अक्षय तो काळ विश्वकर्ता विराट् स्वयें ॥३३॥

अवघीचि नक्षत्रे वेचावी । ऐसी आस उपजे जीवीं । तेव्हा गगनाचीच बांधावी । मोट जैसी; ॥२५९॥

पृथ्वीतिल परमाणू मोजावेत । तर पृथ्वीगोलचि घ्यावा काखेत । तैसा विस्तार मम पहावा येथ । तर जाणावे मज ॥२६०॥

जैसे शाखांसह फूल फळ । वेटाळू म्हणे सकळ । तर उपटूनिया मूळ । हातीं घ्यावे; ॥२६१॥

तैसे माझे विभूतिविशेष । जर जाणावयाचे अशेष । तर स्वरूप एक निर्दोष । जाणावे माझे ॥२६२॥

एरवी वेगळाल्या विभूती । एकेक परिससी किती? । म्हणोनि एकदाचि हे महामती, । सर्व मी जाण ॥२६३॥

मी अवघ्याचि सुष्टिठायी । अगा, आदि मध्य लयीं । वस्त्रीं ओतप्रोत पाही । तंतू जैसे ॥२६४॥

ऐशा व्यापका मज जाणावे । तर विभूतींचे वेगळेपण का सांगावे? । परि ही तुझी योग्यता नव्हे । म्हणोनि असो ॥२६५॥

अगा, तुवा पुसल्या विभूती । म्हणोनि त्या ऐक हे सुभद्रापती । तर सर्व विद्यांमाजी थोर ती । अध्यात्मविद्या मी ॥२६६॥

अगा, बोलणार्‍यांचे ठायी । वाद तो मी पाही । सर्व शास्त्रांचे मतैक्ये कधीही । सरेचिना; ॥२६७॥

निर्णय करु जाता वाढे । ऐकता तर्का बळ चढे । जयावरी बोलणार्‍यांची पुढे- । बोलणी होत गोड; ॥२६८॥

ऐसा प्रतिपादनामाजी वाद । तो मी म्हणे गोविंद । अक्षरांमाजी जो विशद । अकार तो मी ॥२६९॥

आणि गा समासात । द्वंद्व तो मी येथ । चिलटांपासोनि ब्रह्मदेवापावत । ग्रासिता काळ तो मी ॥२७०॥

मेरु मंदार आदींसहित । जो पृथ्वीचा नाश करीत । जो जिरवी जेथल्यातेथ । जलप्रलया ॥२७१॥

जो प्रळयतेजा देत मिठी । सगळ्या पवना गिळी, किरीटी । आकाश जयाचे पोटीं । सामावले; ॥२७२॥

ऐसा तो अपार काळ । तो मी म्हणे लक्ष्मीवेल्हाळ । मग पुनरपि सृष्टीचा मेळ । सृजिता तो मी ॥२७३॥

सर्वनाशक मी मृत्यु होणारा जन्म मी असे
वाणी श्री कीर्ति नारींत क्षमा मेधा धृति स्मृति ॥३४॥

सृजिल्या भूतां मी धारण करी । सकळां जीवनही मी अवधारी । अंतीं सर्वांते या संहारी । तेव्हा मृत्यूही मीचि ॥२७४॥

आता स्त्रीगणांपैकी । माझ्या विभूति सात आणखी । त्या ऐक, कौतुकीं- । कथिल्या जातील ॥२७५॥

तर नित्य नवी जी कीर्ती । अर्जुना, ती माझी मूर्ती । आणि औदार्यासह जी संपत्ती ॥ तीही मीचि जाण ॥२७६॥

आणि ती गा मी वाणी । आरूढोनि न्यायाचे सुखासनीं । सदैव विवेकाचे मार्गांनी । चालत असे ॥२७७॥

देखताक्षणीं पदार्थ । मम स्मरण दे सार्थ । ती स्मृतीही येथ । त्रिवार मी गा ॥२७८॥

स्वहिता अनुगामिनी । मेधा ती मी जनीं । धैर्यवृत्ती मी त्रिभुवनीं । क्षमाही मी ॥२७९॥

नारींमाजी ज्या ज्या वसती । मीचि त्या सातहि शक्ती । अवधारी, ऐसे म्हणती । संसारतापहर मुरारी ॥२८०॥

सामात मी बृहत‌साम गायत्री मंत्रसार मी
मी मार्गशीर्ष मासात ऋतूत फुलला ऋतु ॥३५॥

स्तोत्र साम वेदराशीत । बृहत्‌साम मी त्यात । मेघश्याम म्हणत । प्रानेश्वर रमेचा ॥२८१॥

आणि गायत्रीछंद जे । सकळ छंदांमाजी माझे । स्वरूप हे जाण दुजे । निःसंशय ॥२८२॥

मासात मार्गशीर्ष सुंदर । तो मी म्हणे शारंगधर । ऋतूंमध्ये कुसुमाकर । वसंत तो मी ॥२८३॥

द्यूत मी छळणारांचे तेजस्व्यांतील तेज मी
सत्त्व मी सात्त्विकांतील जय मी आणि निश्चय ॥३६॥

मी वासुदेव वृष्णीत पांडवात धनंजय
मुनींत मुनि मी व्यास कवींत उशना कवी ॥३७॥

ठकविण्याचे जे प्रकार । त्यात गा मी जुगार । म्हणोनि चोरी चालता चव्हाटयावर । निवारिता न ये ॥२८४॥

अगा, सर्व तेजसात । तेज ते मी निश्चित । सकळ कार्यांचिया उद्देशात । विजय तो मी ॥२८५॥

जेणें चोख दिसे न्याय । तो व्यवसायात व्यवसाय । माझेचि स्वरूप होय । म्हणे देवराय ॥२८६॥

सत्त्वगुणसंपन्नांत । सत्त्व मी, म्हणे अनंत । यादवांमाजी श्रीमंत । तोचि तो मी ॥२८७॥

देवकी-वसुदेवास्तव जाहलो । यशोदाकन्येस्तव गोकुळीं गेलो । तो मी प्राणासकट प्यालो । पूतनेसी ॥२८८॥

उमलण्यापूर्वी बाळपणाची कळी । ज्या मी अदानवी सृष्टी केली । करीं गिरी धरूनि मापिली । महेंद्राची थोरवी ॥२८९॥

यमुनेचे कालियाशल्य फेडिले । ज्या मी जळते गोकुळ रक्षिले । वासरांलागी लाविले पिसे । ब्रह्मदेवा ॥२९०॥

बाल्याची होता पहाट । कंसाऐसी अचाट । महाधेंडे अफाट । लीलया नाशली ॥२९१॥

हे काय कितिएक सांगावे । तूही देखिले ऐकिले आघवे । तर यादवांमाजी जाणावे । हेचि स्वरूप माझे ॥२९२॥

आणि सोमवंशी पांडवांचा ठेवा- । अर्जुन तो मी जाणावा । म्हणोनि प्रेमभावीं एकमेकांचिया । अंतर न पडे ॥२९३॥

संन्यासी तू होउनि जनीं । चोरुनि नेली माझी भगिनी । तरि विकल्प नुपजे मनीं । मी-तू दोन्ही एकरूप ॥२९४॥

मुनींमध्ये व्यासदेव । तो मी म्हणे यादवराव । कवीश्वरांत धैया ठाव । शुक्राचार्य तो मी ॥२९५॥

दंड मी दमवंतांचा विजयेच्छूंस धर्म मी
गूढांत मौन मी थोर ज्ञात्यांचे ज्ञान मी असे ॥३८॥

अगा नियामकात । अनिवार दंड तो मी येथ । जो मुंगीपासुनि ब्रह्मदेवापावत । नियमन करी ॥२९६॥

सारासार विचार करी । धर्मज्ञानाचा पक्ष धरी । सकळ शास्त्रांमध्ये धुरेवरी । नीतिशास्त्र ते मी ॥२९७॥

अवघ्याचि गूढांत । मौन ते मी येथ । म्हणोनि न बोलणार्‍यांचे पुढयात । ब्रह्मदेवहि अज्ञानी ॥२९८॥

अगा ज्ञानियांचे ठायी । ज्ञान ते मी पाही । आता असो, यासि काही । पार नसे ॥२९९॥

तसेचि सर्व भूतांचे बीज जे तेहि जाण मी
माझ्याविण नसे काही लेशमात्र चराचरीं ॥३९॥

माझ्या दिव्य विभूतींस नसे अंत कुठेचि तो
तरी विभूतिविस्तार हा मी थोडयांत बोलिलो ॥४०॥

पर्जन्याचिया धारा । मोजता येती का धनुर्धरा? । की पृथ्वीवरिल तृणांकुरां । गणिल कोणी? ॥३००॥

अगा सागरलाटांची गणती । कोण करू शकती? । तैशाचि माझ्या विभूति- । तयांची न मोजदाद ॥३०१॥

ऐशा पाऊणशे विभूति प्रधान । तुज कथिल्या गा जाण । परि ऐसे थोडके सांगून । वरवरचे वाटे मना ॥३०२॥

विभूतिविस्तारासी अन्य । येथ सर्वथा सीमा न होय । म्हणोनि ऐकसी तू काय । आम्ही सांगावे किती? ॥३०३॥

यालागी एकदाचि तुज । दावू आता कर्म निज । सर्व प्राणिमात्रांकुरें बीज । वाढे ते मी ॥३०४॥

म्हणोनि सान-थोर न म्हणावे । उच्च-नीच भाव त्यजावे । एक मीचि ऐसे मानावे । वस्तुजात ॥३०५॥

तरी यावरी साधारण । ऐक बा आणिकही खूण । अर्जुना, ती तू जाण । विभूति माझी ॥३०६॥

विभूतियुक्त जी वस्तु लक्ष्मीवंत उदात्त वा
माझ्याचि किरणातूनि निघाली जाण ती असे ॥४१॥

जेथ जेथ संपत्ति आणि दयाही । दोन्ही वसती एके ठायी । तेथ तेथ गा पाही । विभूति माझी ॥३०७॥

अथवा काय हे फार जाणूनि करिशील तू
एकांशें विश्व हे सारे व्यापूनि उरलोचि मी ॥४२॥

एकले एक सूर्यबिंब गगनीं । तरि प्रभा फाके त्रिभुवनीं । तैसी ज्या एकाची सकळ जनीं । आज्ञा पाळिती ॥३०८॥

तया एकले न म्हणावे । वा निर्धन न समजावे । काय चाले कामधेनूसवे । सर्व सामुग्री? ॥३०९॥

तिज जो जेव्हा जे मागत । ते तात्काळ प्रसवू लागत । तैसे विश्वविभव तया अंगभूत- । होऊनि असे ॥३१०॥

तयां ओळखाया हीचि संज्ञा । अगा, वंद्य जयांची आज्ञा । ऐसे जे असती प्राज्ञा, । जाण अवतार माझे ॥३११॥

आता हे सामान्य, हे विशेष । ऐसे म्हणणे येथ महादोष । कारण की मीचि एक अशेष । विश्व आहे म्हणोनि ॥३१२॥

तरि आता आधारण, चांगला, ऐसे । कल्पावे विभाग कैसे । व्यर्थ भेदाचे कलंक ऐसे । लावावे मतीसी? ॥३१३॥

एरवी तरि तूप कासया घुसळावे । अमृत का रांधूनि अर्धे करावे । अगा वायूसि काय डावे-उजवे-। अंग आहे? ॥३१४॥

सूर्यबिंबा पाठीपोटी-। पाहता नाशेल आपुली दृष्टी । तैशा माझिया स्वरूपीं गोष्टी । सामान्य-विशेषांच्या नसती ॥३१५॥

जाणूनि अन्य अन्य विभूती । मज अपारा मापशील किती? । म्हणोनि किंबहुना सुभद्रापती । असो हे जाणणे ॥३१६॥

आता माझेचि एके अंशें । हे जग व्यापिले असे । यास्तव भेद सोडूनि सरिसे । समभावें भज ॥३१७॥

ऐसे ज्ञानीजनरूप वना वसंत । विरक्तांचा एकांत । बोलिले जेव्हा श्रीमंत-। श्रीकृष्ण देव; ॥३१८॥

तेव्हा अर्जुन म्हणे, स्वामी, । हे अविचारें बोलिला तुम्ही-। की भेद एक, आणि आम्ही । सोडणारे एक ॥३१९॥

अहो, म्हटले काय जगा सूर्यें-? । की तम दूर करी, मी उदये । कैसे तुज अविचारी म्हणावे? । हो अधिकप्रसंग, देवा ॥३२०॥

तुझे नावहि कोणे एके वेळे । जयांचे मुखा वा काना मिळे । तयांचे हृदयां सोडूनि पळे । भेदचि जी, खरोखर ॥३२१॥

तो तू लाभलास परब्रह्म पूर्ण- । दैवें करीं उदक सोडून । आता भेद कवण । देखावा कोणी, कोठे? ॥३२२॥

जी, चंद्रबिंबाचा गाभारा । शिरताचि का देत उबारा? । परि राजेपणें शारंगधरा । बोला हे तुम्ही ॥३२३॥

तेथ तात्काळ तोषोनि देवें । अर्जुना आलिंगिले जिवेंभावें । मग म्हणे, न कोपावे । आमुचिया बोलें तुवा ॥३२४॥

आम्ही भेदाचे वाटांनी । सांगितली विभूतींची कहाणी । ती अभेदें तुवा अंतःकरणीं । मानिली की न मानिली; ॥३२५॥

हेचि पाहण्यास्तव क्षणभर । बोलिलो बाह्यत: वरवर । तर विभूति तुज खरोखर । आल्या चांगल्या बोधा ॥३२६॥

येथ अर्जुन म्हणे, देवें-। हे आपुले आपण जाणावे । परि देखतसे विश्व आघवे । तुवा भरले ॥३२७॥

हे राजा, तो धनुर्धारी । ऐशा प्रतीतीसी वरी । या संजयाचे बोलावरी । निवांत राहे धृतराष्ट्र ॥३२८॥

संजय दुखावल्या अंतःकरणें म्हणे, । नवल नव्हे का दैव दवडणे? । हा शहाणा मी जाणे । परि आतही आंधळाचि ॥३२९॥

परि असो हे, तो अर्जुन । स्वहिताचा वाढवीतसे मान । अन्य त्वाहिवरि तया म्हणून । उत्कंठा उपजली ॥३३०॥

म्हणे, हीचि हृदयींची प्रतीती । बाहेरी अवतरो डोळ्यांप्रती । या इच्छेचे पाउलीं, मती-। उभी जाहली ॥३३१॥

याचि दोन्ही डोळ्यांनी । विश्वरूपा जावे भिडुनी । तो दैवाआगळा म्हणोनि । एवढी आस करी ॥३३२॥

आज तो कल्पतरूची शाखा । म्हणोनी वांझ फुले न येती देखा । जे जे ये तयाच्या मुखा । ते साच होय ॥३३३॥

प्रल्हाद म्हणे, सर्व पदार्थीं नारायण-। म्हणोनि हा विषाहिसह जाहला आपण । तो सद्‌गुरु लाभला श्रीकृष्ण । किरीटीसी ॥३३४॥

म्हणोनि विश्वरूप पुसावया सरसावत । कैसा निघेल पार्थ । ते सांगेन पुढील अध्यायात । ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा ॥३३५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP