समओवी ज्ञानेश्वरी - अध्याय पहिला
ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी या तिन्ही ग्रंथांतून काव्य आणि तत्वज्ञान संत ज्ञानेश्वर आपल्या विलक्षण भाषासौंदर्याने मराठी माणसाला विस्तारून सांगतात.
अध्याय पहिला
श्री गणेशासी नमन ॥ आदिॐकारा तुज नमन । वेदात तुझे प्रतिपादन । स्वानुभवे जयाचे ज्ञान । जय आत्मरूपा ॥१॥
देवा तूचि गणेश । सकळ बुद्धीचा प्रकाश । म्हणे निवृत्तिदास । ऐकावे जी ॥२॥
शब्दब्रह्म वेद अशेष । तीचि मूर्ति सुवेष । वर्णशरीर निर्दोष । मिरवीत असे ॥३॥
मनुस्मृती आदि अवयव । देखा अंगिचे भाव । तेथ लावण्याची ठेव । अर्थशोभा ॥४॥
अठरा ती पुराणे । रत्नखचित भूषणे । पदरचनेची कोंदणे । प्रमेयरत्नांसी ॥५॥
सुंदर पदलालित्य । तेचि रंगीत उत्तरीय । तलम वस्त्र साहित्य । झळकतसे ॥६॥
पहा काव्य नाटके या । अर्थध्वनि रुणझुणत्या । नाजुकशा घागर्या । शोभताती ॥७॥
नाना प्रमेयांच्या परी । निपुणपणे पाहता कुसरी । दिसती त्यात रत्ने भारी । उचित पदे ॥८॥
व्यासादि कवींच्या मती । त्याचि मेखला मिरविती । कमरेसि शुद्ध झळकती । दशा शेल्याच्या ॥९॥
दर्शने सहा म्हणत । तेचि श्रीगणेशाचे हात । त्यातिल भिन्न मते तेथ । आयुधे हाती ॥१०॥
परशु तो तर्कशास्त्रा । अंकुश तो न्यायशास्त्र । रसभरित वंदांतशास्त्र मोदक मिरवे ॥११॥
एके हाती दंत । तो स्वभावता खंडित । तो बौद्ध मतसंकेत । वार्तिकांचा ॥१२॥
सत्कारवाद साहजिक । वरदायी कमलहस्त देख । अभयहस्त धर्मस्थापक । स्वभावसिद्ध ॥१३॥
देखा विवेकवंत सुनिर्मळ । सोंड जणु सोट सरळ । तेथ परमानंद केवळ । महासुखाचा ॥१४॥
संवाद हाचि दंत । शुभ्र वर्ण समता दाविता । ज्ञानरूप सूक्ष्म नेत्र शोभत । ऐसा विघ्नराज देव ॥१५॥
पूर्व-उत्तर मीमांसा दोन्ही । गमती कानांचे स्थानी । बोधमदामृत मुनी । सेविती भ्रमराऐसे ॥१६॥
प्रमेयांची सतेज पोवळी । द्वैत-अद्वैत मतप्रणाली । गजमस्तकीं गंडस्थळीं । एकवटती तुल्यबळें ॥१७॥
औदार्यें ज्ञानमध देत । दशोपनिषदांची शोभतात । सुगंधी फुले मुगुटात । सुंदरशी ॥१८॥
चरणयुगुल हाचि अकार । विशाल उदर उकार । मस्तक महामंडलाकार । मकार ॐ कारातील ॥१९॥
हे तिन्ही एकवटत । संपूर्ण वेद कवळिले जात । तो मी गुरुकृपे नमित । आदिबीज गणेश ॥२०॥
आता अभिनव वाग्विलासिनी । चातुर्य-अर्थकलाकामिनी । ती शारदा विश्वमोहिनी । नमस्कारिली मी ॥२१॥
तारिले संसारपुरातुनी । ते सद्गुरु वसत ह्रदयातुनी । अत्यादर मजला म्हणुनी । विवेकाविषयी ॥२२॥
जैसे डोळ्यां अंजन भेटे । तेवेळी दृष्टीसी फाटा फुटे । तेथ महानिधी प्रगटे । सहजी जैसा ॥२३॥
चिंतामणी येता हाती । मनोरथ विजयी होती । तैसी निवृत्ति करी कामनापूर्ती । ज्ञानदेव म्हणे ॥२४॥
म्हणोनि अहो सुज्ञानी । व्हावे कृतकृत्य भजनीं । जैसे मुळासि देता पाणी । फांद्या पाने संतोषती ॥२५॥
अथवा तीर्थे जी त्रिभुवनीं । ती घडती समुद्रस्नानीं । वा अमृतरससेवनीं । रस सकळ ॥२६॥
तैसा पुन्हा पुन्हा तोचि । मी अभिवंदिला श्रीगुरुचि । जो इच्छित मनोरुची । पुरविता ॥२७॥
आता ऐका कथा गहन । जी सकळ कौतुका जन्मस्थान । की अभिनव उद्यान । विवेकतरूंचे ॥२८॥
सर्व सुखांचे उगमस्थान । प्रमेयांचे आगर महान । वा नवरसीं परिपूर्ण । अमृतसागरचि ॥२९॥
की परमधाम प्रकट । सर्व विद्यांचे मूळपीठ । सर्व शास्त्रांमध्ये श्रेष्ठ । ऐसी कथ ही ॥३०॥
अथवा सकळ धर्मांचे माहेर । सज्जनांचे जिव्हार । लावण्यरत्नभांडार । शारदेचे ॥३१॥
नाना कथारूपें सरस्वती । प्रकटली असे त्रिजगतीं । आविष्कारातुनि महामती । व्यासांचिया ॥३२॥
म्हणोनि हा काव्यां राव- । ग्रंथ, थोरवीचा ठाव । येथुनि रसां लाभला गौरव । रसाळपणाचा ॥३३॥
तैसे ऐका आणिक एक । येथुनि शब्दश्री जाहली सशास्त्रिक । आणि ब्रह्मज्ञानीं कोवळीक । दुणावली ॥३४॥
येथ चातुर्य शहाणे झाले । प्रमेय रुचिसी आले । आणि सौभाग्य पोषले । सुखाचे येथ ॥३५॥
माधुर्यीं मधुरता । शृंगारीं सुरेखता । योग्य वस्तूसी श्रेष्ठता । दिसे भली ॥३६॥
येथ कलांसि आले कौशल्य । पुण्यासि आगळे सामर्थ्य । म्हणोनि जनमेजयाचे पापकृत्य । नाहीसे जाहले ॥३७॥
आणि पाहता क्षण एक । रंगीं सुरंगता अधिकाधिक । गुणां सगुणपणाचे अलौकिक । सामर्थ्य बहुत ॥३८॥
सूर्यतेजें प्रकाशले । जैसे त्रैलोक्य दिसे उजळले । तैसे व्यासबुद्धीने व्यापिले । शोभे विश्व ॥३९॥
की सुक्षेत्रीं बीज पेरिले । ते आपल्यापरी विस्तारले । तैसे महाभारती फुलले । सकळही पुरुषार्थ ॥४०॥
नगरीं करिता वसती । जन सारे नागर होती । तैसी तेजस्वी व्यासोक्ती । उजळित सकळां ॥४१॥
वा नवतारुण्यकाळीं । लावण्याची नव्हाळी । प्रगटे जैसी आगळी । स्त्रीचे अंगी; ॥४२॥
वसंतीं फुले उद्यान । वनशोभेची उघडे खाण । आधीहुनी असाधारण । ज्यापरी गा; ॥४३॥
जैसे लगडीतील सुवर्ण । न्याहाळिता साधारण । मग अलंकारीं सुंदरपण । आगळेचि दावी ॥४४॥
तैसे व्यासें करिता अलंकृत । आपणा चांगुलपण लाभत । हे जाणुनि काय आश्रयत । कथा महाभारतीं? ॥४५॥
जगीं पूर्ण प्रतिष्ठा इच्छुनी । सानपण अंगीं धरूनी । पुराणे आख्यानरूपांनी । महाभारतीं आली ॥४६॥
म्हणोनि महाभारतीं जे नाही । ते नाहीचि लोकीं तिन्ही । याकारणें म्हणती पाही । व्यासोच्छिष्ट जगत्रय ॥४७॥
ऐसी सुरस जगीं कथा । जी जन्मभूमी परमार्था । मुनि वैशंपायन नृपनाथा - । सांगे जनमेजया ॥४८॥
ही अद्वितीय उत्तम । अतिपवित्र निरुपम । परममंगलधाम । अवधारावी कथा ॥४९॥
गीतानामक प्रसंग । भारतीं जणु कमलपराग । संवादें कथिती श्रीरंग । अर्जुनासी ॥५०॥
वेदांचा सागर व्यासांनी । आपुल्या बुद्धीने मंथुनी । हे अपार लोणी । काढियेले ॥५१॥
मग ज्ञानाग्निसंपर्कें । कढविले विवेकें । त्या आला परिपाकें । साजुक गंध ॥५२॥
विरागी जे अपेक्षिती । संत सदा अनुभविती । पारंगत ज्ञानी रमती । सोऽहंभावे जेथ ॥५३॥
भक्तां श्रवणीय मधुर । त्रैलोक्यीं प्रथम नमस्कार । भीष्मपर्वीं संगतवार । सांगितली ती गीता ॥५४॥
जियेसि भगवद्गीता म्हणती । ब्रह्मा शंकर प्रशंसिती । सनकादिक राजे सेवितो । आदराने ॥५५॥
जैसे शरदाचे चंद्रकळेत । अमृतकण कोवळे तेथ । चकोरपिल्ले वेचित । कोमल मनें; ॥५६॥
तयापरि होऊनि श्रोता । अनुभवावी ही कथा । अति हळुवारपण चित्ता । आणूनिया ॥५७॥
शब्दाविण संवादावी । इंद्रियां नकळता भोगावी । बोलण्याआधीचि भिडावी । प्रमेये कथेतील ॥५८॥
कमळदळा नकळत । भ्रमर जैसे पराग नेत । त्यापरी असावे सेवित । ग्रंथतत्त्वे ही ॥५९॥
आपुले स्थान न सोडिता । आलिंगी चंद्रा तो प्रकटता । हा अनुराग कैसा ये भोगता । कमलिनी जाणे ॥६०॥
तैशा गंभीरपणे । स्थिरावल्या अंत:करणें । संपन्न तोचि जाणे । रहस्य या गीतेचे ॥६१॥
बैसोनि अर्जुनाचे पंक्तीस । संत जे योग्य ऐकण्यास । तयांनी कृपा करुनि कथेस । ध्यान द्यावे ॥६२॥
हे सलगीने मी म्हटले । चरणीं लागोनि विनविले । प्रभु, सखोल ह्रदय आपुले । म्हणूनिया ॥६३॥
मायबापांचा स्वभाव जैसा । अपत्य बोले जरि बोबडी भाषा । तरि अधिकचि संतोषा । पावती ते; ॥६४॥
तैसे तुम्ही मज अंगिकारिले । सज्जनांनी आपुले म्हटले । उणेपण सहजी साहिले । मग प्रार्थू कशासी? ॥६५॥
परि अपराध तो आणिक आहे । गीतार्थ मी कवळू पाहे । ऐकावे ऐसे विनविताहे । आपणासी ॥६६॥
हे अनावर साहस । व्यर्थ चित्ता लागे ध्यास । भानुतेजीं काजव्यास । शोभा काय? ॥६७॥
टिटवा चोचीने जैसा । सागराचा करू पाहे उपसा । अल्पमती मी तैसा । प्रवृत्त येथ ॥६८॥
जर आकाश कवळावे । तर आणिक त्याहुनि थोर व्हावे । मनीं आणिता हे आघवे । अपात्र मी ॥६९॥
या गीतार्थाचे थोरपण । स्वये शंभू करी विवरण । जेथ भवानी करी प्रश्न । विस्मयाने ॥७०॥
तेथ म्हणे न उमजे । देवी जैसे स्वरूप तुझे । तैसे नित्यनूतन दिसे जे । गीतातत्त्व; ॥७१॥
या गीतार्थसागराचे गाजणे । जयाचे योगनिद्रितिल घोरणे । स्वयें त्या सर्वेश्वराने । प्रत्यक्ष सांगितले ॥७२॥
ऐसे जे अगाध । जेथ वेडावती वेद । तेथ अल्पमती मी मंद । काय होय? ॥७३॥
हे अपार कैसे कवळावे ? । सूर्यतेजा कोणी उजळावे? । गगन मुठीत धरावे । चिलटाने कैसे? ॥७४॥
परि असे एक आधार । तेवी बोले मी करूनि धीर । अनुकूल मज गुरुवर । ज्ञानदेव म्हणे ॥७५॥
एरवी तर मी मूर्ख । जरी जाहला अविवेक । तरी संतकृपेचा दीपक । सोज्ज्वळ असे ॥७६॥
लोहाचे सुवर्ण होत । हे सामर्थ्य केवळ परिसात । मृतासीही मिळता अमृत । जीवित लाभे ॥७७॥
जर साक्षात सरस्वीती प्रकटे । तर मुक्यासीही वाचा फुटे । यात नवल काय मोठे? । वस्तुसामर्थ्यशक्ती ही ॥७८॥
कामधेनू जयाची माय । तया अप्राप्य ते काय? । म्हणोनि मी प्रवृत्त होय । करण्या ग्रंथ हा ॥७९॥
परि उणे ते पुरते करावे । अधिक ते सोडूनि द्यावे । योग्य तेचि तुम्ही घ्यावे । विनवीत असे ॥८०॥
आता द्यावे जी, ध्यान । आपण बोलविते, मी बोलेन । नाचे सूत्रधाराचे आधीन । बाहुली जशी कळसूत्री; ॥८१॥
तैसा मी अनुग्रहीत । साधूंचा निरोप्या सार्थ । करावे मज अलंकारित । हवे तसे त्यांनी ॥८२॥
तेव्हा श्रीगुरू म्हणती पाही । हे तुज बोलावे नलगे काही । आता ग्रंथा चित्त देई । झडकरी ॥८३॥
श्रीगुरूंच्या या बोलांनी । निवृत्तिदास अति उल्हसुनी -। म्हणे स्वस्थ चित्त देउनी । ऐकावे हे ॥८४॥
धृतराष्ट्र म्हणाला:
त्या पवित्र कुरुक्षेत्रीं पांडूचे आणि आमुचे
युद्धार्थ जमले तेव्हा वर्तले काय संजया ॥१॥
तर पुत्रप्रेमें मोहित । धृतराष्ट्र संजया पुसत । कुरुक्षेत्रींचे काय वृत्त । सांग मज ॥८५॥
धर्माचे घर कुरुक्षेत्र जे । तेथ पांडव आणि पुत्र माझे । गेले असती थोर राजे । झुंजण्यानिमित्त ॥८६॥
ते इतुक्यावेळपावत । काय करिती परस्परांत । ते झडकरी मजप्रत । कथन करी ॥८७॥
संजय म्हणाला:
पाहिली पांडवी सेना सज्ज दुर्योधनें तिथे
मग गेला गुरुपाशी त्यास हे वाक्य बोलिला ॥२॥
गुरुजी तुमचा शिष्य शाहणा द्रुपदात्मज
विशाळ रचिले त्याने पहा पांडवसैन्य हे ॥३॥
त्यावेळी तो संजय बोले । पहा पांडवसैन्य खवळले । जैसे महाप्रळयीं परसरले । कृतांतमुख ॥८८॥
तैसे सैन्य घनदाट । उठावले एकवट उसळले जैसे काळकूट । शमवी कोण? ॥८९॥
अथवा वडवानल पेटला । प्रळयवातें पोषला । सागरा शोषूनि उसळला । आकाशासी ॥९०॥
तैसे सैन्य भयंकर । नाना व्यूहरचनीं तत्पर । भासले अति भेसूर । त्याकाळी ॥९१॥
कळप हत्तींचा मदोन्मत्त । सिंहाचे नसे खिजगणतीत । तैसे दुर्योधन तुच्छ लेखित । पांडवसैन्य ॥९२॥
मग तो द्रोणापाशी आला । तयासी म्हणे, देखिला? । कैसा सैन्यसमूह उसळला । पांडवांचा ॥९३॥
गिरिदुर्ग जैसे चालते । तैसे विविध व्यूह सभोवते । हे रचिले बुद्धिमंतें । द्रुपदकुमरें ॥९४॥
जो तुम्ही शिकवियला । विद्या देऊनि शहाणा केला । तयाने हा सैन्यसिंह उभारिला । पहा पहा ॥९५॥
ह्यात शूर धनुर्धारी युद्धीं भीमार्जुनांसम
महारथी तो द्रुपद विराट नृप सात्यकि ॥४॥
आणिकही असाधारण । जेशस्त्रास्त्रीं प्रवीण । क्षात्रधर्मीं निपुण । वीर आहेत; ॥९६॥
जे बल-थोरवी-पौरुषें । भीमार्जुनांसारिखे । ते सांगेन कौतुकें । प्रसंगेंचि ॥९७॥
येथ युयुधान सुभट । आला असे विराट । महारथी श्रेष्ठ । द्रुपदवीर ॥९८॥
धृष्टकेतु तसा शूर काश्य तो चेकितानहि
पुरुजित् कुंतिभोजीय आणि शैब्य नरोत्तम ॥५॥
उत्तमौजाहि तो वीर युधामन्युहि विक्रमी
सौभद्र आणि ते पुत्र द्रौपदीचे महारथी ॥६॥
चेकितान धृष्टकेतु येथ । काशीश्वर वीरश्रेष्ठ सार्थ । उत्तमौजा नृपानाथ । पहा शैब्यराजा ॥९९॥
हा कुंतिभोज पाहे । येथ युधामन्युअ आला आहे । आणि पुरुजितादि राजे हे । सकळ देख ॥१००॥
द्रोणाचार्या म्हणे दुर्योधन । हा सुभद्राह्रदयनंदन । अहो दुसरा की अर्जुन । पहावे अभिमन्यूसी ॥१०१॥
आणिकही द्रौपदीकुमार । सकळही महारथी वीर । हे अगणित अपार । जमले असती ॥१०२॥
अता जे आमुच्यातील सैन्याचे मुख्य नायक
सांगतो जाणण्यासाठी घ्यावे लक्षात आपण ॥७॥
स्वता आपण हे भीष्म यशस्वी कृप कर्ण तो
अश्वत्थामा सौमदत्ति जयद्रथ विकर्णहि ॥८॥
आता आमुचे द्ळीं प्रमुख । जे विख्यात वीर सैनिक । ते प्रसंगोपात एकेक । सांगतो ऐका ॥१०३॥
या उद्देशें एक दोन । नावे जातसे बोलून । तुम्ही आदिकरून । मुख्य जे जे ॥१०४॥
हा गंगापुत्र भीष्प पहा । प्रतापें तेजस्वी सूर्य हा । शत्रुरूप हत्तींस सिंह अहा । हा वीर कर्ण; ॥१०५॥
हे एकेक मनिं आणितील । तर संहार विश्वाचा करितील । हा कृपाचार्यहि पुरेल । एकलाचि ॥१०६॥
येथ विकर्ण वीर आहे । हा अश्वत्थामा पैल, पाहे । तयाचे भय सदा वाहे । यमही मनीं ॥१०७॥
समितिंज्य सौमदत्ती । ऐसे आणिकही बहुत असती । जयांचे बळाची मिती । ब्रह्यदेवही न जाणे ॥१०८॥
अनेक दुसरे वीर माझ्यासाठी मरावया
सजले सर्व शस्त्रांनी झुंजणारे प्रवीण जे ॥९॥
जे शस्त्रविद्येत पारंगत । मंत्रविद्याचि मूर्तिमंत । अहो अवघे अस्त्रजात । येथूनचि रूढ ॥१०९॥
हे अद्वितीय योद्धे जगीं । प्रताप पुरेपूर अंगीं । प्राणपणाने मजलागी । मिळाले असती ॥११०॥
पतिव्रतेचे ह्रदय जैसे । पतीवाचूनी कोणा न स्पशें । मी सर्वस्व यांसि तैसे । वीर योद्ध्यांसी ॥१११॥
आमुचिया कार्यापुढती । आपुले जीवित तोकडे मानितो । ऐसे हे उत्तम अती । स्वामिभक्त ॥११२॥
युद्धकला चातुर्य जाणिती । कौशल्यें कीर्ती संपादिती । हे बहु असो, क्षात्रनीती । यांचेचिपासुनी ॥११३॥
ऐसे परिपूर्ण सर्व अंगांनी । वीर आमुच्या दळांतुनी । यांची गणति करावी कोणी? । अपार हे ॥११४॥
अफाट आमुचे सैन्य भीष्मांनी रक्षिले असे
मोजके पांडवांचे हे भीमाने रक्षिले असे ॥१०॥
त्वावरि क्षत्रियांमाजी श्रेष्ठ सिद्ध । जो जगीं योद्धा प्रसिद्ध । त्या भीष्मांसी अधिकारपद । सेनापतीचे ॥११५॥
यांनीचि सैन्यसमूह रचिले । ते दुर्ग जैसे शोभले । त्रैलोक्यही धाकुले । यांचेपुढे ॥११६॥
आधीचि पहा सागर । तया उल्लंघिणे दुस्तर । मग वडवानल त्याचा जर । साह्यकर्ता; ॥११७॥
प्रळयाग्नि आणि वादळवात । दोहोंचे संघटन होत । तैसा हा भीष्म गंगापुत्र येथ । सेनापती ॥११८॥
आता यासी कोण भिडे? । पांडवसैन्य खचित थोडे । आमुच्या सैन्यापुढे तोकडे । दिसतसे ॥११९॥
वरि भीमसेन दांडगा अती । जाहला असे सेनापती । ऐसे बोलोनि तयाने ती । सोडिली गोष्ट ॥१२०॥
राहूनि आपुल्या स्थानी जेथे ज्यास नियोजिले
चहुकडूनि भीष्मांस रक्षाल सगळेजण ॥११॥
मग पुनरपि काय बोले । सकळ सेनापतींसि म्हटले । आता सैन्यचमू आपापले । सज्ज करा ॥१२१॥
जयांच्या ज्या अक्षौहिणी । तयांनी त्या युद्धस्थानी । विभागुनी द्याव्या वाटुनी । महारस्थांकडे ॥१२२॥
तयांनी त्यांसि सांभाळावे । भीष्माज्ञेत राहावे । मग द्रोणासि म्हणे पाहावे । तुम्ही सकळ ॥१२३॥
हा भीष्म एक रक्षावा । मी तैसा हा देखावा । यानेचि दळभार आघवा । समर्थ आमुचा ॥१२४॥
हर्षवीतचि तों त्यास सिंहनाद करूनिया
प्रतापी वृद्ध भीष्मांनी मोठयाने शंख फुंकिला ॥१२॥
या दुर्योधनाच्या बोला । सेनापती संतोषला । मग तयाने केला । सिंहनाद ॥१२५॥
तो गाजर असे अद्भुत । त्या दोन्हीही सैन्यांत । प्रतिध्वनी नभीं न समावत । फिरफिरूनि विनादे ॥१२६॥
त्या प्रतिध्वनींसवे स्फुरुनी । वीरवृत्ती उसळुनी । दिव्य शंख भीष्मांनी । गर्जविला ॥१२७॥
ते दोन्ही नाद मिळाले । तेथ त्रैलोक्य बधिर जाहले । जैसे आकाश की पडले । तुटोनिया ॥१२८॥
धडधडत अंबर । उचंबळत सागर । भेदरले चराचर । कापत असे ॥१२९॥
त्या महाघोष गजरांनी । गिरिकंदरे जात दुमदुमुनी । तोंचि त्या सैन्यांतुनी । घुमली रणवाद्य ॥१३०॥
तत्क्षणीं शंखभेर्यादि रणवाद्ये विचित्रचि
एकत्र झडली तेव्हा झाला शब्द. भयंकर ॥१३॥
उदंड वाजे चहुबाजूस । भयानक कर्कश । जेथ धैर्यवानास । महाप्रलय वाटे ॥१३१॥
नौबत डंके ढोल धडधडत । शंख झांजा कर्णे घणघणात । रणगर्जना भयंकर घुमत । वीर योद्ध्यांच्या ॥१३२॥
आवेशें दंड ठोकिती । त्वेषें हाका घालिती । जेथ मदोन्मत्त हत्ती । आवरतीना; ॥१३३॥
भ्याडांची काय कथा तेथ ?। कचरले ते कस्पटपरि उडत । यमही तोंड लपवीत । धडकी भरूनी ॥१३४॥
कोणाचे उभ्याउभ्याचि प्राण जात । भल्यांची दातखीळ बसत । बिरुदांचे धनी कापत । थरथर ॥१३५॥
ऐसा अद्भुत वाद्यबंबाळ । देखोनि ब्रह्या व्याकुळ । देव म्हणती प्रळयकाळ । ओढवला आज ॥१३६॥
ऐसी स्वर्गीची कथा । देखोनि त्या आकांता । इकडे पांडवसैन्यात आता । जाहले काय? ॥१३७॥
रथ तो विजयाचे सार । वा महातेजाचे भांडार । जया गरुडतुल्य चार । जुंपिले घोडे ॥१३८॥
इकडे शुभ्र घोडयांच्या मोठया भव्य रथातुनी
माधवें अर्जुनें दिव फुंकिले शंख आपुले ॥१४॥
पंख फुटुनि मेरू जैसा । दिव्य रथ मिरवे तैसा । तेजें कोंदाटल्या दिशा । जयाचिया ॥१३९॥
जेथ वैकुंठीचा राणा श्रीकृष्ण । सारथी जाहला आपण । त्या रथाचे गुण ॥ काय वर्णावे? ॥१४०॥
ध्वजस्तंभावरि वानर । तो मूर्तिमंत शंकर । सारथी शारंगधर । अर्जुनासी ॥१४१॥
पहा नवल त्या प्रभूचे । उद्भुत प्रेम भक्ताचे । जो सारथ्य पार्थाचे । करित असे ॥१४२॥
सेवक पाठीशी घातला । आपण पुढे राहिला । पांचजन्य शंख फुंकिला । लीलया तयाने ॥१४३॥
पांचजन्य ह्रषीकेशें देवदत्त धनंजयें
पौंड् त फुंकिला भीमें महाशंख महाबळें ॥१५॥
परि तो महाघोष घोर । गर्जत असे गंभीर । जैसा उगवला दिनकर । लोपवी नक्षत्रांते; ॥१४४॥
तैसे वाद्यबंबाळ भवते । कौरवदळी गर्जत होते । लोपुनि कोठल्याकोठे ते । गेले तेथ ॥१४५॥
तैसाचि दुसरा देख । अति गंभीर निनादे शंख । तो देवदत्त नामक । फुंकिला अर्जुनें ॥१४६॥
ते अद्भुत शंखध्वनी । दोन्ही जाता एकवटुनी । ब्रह्मांडाच्या ठिकर्या उडुनी । शतचूर्ण हो पाहे ॥१४७॥
तों भीमसेना आवेश चढला । जैसा महाकाळ खवळला । तयें पौंड्नामक घुमविला । महाशंख ॥१४८॥
तेव्हा अनंतविजय धर्मराज युधिष्ठिरें
नकुळें सहदेवेंहि सुघोष मणिपुष्पक ॥१६॥
गडगडाट प्रळयमेघांचा । गहिरा नाद तसा पौंड्राचा । तोंचि घुमला युधिष्ठिराचा । अनंतविजय शंख ॥१४९॥
सुघोष शंख नकुलाने । मणिपुष्पक सहदेवाने । फुंकिता, त्या ध्वनीने । गडबडला काळही ॥१५०॥
मग काश्य धनुर्धारी शिखंडीहि महारथी
विराट आणि सेनानी तसा अजित सात्यकि ॥१७॥
राजा द्रुपद सौभद्र द्रौपदीचेहि पुत्र ते
सर्वांनी फुंकिले शंख आपुले वेगवेगळे ॥१८॥
तेथ भूपति होते अनेक । द्रुपद द्रौपदेय आदिक । हा काशीपति देख । महाबाहु ॥१५१॥
अभिमन्यु अर्जुनसुत । सात्यकि अपराजित । धृष्टद्युम्न नृपनाथ । आणि शिखंडी ॥१५२॥
राजे विराट आदिक । जे जे सैनिकवीर प्रमुख । तयांनी निरंतर नाना शंख । घुमविले ॥१५३॥
त्या महाघोषआघातांनी । शेष कूर्म जाती गडबडुनी । पृथ्वीचा भार टाकुनी - । देऊ पाहती ॥१५४॥
तेथ तिन्ही लोक डळमळे । मेरू मांडार आंदोळे । समुद्रजळ उसळे । कैलासापावत ॥१५५॥
त्या घोषें कौरवांची तों ह्रदयेचि विदारिली
भरूनि भूमि आकाश गाजला तो भयंकर ॥१९॥
पृथ्वीतळ उलथू पाहत । आकाशा हिसके बसत । तेथ सडा होत । नक्षत्रांचा ॥१५६॥
सृष्टी गेली रे गेली । देवां उरला ना वाली । ऐसी एक आवई उठली । सत्यलोकीं ॥१५७॥
दिवसाचि सूर्य़ थांबला । जैसा प्रळयकाळ मांडला । तैसा हाहा: कार उडाला । तिन्ही लोकीं ॥१५८॥
तेव्हा कृष्णपरमात्मा विस्मित । म्हणे हो काय पृथ्वीचा अंत । मग लोपविला अद्भुत । क्षोभ तयें ॥१५९॥
म्हणोनि विश्व सावरले । एरवे युगान्त होते ओढवले । जेव्हा महाशंख फुंकिले । कृष्णादिकांनी ॥१६०॥
तो घोष जरि शांत झाला । तरि पडसाद घुमत राहिला । तेणें दळभार विध्वंसिला । कौरवांचा ॥१६१॥
जैसा सिंह हत्तींचे कळपात । लीलया पांगापांग करीत । तैसा तो ह्रदया भेदित । कौरवांच्या ॥१६२॥
तो गाजता ध्वनी ऐकून । उभ्याउभ्याचि गळे अवसान । एकमेका सांगती म्हणून । सावध रे सावध ॥१६३॥
मग नीट उभे सारे पुन्हा कौरव राहिले
चालणार पुढे शस्त्रे इतुक्यात कपिध्वज ॥२०॥
बलाढया शूर पुरेपूर । जे होते महारथी वीर । तयांनी पुनरपि देऊनि धीर । सावरिले सैन्य ॥१६४॥
मग सरसावुनी उठावले । दुणावल्या आवेशें उसळले । त्या आघातें क्षोभले । लोकत्रय ॥१६५॥
बाणावरी बाण धनुर्धर । वर्षताति निरंतर । जैसे प्रळयकाळीं अनिवार । वर्षती मेघ ॥१६६॥
अर्जुन ते पाहत । मनीं संतोष पावत । मग उत्सुक नजर लावित । सैन्याकडे ॥१६७॥
युद्धा सज्ज जाहले । सकळ सैनिक देखिले । मग लीलया धनुष्य उचलिले । पंडुपुत्राने ॥१६८॥
अर्जुन म्हणाला:
हातीं धनुष्य घेऊनि बोले कृष्णास वाक्य हे
दोन्ही सैन्यांमध्ये कृष्णा माझा रथ उभा करी ॥२१॥
त्यावेळी अर्जुन म्हणे देवा । आता झडकरि रथ हाकावा । नेऊनि मध्ये घालावा । दोन्ही द्ळांच्या; ॥१६९॥
म्हणजे कोण पाहीन राखिती युद्धकामना
आज ह्या रणसंग्रामीं कोणाशीं झुंजणे मज ॥२२॥
झुंजते वीर ते सारे घेतो पाहूनि येथ मी
युद्धी त्या हतबुद्धीचे जे करू पाहती प्रिया ॥२३॥
म्हणजे मी क्षणभर । हे सकळ सैनिक वीर । न्याहाळीन पुरेपूर । झूंजणार जे ॥१७०॥
येथ आले असती आघवे । परि कवणासी मी झुंजावे । हे रणीं लागे पाहावे । म्हणूनिया ॥१७१॥
बहुतकरुनी कौरव । उतावळे दुष्टबुद्धी सर्व । पुरुषार्थाविण हाव । धरिती युद्धीं ॥१७२॥
झुंजायाची हौस पुरती । परि संग्रामीं धीर न धरिती । हे सांगोनि रायाप्रती । काय संजय म्हणे ॥१७३॥
संयय म्हणाला:
अर्जुनाचे असे वाक्य कृष्णें ऐकूनि शीघ्नचि
दोन्ही सैन्यांमध्ये केला उभा उत्तम तो रथ ॥२४॥
ऐका अर्जुन ऐसे बोलिला । तेव्हा कृष्णें रथ हाकिला । दोन्ही सैन्यांमध्ये केला । उभा तयाने ॥१७४॥
मग लक्षुनिया नीट भीष्म - द्रोण - नृपांस तो
म्हणे हे जमले पार्था पहा कौरव सर्व तू ॥२५॥
तेथ अर्जुन तो पाहे उभे सारे व्यवस्थित
आजे काके तसे मामे सासरे सोयरे सखे ॥२६॥
गुरु बंधु मुले नातू दोन्ही सैन्यात सारखे
असे पाहूनि तो सारे सज्ज बांधव आपुले ॥२७॥
जेथ भीष्म द्रोणादिक । आप्तस्वकीय सन्मुख । पृथ्वीपती आणिक । बहुत असती ॥१७५॥
तेथ स्थिर करूनि रथ । अर्जुन असे पाहत । तो सैन्यचमू समस्त । उत्सुकतेने ॥१७६॥
मग देवा म्हणे पहा तर । सकळ हे आप्त गुरुवर । तेव्हा कृष्ण मनीं क्षणभर । विस्मित जाहला ॥१७७॥
तो आपणासीचि म्हणे । येथ काय कोण जाणे । हे मनीं धरिले याने । विलक्षण काही ॥१७८॥
पुढील काळाचा वेध घेत । तो सहजी जाणे ह्रदयस्थ । परि उगा असे निवांत । त्यावेळी ॥१७९॥
तेव्हा तेथ सकळ । चुलते आजे केवळ । गुरु बंधु मातुलकुळ । पाही पार्थ ॥१८०॥
इष्टमित्र आपुले । कुमारजन पाहिजे । हे सकळ असती आले । तयांमाजी ॥१८१॥
जिवलग मित्र सासरे । आणिकही सखेसोयरे । पुत्र नातू तेथ सारे । पाहिले तयाने ॥१८२॥
जयांवरि उपकार होते केले । वा आपत्काली रक्षिले । हे असो, वडिल धाकुले । आदिकरूनी ॥१८३॥
दोन्ही दळीं गोतचि आपुले । ऐसे युद्धा सज्ज जाहले । हे अर्जुनें अवलोकिले । त्यावेळी ॥१८४॥
अत्यंत करुणाग्रस्त विषादें वाक्य बोलिला
मनीं उलघात झाली । आणि नकळत करुणा आली । त्या अपमानें त्यजुनि निघाली । वीरवृत्ती ॥१८५॥
ज्या उत्तम कुळींच्या असती । आणि गुणलावण्यवती । कधी दुसरीते न साहती । तेजस्विनी त्या ॥१८६॥
नव्या आवडीचे भरे । कामुक निजवनिता विसरे । मग योग्यतेविण दुजी अनुसरे । भ्रमला जैसा; ॥१८७॥
तपोबळें लाभता ऋद्धी । विराग्याची भ्रमे बुद्धी । मग तया वैराग्यसिद्धी । आठवेना; ॥१८८॥
तैसे अर्जुना तेथ जाहले । असते पौरुष गेले । कारण अंतःकरण दिधले । कारुण्यासी ॥१८९॥
मांत्रिक मंत्रोच्चार चुकला । तर बाधा होय तयाला । तैसा अर्जुन जाय ग्रासला । महामोहें ॥१९०॥
म्हणूनि खचले धैर्य । द्रवले करुणेने ह्र्दय । जैसे चांदणाचे शिंपण होय । आणि पाझरे चंद्रकांतमणी ॥१९१॥
त्यापरी तो पार्थ । अतिस्नेहें मोहित । सखेद असे बोलत । अच्युतासी ॥१९२॥
अर्जुन म्हणाला:
कृष्णा स्वजन हे सारे युद्धीम उत्सुक पाहुनी ॥२८॥
गात्रेचि गळाती माझी होतसे तोंड कोरडे
शरीरीं सुटतो कंप उभे रोमांच राहती ॥२९॥
गांडीव न टिके हातीं सगळी जळते त्वचा
न शकेचि उभा राहू मन हे भ्रमले जसे ॥३०॥
तो म्हणे पहा देवा । मी देखिला हा मेळावा । तोंचि गोत्रवर्ग आघवा । देखिला येथ ॥१९३॥
हे युद्धासि उद्युक्त । जाहले असती समस्त । परि आम्हा लढणे उचित । कैसे होई? ॥१९४॥
या नावेंचि सुचेना काही । मज भान सर्वथा नाही । मन बुद्धि आपुल्या ठायी । स्थिर नसती ॥१९५॥
देहा कापरे भरते । तोंडा कोरड पडते । विकलता येते । अवघ्या गात्रां ॥१९६॥
सर्वागा काटा येई । मना यातना होई । लुळा पडे हातही । गांडीव धनुष्य धरिता ॥१९७॥
धरेधरेतों ते निसटले । नकळता हातोनि पडले । ह्रदय ऐसे व्यापिले । या मोहाने ॥१९८॥
जे वज्राहून कठीण । दुर्धर अति दारुण । त्याहुनी स्नेह असाधारण । हे नवल ॥१९९॥
युद्धात शंकरा जिंकिले । निवातकवचा नष्ट केले । त्या अर्जुना मोहें कवळिले । क्षणामाजी ॥२००॥
भ्रमर सहजी पोखरी । कोणतेही कोरडे काष्ठ जरी । कलिकेमाजी सापडे परी । कोवळ्याशा; ॥२०१॥
तेथ करी प्राणार्पण । परि कमळदळ चिरण्या न होई मन । तैसे कोवळेपणे कठीण । मोहपाश ॥२०२॥
ही आदिपुरुषाची माया । ब्रहम्याही अवघड कळावया । म्हणुनि तिने भुलविले, ऐक राया, । संजय म्हणे ॥२०३॥
अवधारी, मग तो अर्जुन । देखोरि सकळ स्वजन । विसरला अभिमान । संग्रामींचा ॥२०४॥
न जाणे कैसी सदयता । उपजली तयाचे चित्ता । मग म्हणे कृष्णा आता । नसावे येथ ॥२०५॥
माझे अति व्याकुळ मन । जातसे बोबडी वळून । या अवघ्यां वधावे म्हणून । घेताचि नाव ॥२०६॥
कृष्णा मी पाहतो सारी विपरीतचि लक्षणे
कल्याण न दिसे युद्धीं स्वजनांस वधूनिया ॥३१॥
या कौरवां जर वधावे । तर युधिष्ठिरादि का न वधावे । हे एकमेक आघवे । गोत्रज आमुचे ॥२०७॥
म्हणोनि जळो ही झुंज । कृष्णा, न कळे मज । स्पधेल काय काज । महापापें या? ॥२०८॥
देवा, अनेकपरी पाहता ॥ अकल्याण होईल झुंजता । आले जर ते चुकविता । तर होईल लाभ ॥२०९॥
नको जय नको राज्य नकोत मज ती सुखे ।
राज्यें भोगें मिले काय किंवा काय जगूनिही ॥३२॥
ज्यांच्यासाठी अपेक्षावी राज्य भोग सुखेहि ती
सजले तेचि युद्धास धना - प्राणांस सोडुनी ॥३३॥
त्या विजयाकांक्षेसि काही । मज कर्तव्य सर्वथा नाही । ऐसे राज्य मिळवुनिही । करावे काय? ॥२१०॥
या सकळांसी वधावे । मग जे राज्यभोग भोगावे । ते जळोत आघवे । पार्थ म्हणे ॥२११॥
त्या सुखांवाचून । काही भलतेही करू सहन । हवे तर वेचू प्राण । याचिसाठी; ॥२१२॥
परि यांचा घात करून । भोगावे राज्य आपण । हे स्वप्नीही माझे मन । करू न धजे ॥२१३॥
तर आम्ही का जन्मावे? । कोणासाठी जगावे? । वडिलधार्यांचे का चिंतावे । अहित मनीं? ॥२१४॥
पुत्राते इच्छी कुळ । तयाचे काय हेचि फळ? । की संहारावे सकळ । गोत आपुले? ॥२१५॥
हे मनींचि कैसे धरावे? । वज्रापरि कठोर कैसे बोलावे? । होईल ते भले करावे । किंबहुना तयांचे ॥२१६॥
आम्ही जे जे जोडावे । ते या सार्यांनी भोगावे । हे जीवितही अर्पावे । यांचेसाठी ॥२१७॥
देशोदेशींचे भूपाळ । युद्धात जिंकुनी सकळ । संतोषवावे आम्ही कुळ । आपुले जे; ॥२१८॥
परि कर्मगती विपरीत । तेचि हे समस्त । झाले असती उद्युक्त । झुंजावया; ॥२१९॥
अंतःपुरीच्या स्त्रिया, संतान । सोडोनिया आपुले धन । तलवारीवरि प्राण । ठेवुनिया ॥२२०॥
ऐशांना कैसे मारू? । कोणावरी शस्त्र धरू? । निजह्रदयाचाचि करू । घात कैसा ? ॥२२१॥
आजे बाप मुले नातू आमुचे दिसती इथे
सासरे मेहुणे मामे संबंधी आणि हे गुरु ॥३४॥
का न जाणिसी हे कोण । पत्नीकडे भीष्म द्रोण । जयांचे उपकार असाधारण । आम्हावरी बहुत ॥२२२॥
येथ मेहुणे मामे सासरे । आणि बंधू की हे सारे । पुत्र नातू मित्र रे । आप्तेष्टही असती ॥२२३॥
ऐक हे अति जवळिकेचे । सकळही सोयरे आमुचे । हत्त्या यांची वदण्याचे । पाप नको ॥२२४॥
न मारू इच्छितो ह्यांस मारितील जरी मज
विश्वसाम्राज्य सोडीन पृथ्वीचा पाड तो किती ॥३५॥
हे भलतेही करोत । आताचि आम्हा मारोत । परि आपण यांचा घात । मनीं न चिंतावा ॥२२५॥
त्रैलोक्यीचे निर्वेध येथ । जरी राज्य लाभत । तरि हे कर्म अनुचित । न आचरे मी ॥२२६॥
आज जर ऐसे करावे । तर कवणाचे मनीं उरावे? । सांग मुख कैसे पहावे । तुझे कृष्णा ? ॥२२७॥
ह्या कौरवांस मारूनि कायसे आमुचे प्रिय
अत्याचारी जरी झाले ह्यांस मारूनि पापचि ॥३६॥
वध करिन गोत्रजांचा । तर आसरा होऊन दोषांचा । मज लाभलासि तू हातीचा । दुरावशील ॥२२८॥
सर्व पातके कुलहरणीं । अंगीं जडती त्याकारणीं । त्यावेळी तुज कोठे कोणी । शोधावे सांग? ॥२२९॥
जैसा उद्यानीं अनळ । संचरला देखोनि प्रबळ । मग क्षणभरही कोकिळ । थांबेना तेथ; ॥२३०॥
चिखलभरले सरोवर । पाहूनिया चकोर । तेथ न राही क्षणभर । अव्हेरुनी निघे ॥२३१॥
त्यापरि मायेने चकवुनि देवा । माझेशी करिशील दुरावा । तर पुण्याचा ओलावा । नष्ट होई ॥२३२॥
म्हणूनि घात बंधूंचा आम्हा योग्य नव्हेचि तो
आम्ही स्वजन मारूनि सुखी व्हावे कसे बरे ॥३७॥
म्हणोनि मी हे न करी । या संग्रामीं शस्त्र न धरी । निंद्य कर्म हे बहुतपरी । दिसतसे ॥२३३॥
तुजसी अंतराय होईल । मग सांग आमुचे काय उरेल । त्या दुःखें ह्रदय फुटेल । तुजवीण कृष्णा ॥२३४॥
म्हणुनी कौरव हे वधावे । मग आम्ही भोग भोगावे । हे कधीही न घडावे । अर्जुन म्हणे ॥२३५॥
लोभाने नासली बुद्धि त्यामुळे हे न पाहती
मित्रद्रोहीं कसे पाप काय दोष कुलक्षयीं ॥३८॥
परी हे पाप टाळावे आम्हा का समजू नये
कुलक्षयीं महादोष कृष्णा उघड पाहता ॥३९॥
हे अभिमानमदें भुलले । जरि या संग्रामा आले । तरि आम्हा हित आपुले । जाणावे लागे ॥२३६॥
हे ऐसे कैसे करावे । आपलेचि आपण मारावे । जाणुनबुजुन घ्यावे । कालकूट ॥२३७॥
अहो वाट असता चालत । पुढे सिंह आला अवचित । तर तया चुकवुनि जाण्यात । हित आपुले ॥२३८॥
असता प्रकाश त्यजावा । मग अंधारकूपीं आश्रय घ्यावा । त्यामाजी काय देवा । लाभ सांग? ॥२३९॥
अथवा समोर अग्नि देखोनि । जर न जावे चुकवुनी । तर क्षणात तो घेरुनी । जाळू शके ॥२४०॥
तैसे दोष मूर्तिमंत । अंगीं आदळू पाहत । हे जाणताहि तेथ प्रवृत्त । कैसे व्हावे? ॥२४१॥
त्यावेळी म्हणे अर्जुन । हे पातक किता महान । देवा तुज सांगेन । ऐक आता ॥२४२॥
कुलक्षयें लया जाती कुलधर्म सनातन
धर्मनाशें कुळीं सर्व अधर्म पसरे मग ॥४०॥
जैसे काष्ठें काष्ठ घासुनी । तेथ उपजे एक वन्ही । तो जाळी प्रज्वळोनी । काष्ठजाता; ॥२४३॥
तैसा गोत्रास परस्पर । जर वध घडवी मत्सर । तर त्या महादोषें घोर । कुळचि नाशे ॥२४४॥
म्हणून या पापाने तेथ । धर्म लांपे परंपरागत । अधर्मचि माजुनी राहत । कुळामाजी ॥२४५॥
अधर्म माजतो तेव्हा भ्रष्ट होती कुलस्त्रिया
स्त्रिया बिघडता कृष्णा घडतो वर्णसंकर ॥४१॥
येथ विचार सारासार । योग्य-अयोग्य आचार । कर्तव्य - अकर्तव्य विचार । नष्ट होती ॥२४६॥
तेवत्या दीपा मालवावे । मग अंधारीं चाचपडावे । सरळ वाटेनेही ठेचाळावे । ज्यापरी की; ॥२४७॥
तैसा कुळीं कुलक्षय होय । आद्यधर्म लोपुनी जाय । उरे मग अन्य काय । पापावाचुनी? ॥२४८॥
जेथ यमनियम थोपती । तेथ इंद्रिये स्वैर विहरती । म्हणूनि व्याभिचार घडती । कुलस्त्रियांचे ॥२४९॥
उत्तम अधर्मीं संचरती । ऐसे वर्णावर्ण मिसळती । तेथे समूळ उखडती । जातिधर्म ॥२५०॥
बळी ठेविता चव्हाटयावर । येती कावळे चौफेर । तैसा महापापसंचार । कुळामाजी ॥२५१॥
संकरें नरका जाय कुलघ्नांसह ते कुळ
पितरांचा अध:पात होतसे श्राद्ध लोपुनी ॥४२॥
मग सर्व त्या कुळास । आणि कुळपातक्यांस । दोहोंसी नरकवास । अटळ असे ॥२५२॥
पहा वंशवृद्धी समस्त । यापरी होय पतित । मग पूर्वज स्वर्गस्थ । माघारे फिरती ॥२५३॥
नित्य धार्मिक कृत्ये जेथ । नैमित्तिकही लोप पावत । कोणी कोणा तेथ । अर्पावे तिलोदक? ॥२५४॥
तर पितर काय करिती । कैसे स्वर्गीं वसती । म्हणुनी तेही येती । कुळापाशी ॥२५५॥
जैसा नखाग्रीं सर्प डसे । मस्तकापर्यंत विष भिनतसे । ब्रहम्यापासुनि समस्त तैसे । बुडे कुळ ॥२५६॥
ह्या दोषांनी कुलघ्नांच्या होउनी वर्णसंकर
जातीचे बुडती धर्म कुळाचेहि सनातन ॥४३॥
ज्यांनी बुडविले धर्म कुळाचे त्यांस निश्चित
नरकीं राहणे लागे आलो ऐकत हे असे ॥४४॥
अरेरे केवढे पाप आम्ही आरंभिले असे
लोभें राज्यसुखासाठी मारावे स्वजनांस जे ॥४५॥
देव ऐका आणिक एक । तेथ घडे महापातक । तयाचे संसर्गें लोक । आचारभ्रष्ट होती ॥२५७॥
जैसी आपुल्या घरात । आग लागता अकस्मात । भडकुनी जाळुनि टाकित । आणिकही घरां; ॥२५८॥
तैशा त्या कुळासंगती । जे जे लोक वर्तती । तेही बाधा पावती । संसर्गाने ॥२५९॥
तैसे नाना दोषें सकळ । अर्जुन म्हणे ते कुळ । मग महाघोर केवळ । नरक भोगी ॥२६०॥
पडिल्यावरि त्या ठायी । मग कल्पांतीही सुटका नाही । एवढे पतन । कुलक्षयीं । अर्जुन म्हणे ॥२६१॥
देवा हे विविध ऐकतोसी । परि अजुनी ना त्रासलासी । ह्रदय वज्राचे काय केलेसी । ऐक देवा ॥२६२॥
ज्यास्तव राज्यसुख अपेक्षावे । ते तर क्षणिक आघवे । ऐसे जाणुनिहि का न त्यागावे । पातक हे? ॥२६३॥
हे वाडवडिल सकळ आपुले । वधावया त्यांसि पाहिले । सांग थोडे का पाप घडले । हेचि आम्हा? ॥२६४॥
त्याहूनि शस्त्र सोडूनि उगा राहीन ते बरे
मारोत मग हे युद्धीं शस्त्रांनी मज कौरव ॥४६॥
आता यावरी जे जगावे । त्याहुनी हेही बरवे । शस्त्रे टाकुनि सोसावे । बाण यांचे ॥२६५॥
यातुनी येईल तैसे । मरणही बरे असे । परि मज इच्छा नसे । त्या पातकांची ॥२६६॥
ऐसे देखोनि सकळ । अर्जुन आपुले कुळ । मग म्हणे राज्य ते केवळ । नरकभोग ॥२६७॥
संजय म्हणाला:
असे रणात बोलूनि शोकावेगात अर्जुन
धनुष्यबाण टाकूनि रथीं बैसूनि राहिला ॥४७॥
ऐसे त्या अवसरीं । अर्जुन बोलिला समरीं । संजय म्हणे, अवधारी । धृतराष्ट्राते ॥२६८॥
मग अत्यंत उद्वेगला । कंठीं गहिवर दाटला । उडी घालुनी आला । रथातुनी खाली ॥२६९॥
जैस राजपुत्र पदच्युत । सर्वथा निस्तेज होत । अथवा सूर्य राहूग्रस्त । प्रभाहीन; ॥२७०॥
अथवा महासिद्धींचे मोहांनी । तपस्वीही जाई भुलुनी । मग कामनेने ग्रासुनी । दीन होई; ॥२७१॥
तैसा तो पार्थ । दुःखजर्जर अत्यंत । त्यजियला रथ । जेव्हा तयाने ॥२७२॥
मग धनुष्यबाण टाकिले । अनावर अश्रू आले । ऐक राजा, ऐसे तेथ घडले । संजय म्हणे ॥२७३॥
आता यावरि तो वैकुंठनाथ । खिन्न देखोनि पार्थ । कोणेपरी परमार्थ । निरूपील; ॥२७४॥
ऐकावे त्या पुढिल कथेसी । सविस्तर कौतुकमय ऐसी । ज्ञानदेव म्हणे श्रोत्यांसी । निवृत्तिदास ॥२७५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP